प्रतिजन : (अँटिजेन). प्राणिशरीरात प्रवेश केल्यानंतर जे पदार्थ विशिष्ट प्रतिरक्षात्मक (प्रतिकार करून शरीराचे रक्षण करण्याची) प्रतिक्रिया उत्पन्न करतात त्यांना ‘प्रतिजन’ म्हणतात. हे बाह्या पदार्थ शरीरात शिरल्यानंतर ते ‘परकीय’ असल्याची ताबडतोब जाणीव होते व त्यांच्या हानिकारक परिणामाविरुद्ध काही विशिष्ट परिणाम शरीरावर होतात. या परिणामांना शरीराचा ‘प्रतिरक्षा प्रतिसाद’ म्हणतात. प्रत्येक प्रतिजनाविरुद्ध शरीरात विशिष्ट ⇨ प्रतिपिंड तयार होतो व तो त्या प्रतिजनास अक्रिय बनवितो. शरीरातील पूर्वनिर्मित प्रतिपिंडांबरोबर प्रतिजनांच्या निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया होऊ शकतात त्यांना प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया (किंवा प्रक्रिया) म्हणतात. प्रतिजन, प्रतिपिंड आणि प्रतिरक्षा यांचा अभ्यास वैद्यकाच्या ज्या शाखेत केला जातो, तिला रोगप्रतिकारक्षमताविज्ञान [⟶ रोगप्रतिकारक्षमता] किंवा प्रतिरक्षाविज्ञान म्हणतात. शरीराच्या ऊतकात (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या – पेशींच्या – समूहात) जरी विविध घटक पदार्थ आढळत असले, तरी त्यांची रासायनिक संरचना सतत कायम राखली जाते. नको असलेला कोणताही बाह्या पदार्थ शरीरात घुसला, तर त्याची विल्हेवाट त्वरेने लावली जाते. संरचनेने साधे व अल्प रेणुभार [⟶ रेणुभार] असलेले पदार्थ रक्त व लसीका (ऊतकाकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ) यांच्याद्वारे हलविले जाऊन शेवटी मूत्रातून उत्सर्जित होतात (शरीराबाहेर टाकले जातात). जटिल (गुंतागुंतीच्या) संरचनेचे व मोठा रेणुभार असलेले पदार्थ अशा सोप्या मार्गाने नाहीसे करता येत नाहीत. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शरीरात त्यांच्याशी संयुग्मित होतील असे प्रतिपिंड निर्माण केले जातात. बाह्य पदार्थाशी प्रतिपिंडांचे संयुग्मन झाल्यानंतरच त्यांची विल्हेवाट लावणे सहज सुलभ बनते.

गर्भावस्थेत गर्भाची व नवजात काळात अर्भकाची प्रतिजनांना प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू वाढत जाते. प्रतिरक्षेच्या पूर्ण वाढीकरिता⇨यौवनलोपी ग्रंथींची आवश्यकता असते. उंदरातील या ग्रंथी जन्मल्यानंतर काढून टाकल्यास सूक्ष्मजंतू संक्रमणामुळे ते नेहमीपेक्षा लवकर मरतात. पक्ष्यांमध्ये ‘फाब्रिसिअस स्यून’ नावाचा (एच्. फाब्रिसिअस या इटालियन शरीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारा) लसीका-अधिस्तर (आच्छादक) ऊतक असलेला आंत्रमार्गाच्या (पचनमार्गाच्या) शेवटच्या भागातील अंधवर्धाच्या (पिशवीच्या) स्वरूपातील अवयव, यौवनलोपी ग्रंथीप्रमाणेच प्रतिरक्षा प्रतिसाद उत्पन्न करण्याचे कार्य करतो.

काही पदार्थ पूर्वनिर्मित प्रतिपिंडाशी संलग्न होऊ शकतात व अशा पूर्वप्रतिरक्षित प्राण्यात प्रतिरक्षा प्रतिक्रिया निर्माण करू शकतात. ते स्वतः एकट्यानेच प्रतिपिंडनिर्मितीस असमर्थ असतात. तेच पदार्थ जेव्हा प्रथिनाबरोबर मिश्रित होतात तेव्हा ते प्रतिपिंड उत्पन्न करू शकतात. अशा पदार्थांना (प्रतिजनांना) ‘अंश-प्रतिजन’ (हॅपटेन) म्हणतात व संयुग्मित होणाऱ्या प्रथिनाला ‘वाहक’ म्हणतात. पेनिसिलीन एकटे प्रतिपिंडनिर्मिती करू शकत नाही परंतु रक्तद्रवातील अल्ब्युमीन या प्रथिनाशी जोडले जाताच ही कार्यक्षमता त्याच्यात उत्पन्न होते. म्हणून पेनिसिलीन अंश-प्रतिजन आणि रक्तद्रवातील अल्ब्युमीन वाहक आहेत.

अंश-प्रतिजने अल्प रेणुभार असलेले पदार्थ असतात व ते प्रथिनासारख्या मोठ्या रेणुभाराच्या प्रतिपिंडोत्पादक पदार्थाशी संयुग्मित झाल्यानंतरच क्रियाशील बनतात. अशा संयुग्मित पदार्थांविरुद्ध तयार होणारे प्रतिपिंड अंश-प्रतिजनाविरुद्ध तसेच वाहकाविरुद्धही तयार होतात. म्हणून तेच अंश-प्रतिजन जेव्हा शरीरात दुसऱ्या वेळी घुसते तेव्हा ते शरीरात पसरून हानी करण्यापूर्वीच पूर्वनिर्मित प्रतिपिंड किंवा संवेदनाशील लसीका-कोशिका त्याला निष्प्रभ करतात. औषधे, धुळीतील रासायनिक पदार्थांचे कण, प्राणिशरीरावरील कोंड्यापासून अवपातनाने बनणारे पदार्थ, त्वचा झडून पडलेल्या पदार्थांपासून बनणारे अपकर्षजन्य (ऱ्हास होऊन तयार झालेले) पदार्थ, निरनिराळी औद्योगिक रसायने इत्यादींचा समावेश अंश-प्रतिजनांत होतो.

