प्रतिरोगचिकित्सा : (आयुर्वेद). प्रत्येक रोगामध्ये चिकित्सेच्या मूलगामी तत्त्वांचा उपयोग प्रायः कारणानुरूप, संप्राप्त्यनुसार रोगाच्या स्थानपरत्वे व अवस्थांनुसार चिकित्सेच्या वेळी करावयाचा असतो. यांखेरीज अनेक मुद्यांचा बारकाईने आणि योग्य चिकित्सेसाठी विचार करावा लागतो. प्रस्तुत नोंदीत काही प्रमुख विकारांच्या चिकित्सेचा थोडक्यात विचार केलेला आहे.

अतिसार : या विकारात वातादि दोषांच्या प्रकोपामुळे वाढलेला अप् धातू जाठराग्नीला मंद करून पुरीष मलामध्ये मिसळून त्याला पातळ करुन अपान वायूमध्ये प्रेरित होऊन वारंवार गुदमार्गे अतिशय प्रमाणात बाहेर पडतो. यामुळे अशा तऱ्हेने होणाऱ्या अतिसाराची संप्राप्ती मोडण्यासाठी प्रायः दीपन-पाचन द्रव्यांनी अग्निवर्धन करणे, अप् धातूचे शोषण करणारी रुक्ष-उष्ण-कषाय-तिक्त गुणरसांची द्रव्ये वापरणे, स्तंभन करणारी द्रव्ये वापरणे ही प्रमुख चिकित्सा असावी. अतिसार आमाशयान्वयी असल्याने वातज अतिसारातही थोडेसे लंघन करावे.

अवस्थांनुसार ही चिकित्सा थोडीशी वेगवेगळी असेल. उदा., आमतिसारात बिघडलेले मलरूप दोष आपोआप बाहेर जात असले, तर जाऊ द्यावेत. रोगी बलवान असेल आणि दोष अडकत बाहेर जात असतील, पोट जड व फुगलेले शूलयुक्त असेल, तर दोष व मल लवकर निघून जाण्यासाठी हरीतकीसारखे जरूरीप्रमाणे विरेचन द्यावे. दोष फार नसतील, तर मध्यम व अल्प दोषांना दीपन-पाचन-आहार-औषधे द्यावीत. अल्प दोषांना लंघनोपचार करावेत. अशक्त, रोगी, लहान मुले, वृद्ध, राजयक्ष्म्यासारख्या विकारांत मोठे जुलाब होतील, तर स्तंभक औषधे देऊन जुलाब थांबवावेत. याशिवाय उगीचच अगर भीतीने वारंवार स्तंभन औषधे दिल्यास शोथ, प्लिहावृद्धी, उदर, अलसक, आध्मान, संग्रहणी, अर्श इ. विकार होतात.

याप्रमाणे रोग्यांचे बल व दुष्ट दोषांचे प्रमाण यांच्या विचाराबरोबर अतिसारातील मल साम अगर निराम आहे याचा विचार करुन चिकित्सा करणे जरुर आहे. निराम दोष झाल्यानंतर त्या त्या दोषदुष्यनुसार दोषांचा विचार करुन चिकित्सा करावी. रक्तातिसारात वाताच्या वा कफाच्या अनुबंधाचा विचार करून त्या दोषानुबंधानुसार रक्त बंद करणारी व अतिसार घालवणारी औषधे द्यावीत. एकान्त रक्तातिसारावर शीतगुणाची व स्तंभन करणारीच औषधे व आहार द्यावा. त्रिदोषाने होणाऱ्या अतिसारात प्रथम वायू, नंतर पित्त व शेवटी कफ या अनुक्रमानेअगर जो दोष बलवान असेल त्यावर उपचार प्रथम करावेत. प्रायः तीव्र जुलाब, ओकारी, ताप, तृष्णा, मोह-मूर्च्छा-आघ्मान व रक्तस्त्राव या उपद्रवांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. कारणानुसार म्हणजे विष पोतात जाणे, कृमी, मृद्‍भक्षण, दुष्ट पाणी, अति-मद्यपान यांचा विचार करूनही ही चिकित्सा करावी लागते. मानसिक शोक, भिती इ. कारणांनी प्रायः वातप्रकोप होऊन रक्त दुष्ट होऊन ते दोषासह गुदमार्गाने बाहेर येऊन अतिसार होतो म्हणून यावर सामान्य अतिसारचिकित्सा करून शिवाय मन प्रसन्न राखणे, आश्वासन देणे, भीती-शोक याचे कारण दूर करणे इ. उपचार करणे आवश्यक आहे. मलमूत्रोपचार वेगळा होणे, अपानानुलोमन, अग्नी दीप्त होणे, पोट हलके वाटणे ही लक्षणे झाली म्हणजे अतिसार बरा झाला असे समजावे. अतिसारावरील प्रथ्यापथ्य विकार पूर्ण बरा होईपर्यंत पाळावे. [⟶ अतिसार].

