पोहणे : हातापायांच्या हालचालीने नैसर्गिक रीतीने पाण्यातून सरकण्याची क्रिया. हा एक अत्यंत लोकप्रिय असा, व्यायामदायक व रंजक क्रीडाप्रकार आहे. ज्या देशांना समुद्रसान्निध्य लाभलेले आहे, त्या देशांत पोहण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला जातो. उंट वगळता अन्य चतुष्पाद प्राणी, मासे, पायाची बोटे जोडलेले पक्षी, सरपटणारे प्राणी यांना निसर्गतःच पोहण्याची देणगी असते. माणसाला मात्र पोहण्याचे खास शिक्षण घ्यावे लागते. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा पोहण्यामुळे शरीरातील जास्तीत जास्त स्नायूंना व्यायाम मिळतो.

ऐतिहासिक आढावा : पोहण्याची कला मानवाला प्रागैतिहासिक काळापासूनच ज्ञात असावी, असे प्राचीन शिल्प, साहित्य वगैरेंच्या संदर्भावरून दिसून येते. सु. ११,००० वर्षांपूर्वीच्या लिबियन डेझर्टमधील एका गुहाचित्रामध्ये पोहणाऱ्या माणसांची रेखाटने आढळतात. इ. स. पू. २१६० च्या सुमारास एका ईजिप्शियन सरदाराने आपल्या मुलांच्या पोहण्याच्या शिक्षणाचा निर्देश केला आहे. इ. स. पू. ८८० च्या सुमारास ॲसिरियन सैनिक आधुनिक क्रॉलसदृश पद्धतीने पोहत असल्याचे एका शिल्पावरून दिसते. प्राचीन भारतीय पौराणिक वाङ्‌मयातही पोहण्याशी संबंधित असे निर्देश आढळतात. कृष्णाच्या व गोपींच्या जलक्रीडा सर्वश्रुतच आहेत. भीमाच्या गदेचा प्रहार चुकवण्यासाठी दुर्योधनाने कुंभक करून पाण्यात बैठक मारल्याची कथा महाभारतात आढळते. या उल्लेखांवरून प्राचीन काळी भारतात पोहण्याची व पाण्यात बुडणाराला वाचवण्याची कला अवगत असावी, असे अनुमान काढता येते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जपान इ. देशांत या कलेचा अभ्यास सुरू होण्यापूर्वी, भारतात ज्या पद्धतीने पोहत असत, त्याला ‘इंडियन स्ट्रोक’ असे म्हणण्यात येते. ह्यालाच ‘शेरण्या’ किंवा ‘वरचे हात’ असे म्हणतात. प्राचीन ग्रीस व रोम या देशांतही पोहण्याची कला फार लोकप्रिय होती. सैनिकी प्रशिक्षणाच्या दृष्टीनेही पोहण्याचे कौशल्य महत्त्वाचे मानले जाई. जपानमध्ये इ. स. पू. ३६ मध्ये सुजीन सम्राटाच्या कारकीर्दीत पोहण्याची स्पर्धा झाल्याचे उल्लेख सापडतात. इ. स. १६०३ मध्ये तर पोहणे हा शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक बनला. मध्ययुगीन यूरोपमध्ये मात्र पोहण्याची कला मागे पडली. पोहण्यामुळे रोगाच्या साथी पसरतात, असा अपसमज त्यामागे होता व एकोणिसाव्या शतकापर्यंत तो टिकून होता. १६६० पासून समुद्रस्नान करण्याची प्रथा उत्तर यॉर्कशरमध्येही असल्याचे दिसून येते. एकोणिसाव्या शतकात पोहण्याला स्पर्धात्मक क्रीडेचे स्वरूप आले. पोहण्याच्या विविध पद्धती (स्ट्रोक्स) त्या काळात प्रचलित झाल्या. १८३७ पासून ब्रिटनमध्ये पोहण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या. तदनंतर या स्पर्धा इतर देशांतूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाल्या. १८९६ साली अथेन्स येथे ऑलिंपिक सामन्यांचे जे पुनरुज्‍जीवन झाले, त्यात पोहण्याच्या सामन्यांचा अंतर्भाव झाला. १९०४ साली पाण्यातील उड्या वा सूर (डाइव्ह) मारण्याच्या खेळाची त्यात भर पडली. १९१२ साली स्त्रियांचे सामने सुरू झाले.

पोहण्याचे प्रशिक्षण : पोहण्याच्या शिक्षणपद्धतीविषयी अनेक मते आढळतात. तथापि दोनच विचारसरणी मुख्यत्वे प्रचलित आहेत. यूरोपीय विचारसरणी ‘गोल हाताची पद्धत’ (ब्रीस्ट स्ट्रोक) प्रथम शिकवावी, असे प्रतिपादते तर अमेरिकन विचारसरणी ‘सरपट पद्धत’ (क्रॉल) सुरुवातीस शिकवावी, यावर भर देते. मात्र पोहताना कोणत्या हालचाली कराव्या लागतात, याची कल्पना येण्यासाठी जमिनीवर किंवा उथळ पाण्यात कवायती कराव्यात, असे दोन्ही पद्धती मानतात.