प्रकार व गुणधर्म : आसमंतात असे अनेक संभाव्य प्रतिजन विखुरलेले असतात की, जे मानवाच्या किंवा प्राण्यांच्या शरीरात शिरताच प्रतिरक्षा प्रतिसाद निर्माण करू शकतात. सूक्ष्मजीव, प्राणिजन्य प्रथिन रेणू, वनस्पती आणि फुलांचे पराग, परकीय ऊतक (उदा., प्रतिरोपण केलेला अवयव म्हणजे एका शरीरातून कृत्रिम रीत्या काढून दुसऱ्या शरीरात बसविलेला अवयव) आणि काही औषधे अशी प्रतिजनांची सर्वसाधारण विभागणी करता येते. प्रतिजन शरीरात अन्नमार्ग, श्वसनमार्ग यांचे श्लेष्मकलास्तर (बुळबुळीत पातळ अस्तर), त्वचा यांच्या संपर्कातून तसेच अंतःनीला, अधस्त्वचीय (त्वचेच्या सर्वांत आतील थरात देण्यात येणारे), अंतःस्नायू, अंतःपर्युदरी [पर्युदरगुहेत ⟶ पर्युदर] अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) अथवा शरीराच्या इतर भागातील अंतःक्षेपणाने प्रवेश करू शकतात.

नैसर्गिक स्वरूपात आढळणाऱ्या अशा पदार्थांचे रासायनिक दृष्ट्या दोन गट आहेत : (१) प्रथिने व (२) पॉलिसॅकॅराइडे [⟶ काबोहायड्रेटे]. प्रथिने पॉलिसॅकॅराइडांपेक्षा प्रतिपिंड उत्पादनास अधिक चेतना देतात. याशिवाय ती कोशिकीय प्रतिरक्षा प्रतिसाद उत्पन्न करणारी चेतना देण्यास अधिक प्रभावी असतात. पॉलिसॅकॅराइडे असा प्रतिसाद उत्पन्न करू शकतात किंवा नाही हे अनिश्चित आहे. ⇨लिपिडे व ⇨न्यूक्लिइक अम्ले प्रथिनाशी संयुग्मित झाल्यानंतर प्रतिपिंड उत्पादन करू शकतात व म्हणून त्यांना ‘नैसर्गिक अंश-प्रतिजन’ म्हणतात. सूक्ष्मजंतूंमधील नैसर्गिक घटकांविरुद्ध अशाच प्रकारे प्रतिपिंड तयार होतात. 


अंश-प्रतिजने व प्रथिने यांच्या कृत्रिम संयुग्मनाने बनणाऱ्या प्रतिजनांना ‘संयुग्मित प्रतिजने’ म्हणतात. ⇨कार्ल लँडस्टायनर यांच्या प्रथम प्रयोगानंतर अनेक संयुग्मित प्रतिजने बनविण्यात आली. रोगप्रतिकारक्षमतेच्या संशोधनपर अभ्यासाकरिता संश्लेषित (कृत्रिम रीत्या तयार केलेल्या) पॉलिसॅकॅराइडांचा विशेष अभ्यास अलीकडे करण्यात आला असून त्यांना ‘संश्लेषित प्रतिजने’ म्हणतात. त्यांची रासायनिक संरचना व सूत्रे पूर्णपणे ज्ञात असल्यामुळे त्यात पाहिजे तसा बदल करणे शक्य असते.

सूक्ष्मजंतू, व्हायरस, प्रोटोझोआ व इतर सूक्ष्मजीवांपासून प्रतिजने मिळतात. रासायनिक दृष्ट्या ती प्रथिने किंवा पॉलिसॅकॅराइडे असून सूक्ष्मजीवाच्या ज्या भागापासून ती मिळतात, त्यावरून त्यांना पुढीलप्रमाणे नावे दिली आहेत : पृष्ठभाग किंवा संपुटापासून (सूक्ष्मजंतूच्या कोशिकेभोवतील जिलेटिनी आवरणापासून) मिळणारे ‘संपुटीय प्रतिजन’, सूक्ष्मजंतूच्या अंतर्भागापासून मिळते ते ‘कायिक प्रतिजन’ किंवा ‘ओ प्रतिजन’, कशाभिकेपासून (सूक्ष्मजंतुकोशिकेपासून निघालेल्या चाबकाच्या दोरीसारख्या लांब, नाजुक आणि बारीक जीवद्रवीय संरचनेपासून) मिळणारे कशाभिकाजन्य अथवा ‘एच प्रतिजन’ आणि झालरीसारखी संरचना असलेल्या भागापासून मिळणारे ते ‘झालरजन्य प्रतिजन’.