प्रवाहिका : या विकारात वायूचे स्थान जे पक्वाशय त्यात कफाचा प्रकोप होऊन वायू वारंवार प्रवाहणयुक्त असे वेग निर्माण करतो. हा अतिसाराचाच भेद आहे. वायू व कफ या दोषांना शमविणारे इलाज करावे लागतात. अगदी प्रथमावस्थेत दोषसंचय खूप असेल, तर एरंडेलासारखे, हरीतकीसारखे शोधन देऊन पक्वाशय शुद्ध करावा. नंतर शेष दोषांसाठी अगर दोष अल्प असतील, तर दीपन-पाचन अशी औषधे द्यावीत. वाताधिक्याने अतिशय शूल (मुरडा) असेल, तर मुस्ता-शुंठी-बडीशेप यांसारख्या द्रव्यांनी सिद्ध दूध-ताक-खल-सांभारे द्यावे. पक्वाशयावर पोटीस, शेक इ. उपचार करावेत. सरक्त प्रवाहिका असेल, तर शेळीच्या दुधावर ठेवून रक्तस्तंभक-दीपन-पाचन करणारी औषधे द्यावीत. नेहमी स्नेह बस्ती द्यावा.

अतिशय कुंथल्यामुळे होणारा गुदभ्रंशासारख्या उपद्रवावरही उपचार करणे आवश्यक आहे. या विकारात पथ्यापथ्य बरेच दिवस ठेवावे लागते. विशेषेकरून समुद्रकाठची हवा व आनूप देश या विकारास अधिक त्रासदायक आहेत. लहान मुले, वृद्ध यांना होणाऱ्या तीव्र प्रकारच्या प्रवाहिकेच्या विकारात काळजीपूर्वक चिकित्सा करावी. बेलकाचरी मुस्ता-सुंठ-वाळा-कुडा-कुचला-भल्लातक-नागकेशर कोकंब तेल- सिद्धतेल – धूत इ.द्रव्ये तसेच शंखोदर संजीवनी वटी, आनंदभैरव, कुटजारिष्ट इ. सिद्धौषधे या विकारात अवस्थानुरूप उपयुक्त आहेत. प्रवाहिकाबरी झाल्यानंतर शक्तिवर्धक व अग्निवर्धक असे उपचार पूर्ववत बल येईपर्यंत करावेत.

अम्लपित्त : या विकारात पित्तप्रकोप कारणामुळे तसेच वारंवार होणाऱ्या विदग्धाजीर्णामुळे पित्त अधिक होऊन घशाशी जळजळणे, विपाक, अम्लोद्‌गार इ. लक्षणासहित मुखावाटे आंबट, कडू चवीचे पित्त बाहेर पडते. कधीकधी न पचलेले अन्नही पडते. काश्यपाचार्यांनी वर्णन केल्याप्रमाणे आमाशयाची विशिष्ट दुष्टी झाल्यामुळे कोणताही पदार्थ पोटात गेला की, त्याचे अम्लरसात रूपांतर होते. कधीकधी अधिक झालेले पित्त अघोग मार्गाने एक-दोन जुलाब होऊन पडून जाते. थोडक्यात, योग्य तऱ्हेने अन्नाचे पचन न होणे, पित्ताधिक्य होणे, आमाशयाची विशिष्ट दुष्टी यांचा विचार चिकित्सेत करावयास हवा.

प्रथम अजीर्णामुळे साठलेले दुष्ट पित्त निघून जाण्यासाठी पितघ्न व वमन करणाऱ्या औषधांनी आमाशयशुद्धी करावी. शेषदोषशोधनासाठी भूनिंबदि काढा, नंतर काही दिवस सौम्य विरेचन औषधे देऊन कोष्ठ शुद्ध झाल्यावर अम्लपित्ताचे शमन करणारी द्रव्ये द्यावयास हवीत. आमाशय दुष्टी (अम्लपित्तामुळे आमाशयात शोथ, दाह, व्रण इ. होतात.) घालविण्यासाठी अग्निमांद्य घालविणारी औषधे देणे जरूर आहे.