आ. १. गोल हात पद्धत

पोहावयास शिकणाराची पाण्याची भीती नाहीशी होण्यासाठी त्याला एकदम पाण्यात ढकलून देण्याची प्रथा सर्वसाधारणपणे दिसते. परंतु अशा दांडगाईचा परिणाम उलट होण्याचा संभव असतो. पाण्याची स्वाभाविक भीती आणि मनोदौर्बल्य यामुळे शिकणाऱ्याच्या स्नायूंवर ताण पडतो. अवयवांची वेगात हालचाल केल्याने आणि ते शिथिल करता येत नसल्याने त्या अडचणीत भरच पडते. विद्यार्थ्याने शिक्षकाबरोबरच हळूहळू गळ्यापर्यंत पाण्यात शिरले असता त्याला तितकी भीती वाटत नाही. उथळ पाण्यात बुचकळ्या मारण्यापूर्वी दीर्घ श्वास घेऊन पाण्यात डोक बुडवून तोंडातून आणि नाकातून उच्छ्‌वास केला म्हणजे पोहताना श्वासोच्छ्‌वास कसा करावा, हे ध्यानात येते. शिक्षकाने विद्यार्थ्यांला पोटाखाली वा पाठीखाली हाताचा आधार देऊन किंवा (दोरी काचू नये म्हणून) रबरी नळीचे वेष्टन असलेल्या दोरीचे कमरेभोवती वेटोळे करून ती काठीला बांधून त्याला काठावरून आधार देऊन शिकविणे सोपे जाते. शिकावयास सुरुवात करताना हवा भरलेली रबरी नळी, पोहावयाचे जाकीट, भोपळे, लाकडाची रुंद फळी, बंद डबे किंवा तत्सम पदार्थांचा कित्येकदा उपयोग केला जातो. कमरेपर्यंत असलेल्या पाण्यात ओणवून आणि दीर्घ श्वास घेऊन कमरेवरचा भाग पाण्यात जाऊ दिला व हात ताठ केले, की जमिनीवरचे पाय सुटून पोहणारा पाण्यात तरंगू लागतो. त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन, तोंड पाण्यात बुडवून, पाय मागे जातील तितके ताणून, हात डोक्यावरून पुढे ताणले, की शिकणारा पोटावर पालथा तरंगू शकतो. पाण्यावरून अधोमुख सरकत जाण्यासाठी पुढे वाकून, जुळविलेले हात डोक्यांवरून पुढे ताठ करीत खांदे पाण्याखाली नेऊन, दीर्घ श्वास घेऊन तोंड पाण्यात बुडवाने आणि पायाने पाणी रेटावे. पुन्हा पाण्यात उभे राहण्याकरिता गुडघे शरीराखाली घेत हात पाण्यात घेऊन डोके वर काढावे. खांद्याइतक्या उथळ पाण्यात बसून, दोन्ही तळहात पाण्यातच ठेवून हात बाजूंना ताणीच, कमर वर उचलीत, पायाने रेटा देत, डोके मागे नेल्यास उताणे तरंगता येते.पुन्हा उभे राहताना गुडघे वर घेत हात पुढे ढकलून डोके खाली वाकवावे लागते. इतकी प्रगती झाल्यावर पाय मारावयास शिकण्यासाठी दोन्ही हातांनी काठाला धरून किंवा काठाला जोडलेल्या दांड्याला पकडून खालीवर पाय मारताना ते गुडघ्यात थोडे वाकवून घोटे सैल ठेवावे. पाय मारता येऊ लागले, की अधोमुख सरकत जाताना किंवा उताणे तरंगताना त्याचा उपयोग करावा.

पोहणाऱ्याला तरंगता येऊन पाय मारता आले, की कुत्रा पोहतो त्या पद्धतीने (डॉग पॅडल) हात मारावयास शिकवावे. पाण्यातल्या पाण्यातच एकाआड एक हात पुढे घेत, तळहाताने पाणी दाबीत ते खांद्याच्या रेषेत आणावे. मात्र कुत्र्याच्या पद्धतीने पोहण्यात वेग येत नाही आणि ही पद्धती आकर्षकही नाही.

दुसऱ्या महायुद्धात सैनिकांच्या अभ्यासक्रमात पोहणे हा विषय ठेवलेला होता. वीस ते तीस वर्षे वयाच्या सैनिकांना ही कला लवकर आत्मसात करता यावी, म्हणून उताणे पोहावयाच्या पद्धतीचा उपयोग करण्यात आला.

पोहण्याच्या पद्धती : पोहण्याच्या गोल हात पद्धत, कुशीवरील पद्धत (साइड स्ट्रोक), सरपट पद्धत व पाठीवरील पद्धत (बॅक स्ट्रोक) ह्या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या मूलभूत पद्धती आहेत. ह्याच पद्धतींमध्ये काहीसे फेरफार होऊन ट्रजन पद्धत, फुलपाखरी (बटरफ्लाय) पद्धत, कुशीवरील वरचे हात (ओव्हरआर्म साइड स्ट्रोक) इ. अनेक उपप्रकार निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये मात्र चारच पद्धती अधिकृत मानल्या जातात त्या अशा : गोल हात पद्धत, पाठीवरील पद्धत, फुलपाखरी पद्धत व मुक्त शैली (फ्री स्टाइल).