प्रतिजनामध्ये पुढील गुणधर्म असावे लागतात : (१) प्रतिरक्षा प्रतिसादाचा प्रमुख हेतू प्राणिशरीरात घुसलेल्या कोणत्याही बाह्य पदार्थाची विल्हेवाट लावण्याचा असतो. प्रभावी ठरण्याकरिता कोणतेही प्रतिजन ‘परकीय’ पदार्थ असणे जरूरीचे असते. प्राणी स्वशरीरातील ऊतकात असणाऱ्या प्रतिजनाविरुद्ध प्रतिपिंड निर्मिती प्राकृतिक (सर्वसामान्य) अवस्थेत करीत नाहीत परंतु कोशिका-आघातामुळे किंवा एखाद्या औषधाच्या परिणामामुळे ऊतकातील घटकात बदल घडून ते अनैसर्गिक बनले, तर प्रतिरक्षा प्रतिसाद उत्पन्न होऊ शकतो. प्रतिजनाचा रासायनिक गट व संरचना शरीरास परकीय असावी लागते. एखाद्या प्रतिजनाचे घटक जरी शरीरास परिचित असले, तरी त्यांची संरचना अपरिचितच असावी लागते. म्हणून प्रथिने प्रतिजनासारखी क्रियाशील असण्याकरिता शरीर ऊतकातील नैसर्गिक प्रथिनांच्या संयुग्मनापेक्षा आणि संरचनेपेक्षा त्यांची संरचना भिन्नच असावी लागते.

(२) प्रतिजन नेहमी एका ठराविक मूल्यापेक्षा अधिक रेणुभार असलेला पदार्थ असतो. कमी रेणुभार असलेले बाह्य पदार्थ अतिजलद गतीने शरीरातून उत्सर्जित होतात. ८,००० पेक्षा कमी रेणुभार असलेले पदार्थ सहसा प्रतिजन नसतात. प्रतिजनांचा सर्वसाधारण रेणुभार १४,००० च्या आसपास असतो. बहुतेक सर्व प्रथिन प्रतिजनांचा रेणुभार २०,००० ते १,००,००० एवढा असतो. सर्वांत कमी रेणुभार असलेल्या नैसर्गिक प्रतिरक्षा-उत्पादक पदार्थात ग्लुकागॉन [अग्निपिंडाचे हॉर्मोन ⟶ अग्निपिंड], बॅसिट्रॅसीन (एक प्रतिजैव-अँटिबॉयॉटिक – औषध) आणि अँजिओटेन्सीन [वृक्काचे म्हणजे मूत्रपिंडाचे हॉर्मोन ⟶ वृक्क] यांचा समावेश असून त्यांचे रेणुभार अनुक्रमे ३८००, १९३० आणि १०३० एवढे असतात. सर्वांत कमी रेणुभाराचे संश्लेषित प्रतिजन p – ॲझोबेंझीन आर्सोनेट असून त्याचा रेणुभार फक्त ४५० डाल्टन आहे. (१ डाल्टन = १·६५X१०-२४ ग्रॅम). 

(३) प्राणिशरीरात प्रवेश करताना ज्या भौतिक अवस्थेत प्रतिजन असेल त्यावर त्याची प्रतिरक्षा-उत्पादकक्षमता अवलंबून असते. कणरूपातील प्रतिजने विद्राव्य (विरघळलेल्या) अवस्थेतील प्रतिजनांपेक्षा अधिक प्रभावी असतात. अल्प प्रतिरक्षा-उत्पादक प्रथिने काही विशिष्ट प्रक्रिया करून अतिप्रतिरक्षा-उत्पादक बनविता येतात. कणरूपातील प्रतिजनांचा जादा प्रभावीपणा ते महाभक्षी कोशिकांकडून (सूक्ष्मजीव वा इतर कोशिका व परकीय कण खाऊन टाकणाऱ्या मोठ्या कोशिकांकडून) चटकन अभिशोषिले जाण्यामुळे उत्पन्न झालेला असतो आणि त्यामुळे या स्वरूपातील प्रतिजने परिसरीय लसीकाभ ऊतकात (पृष्ठभागावरील लसीका कोशिकायुक्त जाळीदार ऊतकात) सहज अडविली जातात.

(४) काही पदार्थ प्रतिजनाबरोबरच प्राणिशरीरात शिरले, तर ते प्रतिजनांची प्रतिपिंड-उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत करतात. अशा पदार्थांना ‘साहाय्यक पदार्थ’ म्हणतात. निरनिराळ्या रासायनिक संरचनांचे विविध पदार्थ साहाय्यक असल्याचे आढळले आहे. यांमध्ये तुरटी व इतर ॲल्युमिनियम लवणे, मृत सूक्ष्मजंतुसहित किंवा सूक्ष्मजंतुविरहित पाणी-तेल पायस [⟶ पायस], ग्रॅम-रंजक-अव्यक्त [एच्. सी. जे. ग्रॅम या डॅनिश शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली रंजकक्रिया केली असता तयार होणारा जांभळटसर रंग ज्यांच्या बाबतीत टिकून राहत नाही अशा ⟶ रंजक, जीवविज्ञानीय] सूक्ष्मजंतूंची अंतर्विषे (सूक्ष्मजंतूच्या कोशिकेत तयार होणारी विषे) आणि अल्पसांद्रित प्रतिपिंड यांचा समावेश असून हे पदार्थ महत्त्वाचे व अधिक वापरातील आहेत. याशिवाय चतुर्थक अमोनियम लवणे, अ जीवनसत्त्व व त्याचे अनुजात (त्यापासून तयार केलेली संयुगे), काही सूक्ष्मजंतू (विशेषेकरून कॉरिनिबॅक्टिरियम पार्व्हम आणि बॉर्देटिल्ला परट्युसिस) हेही साहाय्यक असतात. हा साहाय्यक परिणाम कसा घडून येतो, हे निश्चित सांगता येत नाही.

