प्रतिपत्री : (प्रॉक्सी). कायद्याच्या परिभाषेत प्रतिपत्री म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने आपल्यातर्फे उपस्थित राहण्याचा व मतदान करण्याचा दिलेला अधिकार. ज्या व्यक्तीला असा अधिकार दिलेला असतो अशी व्यक्ती व त्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून हजर राहून काम करण्यास दिलेले अधिकारपत्र, अशा दोहोंना उद्देशून प्रतिपत्री ही संज्ञा वापरण्यात येते. एखाद्या कंपनीचे भागधारक किंवा सार्वजनिक संस्था यांचे सदस्य इत्यादींना प्रतिपत्रीचा उपयोग करता येतो. एखाद्या भागधारकाला किंवा सभासदाला कंपनीच्या किंवा संस्थेच्या सभेत प्रत्यक्ष हजर राहून भाग घेता येत नसेल, तर सदर भागधारक किंवा सदस्य दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस अशा सभेस हजर राहण्याचे अधिकारपत्र देतो. ‘कंपनी कायदा १९५६’ च्या कलम १७६ प्रमाणे अशा प्रतिपत्रींना सभेत प्रत्यक्ष चर्चेत भाग घेता येत नाही त्यांना फक्त मतदानाचा अधिकार असतो. मूळ सभासदाच्या इच्छेप्रमाणे प्रतिपत्रीने मतदान करावयाचे असते. प्रतिपत्रीचे अधिकारपत्र हे नेहमी लेखी असावे लागते व ते संबंधित सभेच्या पूर्वी संस्थेच्या वा कंपनीच्या योग्य त्या अधिकाऱ्याजवळ दाखल करावे लागते.
कुलकर्णी, स. वि. पटवर्धन, वि.भा.
“