‘फ्री स्टाइल’ ही नावाप्रमाणेच पोहण्याची मुक्त शैली असून, त्यात स्पर्धक जलतरणपटू त्याला हव्या त्या पद्धतीने पोहू शकतो. आधुनिक स्पर्धांमध्ये स्पर्धक ‘फ्रंट क्रॉल’पद्धतीचाच विशेषतः वापर करतात, त्यामुळे कित्येकदा ‘फ्रंट क्रॉल’लाच ‘फ्री स्टाइल’असे म्हटले जाते. वरील पद्धतींची पुढे थोडक्यात माहिती दिलेली आहे :

 गोल हात पद्धत : प्राचीन काळात हातापायांची हालचाल एकमेकांना पूरक करण्याच्या कल्पनेतून या पद्धतीचा उगम झाला. याचेच पुढे गोल हात पद्धत आणि फुलपाखरी पद्धत असे दोन प्रकार झाले. दोन्ही पद्धतींत हात संपूर्णपणे पुढे नेल्यावर तळवे पाण्याकडे करून हात जुळविल्यानंतरच हात मारावयास प्रारंभ होतो. जुन्या पद्धतीत पाणी दाबताना आणि हात बाहेरून खांद्याच्या रेषेत येताना सु. ८० अंशांचा कोन करतात. हात छातीजवळ आणि कोपरे शरीराजवळ आख्यावर, तळहात खाली करून ते पूर्वस्थितीत नेतात. त्याचवेळी पाय वर घेतल्यावर ते फाकताना, तळवे वर काढून दोन्ही घोटे जवळ घेतात. नंतर दोन्ही हात पृष्ठभागातच पुढे ताणताना, हातांची बोटे जुळविल्यावर, हात फाकून एकदम झेप घेतात. एक आवर्तन पूर्ण झाल्यावर श्वास घेण्यासाठी क्षणभर पाण्याबाहेर तोंड काढतात आणि हात पुढे घेतानाच ते पुन्हा पाण्यात नेतात. हात मागे घेताघेताच पाय जवळ घेऊन ते बेडकासारखे झटकतात. फुलपाखरी पद्धतीत पाणी दाबीत हात मांड्यांपर्यंत गेल्यानंतर ते वर येताना त्यांची हालचाल वर्तुळाकृती होते. दोन्ही पद्धतींत वेग येण्यासाठी तोंड वर काढून श्वास घेतात आणि हात पुढे नेताना तोंड बुडवून पाण्यातच श्वास सोडतात. फुलपाखरी पद्धतीने जास्त वेगात पोहता येते.

कुशीवरील पद्धत : कुठल्याही कुशीवरून हात मारताना पाय कातरीसारखे मारतात. दोन्ही पाय ताठ करून, बोटे पाण्याकडे रोखीत, पाय गुडघ्यात वाकवून परत पृष्ठभागाजवळ आणतात. खालचा पाय गुडघ्यात वाकवून वर आणताना शरीराच्या मागे ठेवतात. दोन्ही हात आलटूनपालटून, छाती आणि डोक्याखालून पुढे ढकलताना पोहणारा पाण्यात कुशीवर निजल्यासारखा राहतो. वरील बाजूचा हात गालाजवळून आणि शरीराजवळून खाली नेताना तो मांडीजवळ आल्यावर पाण्याबाहेर काढतात. वर्तुळाकार झेप घेऊन पाय लांब केल्यावर ते एकमेकांजवळ घेतात. कुशीवरील वरचे हात मारताना वरचा हात पाण्याबाहेर ताणून त्याने पाणी ओढताना शरीर थोडेसे पुढे सरकत असल्याने या हातांनी अधिक वेग येतो.

ट्रजन पद्धत : वरचे हात आणि कातरीसारखी पायांची हालचाल मिळून ही पद्धत होते. जे. आर्थर ट्रजन याने १८७३ मध्ये ही पद्धत इंग्लंडमध्ये रूढ केली. त्याने ती दक्षिण अमेरिकेतील इंडियन लोकांकडून आत्मसात केली असावी, असे दिसते. स्पर्धात्मक पोहण्यात तिला तिच्या गतिशीलतेमुळे प्राधान्य आले. या पद्धतीचा उपयोग करून ट्रजन याने पूर्वीचे उच्चांक मोडल्याने ती पुढे इतरांनीही उचलली.

आ. २. सरपट पद्धत

सरपट पद्धत : या पद्धतीने पोहणारा पाण्यावर सरपटत गेल्यासारखे वाटत असल्याने त्यास ‘क्रॉल’ हे नाव पडले. ऑस्ट्रेलियातील स्थानिक लोकांत ही पद्धत रूढ असल्याने त्याला ‘ऑस्ट्रेलियन क्रॉल’ असेही म्हणण्यात येते. १९०२ साली रिचर्ड कॅव्हिल यांनी ती इंग्लंडमध्ये आणली. त्या पद्धतीने शर्यतीतून कॅव्हिल यांना यश मिळाल्याचे पाहून अमेरिकन जलतरणपटू सी. एम्. डॅन्येल्झ याने ही पद्धत शिकून, १९०६ मध्ये १०० यार्ड (९१·४४) अंतर कमीत कमी वेळात पोहून जागतिक उच्चांक प्रस्थापित केला. यानंतर ही वेगवान पद्धत स्त्रीपुरुषांनी उचलून तिला चाळीस वर्षांत परिपूर्णता आणली. या पद्धतीत हात किंचित वाकवून, कोपर वर उचलून, तोंडासमोर तो पाण्यात खुपसून शरीराच्या मध्यरेषेपर्यंत उभा आल्यावर, त्यात बाक घेऊन कटिभागापर्यंत अलग बाहेर काढतात. हात पुन्हा पुढे टाकताना पंजाचा झोक शरीरापासून दूर आणि हवेत उंच


आ. ३. पाठीवरील पोहण्याची पद्धत

जातो. एकीकडून दुसरीकडे मान वळविताना खांद्याजवळच्या पोकळीतून श्वासोच्छ्‌वास करावा लागतो. पाय ताणून, बोटे पाण्याकडे वळवून, गुडघे जुळवून व घोटे सैल ठेवून पृष्ठभागाखालून सारख्या वेगात खालीवर पाय मारतात. यामुळे कमर आणि पाय घोळत आडवेच राहतात. मोठे अंतर पोहताना ही पद्धत उपयोगी पडते. 