संशोधन प्रयोगशाळांतून अधिक उपयोगात असलेल्या व अभ्यासिलेल्या एका साहाय्यक पदार्थास ई. फ्रॉइन्ट या संशोधकांच्या नावावरून ‘फ्रॉइन्ट साहाय्यक’ असे नाव दिले आहे. खनिज तेल, मृत क्षयरोग-सूक्ष्मजंतू आणि एक पायसीकारक यांच्या मिश्रणापासून तो तयार करतात. त्याचे दोन प्रकार असून ज्यात सूक्ष्मजंतू असतात त्यास ‘पूर्ण’ आणि ज्यात नसतात त्यास ‘अपूर्ण’ म्हणतात. हा साहाय्यक प्रतिपिंडाचे उत्पादक अनेक पटींनी वाढवतो. आत्मप्रतिरक्षाजन्य रोगांच्या अभ्यासाकरिता फ्रॉइन्ट साहाय्यक अतिशय उपयुक्त ठरला आहे. स्वशरीरातील ऊतकात असणाऱ्या प्रतिजनांविरुद्ध प्राणी प्रतिपिंड उत्पन्न करीत नाहीत परंतु तीच प्रतिजने फ्रॉइन्ट साहाय्यकाबरोबर अंतःक्षेपणाने दिल्यास प्रतिरक्षा उत्पन्न होते. प्रयोगशालेय आत्मप्रतिरक्षाजन्य रोगाचे उत्तम उदाहरण म्हणजे मेंदूचे ऊतक व फ्रॉइन्ट साहाय्यक यांचे मिश्रण अंतःक्षेपणाने दिल्यानंतर उद्‌भवणारा अधिहृषताजन्य (ॲलर्जीजन्य) मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) हे होय.

(५) हॉर्मोनांचा परिणाम : यौवनलोपी ग्रंथी प्रतिरक्षा प्रतिसादावर महत्त्वाचे नियंत्रण करते. या ग्रंथीचे ‘थायमोसिन’ नावाचे हॉर्मोन स्कंध कोशिकांच्या (पूर्वगामी रक्तकोशिकांच्या) गुणनास आणि विभाजनास चेतावणी देण्यात भाग घेत असावे. यौवनलोपी ग्रंथिजन्य लसीका कोशिकांना ‘थायमोसाइट’ किंवा ‘टी-कोशिका’ म्हणतात. या कोशिका प्रतिरक्षा प्रतिसादात महत्त्वाचा भाग घेतात. इतर ⇨अंतःस्रावी ग्रंथींची हॉर्मोनेही प्रतिरक्षा प्रतिसादावर परिणाम करतात. ⇨अधिवृक्क ग्रंथीची कॉर्टिकॉइड हॉर्मोने प्रतिपिंड उत्पादनाचे दमन करतात, तर ⇨पौरुषजने उत्पादनात अडथळा आणतात. ⇨स्त्रीमदजने प्रतिपिंड उत्पादनात वाढ करतात. या कारणामुळे स्त्रिया उत्तम प्रतिपिंड उत्पादक असल्याचे व म्हणून सूक्ष्मजंतूच्या विरुद्ध पुरुषापेक्षा अधिक प्रतिरक्षाक्षम असल्याची कल्पना होणे शक्य आहे परंतु तसा कोणताही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. [⟶  हॉर्मोने]. 


(६) काही प्रतिजने सूक्ष्मजंतू कोशिकांतून उत्सर्जित होतात किंवा सूक्ष्मजंतूच्या मृत्यूनंतर जिथे असतील त्या माध्यमात उतरतात. यांमध्ये अनेक एंझाइमांचा (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिन पदार्थांचा) व विषांचा समावेश असतो [⟶ प्रतिविष]. धनुर्वात, घटसर्प या रोगांच्या सूक्ष्मजंतूंचे विष, कुपिरूप जंतूचे (क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम) विष वगैरे यात मोडतात. ही विषे बहुतकरून प्रथिने असतात. अशा प्रथिनांवर फॉर्‌मॉलिनाची (फॉर्माल्डिहाइडाच्या जलीय विद्रावाची) विक्रिया करवून रूपांतरित प्रतिजन किंवा विषसम पदार्थ (मूळ पदार्थाचा विषारीपणा जवळजवळ नष्ट केलेला पदार्थ) बनविता येतात. हे पदार्थ मूळ विषाप्रमाणेच प्रतिरक्षा प्रतिसाद निर्माण करू शकतात. विषसम पदार्थ अंतःक्षेपणाने टोचून रोगप्रतिकाराकरिता वापरतात. मृत किंवा हतप्रभ सूक्ष्मजंतूंपासून जी प्रतिजने तयार करतात, त्यांना ‘सूक्ष्मजंतुजन्य प्रतिजने’ म्हणतात. व्यवहारात त्यांना लस (व्हॅक्सीन) म्हणतात. डांग्या खोकला, पटकी, प्लेग यांसारख्या सूक्ष्मजंतुजन्य रोगांकरिता उपयोगात असलेली प्रतिबंधात्मक लस प्रतिजनाचाच प्रकार आहे.

