प्रतिष्ठान : (फाउंडेशन). सामान्यपणे मानवतेच्या कल्याणासाठी स्थापन केलेली व त्याकरिता खाजगी धनाचा उपयोग करणारी संस्था म्हणजे प्रतिष्ठान होय. अखिल जगातील मानवजातीची सुस्थिती उंचावण्याचा प्रयत्‍न करणे हा रॉकफेलर प्रतिष्ठानाचा उद्देश सर्वसाधारणतः कोणत्याही प्रतिष्ठानामागे असतो. फार पूर्वीच्या काळीही प्रतिष्ठाने अस्तित्वात होती. त्यांमध्ये ईजिप्तच्या फेअरो राजांनी धार्मिक हेतूंकरिता निर्धारीत केलेली वर्षासने, ग्रीक व रोमनकालीन दाननिधी, तसेच ट्यूडरकालीन इंग्लंडमध्ये उभारण्यात आलेले धर्मादाय न्यासनिधी यांचा अंतर्भाव करता यईल. चर्चच्या मार्गदर्शनाखालील धर्मिक प्रतिष्ठाने यूरोपमध्ये अतिशय प्रभावी ठरली. त्यांच्याजवळ असलेली अफाट संपत्ती हे चर्च व शासन यांच्यामधील प्रदीर्घ काळ चाललेल्या संघर्षाचे एक महत्त्वाचे कारण होते.

सायमन द अथीनियनकडून देणगीदाखल मिळालेल्या जमिनीवरच प्लेटोने आपली प्रसिद्ध अकादमी उभारली (इ. स. पू. ३८७). या अकादमीशेजारी असलेल्या आपल्या स्वतःच्या जमिनीतून मिळणारे उत्पन्न अकादमीच्या कार्याकरिता सतत खर्च करण्यात यावे, असे प्लेटोने मृत्यूपूर्वी लिहून ठेवले होते. प्लेटोचे हे प्रतिष्ठान सु. ९०० वर्षे टिकले. सम्राट जस्टिनियनने ते इ. स. ५२९ मध्ये बंद करून टाकले. रोमन साम्राज्यकाळात, विशेषतः इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांत, गरजूंना साहाय्य करणारी प्रतिष्ठाने स्थापण्यात आली. ‘वक्फ’ सारखी चिरस्थायी धार्मिक स्वरूपाची वर्षासने इस्लामी राष्ट्रांत आढळतात. त्यांना महंमद पैगंबराने मान्यता दिली होती. मुस्लीम राष्ट्रांत वक्फ या प्रकारची प्रतिष्ठाने मोठ्या प्रमाणात आढळतात. हिटाइट संस्कृतिकाळात (इ. स. पू. १६००-१२००) न्यास विलेख (ट्रस्ट डीड) अस्तित्वात आले.

प्रतिष्ठानांचे प्रकार :(१)खाजगी प्रतिष्ठाने : या प्रतिष्ठांनाना त्यांच्या दात्यांची नावे दिलेली असतात आणि ती लोकांना विशेषपणे माहीत असतात. या प्रकारच्या प्रतिष्ठानांत ‘कार्नेगी कार्पोरेशन ऑफ न्यूयॉर्क’, ‘फोर्ड प्रतिष्ठान’, ‘रॉकफेलर प्रतिष्ठान’, ‘नोबेल प्रतिष्ठान’ इत्यादींचा अंतर्भाव होतो. काही खाजगी प्रतिष्ठानांच्या सनदा अशा प्रकारच्या असतात की, त्यांना शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक कल्याण यांसारख्या क्षेत्रांत निर्वेधपणे काम करता येते.

(२)व्यावसायिक प्रतिष्ठाने : (बिझिनेस फाउंडेशन्स). ही उद्योगसमूहांनी वा नामांकित उत्पादनसंस्थांनी उभारलेली असतात. त्यांची मत्ता फार मोठी नसते व ती या उद्योगांच्या औदार्यावर मुख्यत्वे अवलंबून असतात. उद्योगसमूहांच्याच आवडीचे क्षेत्र त्यांच्या प्रतिष्ठानांच्या कार्यातून प्रतिबिंबित होते. अशा प्रतिष्ठानांमध्ये ‘युनायडेड स्टेट्‌स स्टील प्रतिष्ठान’, ‘वेस्टींगहाउस शैक्षणिक प्रतिष्ठान’, ‘जनरल फुड्‌स फंड’ इत्यादींचा समावेश होतो.

(३)कार्यकारी प्रतिष्ठाने : (ऑपरेटिंग फाउंडेशन्स). बहुतेक प्रतिष्ठाने संघटनांना वा व्यक्तींना अनुदाने देऊन त्यांद्वारे कार्य करीत असतात. काही प्रतिष्ठाने स्वतःच संशोधनकार्य वा सेवाकार्यक्रम राबवितात. त्यांना कार्यकारी प्रतिष्ठाने म्हणतात. अशी प्रतिष्ठाने कायम कर्मचारीवर्ग नियुक्तकरतात अथवाएखाद्या प्रकल्पासाठी आवश्यक तो कर्मचारीवर्ग नेमतात. ‘ड्यूक एंडाउमेंट’ पहिल्या,तर ‘रसेल सेज प्रतिष्ठान’ दुसऱ्या वर्गात मोडते. रॉकफेलर व फोर्ड प्रतिष्ठाने ही अनुदाने देणारी व कार्यकारी अशी दुहेरी भूमिका बजावताना आढळतात.

(४)संघटना प्रतिष्ठाने : (युनियन फाउंडेशन्स). ही कामगार संघटनांनी स्थापन केलेली असून शिक्षण हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र असते. कित्येक प्रतिष्ठाने गरजू मुलांकरीता शिष्यवृत्त्या उपलब्ध करतात. तयार कपडे उद्योगाच्या कामगार संघटनांनी १९४७ मध्ये उभारलेल्या ‘सिडनी हिलमन प्रतिष्ठाना’ द्वारे हुषार विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात.