आ. ४. अ. : फुलपाखरी पद्धत : एका बाजूचे दृश्य.

पाठीवरील पद्धत : पूर्वी या पद्धतीला ‘डॉर्सल स्विमिंग’ (पाठीवरील पोहणे) असे म्हणत असत. या पद्धतीत पूर्वी दोन्ही हात एकाच वेळी मागे टाकून व पाय गुडघ्यात वाकवून ते बेडकासारखे खालीवर मारीत असत. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये या पद्धतीचा अंतर्भाव १९०८ साली पुरुषांकरिता आणि १९२४ साली स्त्रियांकरिता करण्यात आला. क्रॉल प्रकाराच्या उदयानंतर या प्रकारातही बदल घडून आला. परिणामी त्यास उताण्या स्थितीतील सरपट पद्धत (बॅक क्रॉल) असेही म्हटले जाऊ लागले. ह्या पद्धतीत हात एकापाठोपाठ एक आणि एक पाण्याबाहेर व एक पाण्यात या पद्धतीने मारले जातात. पायाचा उपयोग कातरीसारखा केला जाऊन पाणी रेटले जाते. हात खांद्यांपासून पूर्ण उचलून टाकायचे असल्यामुळे हात खांद्यांतून लवचिक ठेवावे लागतात. हात मारताना प्रारंभी ते कोपरातून किंचित वाकलेले असतात, पण मागे जाताना सरळ होत जातात. पायांची हालचाल फक्त खालीवर करण्याइतकीच मर्यादित असते.

या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीचा प्रारंभ बाहेरून पाण्यात उडी मारून होत नसून पाण्यातच होतो. या पद्धतीनुसार पोहताना स्पर्धकाला पूर्ण वेळ पाठीवरच पोहावे लागते. चेहरा पाण्याच्या वर असल्याने श्वासोच्छ्‌वासाचे वेगळे तंत्र नसते. या पद्धतीचा उपयोग विश्रांती घेत पोहताना तसेच बुडणाराला वाचवतानाही केला जातो.

आ. ४ आ. : फुलपाखरी पद्धत : समोरील दृश्य.

फुलपाखरी पद्धत : सर्व स्पर्धात्मक पद्धतीमंध्ये ही पद्धत आधुनिक मानली जाते. गोल हातांच्या पद्धतीत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेतून या पद्धतीचा उगम झाला. १९३५ मध्ये हेन्‍री मायर्स या अमेरिकन जलतरणपटूने या पद्धतीचा पोहण्याच्या स्पर्धांमध्ये प्रथम वापर केला. १९५२ मध्ये तिचा ऑलिंपिक स्पर्धांत अंतर्भाव झाला. या पद्धतीत पोहणाऱ्याच्या पायांची हालचाल डॉल्फिन माशाच्या शेपटीसारखी (डॉल्फिन किंवा फिशटेल किक) होते, हे तिचे वैशिष्ट्य होय. या पद्धतीत दोन्ही हात पाण्यावरून एकाच वेळी पुढे आणले पाहिजेत व एकाच वेळी मागे नेले पाहिजेत. दोन्ही पायांची हालचालही एक-समयावच्छेदेकरून केली पाहिजे. शरीर छातीवर तोलणे आवश्यक आहे. दोन्ही खांदे पाण्याच्या पृष्ठभागावर राहिले पाहिजेत. अशा प्रकारचे नियम ठरविण्यात आले आहेत.

तरंगणे : (फ्लोटिंग). कमीतकमी हालचाल करीत पाण्यावर तरंगण्यासाठी कौशल्य लागते. प्रत्येक माणसाच्या तरंगण्याच्या क्षमतेत फरक असला, तरी योग्यत्या शिक्षणामुळे पाण्यात शरीर समतोल राखता येते. शिकाऊ माणसाला आपले पाय पाण्याच्या पृष्टभागाशी समांतर ठेवणे कठीण पडते. उताणे किंवा पालथे तरंगताना शरीराचा आस लांबविण्याकरिता हात डोक्याच्या पलीकडे न्यावे लागतात. समतोल साधण्यासाठी श्वासोच्छ्‌वास नियंत्रित करावा लागतो. पाय गुडघ्यांत वाकवूनही समतोल साधता येतो. ही कला आत्मसात झाल्यास ती पोहणाराला किंवा शिकणाराला स्वसंरक्षणासाठी उपयोगी पडते. माणूस चालताना ज्याप्रमाणे एकामागे एक पाय टाकतो, तशी पायांची हालचाल करून हातांनी पाण्यावर दाब दिल्यास सहजपणे पाण्यावर उताणे पडून राहता येते.