(७) सर्व सूक्ष्मजीवांत प्रतिजने आणि अंश- प्रतिजने ही संरचनेचा भाग म्हणून किंवा मुक्त संयुगांच्या स्वरूपात कोशिकाबाह्य द्रवात विखुरलेली असतात. प्रत्येक प्राणिजातीत रक्तरसासंबंधी विशिष्ट अशी प्रतिजने असतात. परंतु काही प्रतिजने सारख्याच संयुगाच्या स्वरूपात निरनिराळ्या जातींत आढळतात. परस्परांशी अजिबात संबंध नसलेल्या विविध प्राणी व सूक्ष्मजंतू यांच्या कोशिका व कोशिका द्रव्ये यांमध्ये आढळणाऱ्या पण प्रतिरक्षात्मक दृष्ट्या जवळचे नाते असणाऱ्या या प्रतिजनांना ‘विषमाकर्षी प्रतिजने’ म्हणतात. प्राणी किंवा सूक्ष्मजंतूच्या जातीत काही संरचनात्मक किंवा क्रियात्मक पदार्थ (उदा., अंड्यातील प्रथिने, हीमोग्लोबिने किंवा एंझाइमे) त्यांच्या जवळच्या जातीतील याच पदार्थाशी जवळजवळ जुळणाऱ्या रासायनिक संरचनेचे असतात. उदा., पाळलेल्या कोंबडीच्या अंड्यातील प्रथिन बदकाच्या अंड्यातील प्रथिनामुळे उत्पन्न होणाऱ्या प्रतिपिंडाच्या विरुद्ध प्रतिक्रिया उत्पन्न करू शकतात. अशा प्रतिक्रियांना ‘छेदित प्रतिक्रिया’ (ज्यांच्यात प्रतिजन जुळणारे असते परंतु मूळ विशिष्ट प्रतिजन नसते अशा प्रतिपिंड आणि प्रतिजन यांमधील प्रतिक्रिया) म्हणतात.

विषमाकर्षी प्रतिजनांपैकी विशेष अभ्यासिले गेलेले फॉर्समन प्रतिजन (जे. फॉर्समन या स्वीडिश संशोधकांच्या नावावरून ओळखण्यात येणारे प्रतिजन) हे कुत्रा, मांजर, उंदीर, कोंबडी इ. प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या कोशिकांवर आढळते. न्यूमोकोकाय, परांत्रज्वराचे (पॅराटायफॉइडचे) सूक्ष्मजंतू व इतर काही सूक्ष्मजंतूंतही ते असते. दुसरे एक विषमाकर्षी प्रतिजन मानवी बी रक्तगटाशी संबंधित असून ते एश्चरिकिया कोलायच्या (मानवी आतड्यात व इतर सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या आंत्रमार्गात नेहमी वास्तव्य करणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या) विविध प्रकारांतही आढळते. मानवी ओ रक्तगटाशी संबंधित दुसरे एक विषमकर्षी प्रतिजन बकऱ्यातील बॅसिलस डिसेंटरी नावाच्या सूक्ष्मजंतूत आढळते. विषमाकर्षी प्रतिजनांचे अस्तित्व काही विशिष्ट रोगांच्या निदानाकरिता उपयुक्त ठरले आहे. उदा., ⇨प्रलापक सन्निपातज्वराच्या निदानाकरिता उपयुक्त असलेली ‘व्हाइल-फेलिक्स-प्रतिक्रिया’ (ई. व्हाइल व ए. फेलिक्स शास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारी प्रतिक्रिया) या परीक्षेकरिता रोग्याचा रक्तद्रव आणि प्रोटियस वंशातील सूक्ष्मजंतू, विशेषेकरून एक्स-१९ प्रकारचे सूक्ष्मजंतू वापरतात व त्यात रोग असल्यास सूक्ष्मजंतूंचे समूहन होते (गुच्छांसारखे एकत्रित होतात). रिकेट्‌सिया (सूक्ष्मजंतूपेक्षा लहान परंतु व्हायरसापेक्षा मोठे सूक्ष्मजीव) मानवी शरीरात शिरल्यानंतर तयार होणारे रक्तद्रवातील प्रतिपिंड व प्रोटियस सूक्ष्मजंतू ( प्रतिजन) यांमधील ही प्रतिक्रिया असते.

(८) सूक्ष्मजंतूचे वर्गीकरण ग्रॅम यांची पद्धत वापरून करतात. या पद्धतीत विशिष्ट ग्रॅम-रंजक वापरून सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करतात व त्यावरून ग्रॅम-रंजक-अव्यक्त आणि ग्रॅम-रंजक-व्यक्त असे दोन वर्ग पाडतात [⟶ रंजक, जीवविज्ञानीय]. यांपैकी ग्रॅम-रंजक-अव्यक्त सूक्ष्मजंतूंच्या कोशिकाभित्ती शर्करा, मेद (स्निग्ध पदार्थ) व प्रथिने यांनी बनलेल्या असतात व म्हणून त्यांना संबंधित गुणधर्म प्राप्त होतात. या सूक्ष्मजंतूंच्या प्रतिजनांना ‘बॉयव्हीन प्रतिजने’ म्हणतात. या गटापैकी कोणत्याही सूक्ष्मजंतूपासून मिळविलेल्या बॉयव्हीन प्रतिजनात काही विशिष्ट गुणधर्म असतात. मानवी किंवा प्रयोगशालीय प्राण्याच्या शरीरात ते अंतःनीला अंतःक्षेपणाने टोचल्यास पुढील परिणाम आढळतात : (अ) पुरेशी मात्रा (३० मायक्रोग्रॅम ते कित्येक मिलिग्रॅम/किग्रॅ. वजनाप्रमाणे) दिल्यास प्राणी मृत्यू पावतो. (आ) सुरुवातीस रक्तातील श्वेतकोशिका घटतात व नंतर वाढतात. (इ) ताप येतो. (ई) जी. श्वार्त्समन या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी दृश्य घटना दिसते. पहिल्या अंतःक्षेपणानंतर २४ तासांनी अधस्त्वचीय अंतःक्षेपणाने मात्रा दिलेल्या जागी स्थानिक ऊतकमृत्यू झाल्याचे आढळते. (उ ) लहान मात्रा कोशिकाभक्षणक्रिया (बाह्य पदार्थांचे कण गिळून टाकून पचनाने नाहीसे करण्याची भक्षी कोशिकांची क्रिया) वाढवते, तर मोठी मात्रा ही क्रिया मंदावते. (ऊ) अंतःक्षेपणानंतर संबंध नसलेली प्रतिजनेही टोचली, तर त्याविरुद्ध प्रतिपिंडनिर्मिती वाढते.