अम्लपित्तात प्रायः सूतशेखर, शंखभस्म, मौक्तिकभस्म, प्रवाळ, कामदुधा इ. पित्तशमन करणारी सामुद्रादी चूर्णे अविपत्तिकर चूर्ण, भास्कर-लवण चूर्ण इ. पाचक व पित्ताचे अम्लत्व घालविणारी औषधे त्रिफळा, हरीतकी, मनुका, आवळकठी, निशोत्तर इ. पित्तशोधन करणारी औषधे कूष्मांडपाक, नारिकेलपाक इ. कोष्ठबलवर्धक योग अवस्थांनुसार अम्लपित्त विकारात वापरावेत. दोषांचे अधिक्य पाहून चिकित्सा करावी.


अम्लपित्त विकारात पथ्यापथ्याला फारच महत्त्व आहे. वंद्याला मोहात टाकणारा हा विकार आहे. कारण प्रतिरुग्णात व रोगाच्या विशेष स्वरूपामुळे एका रुग्णास जे पदार्थ मानवतात तेच दुसऱ्या रुग्णास हा रोग वाढविणारे होतात. विशेषतः आंबट-तिखट रसांचे पदार्थ पित्त वाढवितात म्हणून अम्लविपाक होणारे पोहे-भात-कुळीथ-तुरडाळ-मसाल्याचे पदार्थ-गूळ-तेल-चहा कॉफी-कोको-थंडगार पदार्थ इ. काही घेऊ नयेत. शौचाला अवरोध होणे, जागरण, ऊन, अवेळी खाणेपिणे इ. कुपथ्ये कटाक्षाने टाळावीत. [⟶ अम्लपित्त].

उदरविकार : मेदोवृद्धी, गुल्म, गरोदरावस्था, अतिभोजन इ. उदरवृद्धी करणाऱ्या अवस्था सोडून अतिशय वाढलेले दोष उदरात साठून ज्या वेळी उदरवृद्धी होते, अशा वेळी त्या विकारास ‘उदर’ असे म्हणतात. सर्व तऱ्हेच्या उदरांचे अखेरीस जलोदरात रूपांतर होते. [⟶ जलोदर]. हा उदरविकार अग्निमांद्य-अजीर्ण-मलसंचय-स्त्रोतोरोध-प्राण, अपान, समान वायूची दुष्टी-उदकान्नवह स्त्रोतसेक्लेद-स्वेद-पाचक पित्त इत्यादींची दुष्टी होऊन व संप्राप्त्यनुसार उदरस्थ त्वङ्‌मांसांत्रांमध्ये दोषसंचय होऊन होतो. चिकित्सा-मुख्यत्वे मलसंचय व स्त्रोतोरोध घालविणारी शोधन औषधे, अग्निदीपक व पाचक औषधे, प्राण-अपान-समान यांची गती योग्य करणारी (अनुलोमक) औषधे अशा प्रकारची असते. रेचक हा प्रमुख उपचार आहे.

सामान्यपणे प्रथम दोषाधिक्य विचारात घेऊन जरूर तर स्नेहस्वेद करून शोधन करावे. रुग्णाची स्त्रोतः शुद्धी, बललाभ, मलसंचिती न व्हावी, अनुलोमन व्हावे यासाठी रोग्याला उंटिणीचे किंवा गायीचे दूध हाच आहार द्यावा. शोधनासाठी जरुरीप्रमाणे एरंडेल, गोमूत्र, पटोलादि काढा, नारायण चूर्ण, हरितकी, निशोत्तर, दंती, त्रिधारी निवडुंग, द्राक्षा इत्यादींचा दोषसंचय व दोष पाहून उपयोग करावा. शेषदोष घालविण्यासाठी वर्धमान-पिंपळी, हरितकी, शिलाजतू, गुडार्दक इत्यादींचा उपयोग करावा. नंतर क्रमाने पेयादि क्रम जरूरीप्रमाणे करावा. प्रथम सहा महिने केवळ दुधावर ठेवावे. थोडेही दोष शिल्लक राहिले अगर पेयादि क्रमात चूक झाली, तर हा विकार पुन्हा उद्‍भवतो. पेयादि क्रम चालू झाल्यावर क्रमाने हळूहळू रसायने वापरून रुग्णास पूर्ववत रसरक्त धातुपुष्टी व बललाभ होईल याप्रमाणे चिकित्सा चालू ठेवावी. अपुनर्भवत्वाच्या दृष्टीने सुमारे वर्षभर तरी रुग्णावर वारंवर लक्ष ठेवावयास हवे.