(५)समुह प्रतिष्ठाने व न्यास : (कम्युनिटी फाउंडेशन्स अँड ट्रस्ट्स). कम्यूनिटी ट्रस्ट कल्पनेचा उदय १९१४ मध्ये झाला. क्लीव्हलँड (ओहायहो राज्य) शहरातील फ्रेडरिक एच्. गॉफ या बँकव्यवसायीने असा न्यास १९१४ मध्ये उभारला. गॉफने अनेक व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणग्या व मृत्युपत्रित देणग्या एकत्रित करुन त्यांची मिळून एक लोकोपकारी संघटना बनवावी आणि त्या संघटनेद्वारे समाजाच्या गरजा भागविल्या जाव्यात, अशी एक योजना आखली. या योजनेनुसार अनेक प्रतिष्ठाने एकत्रितपणे येऊन कार्य करतात. समूह प्रतिष्ठान हे समाजाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक गरजा भागविण्याचा प्रयत्‍न करते, त्याचप्रमाणे समाजाचे आरोग्य व कल्याण यांबद्दलच्या समस्यांचे निराकरण करण्यातही ते प्रयत्‍नशील राहते. अशा प्रकारच्या समूह प्रतिष्ठानांची व न्यासांची संख्या अमेरिकेत १९७० च्या सुमारास २३० होती. ‘क्लीव्हलँड प्रतिष्ठान’, ‘न्यूयॉर्क कम्यूनिटी ट्रस्ट’, ‘हार्टफर्ड फाउंडेशन फॉर पब्लिक गिव्हींग’ ही अमेरिकेतील सर्वांत मोठ्या समूह प्रतिष्ठानांची व न्यासांची उदाहरणे होत.

प्रतिष्ठानांची कार्यक्षेत्रे : ज्यासमाजात ही प्रतिष्ठाने उभारलेली आहेत, त्यासमाजातीलअनेकविध समस्यांच्या निराकरणाकरिता ती कार्य करीत असलेली आढळतात. शिक्षण, आरोग्य व औषधे, शास्त्रीय संशोधन, समाजकल्याण, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, धर्म आणि मानव्यविद्या ही प्रमुख कार्यक्षेत्रे होत. ‘फाउंडेशन सेंटर’ ही संस्था १०,००० डॉलरवर वार्षिक अनुदाने देणाऱ्या अमेरिकेतील प्रतिष्ठानांचा अहवाल संकलित करीत असते. त्या अहवालानुसार १९६९ मध्ये सु. ६७७० लक्ष डॉ. अनुदान-रकमेपैकी ३०% शिक्षण, १७% विज्ञाने, १६% आरोग्य, १५% सामाजिक कल्याण, ११% आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, ६% धर्म आणि ५% मानव्यविद्या या क्षेत्रांत अनुदाने वितरीत करण्यातआली. १९६० पासून मानव्यविद्या व नागरी सुधारणा या क्षेत्रांसाठी देण्यात यावयाच्या अनुदान रकमांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे शिक्षण व सामाजिक कल्याण या क्षेत्रांसाठीच्या रकमांत घट झाली. जातिसंबंध, गुन्हेगारी, ओषधाशक्ती, गृहनिवसन, वाहतूक यांसारख्या नागरी समस्यांचे निराकरण करण्यात प्रतिष्ठानांनी अधिक लक्ष घातल्याचे आढळते. प्रतिष्ठानांनी ज्या विशिष्ठ क्षेत्रांवर अधिककरून लक्ष केंद्रित केले आहे, ती क्षेत्रे म्हणजे तांत्रिक साहाय्य, पारिस्थितिकी आणि लोकसंख्या-नियंत्रण ही होत. फोर्ड व रॉकफेलर प्रतिष्ठाने कृषिसंशोधनात अग्रेसर असून त्यांनी फिलिपीन्समधील ‘आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थे’त संशोधन केले आहे. लोकसंख्या-नियंत्रणकार्यात ‘लोकसंख्या परिषद’ (पॉप्युलेशन कौन्सिल) या संस्थेला वरील दोन प्रतिष्ठानांकडून मोठे साहाय्य मिळत असून त्यायोगे या संस्थेने जनांकिकी व तत्सम संशोधनक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे व ते अनेक परदेशी सरकारांना उपलब्ध करुन दिले आहे. अनेक मोठी प्रतिष्ठाने ऐतिहसिक परिरक्षण व संवर्धनक्षेत्रात कार्य करताना दिसतात. रॉकफेलर व मेलन प्रतिष्ठानांनी अनेक राज्यशासनांना उद्यानांकरिता प्रचंड प्रदेश विकत घेऊन देणग्यांच्या स्वरूपात दिलेले आहेत.

शिक्षण : या क्षेत्रामधील पुढील विभागांसाठी अनुदाने दिली जातात : प्रौढ शिक्षणाकरिता अध्यापक तयार करणे शैक्षणिक संस्थांच्या इमारती व उपकरणे शैक्षणिक संघटना शैक्षणिक संशोधन वर्षासने अधिछात्रवृत्त्या ग्रंथालये शैक्षणिक कार्यक्रमांची छपाई शिष्यवृत्त्या व कर्जे आणि व्यवसायशिक्षण. फोर्ड प्रतिष्ठानाने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य केले आहे. ‘कार्नेगी कॉर्पोरेशन’ या प्रतिष्ठानाने शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे यांमधील विज्ञान व गणित यांचे अध्यापन त्याचप्रमाणे तांत्रिक शिक्षणाचा दर्जा यांच्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रचंड अनुदाने दिलेली आढळतात. १९६० पासून या प्रतिष्ठानाने प्रारंभिक बालशिक्षण विकासावर, विशेषतः या प्रकारच्या शिक्षणात दूरचित्रवाणी माध्यमाचा प्रभावी उपयोग होऊ शकेलया विचारावर आवर्जून भर दिला आहे. ‘यू.एस्. स्टील प्रतिष्ठान’, ‘जनरल इलेक्ट्रिक शैक्षणिक व धर्मादाय निधी’, ‘युनियन कार्बाइड शैक्षणिक निधी’, ‘वेस्टिंगहाउस शैक्षणिक प्रतिष्ठान’, ‘फोर्ड मोटर कंपनी निधी’ यांसारख्या मोठ्या अमेरिकन उद्योगांनी उभारलेल्या प्रतिष्ठान-निधींनीही शाळा-महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणावर अनुदाने दिली आहेत.