जीव वाचविणे : पाण्यात बुडणाऱ्यास वाचविण्यासाठी दोन प्रमुख पद्धती आहेत. या पद्धतींचे शिक्षण घेतलेले असावे. शक्यतो पाण्यात न शिरता वाचविता येणे जमत असल्यास पाहावे म्हणजे दोरी, काठी, वल्हे इत्यादींचा उपयोग करावा व बुडणाऱ्यास त्यांच्या आधारे बाहेर काढावे. पहिल्या पद्धतीत वाचविणाऱ्याने बुडणाऱ्या माणसाच्या मागे जाऊन त्याच्या छातीवर हात ठेवून उताणे पकडावे व दुसऱ्या हाताने कुशीवरील हात मारून कडेला आणावे. दुसऱ्या पद्धतीत बुडणाऱ्याचे डोके दोन्ही हातांनी उताणे छातीवर धरून उताणे पोहून कड गाठली जाते. या पद्धतीत बुडणाऱ्याचे व त्याला वाचविणाऱ्याचे डोके पाण्यावर राहते. बालवीर व जलरक्षक पथकातील लोकांना याचे खास शिक्षण देण्यात येते.


पोहण्याच्या स्पर्धा : पोहण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा ‘Federation Internationale de Natation Amateur’ (‘फीना’) या संघटनेच्या वतीने व तिच्या नियमांनुसार होतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत ५० मी. X २१ मी. चा तलाव वापरला जातो. एका स्पर्धकाला पोहण्यासाठी २·५० मी. रुंदीची जागा मिळते. पोहण्याच्या स्पर्धांतील अधिकारी वर्ग पुढीलप्रमाणे असतो : (१) पंच (रेफरी) – नियंत्रक, (२) प्रारंभक (स्टार्टर)-स्पर्धा सुरू होण्यापर्यंतचा नियंत्रक, (३) स्पर्धेची सुरुवात आणि शेवट यांचे नियंत्रण करणारे दोन अधिकारी (प्लेसिंग जजे्स), (४) स्पर्धक विशिष्ट पद्धतीनेच पोहतो आहे किंवा नाही, हे पाहणारे दोन नियंत्रक (स्ट्रोक जजे्‌स)- स्पर्धकाला स्पर्धेतून बाद करण्याचाही त्यांना अधिकार असतो, (५) स्पर्धक ५० मी. अंतर तोडल्यावर नियमाप्रमाणे वळतो की नाही, हे पाहणारे दोन नियंत्रक (टर्निंग जजे्‌स), (६) वेळाधिकारी (टाइमकीपर) आणि (७) स्पर्धेच्या निकालाची नोंद ठेवणारा नोंदलेखक (रेकॉडर).

ऑलिंपिक व इतर तत्सम दर्जांच्या सामन्यांत खालील स्पर्धा होतात :

(१) १००, २००, ४०० आणि १,५०० मी. मुक्त शैलीच्या पुरुषांच्या स्पर्धा आणि १००, २००, ४०० व ८०० मी. स्त्रियांच्या स्पर्धा.

(२) ४ X १०० मी. व ४ X २०० मी. मुक्त शैलीच्या सांघिक (रिले) शर्यती.

(३) २०० मी. व ४०० मी. स्त्रीपुरुषांच्या वैयक्तिक मिश्र (मेडले) स्पर्धा आणि ४ X १०० मी. व ४ X १००  मी. मिश्र (मेडले) स्त्रियांच्या शर्यती.

या मिश्र स्पर्धांत स्पर्धकाला पोहण्याच्या चारही अधिकृत पद्धती विशिष्ट क्रमाने उपयोगात आणव्या लागतात.

(४) १०० वा २०० मी. पाठीवरील पद्धतीच्या स्पर्धा.

(५) १०० व २०० मी. गोल हात पद्धतीच्या स्पर्धा.

(६) १०० व २०० मी. फुलपाखरी पद्धतीच्या स्पर्धा.

(७) उसळफळीवरील (स्प्रिंगबोर्ड) आणि उंच फलकावरील (प्लॅटफॉर्म) उड्यांच्या स्पर्धा.

आ. ५. तंत्रशुद्ध पवित्रा घेऊन मारलेला सूर

पाण्यातील उड्यांच्या स्पर्धा : यासाठी शरीराचा चपळपणा, डौलदार हालचाली व बेडर वृत्ती यांची प्रामुख्याने आवश्यकता असते. काठावरून, डोक्यावर हात ताठ उंचावून, तोल जाईपर्यंत पुढे झुकले, की कुठलाही धोका न संभवता सहजपणे पाण्यात उडी मारता येते. अनेक प्रकारच्या प्रेक्षणीय उड्यांच्या स्पर्धा घेण्यात येतात. या प्रकारांची वाढ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली. उड्यांचे विविध प्रेक्षणीय व कल्पकतापूर्ण प्रकार प्रत्यक्ष पाण्यात पडण्यापूर्वीच करावे लागतात. १९०४ मध्ये ऑलिंपिक सामन्यांत पाण्यातील उड्यांच्या वा सूर मारण्याच्या स्पर्धांचा (डाइव्हिंग) समावेश झाला. त्यातील ५ ते १० मी. उंचीवरील उड्यांत काही सक्तीच्या तर काही ऐच्छिक होत्या. उडीची सुरुवात, प्रत्यक्ष पाण्यात शिरण्याची पद्धती आणि दरम्यान होणाऱ्या हालचाली यांवर पंच गुण देत असत. त्याचप्रमाणे उड्यांचे अधिकृत प्रकार आणि तिच्यातील सोपेपणा व काठिण्य यांचाही विचार करण्यात येत असे. प्रारंभी उंचावरील १४ व उसळफळीवरील २० उड्यांच्या प्रकारांची नोंद मिळते. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांची संख्या अनुक्रमे ७७ व ५९ झाली. या आकड्यांवरून उड्यांच्या प्रकारांत झपाट्याने झालेली प्रगती ध्यानात येते.