यांतील पहिले पाच परिणाम कोशिकाभित्तीतील मेद घटकांशी संबंधित असतात. 


वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाची इतर काही प्रतिजने : रक्तगट प्रतिजने : मानवी रक्तामध्ये तांबड्या कोशिकांवर सर्वसाधारणपणे आढळणारी कमीत कमी ३० प्रतिजने ज्ञात झाली आहेत आणि ती कोशिका-कलेत (कोशिकेच्या पृष्ठभागावरील जीवद्रव्याच्या पातळ थरात) असतात. यांशिवाय शंभरपेक्षा जास्त प्रतिजने अशी आहेत की, जी कमी प्रभावी असून ठराविक कुटुंबांतूनच आढळतात. मानवी रक्ताचे जे चार रक्तगट पाडले आहेत ते तांबड्या कोशिकांवरील दोन प्रमुख प्रतिजनांच्या मदतीने पाडले आहेत आणि त्यांना प्रकार ए व प्रकार बी प्रतिजने म्हणतात. ही प्रतिजने आनुवंशिक असल्यामुळे एखाद्या व्यक्तीत दोन्ही नसण्याची, दोन्हीपैकी कोणतेही एकच असण्याची किंवा दोन्ही असण्याची शक्यता असते.

रक्तगट प्रतिजनांबाबत झालेल्या अधिक संशोधनावरून पुढील माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रतिजनांची विशिष्टता त्यांच्या रचनेतील शर्करा गटातील विशिष्ट शर्करांमुळे प्राप्त होते. ही ए व बी प्रतिजने एकाच मूळ म्युकोपॉलिसॅकॅराइडापासून [⟶ कार्बोहायड्रेटे] बनतात. हे उत्पादन जीनांच्या (गुणसूत्रांमध्ये म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमध्ये असणाऱ्या आनुवंशिक घटकांच्या एककांच्या) नियंत्रणाखाली असते. ओ रक्तगटाच्या व्यक्तीत ही दोन्ही प्रतिजने नसतात याचे कारण मूळ म्युकोपॉलिसॅकॅराइडे निष्क्रियावस्थेतच राहतात. ए रक्तगटाच्या व्यक्तीत फक्त ए तर बी रक्तगटाच्या व्यक्तीत फक्त बी प्रतिजन तयार होते. एबी रक्तगटात ही दोन्ही तयार होतात.

मानवी रक्तद्रवात दोन विशिष्ट प्रतिपिंडेही असतात व त्यांना ‘प्रति-ए’ आणि ‘प्रति-बी’ अशी नावे आहेत. प्रतिजनांना समूहजने व प्रतिपिंडांना समूहके म्हणतात. रक्तातील रक्तकोशिकांत जेव्हा ए समूहजन नसते तेव्हाच रक्तद्रवात प्रति-ए समूहके असतात. जेव्हा बी समूहजन नसते तेव्हाच प्रति-बी समूहके असतात. समूहजने आनुवंशिक असतात, तर समूहके पूर्णपणे जन्मानंतर उत्पन्न होतात.

वरील समूहजनांशिवाय आणखी आठ समूहजने महत्त्वाची असून त्यांना ‘ऱ्हीसस घटक किंवा आरएच कारक’ (कार्ल लँडस्टायनर आणि ए. वीनर या शास्त्रज्ञांनी १९३७ मध्ये ऱ्हीसस माकडांच्या रक्तातील तांबड्या कोशिकांत शोधून काढलेले प्रतिजन) म्हणतात [⟶ ऱ्हीसस घटक]. आरएच कारकांखेरीज मानवी रक्तात त्यांच्यासारखेच आणखी काही कारक आहेत. त्यांना ‘एचआर कारक’ म्हणतात. आतापर्यंत असे तीन कारक ज्ञात झाले आहेत परंतू तेही एकूण आठ असावेत व ज्या रक्तात एक प्रकारचा आरएच कारक नसतो, त्या रक्तात त्याचा सारखवट एचआर कारक असतो, असा समज आहे. याशिवाय रक्तात आणखी काही कारक आहेत व त्यांना निरनिराळी नावेही दिली आहेत. ते सर्व आनुवंशिक असून बहुतेक सर्व प्रभावी आहेत.

रक्ताधान, संशयित पितृत्व, निरनिराळ्या जातींचा वर्णसंकर इत्यादींकरिता ही माहिती महत्त्वाची ठरली आहे. [⟶  रक्तगट रक्ताधान]. 

