प्रभावती–गुप्ता : ही गुप्त सम्राट ⇨ दुसरा चंद्रगुप्त आणि त्याची दुसरी महाराणी कुबेरनागा यांची कन्या. तिच्या जन्ममृत्यूविषयीच्या सनांबाबत इतिहासज्ञांत एकवाक्यता आढळत नाही. इ. स. ३९५ च्या सुमारास हिचा विवाह वाकाटकांच्या ज्येष्ठ शाखेतील द्वितीय रुद्रसेन याच्याशी झाला. द्वितीय चंद्रगुप्तास गुजरात, सौराष्ट्र आणि माळवा या भागांत अधिराज्य गाजवीत असलेल्या क्षत्रपांचा पराभव करून आपली पश्चिम भारतातील सत्ता निष्कंटक करावयाची होती. या कामी त्यास विदर्भाधिपती वाकाटकांचे साहाय्य झाले असले पाहिजे. या दोन राजघराण्यांतील ही राजकीय मैत्री विवाहबंधनाने दृढ करण्यात आली असावी. द्वितीय रुद्रसेनाने सु. पाच वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर, त्याचा प्रथम पुत्र दिवाकरसेन अल्पवयस्क असल्यामुळे, राजप्रतिनिधी म्हणून प्रभावती-गुप्ताने सु. पंधरा वर्षे (इ. स. ४०५–४२०) वाकाटक राज्याची धुरा मोठ्या कर्तबगारीने वाहिली. तिला सल्लामसलत देण्यासाठी दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी पाठविले होते. त्यांत कविकुलगुरू कालिदासाचा समावेश झाला असावा. युवराज दिवाकरसेनही अल्पायुषी ठरला. त्याच्या मृत्यूनंतर ४२० च्या सुमारास प्रभावती-गुप्ताचा द्वितीय पुत्र दामोदरसेन हा (द्वितीय) प्रवरसेन हे नाव धारण करून वाकाटक नृपती झाला. प्रभावती-गुप्ता रामगिरिस्वामीची उपासक असून दानशूर होती. पुणे येथे उपलब्ध झालेल्या तिच्या एका ताम्रपटावरूनच वाकाटकांचा काल प्रथम निश्चित करता आला.
दांडेकर, रा. ना.