शरीर गरगर फिरवून व वाकवून (स्पिन अँड ट्‌विस्ट) तसेच या दोन्ही प्रकारांचे मिश्रण करूनही उड्या मारण्यात येतात. उड्यांतील तिहेरी बाक व दीड कोलांट्या यांचे मिश्रण फार कौशल्यपूर्ण असते.

 या उड्यांसाठी वापरले जाणारे फलक लाकूड, ॲल्युमिनियम, लोखंड किंवा कुठल्याही लवचिक माध्यमाचे असतात. ते स्पर्धक घसरणार नाही अशा काथ्याच्या हातऱ्यांनी झाकतात आणि जरूर तितके लवचिक होण्यासाठी त्यांना टेकू देतात.

विविध उंचीवर वापरण्यात येणारे फलक

फलकाचा प्रकार            उंची

उंची

लांबी

रुंदी

प्लॅटफॉर्म

१० मी.

६ मी.

२ मी.

प्लॅटफॉर्म

७·५० मी.

६ मी.

१·५० मी.

प्लॅटफॉर्म

५ मी.

६ मी.

१·५० मी.

प्लॅटफॉर्म

३ मी.

५ मी.

०·८० मी.

स्प्रिंगबोर्ड

३ मी.

५ मी.

०·५० मी.

स्प्रिंगबोर्ड

१ मी.

५ मी.

०·५० मी.

 स्पर्धेसाठी एकूण सहा अधिकृत गट करण्यात आले आहेत : (१) स्पर्धक पाण्याकडे तोंड करून फलकावर उभा राहतो व पाण्यात सूर मारतो (फॉरवर्ड डाइव्ह). यात पाण्यात शिरण्यापूर्वी तो / ते ३/ वेळा गरगर फिरतो. (२) तो पाण्याकडे पाठ करून पाण्यात सूर मारतो (बॅकवर्ड डाइव्ह). यात पाण्यात शिरण्यापूर्वी तो / ते २/ वेळा गरगर फिरतो. (३) स्पर्धक पाण्याकडे तोंड करून उडीस सुरुवात करतो, परंतु हवेत शरीर फिरवून पाण्याकडे पाठ करतो व तोंड फिरवतो (रिव्हर्स डाइव्ह). यात तो पाण्यात शिरण्यापूर्वी / ते २/ वेळा फिरतो. (४) स्पर्धक पाण्याकडे पाठ करून उभा रहातो व शरीर आत वळवून उडी घेतो (इनवर्ड डाइव्ह). यात तो पाण्यात शिरण्यापूर्वी / ते २/वेळा फिरतो. (५) तो शरीर हवेत वळवून पाण्यात सूर मारतो (ट्‌विस्टिंग डाइव्ह). यात तो / ते ३/ वेळा स्वतःभोवती फिरतो व मग पाण्यात शिरतो. (६) स्पर्धक हातांवर तोल सावरून फलकावर उभा राहतो व पाण्यात सूर मारतो (आर्मस्टॅंड डाइव्ह).


वरील स्पर्धांतील गुणपद्धती पुढीलप्रमाणे असते : (१) अपयश-० गुण, (२) असमाधानकारक –/ ते २ गुण, (३) सदोष –२/ ते ४/ गुण, (४) समाधानकारक–५ ते ६ गुण, (५) चांगला–६/२ ते ८ गुण आणि (६) उत्कृष्ट–८ / ते १० गुण.

 समुद्रात किंवा खाडीत पोहताना भरती-ओहोटीच्या वेळा, वादळ व तुफान यांच्या शक्यता, तसेच खडक, अंतर्गत प्रवाह व जलचर प्राणी यांचे धोके लक्षात घेऊन पोहावे लागते. समुद्रात खाऱ्या पाण्याचे वजन जास्त असल्याने त्यात पोहणे सोपे असले, तरी वेगवान लाटांचा मोठा अडथळा येतो. वाहत्या पाण्यात असणाऱ्या अनेक प्रकारच्या प्रवाहांवर मात करावयाचे ज्ञान नसल्यास त्यात पोहणे धोकादायक ठरते.

