प्याजे, झां : (९ ऑगस्ट १८९६— ). स्विस मानसशास्त्रज्ञ व शिक्षणशास्त्रवेत्ते. बालकांच्या बुद्धिविकास टप्प्यांच्या अभ्यासावर आधारलेल्या सिद्धांतांमुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. जन्म नशाटेल (स्वित्झर्लंड) येथे. त्यांचे वडील इतिहासकार होते. चिमणीच्या एका जातीवरील प्याजेंनी केलेली टिपणे वयाच्या अकराव्या वर्षीच प्रसिद्ध झाली. नशाटेल विद्यापीठात निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण केल्यावर त्यांनी मृदुकाय (मॉलस्क) प्राण्यावरील संशोधनाबद्दल १९१८ साली डॉक्टरेट संपादन केली. पुढे ज्ञानमीमांसेत त्यांना रस वाटू लागला. झुरिक येथील प्रयोगशाळांमध्ये काम करीत असताना त्यांचा मनोविश्लेषणाशी परिचय झाला. पॅरिस येथे त्यांनी तर्कशास्त्र, अपसामान्य मानसशास्त्र व ज्ञानमीमांसा यांचाही अभ्यास केला. १९२० मध्ये तेओदोर सीमोनसमवेत बीने-प्रयोगशाळेत प्रमाणित तर्कविचार कसोट्याही त्यांनी तयार केल्या. १९२१ नंतर संशोधन संचालक, रूसो इन्स्टिट्यूटचे सहसंचालक ही मानाची पदे त्यांनी भूषविली. त्यांनी १९२९ ते ३९ ह्या काळात रूसो इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे पॅरिस, लोझॅन व नशाटेल या विद्यापीठांतही अध्यापन करून १९५६ मध्ये जिनीव्हा येथे ‘इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल सायन्स’ ही संस्था त्यांनी स्थापन केली व तिचे ते संचालक झाले.
प्राणी व प्रौढ माणूस यांच्यामधील टप्पा या नात्याने बालकांच्या मनोविकासाचा जो अभ्यास सुरू झाला, त्यात प्याजेंचा वाटा विशेष महत्त्वाचा आहे. अकृत्रिम परिस्थितीत बालकांचे निरीक्षण करून तसेच निरनिराळ्या वयाच्या बालकांसाठी निरनिराळे चाचणी-प्रसंग योजून व त्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांच्या बौद्धिक विकासाचा प्याजेंनी अभ्यास केला. बालकांच्या, विशेषेकरून आपल्या स्वतःच्या मुलांच्या, मानसिक विकासाचा बारकाईने अभ्यास करता, पहिली दोन वर्षे तसेच २ ते ७, ७ ते ११ वर्षांनंतरचे वय, असे त्यांच्या मानसिक विकासाचे चार टप्पे प्याजेंना आढळून आले. पहिली दोन वर्षे बालकांचे मन मूर्त वस्तूंवर केंद्रित असते. २ ते ७ वर्षे ही तयारीची अवस्था असून या वयात भाषा, दिवास्वप्ने, स्वप्ने आणि खेळ यांच्याद्वारा बालके प्रतीके संपादन करतात. ७ ते ११ वर्षांच्या वयात योग्य वर्गीकरण, कार्यकारण व इतर संबंधांचे आकलन, अंकगणित तसेच या गोष्टींबाबत सुसंगत विचार करण्याच्या रीती यांवर त्यांच्या ठिकाणी प्रभुत्व येते. अकराव्या वर्षानंतर स्वतःच्या विचारांवर प्रभुत्व येते तसेच इतरांची विचारसरणी आकलन होण्याची क्षमताही येते. यांपैकी पहिल्या तीन टप्प्यांपर्यंत, मुळे स्वतःच्या परिसराचा चौकस धांडोळा घेत घेत विविध वस्तूंविषयीच्या स्वतःच्या कल्पना बनवीत-बदलत जात असतात, असे प्याजेंनी म्हटले आहे. त्यांच्या मते ह्या तीन अवस्थांत मुले बक्षिसाचे प्रलोभन या शिक्षेचा धाक यांमुळे ज्ञानसंपादन करीत नाहीत, तर नैसर्गिकपणेच ज्ञानसंपादन करतात. प्याजेंच्या ह्या विवरणाचे एक व्यापक सूत्र म्हणून त्यांच्या विकास-ज्ञानमीमांसेचा (जेनेटिक एपिस्टीमॉलॉजी) निर्देश करावा लागेल. त्यांच्या ह्या विकास-ज्ञानमीमांसाकल्पनेतूनच १९५५ मध्ये जिनीव्हा येथे प्रख्यात अशा आंतरराष्ट्रीय विकास-ज्ञानमीमांसा केंद्राची स्थापना झाली. प्याजेंचे संशोधन काही काळ दुर्लक्षिले गेले होते परंतु १९५६च्या सुमारास हार्व्हर्ड येथील जे. ब्रूनर व इतर अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी प्याजेंच्या विचारांची दखल घेतली व त्यांच्या ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे होऊ लागली. प्याजेंनी तिसाहून अधिक ग्रंथ फ्रेंचमध्ये प्रसिद्ध केले. त्यांतील काही महत्त्वाच्या ग्रंथांची भाषांतरित इंग्रजी नावे अशी : द लँग्वेज अँड थॉट ऑफ द चाइल्ड (१९२४), द चाइल्ड्स कन्सेप्शन ऑफ द वर्ल्ड (१९२६), द चाइल्ड्स कन्सेप्शन ऑफ फिझिकल कॉझॅलिटी (१९२७), द मॉरल जज्मेंट ऑफ द चाइल्ड (१९३२), ॲन इंट्रोडक्शन टू जेनेटिक एपिस्टीमॉलॉजी (३ खंड, १९५०), द ग्रोथ ऑफ लॉजिकल थिंकिंग (१९५५) इत्यादी.
पहा : बालमानसशास्त्र विकासात्मक मानसशास्त्र.
संदर्भ : Flavell, J. H. The Developmental Psychology of Jean Plaget,
अकोलकर, व. वि.
“