काही चिकित्सकांच्या मते रुग्णास केवळ पूर्वी सांगितल्याप्रमाणे दुग्धाहारावर ठेवून पर्पटीसारख्या कल्पांच्या उपयोगानेउदरविकार बरा होतो. पर्पटी कल्पांचे स्त्रोतोगामित्व, अग्निदीपन, रसायनगुण तसेच केवळ दुग्धाहाराच्या रसादिधातुपोषण, अल्पमलप्रवृत्ती अनुलोमन, बल्य इ. गुणांमुळे उदरविकाराची पूर्वी सांगितलेली संप्राप्ती नाहीशी होऊन उदरविकार बरा होतो.

उदरविकार चिकित्सा चालू असता उदराच्या उपद्रवांचीही बारकाईने चिकित्सा करावी लागते. आघ्मान, योग्य विरेचन न होणे अगर अधिक विरेचन होणे, उदावर्त, मोह, अग्निमांद्य, तृष्णा, दाह, बलनाशरसादि धातुक्षय यांचा प्रायः खास विचार करावा लागतो. यकृत्प्लीहोदरात अतिशय जलसंचिती असेल, तर जरुरीप्रमाणे जलनिर्हरणी उपक्रम करावे लागतात.

उदरातील पथ्यचिकित्सेचे व्याधिनिवृत्ती व अपुनर्भवत्वाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. जलोदरात पाणी कटाक्षाने सर्व वेळी टाळावे. इतर उदरांतही आयास, दिवास्वप्न, यानावरोहण, गुरु, विष्टंभी, अभिष्यंदी, शीत पदार्थांचे सेवन इ. सर्वसंपूर्ण टाळणे आवश्यक आहे.

कृमी : स्थूलमानाने कृमींचे वीस वर्ग वर्णिले असेल, तरी प्रत्येक वर्गात अनेक प्रकार असून त्यांची स्थाने-कारणे-लक्षणे अनेकविध आहेत. शास्त्रकारांनी बाह्य व आभ्यंतर असे कृमी वर्णिले असून आभ्यंतराचे पुन्हा पुरीषज, कफज (आमाशयोत्स), रक्तज असे वर्ग सांगितले आहेत. या कृमींची कारणे-संप्राप्ति-स्थान यांनुसार चिकित्सा वेगवेगळी आहे.

बाह्य मलज कृमींसाठी अपकर्षण (कृमी काढून साफ करणे), शरीरावरील मल साफ करणे, नवीन मल निर्माण होणार नाहीत असे वागणे व लेपादि औषधे वापरणे ही चिकित्सा होय. रक्तज कृमींसाठी रक्तशोधन सृती, विरेचन व कुष्ठोक्त चिकित्सा करावी. कफज व पुरीषज कृमीसाठी चिकित्सा तीन प्रकारची म्हणजे (१) अपकर्षण, (२) प्रकृतिविधात व (३) निदान परिवर्जन अशी आहे. अपकर्षणामध्ये जरूरीप्रमाणे स्थानानुसार कृमिघ्न द्रव्ये वापरून नस्य-वमन-विरेचन-बस्ती यांच्या साहाय्याने तयार झालेले कृमी बाहेर काढावेत. प्रकृतिविधात या चिकित्सा प्रकारात ज्या महास्त्रोतसात किंवा जागी नवीन निर्माण होऊन वाढतात त्या स्थानांचीच अशी प्रवृत्ती निर्माण करावयाची की, नवीन कृमी त्या ठिकाणी निर्माण होणार नाहीत व त्यांची वाढ होणार नाही. यासाठी विशेषतः कटु-तिक्त-क्षार-उष्ण द्रव्यांचा विडंग-करंज, मोहरी, शेवगा, आघाडा-सुरसादि गण इ. द्रव्यांचा तसेच कफ व पुरीष न बिघडविणाऱ्या द्रव्यांचा उपयोग नेहमी करावा. निदान परिवर्जन या चिकित्सा प्रकारामध्ये कृमी रोगाची जी कारणे म्हणजे उदा., दूध, तीळ, गूळ, मासे, आनूपमांस-विरुद्ध-दुष्ट-पिष्टान्नादि आहारद्रव्यांचा त्याग करणे. यायोगे कृमींची वाढ व निर्मिती थांबून कृमिविकार होणार नाहीत.

जोशी, वेणीमाधवशास्त्री