काळे पाणी : एकेकाळच्या हद्दपारीच्या शिक्षेचे विशिष्ट नाव. भारतात काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या आरोपींना ब्रिटिश सरकार अंदमान बेटावर पाठवीत असे. तेथील पाण्याच्या रंगावरून हे नाव पडले असावे.

सुधारण्यास अशक्य असणाऱ्या गुन्हेगारांना समाजापासून दूर ठेवणे अवश्य असते त्याचप्रमाणे दहशत बसविण्याक‌रिताही असल्या परावर्तक शिक्षेची गरज असते, असे या शिक्षेचे पुरस्कर्ते म्हणतात. या शिक्षेने मानवाची आरोपीसंबंधीची गर्हणीय भूमिका दिसून येते, अशी विरोध‌क टीका करतात. भारतात ब्रिटिश सरकारने या शिक्षेचा उपयोग देशभक्त वीर सावरकरांसारखे क्रांतिकारक आणि अडचणीचे वाटणारे राजकीय पुढारी यांना आपल्या मार्गातून दूर करण्याकरिता बव्हंशी केलेला आहे.

ज्या तत्वावर ही शिक्षा आधारलेली आहे, ते तत्त्व टाकाऊ व कालबाह्य झाले आहे. इंग्लंडमध्ये १८५४ सालीच ही शिक्षा बंद करण्यात आली. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५९ च्या दंडसंहिता-दुरुस्ती-अधिनियमाने ही शिक्षा बंद करण्यात आली व तिच्याऐवजी आजन्म कारावासाची तरतूद करण्यात आली.

खोडवे, अच्युत