काही जागतिक विक्रम : इंग्लिश खाडी पहिल्यांदा पोहून जाण्याचा विक्रम कॅप्टन मॅथ्यू वेब या जलतरणपटूने केला. डोव्हर ते कॅले हे ३३ किमी. अंतर त्यांनी २४—२५ ऑगस्ट १८७५ रोजी एकूण २१ तास ४५ मि. एवढ्या अवधीत पार केले. गर्ट्रूड एडर्ली या अमेरिकन स्त्रीने १९२६ साली ही खाडी पोहून स्त्रियांमध्ये पहिला मान संपादन केला. केव्हिन अँडरसन हा बारा वर्षांचा दक्षिण अफ्रिकन इंग्लिश खाडी पार करणारा सर्वांत लहान जलतरणपटू. ही खाडी त्याने १९७९ साली साडेबारा तासांत पार केली. मिहिरकुमार सेन हे इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय जलतरणपटू होत. त्यांनी २६—२७ सप्टेंबर १९५८ रोजी १४ तास ४५ मिनिटांत हे अंतर पार केले. या यशाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब दिला. इंग्लिश खाडीव्यतिरिक्त त्यांनी पनामा कालवा (सु. ६७ किमी. अंतर व ३५ तास ३० मि. वेळ) पाल्कची सामुद्रधुनी (सु. ३५ किमी. २५ तास ४४ मि.) जिब्राल्टरची सामुद्रधुनी (सु. ३७ किमी. ८ तास १ मि.) वगैरे अंतर पोहून अनेक विक्रम केले आहेत. अनंत विष्णू जाधव यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी रेवस बंदर ते मुंबईच्या गेटवेपर्यंतचे सु. ३२ किमी. (२० मैल) अंतर ७ तास २५ मिनिटांत पोहून जाण्याचा विक्रम केला. यांखेरीजही जलतरणाचे अनेक जागतिक विक्रम नोंदले गेले आहेत. मार्क स्पिट्झ या अमेरिकन स्पर्धकाने १९६८ (२) व १९७२ (७) या ऑलिंपिक स्पर्धांत ९ सुवर्णपदके मिळवून जागतिक विक्रम नोंदवला. १९६८ मध्ये त्यांना एक रौप्य व एक ब्राँझ पदकही मिळाले होते. स्वीडनच्या आर्ने बोर्ग या जलतरणपटूने १९२१—२९ या काळात सर्वांत जास्त म्हणजे ३२ जागतिक उच्चांक नोंदवले, तर रॅनहिल्ड व्हेगर या डेन्मार्कच्या स्त्री जलतरणपटूने १९३६—४२ या काळात ४२ उच्चांक केले. सर्वप्रथम इंग्लंड ते फ्रान्स व फ्रान्स ते इंग्लंड असे दुहेरी अंतर पोहण्याचा विक्रम आंतोन्यो आबर्तोन्दो यांनी १९६१ मध्ये केला. पहिले अंतर त्यांनी १८ तास ५० मिनिटांत तोडले व मध्ये चार मिनिटांची विश्रांती घेऊन परतीचे अंतर २४ तास १६ मिनिटांत पार केले. ऑस्ट्रेलियाच्या रेन्फोर्ड यांनी दहा वेळा इंग्लिश खाडी पोहण्याचा विक्रम केला. बांगला देशच्या ब्रोजन दास या जलतरणपटूनेही ही खाडी १२ दिवसांच्या कालावधीत ६ वेळा दोन्ही बाजूंनी पोहून पार केली आहे. अमेरिकेच्या फ्रेड न्यूटन या जलतरणपटूने १९३० मध्ये एकूण २,९६८ किमी. अंतर पोहून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला. तो ७४२ तास पाण्याखाली होता.

 पाण्यातील खेळ : पोहण्याच्या कलेचा जसजसा विकास होत गेला, तसतसा पाण्यातील अनेक नव्या नव्या खेळांचा उदय झाला. त्यांतील काही निवडक प्रकार पुढे दिले आहेत :

 वाटर पोलो : या खेळात प्रत्येक संघात सात खेळाडू व चार राखीव खेळाडू असतात. दोन्ही बाजूंचे खेळाडू पोहतपोहत चेंडूला शिवण्याचा किंवा तो जाळ्यात फेकून गोल करावयाचा प्रयत्न करतात. खेळाला वेळेची मर्यादा असते. पाण्याचा तलाव २० ते ३० मी. लांब व ८ ते २० मी. रुंद असतो. पाण्याची खोली किमान १·५० मी. असते. गोल करण्याचे जाळे सामान्यतः तलावाच्या तळापासून २·४० मी. उंच व ३ मी. लांब असते. चेंडूचा परिघ ६८ ते ७१ सेंमी. व वजन ४०० ते ४५० ग्रॅ. असते. या खेळाचा प्रारंभ १८७० साली इंग्लंडमध्ये झाला. पुढे तो यूरोपमध्ये व अमेरिकेत प्रसृत झाला.

आ. ६. वॉटर पोलो : पंजाब वॉटर पोलो अजिंक्यपदाच्या ब्रदर्स क्लब वि. शासकीय महाविद्यालय यांच्यातील अंतिम सामन्याचे दृश्य.

बास्केटबॉल : मध्य व पश्चिम अमेरिकेत लोकप्रिय आहे. तो दोन संघांत खेळतात. खेळाडूंच्या संख्येवर बंधन नसते. चेंडू पाण्यावर तरंगात असतानाच ढकलीत गोलरेषेकडे न्यावा लागतो. चेंडूचा व्यास १·२१ मी. असतो.

पाण्यातील समूहनृत्ये : ही नृत्ये म्हणजे पाण्यातील ‘बॅले’ होत. विशेषतः पाश्चिमात्त्य स्त्रियांत ही प्रचलित आहेत. पार्श्वसंगीताच्या साथीवर जलतरणपटू नर्तकी आकर्षक हालचाली करीत पाण्यावरून सरकत जातात आणि त्यांतून विविध प्रकारचे एकात्म व सुसंवादी नृत्यबंध साधले जातात. या बॅले नृत्याच्या स्पर्धाही भरवल्या जातात व त्यांना उड्यांच्या स्पर्धांप्रमाणे गुण देतात.