आरोग्य व वैद्यकीय सेवा : या क्षेत्रात वैद्यकीय शिक्षण, परिचर्या, रुग्णालये, मानसिक आजार यांसारख्या विभागांचा अंतर्भाव होतो. प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सतत पडणारा तुटवडा दूर करण्याच्या दृष्टीने ‘कॉमनवेल्थ फंड’, ‘डब्ल्यू. के. केलॉग प्रतिष्ठान’, ‘मॉरिस फॉक मेडिकल फंड’ यांनी वैद्यकीय महाविद्यालयांना भरपूर अनुदाने व देणग्या दिलेल्या आहेत. ‘स्लोन प्रतिष्ठाना’ ने निग्रोंकरिता वैद्यकीय शिष्यवृत्त्या १९६० पासून सुरू केल्या आहेत. ‘केलॉग प्रतिष्ठान’ व ‘ड्यूक एन्डाउर्मेट’ यांनी परिचर्या अभ्यासक्रमाच्या विकासार्थ बहुमोल अर्थसाहाय्य केले आहे. फोर्ड प्रतिष्ठानाने १९५५ मध्ये अमेरिकेतील ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या सु. ३५०० स्वेच्छा-रुग्णालयांना २० कोटी डॉलरचे अनुदान देऊ केले. रॉकफेलर प्रतिष्ठानाने जंत, मलेरिया, पीतज्वर यांसारख्यारोगांविरुद्ध यशस्वी मोहिमा पार पाडल्या आहेत. ‘रॉबर्ट वुड जॉन्सन प्रतिष्ठान’ अमेरिकेतील आरोग्यसेवा शुश्रूषेची गुणवत्ता उंचवण्याबाबत अतिशय प्रयत्‍नशील आहे. ‘ॲल्बर्ट अँड मेरी लास्कर प्रतिष्ठान’ प्रतिवर्षी वैद्यकीय संशोधनार्थ अनुदाने देते. ‘बाल विकास प्रतिष्ठाना’ तर्फे अपंग (बधिर, मूक वगैरे) लोकांना आर्थिक साहाय्य केले जाते.

सामाजिक कल्याण : या क्षेत्रात पुढील बाबी येतात: वृद्ध, अपंग यांना अनुदाने बालकल्याण, समूह विकास, बालगुन्हेगारी व गुन्हेगारी यांचा प्रतिबंध,जातिसंबंधात सुधारणा, मनोरंजन, सामाजिक संस्था, वाहतूक व सुरक्षा आणि युवासंघटना या सर्वांसाठी अनुदाने उपलब्ध करून देणे. समूहविकास व स्थानिक समूहनेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम यांकरिता प्रायोगिक अनुदाने फोर्ड, फिल्ड, स्टर्न, सिअर्झ-रोबक इ. प्रतिष्ठानांनी दिली आहेत. ‘फील्ड प्रतिष्ठान’ व ‘रसेल सेज प्रतिष्ठान’ यांनी युवक आणि वृद्ध यांचे मानसिक, आरोग्यविषयक व सामाजिक प्रश्न सोडविण्याकरिता विविध कार्यक्रम हाती घेऊन ते यशस्वी करून दाखविले.

वैज्ञानिक संशोधन : केंद्र शासन ज्या शास्त्रीय प्रकल्पांना आर्थिक साहाय्य करीत नाही, अशांनाप्रतिष्ठाने मदत करतात. दुसऱ्या जागतिक महायुद्धापूर्वी रॉकफेलर प्रतिष्ठानाने कॅलिफोर्निया विद्यापिठात सायक्लोट्रॉन उभारण्याकरीता आर्थिक साहाय्य दिले होते. त्या प्रकल्प-संशोधनानुसार अणुबाँबनिर्मिती शक्य झाली. ‘राष्ट्रीय संशोधन संस्था’ (नॅचरल रिसर्च एजन्सी) या शास्त्रीय संशोधनास वाहिलेल्या संस्थेला ‘कार्नेगी कॉर्पोरेशन ऑफ न्यूयॉर्क’ अर्थसाहाय्य करते. केंद्रशासनाचे ‘राष्ट्रीय विज्ञान प्रतिष्ठान’ (नॅचरल सायन्स फाउंडेशन) हेही वैज्ञानिक संशोधनास मदत करते. ‘डॅनियल फ्लॉरेन्स गुगेनहाइम प्रतिष्ठाना’ने, रॉबर्ट गॉडर्ड या अमेरिकन भौतिकविज्ञान रॉकेट विज्ञानांच्या कार्यासाठी भरघोस आर्थिक साहाय्य देऊ केले. ‘जॉन ए. हार्टफर्ड प्रतिष्ठान’ अद्यापही आपल्या आर्थिक साहाय्याचा बराच मोठा वाटा वैद्यकीय संशोधनार्थ देत असते. ‘रिसर्च कॉर्पोरेशन’ ही संस्था नैसर्गिक विज्ञाने आणि सार्वजनिक आरोग्य व पोषण यांमध्ये विशेषेकरून लक्ष देत असते. ‘स्लोन प्रतिष्ठान’ हे जीवविज्ञानांमध्ये विशेष आस्था दाखविते.

मानव्यविद्या : यांमध्ये कला, वास्तुकला, इतिहास, भाषा-साहित्ये, वस्तुसंग्रहालये, संगीत, प्रयोगीय कला आणि तत्त्वज्ञान ह्या बाबी येतात. अनेक प्रतिष्ठाने आपल्या परिसरातील तसेच पब्लिक स्कूल व समूहकेंद्रे यांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांना आर्थिक साहाय्य देतात. अशा प्रतिष्ठानांत ‘लूइस डब्ल्यू. अँड मॉड हिल फॅमिली प्रतिष्ठान’, ‘क्लिव्हलॅंड प्रतिष्ठान’, ‘रॉकफेलर ब्रदर्स फंड’, ‘क्विन्सी प्रतिष्ठान’, ‘फोर्ड प्रतिष्ठान’, ‘रॉकफेलर प्रतिष्ठान’ इत्यादींचा समावेश होतो. ‘लिंकन सेंटर फॉर द पर्‌फॉर्मिंग आर्ट्‌स’ ही भव्य संस्था १८·२ कोटी डॉ. खर्चाने बांधण्यात आली. त्यांपैकी बरीचशी रक्कम रॉकफेलर, फोर्ड, ॲव्हलॉन, जॉन ए. हार्टफर्ड या खाजगी प्रतिष्ठानांनी देऊ केली. साहित्य व ललित कला यांच्या विकासार्थ ‘जॉन सायमन गुगेनहाइम मेमोरीयल प्रतिष्ठान’ अग्रेसर राहून कार्य करताना आढळते. ‘फोर्ड प्रतिष्ठान’ व ‘कार्नेगी कॉर्पोरेशन ऑफ न्यूयॉर्क’ ही प्रतिष्ठाने महाविद्यालये व विद्यापीठे यांमधील ललित कला प्रकल्प व कार्यक्रम तसेच विद्वत्ताप्रचुर ग्रंथ प्रकाशनार्थ भरघोस अर्थसाहाय्य करतात. ‘ए. डब्ल्यू. मेलन शैक्षणिक व धर्मादाय न्यास’ या संस्थेने वॉशिंग्टनमधील ‘राष्ट्रीय कलावीथी’ ची (नॅशनल आर्ट गॅलरी) स्थापना व संवर्धन करण्याकरिता दोन कोटी डॉ. ची उदार देणगी दिली आहे.

