दीप्तिगोल : सूर्यबिंबाचा दृश्य पृष्ठभाग. पृथ्वीच्या पृष्ठभागाप्रमाणे हा घन नाही, तर वायुरूप आहे. याची खोली सु. ४00 किमी. व मध्यभागी तापमान ५७५०° के. असून ते कडेला थोडे कमीकमी होत जाते. दीप्तिगोल अगदी विरल असून त्याचा दाब पृथ्वीवरील समुद्रसपाटीच्या दाबाच्या १/१00 असतो. सूर्याकडून सूर्यकुलाकडे उष्णता, प्रकाश अशा निरनिराळ्या स्वरूपांत येणारी शक्ती ५ X १0२३ अश्वशक्ती असून तिचे उगमस्थान दीप्तिगोलातच असते. दीप्तिगोल अपारदर्शक असल्याने त्यातून सूर्याचे अंतरंग दिसू शकत नाही. दूरदर्शकातून याचा पृष्ठभाग दाणेदार दिसतो. हा दाणेदारपणा अंतरंगातून वर उसळणाऱ्या तेजस्वी तप्त द्रव्यामुळे येतो. या तप्त द्रव्यामुळेच दीप्तिगोलाचे तापमान टिकवून धरले जाते. दूरदर्शकातून हे कण दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते २५0 ते १,६00 किमी. व्यासाचे असतात. पृष्ठभागावर डाग आणि ⇨ ज्वालमालाही (अनियमित आकाराचे व असामान्य तेजस्वी असे पांढरे भागही) दिसतात.

पहा : सूर्य.

गोखले, मो. ना.