प्रतिरोपणाशी संबंधित प्रतिजने : आधुनिक शस्त्रक्रियाशास्त्रात इंद्रिय प्रतिरोपण आणि ऊतक प्रतिरोपण या शस्त्रक्रियांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. स्वशरीरातील ऊतकात असणाऱ्या प्रतिजनाविरुद्ध प्राणी प्रतिपिंड सहसा उत्पन्न करीत नाहीत. या कारणामुळे जेव्हा आत्मजात प्रतिरोप (ज्या प्राण्यात प्रतिरोपण करावयाचे त्याच्या शरीराचा भाग, उदा., त्वचा, अस्थी वगैरे) शस्त्रक्रियेत वापरतात, तेव्हा तो टिकाऊ आणि कायम स्वरूपाचा असण्याची शक्यता असते. कारण नवा प्रतिरोपित भाग आत्मजात असल्यामुळे शरीर त्याला बाह्य किंवा ‘परकीय’ म्हणून ओळखत नाही व म्हणून प्रतिरक्षात्मक प्रतिक्रियेचा अभाव असतो. याउलट समजात प्रतिरोप (एकाच जातीच्या परंतु दुसऱ्या प्राण्याचा शरीर भाग) किंवा विजातीय प्रतिरोप (निराळ्या जातीच्या प्राण्याचा शरीर भाग) शस्त्रक्रियेत वापरल्यास प्रतिरक्षात्मक प्रतिक्रिया अटळ असते. यामुळे अशा प्रतिरोपातील सर्व ऊतक कोशिका ३ ते १० आठवड्यांत मरण पावतात.

प्रतिरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्याकरिता प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया टाळता येणे महत्त्वाचे असते. त्याकरिता रक्ताधानापूर्वी जसा रक्तगट निश्चित करता येतो तसा ऊतक-प्रकारही ठरविता येतो पण रक्तगट ठरविणे जेवढे सोपे तेवढे ऊतक-प्रकार ठरविणे सोपे नाही आणि ते अजून तेवढे यशस्वीही झालेले नाही. समजात प्रतिरोप अस्वीकृत होण्यास कारणीभूत असणाऱ्या प्रतिजनांचा विशेष अभ्यास करण्यात आला आहे व त्यांना ऊतक-विरोधाभावी प्रतिजने म्हणतात. ही प्रतिजने आनुवंशिक नियंत्रणाखाली असतात. पंचवीसाहून अधिक निरनिराळ्या प्रतिजनांचे गट ऊतक कोशिकाभित्तीत असल्याचे आढळले आहे व त्यांचे नियंत्रण चार स्वतंत्र जीनांमार्फत होते. म्हणजेच एका व्यक्तीत फक्त चारच प्रतिजने असतात. प्रामुख्याने रक्तातील श्वेतकोशिकांवर असणाऱ्या या प्रतिजनांना ‘एचएल-ए’ प्रतिजने (ह्यूमन लिम्फोसाइट अँटिजेन्स या इंग्रजी नावातील आद्याक्षरांवरून)  असेही म्हणतात. प्रत्येक व्यक्तीत जरी फक्त चारच एचएल-ए प्रतिजने असली, तरी ती पंचवीसाहूनही जास्त असलेल्या कोणत्याही चार प्रतिजनांचा संयोग असू शकतात. या कारणामुळे ऊतक-प्रकारांची संख्या एवढी वाढली आहे की, संपूर्णपणे अनुरूप ऊतक दाता मिळण्याची शक्यता, एकरूप जुळे आणि गॅमा-ग्लोब्युलीनन्यूनता [⟶ प्रतिरक्षा प्रथिनांचे अत्यल्प उत्पादन होत असलेली जन्मजात किंवा उपार्जित विकृती ⟶ ए-गॅमा-ग्लोब्युलिनीमिया] वगळल्यास फारच कमी असते. बऱ्याचशा प्रयत्नांनंतर आणि प्रयोगशालीय तपासणीत अगदी जुळते असे वाटणाऱ्या ऊतकाचे प्रतिरोपणही अस्वीकृत होऊ शकते. याउलट थोड्याफार जुळणाऱ्या ऊतकांचे प्रतिरोपण प्रतिरक्षा-प्रतिकाराचे दमन करणाऱ्या उपायांनी टिकू शकते. [⟶ अंतस्त्य-प्रतिरोपण].

अधिहृषताजने : मानवी किंवा प्राणिशरीरात अधिहृषता (ॲलर्जी) उत्पन्न करणारे पदार्थ विशिष्ट प्रतिजनेच असून त्यांना ‘अधिहृषताजने’ म्हणतात. अधिहृषतेची प्रवृत्ती आनुवंशिक असून मातापित्याकडून अपत्यात उतरते. अशा व्यक्तीमध्ये आयजी-ई प्रतिपिंड [⟶ प्रतिपिंड] पुष्कळ प्रमाणात असतात. या प्रतिपिंडांना ‘रिॲजीन’ किंवा ‘सुग्राहीकारक प्रतिपिंड’ म्हणतात. जे प्रतिजन या विशिष्ट प्रतिपिंडाशी प्रतिक्रिया करतात, त्यांना अधिहृषताजन ही संज्ञा लावतात. बहुतांशी प्रथिने असलेल्या या पदार्थांमध्ये इतर अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. काही औषधे उदा., ॲस्पिरीन, क्विनीन, मॉर्फीन काही पराग उदा., गवते काही कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) उदा., पेनिसिलियम काही पशूंचे केस उदा., कुत्रा, मांजर, ससा वगैरे काही अन्नपदार्थ उदा., अंडी, मासे, दूध, कांदा वगैरे इत्यादींचा समावेश अशा पदार्थांत होतो. 