धर्म : या क्षेत्रात इमारती व उपकरणे, धार्मिक संघटना, धार्मिक शिक्षण, धर्मविषयक परिषदा, धर्मशास्त्र इत्यादींसाठी अनुदाने देण्यात येतात. ‘माक्स सी. फ्लिशमान प्रतिष्ठान’, ‘लिली एन्डाउमेंट’, ‘रिचर्ड किंग मेलन प्रतिष्ठान’, ‘रॉकफेलर ब्रदर्स फंड’ इ. प्रतिष्ठाने धार्मिक क्षेत्रात विशेष सर घेऊन अर्थसाहाय्य करतात. ‘एडवर्ड डब्ल्यू. हेझन प्रतिष्ठाना’ ने महाविद्यालयांतून धार्मिक शिक्षण चालू राहण्यासाठी आर्थिक साहाय्य मोठ्या प्रमाणावर केले आहे. रॉकफेलरच्या ‘सीलँटिक निधी’ या धर्मादाय संस्थेद्वारा धार्मिक शाळांना तसेच ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ थिऑलॉजिकल स्कूल’ या संस्थेला अर्थसाहाय्य होत असते.

नागरिकत्व : अनेक प्रतिष्ठानांनी या क्षेत्रास मदतीचा हात पुढे केला आहे. फोर्ड प्रतिष्ठान आणि त्यानेच स्थापिलेला ‘फंड फॉर द रिपब्लिक’ यांनी नागरिकत्व व लोकशाही ह्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याच्या उद्देशाने मोठी आर्थिक अनुदाने दिली आहेत.

आंतरराष्ट्रीय सामंजस्य : या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, आरोग्य व वैद्यकीय सेवा, आंतरराष्ट्रीय अध्ययन, शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार, निर्वासित साहाय्य तसेच तांत्रिक साहाय्य इ. बाबींचा अंतर्भाव होतो. केलॉग प्रतिष्ठानाने अशा प्रकारचे कार्य लॅटिन अमेरिकी देशांत केले आहे. फोर्ड व रॉकफेलर प्रतिष्ठानांनी भारत व इतर देश यांमधील भूकनिवारण (दुष्काळ) व लोकसंख्याधिक्य ह्यांविरुद्धच्या मोहिमांमध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेतल्याचे आढळते. ‘जेडीआर निधी-३’या प्रतिष्ठानाद्वारा तर इतर देशांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांना आर्थिक साहाय्य करणे हे एक विशेष कार्य समजले जाते. ‘कार्नेगी कॉर्पोरेशन’ व ‘फेल्प्स-स्टोक्स फंड’ ही प्रतिष्ठाने आफ्रिकी देशांमधील समस्यांच्या निवारणकार्यात गुंतलेली आहेत. १९१० मध्ये अँड्रू कार्नेगीने ‘कार्नेगी एन्डाउमेंट फार इंटरनॅशनल पीस’ हा दाननिधी स्थापन केला. हा निधी देशादेशांमधील ज्ञान व सामंजस्य यांची वाढ करावयास मदत करतो.

 इतर क्षेत्रे : प्रतिष्ठानांची इतरही अनेक कार्यक्षेत्रे आहेत. फोर्ड प्रतिष्ठानाने ‘रिसोर्सेस फॉर द फ्यूचर’ ही संस्था केली असून नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिरक्षण करणे हा तिचा प्रमुख हेतू आहे. ‘द ट्‌वेंटिएथ सेंचरी फंड’नावाची संस्था शहरांमधील कार्यक्रमांना तसेच प्रादेशिक नियोजन कार्यक्रमांना साहाय्य करते. ‘ब्यूहल प्रतिष्ठान’ हेही प्रादेशिक नियोजन कार्यक्रमांना भरघोस मदत देते.

अमेरिकेतील प्रतिष्ठाने : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये १७९१ साली बॉस्टन व फिलाडेल्फीया ह्या दोन शहरांत बेंजामीन फ्रॅंकलिनच्या मृत्युपत्रान्वये दोन निधी स्थापण्यात आले. आधुनिक प्रतिष्ठानांच्या विकास-विस्ताराला तेव्हापासूनच चालना मिळाली. एकोणिसाव्या शतकात २० लक्ष डॉलरहून अधिक रकमेचा निधी अमेरिकेमध्ये जॉर्ज पीबॉडी या उद्योगपतीने (१७९५-१८६९) दक्षिणेकडील दुष्काळग्रस्त राज्यांसाठी ‘पीबॉडी शिक्षण निधी’ या नावाने स्थापन केला (१८६७). १८८२ मध्ये निग्रोंकरिता दहा लक्ष डॉलरचा ‘जॉन एफ्. स्लेटर निधी’ उभारण्यात आला. अशाच प्रकारची पाच प्रतिष्ठाने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस उभारण्यात आली.


