प्रकाशवर्ष : अवकाशातील फार मोठमोठी अंतरे मोजण्याचे ज्योतिषशास्त्रातील एकक. निर्वात जागेत एका वर्षात प्रकाशाने तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाशवर्ष होय. प्रकाश एका सेकंदात २,९९,७९१ किमी. जातो. यावरून एक प्रकाशवर्ष अंतर ९·४६०५ x १०१२ (९४,६०५ कोटी) किमी. इतके होते. मात्र नाक्षत्र वर्ष, सांपातिक वर्ष वगैरे वर्षांपैकी कोणते वर्ष घेणार त्यावर हे अंतर किंचित अवलंबून राहील. या एककात चंद्राचे अंतर (सरासरी) १·३ सेकंद, सूर्याचे (सरासरी) ८·३ मिनिटे, गुरूचे (सर्वांत जवळचे) ३३ मिनिटे, कुबेराचे (प्लुटो सर्वांत जवळचे) ५·३ तास, निकटतम नरतुरंगीयाचे (सर्वांत जवळचा तारा) ४·३ वर्षे व देवयानी तारकासमूहातील एम ३१ या दीर्घिकेचे २३,००,००० वर्षे आहे. १ प्रकाशवर्ष म्हणजे ०·३०६९ पार्सेक [→ पार्सेक] किंवा ६३,२४० ज्योतिषशास्त्रीय एकके (सूर्य व पृथ्वी यांतील सरासरी अंतर म्हणजे ज्योतिषशास्त्रीय एकक) होत.

नेने, य. रा.