वॉटर स्कीइंग : १९२० नंतर यूरोपमध्ये व अमेरिकेत या खेळाचा उगम झाला. या खेळासाठी तलावातील पाणी शांत असणे आवश्यक असते. मोटारबोटीला सु. ३० मी. लांबीची दोरी जोडलेली असते. दोरीच्या दुसऱ्या टोकाला २८ सेंमी. लांबीची दांडी असते. तिच्या आधारे खेळाडूला दोरीचे टोक पकडणे सोयीचे ठरते. खेळाडू पायात जी ‘स्की’ (बर्फावरून चालताना वापरण्याचे पादत्राण) घालतो, तिची लांबी १·७ मी. आणि रुंदी १६·५ सेंमी. असते. मोटारबोट पाण्यावरून पुढे निघाली, की खेळाडूही पायातील ‘स्की’मुळे पाण्यावरून वेगाने पुढे जातो. यासाठी धाडस आणि तोल सांभाळण्याचे कौशल्य यांची आवश्यकता असते. तलावातील पाणी शांत असावे, यासाठी बऱ्याच देशांत अंतर्गेही (इनडोअर) तलाव बनवले आहेत. या तलावाची लांबी १५० मी. व रुंदी २३ मी. इतकी सर्वसामान्यपणे असते. वॉटर स्कीइंगचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात. ते म्हणजे उड्डाण (जंपिंग), ‘स्लालोम’ व क्लृप्ति-आरोहण (ट्रिक रायडिंग). उड्डाणामध्ये ३·६६ मी. रुंद, ६·१० मी. लांब व १·८३ मी. उंच असा अडथळा असतो. तो पार करून खेळाडूला १·८३ मी. उंचीवरून पाण्यात उतरावे लागते. ह्यात तोल सावरण्याची नितांत आवश्यकता असते. स्लालोम पद्धतीत वक्र मार्गाने अडथळे पार करावे लागतात, तर क्लृप्ति-आरोहणामध्ये दोन्ही पायांसाठी मिळून एकच ‘स्की’ वापरली जाते. हा खेळ जगातील बहुतेक सर्व देशांत खेळला जातो.

लाटारोहण : (सर्फ रायडिंग किंवा सर्फिंग). पॅसिफिक समुद्रातील पॉलिनीशियन बेटावरील लोक हा खेळ खेळत असल्याची नोंद १७७८ साली जेम्स कुकने हवाई बेटावर परतल्यानंतर केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या खेळाचा प्रसार यूरोप व अमेरीका येथे झाला. १·८३ मी. ते २·२८ मी. लांबीची पुढील टोकास निमुळती व मागील बाजूस थोडी रुंद अशी माशाच्या आकाराची फळी या खेळासाठी आवश्यक असते. खेळाडू प्रथम फळी हातात घेऊन समुद्रात खोलवर पोहत जातो व समुद्राच्या लाटांचा अंदाज घेऊन मग फळीवर तोल सावरून उभा राहतो. किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांमुळे तोही वेगाने किनाऱ्याकडे येऊ लागतो. ह्यासाठी धैर्याबरोबरच लाटांचा अचूक अंदाज घेणे, योग्य तीच लाट निवडणे, शरीराचा तोल सांभाळणे या गोष्टींचीही आवश्यकता असते. या खेळाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धाही भरवल्या जातात. काही बेटांवर तळ्यातील पाण्यात कृत्रिम रीतीने लाटा तयार करून स्पर्धा भरवल्या जातात.

स्किन डाइव्हिंग : या खेळास १९३० च्या सुमारास प्रारंभ झाला. खेळाडू डोळ्यापुढे काच लावलेला रबरी मुखवटा तोंडावर घालतात. काचेमुळे पाण्यातही स्पष्ट दिसते. पायातीत रबरी ‘फिन’ (माशाच्या पंखासारखे साधन) मुळे हालचाली सुलभ व गतिमान होतात. मुखवट्याला इंग्रजी ‘जे’आकाराची रबरी नळी असते. पाण्याखाली गेल्यानंतर श्वासोच्छ्‌वास सुलभतेने करता यावा, अशी याची रचना असते. निर्व्यसनी मनुष्य अशा मुखवट्याने सु. ११ मी. खोलवर पाण्यात जाऊन येऊ शकतो. अधिक काळ पाण्याखाली राहता यावे, म्हणून हवा भरलेल्या बाटल्यांचा वापरही १९४० पासून करण्यात येऊ लागला आहे. पाण्याखाली माशांची शिकार व पाण्यातील छायाचित्रण यांना या खेळामुळेच चालना मिळाळी.

 संदर्भ : 1. Armbruster, D.A. Allen, R. H. Billingsley, H. S. Swimming and Diving, London, 1964.

              2. Besford, P. Encyclopaedia of Swimming, New York, 1972.

              3. Counsilman, J. E. The Science of Swimming, London, 1958.

              4. Oppenheim, Francois, The History of Swimming, Hollywood, 1970.

              5. Pollard, Jack, Ed. Swimming : Australian Style, London, 1963.

              6. Sarsfield, N.W. Swimming for Everyone, London, 1965.

              7. काळे, अनंतराव, जल-विहार, मुंबई, १९४९.

              8. गर्दे, र. कृ. पोहण्याचा छंद, मुंबई, १९५६.

गोखले, श्री. पु. अभ्यंकर, शंकर