अमेरिकेत प्रतिष्ठान विकासाचे, विसाव्या शतकाची सुरुवात व दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ, असे दोन टप्पे आढळतात. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांच्या काळात प्रतिष्ठानांची उभारणी अनुक्रमे अफाट संपत्तीचा विनियोग व करबचती करणे या हेतूंनी झालेली दिसून येते. अमेरिकन प्रतिष्ठानांच्या संस्थापकांनी प्रतिष्ठानांना ‘फाउंडेशन’, ‘फंड’ (निधी), ‘ट्रस्ट’ (न्यास), ‘एन्डाउमेंट’ (वर्षासन), ‘कॉर्पोरेशन’ (निगम) आणि ‘सोसायटी’ (संस्था) अशी विविध नावे दिलेली आहेत. अशाच प्रकारची विविधता प्रत्येक प्रतिष्ठानाच्या निधीच्या विनियोगासंबंधी म्हणजे मूळ मुद्दल व व्याज यांच्या वापरासंबंधी आढळून येते.

अँन्ड्रू कार्नेगी ह्या दानशूर अमेरिकन उद्योगपतीने आपल्या द गॉस्पेल ऑफ वेल्थ (१८८९) ह्या प्रबंधाद्वारा धनिकांनी आपल्याजवळील संपत्ती आपल्या हयातीतच गरिबांच्या कल्याणार्थ खर्च करावी, समाजाकरिता त्या संपत्तीचा विनियोग करावा असे मत ठामपणे व्यक्त केले, त्याचबरोबर आपल्या नावाने अनेक प्रतिष्ठाने व निधी स्थापन केले. ‘प्रतिष्ठानांचे द्रव्यनिधी म्हणजे लोकोपकाराचे जोखीम भांडवलच होय’ (फाउंडेशन्स आर रिस्क कॅपिटल ऑफ फिलॅन्थ्रॉफी) या सुविख्यात सिद्धांताचा कार्नेगीनेच प्रसार केला. १९१० पर्यंत कार्नेगीने ‘कार्नेगी इन्स्टिट्यूशन ऑफ वॉशिंग्टन’ (१९०२), ‘कार्नेगी हीरो फंड कमिशन’ (१९०४), ‘द कार्नेगी फाउंडेशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ टीचिंग’ (१९०५) आणि ‘कार्नेगी एन्डाउमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’ (१९१०) असे चार प्रतिष्ठाननिधी स्थापना केले होते. १९११ मध्ये त्याने ‘कार्नेगी कॉर्पोरेशन ऑफ न्यूयॉर्क’ हे आपले मोठे प्रतिष्ठान स्थापना केले. ह्यास व परदेशांतील प्रतिष्ठानांस कार्नेगीने २० कोटी डॉ. दिले. याच सुमारास जॉन डी. रॉफेलर या उद्योगपतीने ‘रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च’ (आता ‘रॉकफेलर युनिव्हर्सिटी’ ह्या नावाने प्रसिद्ध) ही प्रतिष्ठानवजा संस्था स्थापली. पुढे १९१३ मध्ये सुविख्यात ⇨ रॉकफेलर प्रतिष्ठानाची स्थापना झाली. ह्या व इतर प्रतिष्ठानांना रॉकफेलर घराण्याने सु. ४७·८० कोटी डॉ. दिले. याच काळात ‘मिलबॅंक मेमोरियल फंड’ (१९०५), ‘रसेल सेज प्रतिष्ठान’ (१९०७), ‘न्यूयॉर्क प्रतिष्ठान’ (१९०९) यांसारखी प्रतिष्ठाने स्थापण्यात आली. १९२० च्या सुमारासअमेरिकेत सु. ८० प्रतिष्ठाने होती परंतु पुढील दहा वर्षांतच त्यांची संख्या २७० वर गेली. १९३० च्या पुढे महामंदीमुळे अनेक धनिक घराणीनष्टप्राय वा उद्ध्वस्त झाली. तरीही हेडन, केलॉग, एल्. पोमार, मेलन यांसारखी प्रतिष्ठाने उदयास आली.

प्रतिष्ठानांच्या विकासाचीदुसरी लाट १९४० पासून सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर आकारले जाणारे निगमांवरील कर तसेच व्यक्तिगत कर चुकविण्यासाठी किंवा करभार कमी करण्यासाठी देणगीदारांनी आपले करपात्र उत्पन्न धर्मादाय,शैक्षणिक व तत्सम कार्याकडे वळविले. धनाढ्य उद्योगपतींच्या कुटुंबियांना कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणावर संपदाकर भरण्याची पाळी आली, त्याचप्रमाणे आपल्या मालकीच्या निगमावरील (कॉर्पोरेशनवरील) नियंत्रण सोडण्याची वेळ आली. याचाच परिणाम नियंत्रण ठेवण्यासाठी कौटुंबिक प्रतिष्ठाने (फॅमिली फाउंडेशन्स) निर्माण होण्यात झाला. अनेक कौटुंबिक प्रतिष्ठानांची मत्ता प्रारंभीच्या काळात फार मोठी नसते. तथापि त्यांच्या संस्थापकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युपत्राप्रमाणे मोठ्या देणग्या त्या त्या प्रतिष्ठानाला मिळतात. सांप्रत ज्या अनेक प्रतिष्ठानांची मत्ता ३० कोटी डॉ. वर आढळते, ती प्रतिष्ठाने १९३० च्या पुढील काळात अतिशय तुटपुंज्या भांडवलावर उभारण्यात आली. अशा प्रतिष्ठानांत ⇨ फोर्ड प्रतिष्ठान, ‘ॲल्फ्रेड पी. स्लोन प्रतिष्ठान’, ‘लिली एन्डाउमेंट’, ‘केलॉग प्रतिष्ठान’ इत्यादींचा अंतर्भाव होता. ‘मूडी प्रतिष्ठान’, ‘सिड. डब्ल्यू.रिचर्डसन प्रतिष्ठान’, ‘रिचर्ड किंग मेलन प्रतिष्ठान’, ‘रॉकफेलर ब्रदर्स फंड’, ‘सॅरा मेलन स्कैफी प्रतिष्ठान’ यांसारखी प्रतिष्ठाने १९४० च्या पुढे अत्यल्प भांडवलावर स्थापण्यात आल्याचे आढळते. अमेरिकेतील प्रतिष्ठानांची १९६०-७० या दशकातील वाढ प्रतिवर्षी २,००० प्रमाणे होत गेल्याचे दिसते. याच काळात एक दशलक्ष डॉ. वर मत्ता असलेल्या प्रतिष्ठानांचा वाढीचा दर प्रतिवर्षी २४ होता. १९५०-६० व १९६०-७० या दोन दशकांत व्यवसायसंस्थांनी धर्मादाय म्हणून दिलेल्या देणग्यांमुळे कर बचत होऊ शकल्याचे दिसून आल्यावर अनेकमोठ्या उद्योगसमूहांनी निगम-प्रतिष्ठाने निर्माण केली. यांमध्ये ‘युनायटेड स्टेट्स स्टील’, ‘सिअर्झ-रोबक’, ‘एस्सो’ यांसारख्यांचा समावेश होतो.