इन्फ्ल्यूएंझा व्हायरसाचा आडवा छेद : (१) न्यूरॅमिनिडेझ, (२) हीमॅग्लुटिनीन, (३) प्रथिने व जीन असलेला गाभा, (४) कलावरण.

व्हायरसतील प्रतिजने : सर्व व्हायरस डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए)  किंवा रिबोन्यूक्लिइक अम्ल याचे [⟶ न्यूक्लिइक अम्ले] बनलेले असतात. यांशिवाय काही व्हायरसांच्या घटक पदार्थांत मेद, शर्करा इ. पदार्थही असतात. प्रत्येक व्हायरस कणात अनेक विशिष्ट प्रतिजने असतात व त्यांपैकी काही विशिष्ट गटाची किंवा जातीची निदर्शक असतात. त्यामुळे गट ओळखण्यास मदत होते. रासायनिक दृष्ट्या ही प्रतिजने प्रथिने असतात आणि त्यांत ग्लायकोप्रथिने व लिपोप्रथिने यांचा समावेश असतो. काही विशिष्ट व्हायरसांमध्ये, विशेषेकरून मिक्सोव्हायरस आणि ॲडिनोव्हायरस यांमध्ये, ‘विद्राव्य प्रतिजने’ असतात. अर्बुदोत्पादक (कोशिकांची अत्यधिक नवोत्पत्ती करून शरीरक्रियेला निरुपयोगी अशी गाठ उत्पन्न करणाऱ्या) व्हायरसामुळे काही नवी अंतःकोशिकीय प्रतिजने तयार होतात व त्यांना ‘टी-प्रतिजने’ म्हणून संबोधतात. इन्फ्ल्यूएंझा व्हायरसावरील [⟶ इन्फ्ल्यूएंझा] दोन प्रथिन प्रतिजनांना ‘हीमॅग्लुटिनीन’ आणि ‘न्यूरॅमिनिडेझ’ अशी नावे  (संक्षिप्त नावे एच् व एन्) असून ती थोड्याफार फरकाने जशी बदलतात तसा त्यांचा रोगोत्पादन क्षमतेवरही परिणाम झाल्याचे आढळले आहे. यांपैकी हीमॅग्लुटिनीन रक्तातील तांबड्या कोशिकांचे समूहन करणारे असून न्यूरॅमिनिडेझ हे एंझाइम आहे. अ प्रकारच्या इन्फ्ल्यूएंझा व्हायरसाचे तेवीस उपप्रकार शोधण्यास या प्रतिजनांमुळे मदत झाली आहे. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यास या व्हायरसाच्या पृष्ठभागावर काट्यासारख्या संरचना विखुरल्याचे दिसते आणि यामध्ये वरील दोन प्रकारची प्रतिजने असल्याचे आढळते. आकृतीमध्ये इन्फ्ल्यूएंझा व्हायरसाचा आडवा छेद दर्शविला आहे.

व्हायरसांच्या सर्व घटकांविरुद्ध शरीरात प्रतिपिंड तयार होतात व ते बराच काळपर्यंत शरीरात टिकून राहत असल्यामुळे व्हायरसाविरुद्ध रोगप्रतिकारक्षमताही टिकून राहते. [⟶ व्हायरस].

वनस्पतीतील प्रतिजने :वनस्पतीमध्ये विविध प्रतिजने वैपुल्याने आढळतात. परागांचा उल्लेख वर आलेला आहे.  पराग ज्वर, दमा यांसारख्या रोगात पराग कारणीभूत असू शकतात. वनस्पतीतील काही प्रतिजने रक्तातील पॉलिसॅकॅराइडांसारखी असून ती संबंधित प्रतिपिंडाशी संलग्न होऊ शकतात. यावरून ती रासायनिक दृष्ट्या एकसारखी असावीत किंवा त्यांची पृष्ठरचना एकाच प्रकारची असावी. मानवी श्वेतकोशिकांतील एचएल-ए प्रतिजनासारखे द्रव्य ‘यू’ [बर्मी किंवा बिरमी ⟶ टॅक्सेलीझ] झाडाच्या अर्कात आढळते. काही वनस्पतींत निसर्गात आढळणारी प्रथिने प्रतिपिंडाप्रमाणे क्रियाशील असतात व ती विशिष्ट पॉलिसॅकॅराइड प्रतिजनाशी संयोग पावू शकतात. अशा प्रथिनांना लेक्टिन म्हणतात. एका वनस्पतीतील लेक्टिन एचएल-ए प्रतिजनाशी संलग्न होते. फॅसिओलस लायमेन्सिस या घेवड्याच्या जातीच्या एका वनस्पतीमधील लेक्टिन विशिष्ट रक्तगटाच्या तांबड्या कोशिकांशी संलग्न होते. 

पहा : प्रतिपिंड रोगप्रतिकारक्षमता.

संदर्भ :  1. Beverige, W. I. B. Influenza : The Last Great Plague, London, 1977.

            2. Gray, D. F. Immunology, London, 1964.

            3. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.

            4. Illingworth, C. Dick, B. M. Textbook of Surgical Pathology, London, 1975.

            5. Stewart, F. S. Beswick, T. S. L. Bacteriology, Virology and Immunity for Students of Medicine, London, 1977.

  

परांडेकर, आ. शं. कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.