अमेरिकेत १९६९ च्या कर सुधारणा कायद्यामध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या. या कायद्यानुसार खाजगी प्रतिष्ठानांनी मिळविलेल्या उत्पन्नावर ४% कर आकारण्यात आला. प्रतिष्ठान व्यवस्थापकांनी स्वतःसाठी पैसे वापरले, उत्पन्न वितरणात ढिलाई केली, सट्टेबाजीला उत्तेजन दिले आणि अनुदानांचा प्रभाव कायदेकानूवर अथवा निवडणुकांवर पडू दिला, तर व्यवस्थापकांना व संचालकांना जबर दंड भरावा लागण्याचीतरतूदही या कायद्यातकरण्यात आली. गेल्या काही वर्षांत अमेरिकन शासनाने अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठान पद्धती स्वीकारल्याचे दिसून येते. ‘राष्ट्रीय विज्ञान प्रतिष्ठान’ (नॅशनल सायन्स फाउंडेशन) हे जीवशास्त्र व भौतिकी यांमधील संशोधनासाठी अनुदाने देते ‘राष्ट्रीय कला व मानव्य प्रतिष्ठान’ हेही अशाच प्रकारचे शासनपुरस्कृत दुसरे प्रतिष्ठान होय.

अमेरिकेत सु. २५,००० प्रतिष्ठाने आहेत. त्यांची एकंदर मत्ता सु. २,००० कोटी डॉलरची असून त्यांपैकी ३३ टक्के प्रतिष्ठानांचीएकंदर मत्ता२ लक्ष डॉ. वा अधिक अशी आहे. ही प्रतिष्ठाने प्रतिवर्षी १५० कोटी डॉलरहून अधिक रक्कम अनुदानस्वरूपात वितरीत करतात.

 

अमेरीकेतील अग्रेसर प्रतिष्ठाने, त्यांची स्थापना – वर्षे व एकंदर मत्ता (आकडे कोटी डॉ. मध्ये) पुढीलप्रमाणे आहे : (१) फोर्ड प्रतिष्ठान- १९३६ ३,१४,५५,७९,००० (२) रॉबर्ट वुड जॉन्सन प्रतिष्ठान- १९३७ १,३०,१९,४८,००० (३) लिली एन्डाउमेंट- १९३७ १,२४,२६,०५,००० (४) रॉकफेलर प्रतिष्ठान- १९१३ ८४,०४,८७,००० (५) क्रेसगी प्रतिष्ठान- १९२४ ६५,७९,५३,००० (६) ॲंड्रू डब्ल्यू. मेलन प्रतिष्ठान- १९६९ ६३,६०,३८,००० (७) प्यू मेमोरियल ट्रस्ट- १९४८ ५८,१७,३३,००० (८) डब्ल्यू. के. केलॉग प्रतिष्ठान- १९३० ५७,७३,२८,००० (९) कार्नेगी कॉर्पोरेशन ऑफ न्यूयॉर्क- १९११ ३३,६४,५३,००० (१०) मॉट प्रतिष्ठान- १९२६ ३२,२२,४८,००० (११) स्लोन प्रतिष्ठान-१९३४ २८,४३,२८,००० (१२) रॉकफेलर ब्रदर्स फंड- १९४० २२,९९,७६,००० (१३) डॅनफोर्थ प्रतिष्ठान- १९२७ १९,७५,१३,००० (१४) कॉमनवेल्थ फंड- १९१८ ११,०८,८४,००० (१५) जॉन सायमन गुगेनहाइम स्मृतिप्रतिष्ठान- १९२५ १०,३८,५९,०००.

 

अमेरिकेबाहेरील प्रतिष्ठानांचा विकास : ग्रेट ब्रिटन, प. जर्मनी यांसारख्या देशांत प्रतिष्ठान चळवळीचा सर्वाधिक विकास झाल्याचे दिसून येते. विसाव्या शतकारंभी ग्रेट ब्रिटनमध्ये ‘कार्नेगी डन्फर्मलाइन ट्रस्ट’, ‘कार्नेगी हीरो फंड ट्रस्ट’, ‘कार्नेगी ट्रस्ट फॉर द युनिव्हर्सिटिज’ ऑफ स्कॉटलंड’ व ‘युनायटेड किंग्डम ट्रस्ट’ असे चार कार्नेगी न्यास उभारण्यात आले. ‘नफील्ड प्रतिष्ठान’ १९४३ मध्ये ८२० लक्ष डॉ. भांडवलावर उभारण्यात आले. या पाचही संस्था सर्वांत मोठ्या समजल्या जातात. अन्य उल्लेखनीय ब्रिटिश प्रतिष्ठानांमध्ये ‘टॉम्पसन प्रतिष्ठान’, ‘लिव्हर-ह्यूम ट्रस्ट’, ‘पिल्‌ग्रिम ट्रस्ट’, ‘वूल्फसन प्रतिष्ठान’ यांचा समावेश होतो. प. जर्मनीमध्ये १९५० पासून प्रतिष्ठानांत संख्यात्मक वाढ झाली. १९७० मध्ये त्या देशात ३,००० प्रतिष्ठानांची एकत्रित एकंदर मत्ता १०० कोटी डॉलरवर होती. त्यांमध्ये ‘फोक्सवॅगेन प्रतिष्ठान’ (स्था. १९६१) हे सर्वांत मोठे असून त्याची एकूण मत्ता २,५०० लक्ष डॉ.हून अधिक होती. हे प्रतिष्ठान सर्व विद्याशाखांमधील संशोधनाला मदत करते, तसेच विज्ञाने व शिक्षण यांच्या आधुनिकीकरण-कार्यक्रमावर अधिक भर देते. इतर महत्त्वाच्या जर्मन प्रतिष्ठानांमध्ये ‘क्रप प्रतिष्ठान’ (एकूण मत्ता १२५० लक्ष डॉ.), ‘बोश प्रतिष्ठान’, ‘कार्ल त्सिस प्रतिष्ठान’, ‘कार्ल्सबर्ग प्रतिष्ठान’, ‘फ्रिट्‌स टिसेन प्रतिष्ठान’ यांचा अंतर्भाव होतो. इटलीमध्ये १९६० च्या पुढे प्रतिष्ठानांच्या संख्येत वाढ होत गेली. ‘जोव्हान्नी आग्नेली प्रतिष्ठान’ (एकूण मत्ता ८० लक्ष डॉ.), ‘जॉर्जो सिनी प्रतिष्ठान’ (६५ लक्ष डॉ.), ‘ऑलिव्हेत्ती प्रतिष्ठान’ ही तेथील महत्त्वाची प्रतिष्ठाने होत. कॅनडामध्ये सु. २०० प्रतिष्ठाने असून त्यांपैकी सहा प्रतिष्ठानांची एकूणमत्ता १९७० मध्ये प्रत्येकी एक कोटी डॉलरवर गेली होती. माँट्रिऑल येथील ‘एल्. डी.’ व ‘माकोनेल’ प्रतिष्ठाने आणि व्हॅंकूव्हर येथील ‘डॉनर कॅनडियन’, ‘जे. पी. बिकेल’, ‘ॲटकिन्सन धर्मादाय प्रतिष्ठान’ आणि ‘व्हॅंकूव्हर प्रतिष्ठान’ ही कॅनडाची उल्लेखनीय प्रतिष्ठाने होत. कॅनडियन संसदेने उभारलेले ‘कॅनडा कौन्सिल’ हे सर्वांतमोठेप्रतिष्ठान होय.त्याची १९७० मधील एकंदर मत्ता ७६० लक्ष डॉ. असून मुख्यालय ओटावा तेथे आहे. कॅलाउस्ते सार्‌कीस गुल्बेन्‌कियन या कोट्याधीश पोर्तुगीज तेलकारखानदाराने लिस्बन येथे ‘कॅलाउस्ते गुल्बेन्‌कीयन प्रतिष्ठान’ उभारले असून त्याची एकंदर मत्ता १९७० मध्ये ३० कोटी डॉलरवर होती. या प्रतिष्ठानाचा मुख्य उद्देश धर्मादाय तसेच कला, शिक्षण व विज्ञान यांना साहाय्य करणे हा असून त्याच्यामार्फत मध्य पूर्वेकडील देश व अखिल जगातील आर्मेनियन समाजासाठी मदत कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

गद्रे, वि. रा.


 भारत :भारतातील प्रतिष्ठानांना एकोणिसाव्या शतकापासूनची परंपरा आहे. भारतीयनोंदणी अधिनियम, १९६० व भारतीय न्यास अधिनियम, १८८२ यांनुसार भारतातील प्रतिष्ठाने व न्यास यांचे नियमन केले जाते. भारतीय समाजाच्या गरजा लक्षात घेऊन अनेक सेवाभावी व्यक्तींनी तसेच संघटनांनी मोठ्या रकमा जमा करून आधुनिक काळात प्रतिष्ठाने व न्यास स्थापन केले.

ज्या संघटनांचे कार्य कला, नैसर्गिक व सामाजिक विज्ञाने, खेळ, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या क्षेत्रांशी निगडित आहे आणि ज्या कार्यात वैयक्तिक फायदा अभिप्रेत नाही, अशा संघटनांना भारतीय नोंदणी अधिनियमाखाली संस्था म्हणून नोंदणी करून घ्यावी लागते. सार्वजनिक न्यास अधिनियमाखालीही त्यांना सक्तीने नोंद करावी लागते. भारतातील अनेक राज्यांत सार्वजनिक न्यास अधिनियम केलेले आहेत. उदा., महाराष्ट्रात मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम,  १९५० आहे. त्याखाली कोणत्याही प्रतिष्ठानाची स्वतंत्रपणे नोंद करता येते [→ नोंदणी].

 

भारतात खाजगी व सार्वजनिक अशी दोन प्रकारची प्रतिष्ठाने आहेत. मृत्युपत्रान्वये व्यक्तीला आपल्या खाजगी मालमत्तेचे प्रतिष्ठान स्थापन करता येते व अज्ञान वारस सज्ञान होईपर्यंत सर्व मालमत्ता विश्वस्तांकडे सोपवून त्याची देखरेख करता येते [→ विश्वस्त पद्धति]. ही खाजगी प्रतिष्ठाने होत. परंतु आयकरातील सवलतींचा फायदा घेण्याकरिता अनेक धनिकांनी खाजगी प्रतिष्ठाने स्थापन केली आहेत. आयकरविषयक सवलतींचा दुरुपयोग होत असल्याने १९८०-८१ सालापासून अशा खाजगी प्रतिष्ठानांना मिळणारी सवलत सरकारने काढून घेतली आहे. खाजगी प्रतिष्ठाने विधिदृष्ट्या जरी प्रतिष्ठाने असली, तरी त्यांपासून मिळणारे उत्पन्न त्यांच्या कुटुंबियांनाच मिळते ते सार्वजनिक कार्यास उपयोगी पडत नाही.

गांधी स्मारक निधीने स्थापिलेल्या ‘गांधी शांतता प्रतिष्ठाना’च्या भारतामध्ये ४५ शाखा असून त्यांमार्फत विविध उपक्रमांद्वारा गांधीजींच्या ध्येयवादाचा प्रसार केला जातो. देशातील सर्वांत जुने प्रतिष्ठान म्हणून ‘जे. एन्. टाटा एन्डाउमेंट फॉर हायर एज्युकेशन’ याचा उल्लेख करता यईल. हे प्रतिष्ठान १८९२ साली स्थापन झाले. त्याचा सु. एक हजार विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी फायदा मिळाला असून त्याकरिता या प्रतिष्ठानाने सु. एक कोटी रुपयांचा विनियोग केला आहे. याखेरीज टाटा उद्योगसमूहाने ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ (१९१८), ‘लेडी मेहेरबाई डी. टाटा एज्युकेशन ट्रस्ट’ (१९३२), ‘लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट’ (१९३२), ‘लेस्ली सॉहनी मेमोरियल ट्रस्ट’ (१९६८) इ. प्रतिष्ठाने निर्माण केली असून त्यांद्वारे शिक्षण, आपद्‌ग्रस्तांसाठी साहाय्य, वैज्ञानिक संशोधन, सामाजिक व औद्योगिक कल्याणकार्य अशी कामे केली आहेत. टाटा उद्योगसमूहाच्या न्यासातूनच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर ⇨ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, मुंबई ⇨ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई अशा नामवंत आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संस्था उभ्या राहिल्या. प्रतिष्ठानांच्या बाबतीत टाटा उद्योगसमूहाची कामगिरी मोलाची आहे [→ टाटा घराणे].

बिर्ला उद्योगसमूहानेही प्रतिष्ठाने निर्माण करून सामाजिक कार्य केले आहे. राजस्थान राज्यातील पिलानी येथे त्याने मोठी तंत्रविद्या तथा विज्ञान संस्था निर्माण करुन अद्ययावत तांत्रिक शिक्षण देण्याची सोय केली आहे. त्याचप्रमाणे अर्थशास्त्रातील संशोधनासाठी दिल्ली येथे एक स्वतंत्रसंस्था व कलकत्ता येथे अंतराळनिरीक्षणासाठी कृत्रिम तारामंडळ उभारले आहे. [⟶ बिर्ला घराणे]. जैन उद्योगसमूहाने भारतीय ज्ञानपीठ न्यास उभारून त्याच्यातर्फे दरवर्षी एक लाख रुपयांचे पारितोषिक भारतातील एका थोर साहित्यिकाला देण्यास १९६५ पासून आरंभ केला.

 

महाराष्ट्रातील अनेक उद्योगसमूहांनीही प्रतिष्ठाने स्थापून सामाजिक सेवा केली आहे. किर्लोस्कर प्रतिष्ठानाच्या वतीने लहान कारखानदारांना बॅंकेकडून कर्ज मिळविण्यासाठी पूर्वी जामीन दिला जात असे आता अनेक विषयांतील प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतात [→ किर्लोस्कर घराणे]. गरवारे धर्मादाय न्यासाच्या वतीने अनेक शिक्षणसंस्थांना, अनेक रुग्णालयांना देणग्या देण्यात येतात. इचलकरंजीचे उद्योगपती पंडितराव कुलकर्णी ह्यांनी स्थापिलेल्या ‘फाय प्रतिष्ठान’ तर्फे प्रतिवर्षी एक लाख रुपयांचे बक्षीस देशातील कोणत्याही सामाजिक क्षेत्रातील सेवा करणाऱ्या थोर व्यक्तींना दिले जाते. याखेरीज उद्योग, शास्त्रीय संशोधन, कला, साहित्य या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी रु. २५,००० ची अनेक पारितोषिके दिली जातात. पारखे उद्योगसमूहाने कागद उद्योगातील उच्च संशोधनासाठी ‘पारखे संशोधन प्रतिष्ठाना’ ची स्थापना केली आहे. ‘गोपाळराव पारखे पारितोषिक प्रतिष्ठान’ प्रतिवर्षी नव्या होतकरू उद्योजकांना पारितोषिके देते पारखे उद्योगसमूहपुरस्कृत ‘गदिमा प्रतिष्ठान’, ‘मातुश्री माईसाहेब न्यास’, ‘श्री. एंजल्स मेमोरियल ट्रस्ट’ ह्यांद्वारा गोधन संवर्धन, शैक्षणिक शिष्यवृत्या इ. लोकोपकारी कार्ये चालू असतात. वालचंद उद्योगसमूहाच्या ‘वालचंद स्मारक न्यासा’तर्फे सांगलीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला भरघोस आर्थिक साहाय्य मिळाले आहे.


कराडजवळच्या रेठेरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याने स्थापिलेल्या ‘कृष्णा न्यासा’तर्फे एका मोठ्या रुग्णालयाच्या उभारणीचे काम चालू आहे. डेक्कन स्पिनिंग मिल्सनेही स्थानिक शेतकरी, शिक्षणसंस्था ह्यांच्या साहाय्यार्थ एक प्रतिष्ठान उभारले आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजना, आधुनिक शेतीची तंत्रे, नवीन बीबियाणे, जनावरांची पैदास इत्यादींसाठी अनेक प्रतिष्ठाने निघाली आहेत. त्यांत प्रामुख्याने पुणे शहराजवळील उरुळी कांचन येथील ‘भारतीय कृषि उद्योग प्रतिष्ठान’ उल्लेखनीय आहे. हे प्रतिष्ठान भारतात व परदेशांत संशोधनसंस्था म्हणून मान्यता पावले असून ग्रामीण भागातील अर्धबेकारी दूर करण्याच्या उद्देशाने किफायतशीर स्वयंरोजगार व्यापक प्रमाणावर उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रम गोधन व कृषिविकास माध्यमांतून राबवीत आहे. गोधनाचा रोगांपासून बचाव करण्याकरिता पुणे-नगर रस्त्यावर वाघोली गावाजवळ दुसरा संशोधन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. बारामती, श्रीरामपूर, नायगाव, कोसबाड, वारणानगर येथील प्रतिष्ठाने शेतीविकासाबाबत प्रयत्‍नशील आहेत.

 प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे ह्यांनी स्थापिलेले ‘पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान’ (१९६५) उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय सांस्कृतिक उपक्रमांच्या वृद्धीसाठी तसेच अंध व महारोगी यांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांना या प्रतिष्ठानातर्फे साहाय्य केले जाते.

 आरोग्यविषयक संशोधनासाठी दिलेल्या देणग्यांना शंभर टक्के आणि काही बाबतीत त्यांहूनही अधिक प्रमाणात आयकरातून सूट मिळते. त्यामुळे अनेक प्रतिष्ठाने उभी राहत असून त्यांतून सार्वजनिक रुग्णालये उभारली जात आहेत. या दृष्टीने सौ. शालिनीताई पाटील यांचे ‘राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान’ उल्लेखनीय आहे. त्याच्यामार्फत महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे.

पहा: धर्मादाय न्यास.

संदर्भ : 1. Lewis, Marianna, Ed. The Foundation Directory, New York, 1975.

            2. Nielsen, Waldemar, A. The Big Foundations, New York, 1972.

गद्रे, वी. रा. साबडे, भा. र.