फाळफेक : (डार्ट्‌स). अचूक हात-फेकीच्या कौशल्यावर आधारलेला एक खेळ. हा प्रामुख्याने ब्रिटिश लोकांचा खेळ असून अमेरिकेतही तो प्रचलित आहे. इंलंडमध्ये तो पंधराव्या शतकापासून रूढ होता. अद्यापही इंग्‍लिश खानावळींतून तसेच सार्वजनिक गृहांतून मोठ्या प्रमाणात खेळला जातो. दोघा खेळाडूंमध्ये तसेच प्रत्येक दोन ते आठ खेळाडू असलेल्या दोन संघांमध्येही तो खेळता येतो. फाळ ह्याचा रूढ अर्थ भाला, बरची यांसारखा हत्यारांचे वा नांगरासारख्या अवजारांचे पाते. या खेळातील फाळ सु. ६ ते ६/ इंच (१६ ते १७ सेंमी.) लांबीचा असून तो पितळ, पातळ पोलाद, वजनदार लाकूड वा प्‍लॅस्टिक यांपासून बनविलेला असतो. त्याचे एक टोक सुईच्या अग्राप्रमाणे अणकुचीदार असून दुसऱ्या टोकावर फेकीचे दिशानियंत्रण करण्यासाठी मऊ पिसे जडवलेली असतात. फाळफेकीचा फळा बुचासारख्या मऊ लाकडाचा व वर्तुळाकार असून त्याचा व्यास १८ इंच (४५ सेंमी.) असतो. या गोलाचे घड्याळाप्रमाणे, पातळ तारांच्या योगे वीस समान त्रिकोणी भाग केलेले असतात व त्यावर १ ते २० आकडे अशा प्रकारे दर्शविलेले असतात, की मोठ्या आकड्यांच्या मध्ये मध्ये लहान आकडे यावेत. गोलावर केंद्रस्थानी असलेले लक्ष्य म्हणजे बैलाचा डोळा (बुल्स आय).

फाळफेकीचे फळा व फळाचे नमुने

या फळ्यावर अचूक नेम धरून फाळ फेकणे व जास्तीत जास्त गुण मिळविणे हे या खेळाचे सामान्य तत्व होय. फळ्याच्या गोलावर दर्शविलेल्या आकड्यांवरून दोन अरुंद वर्तुळे मध्ये काही अंतर सोडून गेलेली असतात. त्यांपैकी बाह्य वर्तुळात फाळ रुतल्यास, तो ज्या त्रिकोणी भागात असेल त्या भागावर दर्शविलेल्या आकड्यांच्या दुप्पट गुण मिळतात व अंतर्वर्तुळात रुतल्यास तिप्पट गुण मिळतात. मधल्या त्रिकोणी पट्‍ट्यामध्ये फाळ रुतल्यास त्यावरील गुणच फक्त मिळतात. फळ्यावरील बैलाच्या डोळ्याच्या वर्तुळात फाळ रुतल्यास ५० गुण मिळतात व त्याला वेढणाऱ्या लहान बाह्य वर्तुळात तो गेल्यास २५ गुण मिळतात. फळाच्या आकडे दर्शविलेल्या बाह्य परिघावर फाळ गेल्यास गुण मिळत नाहीत. हा खेळ प्रायः अंतर्गेही असला, तरी मैदानातही खेळता येतो. अंतर्गेही खेळामध्ये फळा हा भिंतीवर अशा प्रकारे टांगलेला असतो, की त्याचा मध्य म्हणजे बैलाचा डोळा हा जमिनीपासून ५ फूट ८ इंच (१·७० मी.) उंचीवर यावा. फळ्यापासून ९ फूट (२·७५ मी.) अंतरावरून फाळ फेकला जातो. खुल्या आवारातील प्रांगणीय खेळामध्ये ६ फूट (१·८० मी.) चौरस फळा वापरला जातो व त्यापासून २० ते ३० फुट (६·१० ते ९·१५ मी.) अंतरावरून खेळाडू फाळ फेकतात. फाळफेकीचे विविध खेळ रूढ आहेत. ‘टुर्नामेंट्‍स डार्ट्‌स’ हा त्यांपैकी प्रमुख व सर्वाधिक लोकप्रिय खेळ होय. ह्यात उदरनिर्दिष्ट पद्धतीने गुण मोजले जातात. गुणमोजणीची सुरूवात सामान्यपणे दुप्पट गुणांच्या वर्तुळात फाळ गेल्यानंतरच होते. दोघा खेळाडूंसाठी २०१ गुण दोन खेळाडूंचा संघांसाठी ३०१ गुण, तीन वा चार खेळाडूंच्या संघांसाठी ५०१ व त्यापेक्षा अधिक खेळाडू असल्यास १,००१ गुण हे या खेळाचे लक्ष्य असते. खेळाडू फेकी करून जे गुण मिळवतात ते या नियोजित गुणांतून वजा केले जातात. जो संघ सर्वांत प्रथम शून्यावर येऊन पोहोचेल तो सामना जिंकतो. मात्र शेवटची गुणांची वजाबाकी नेमकी शून्यच व्हावी लागते. शेवटच्या फेरीत अपेक्षित गुणांपेक्षा कमी वा अधिक गुण मिळाल्यास ते वाया जातात व खेळाडूस पुन्हा खेळावे लागते. तसेच शेवटची फेक ही दुप्पट गुणांच्या वर्तुळातच पुन्हा व्हावी लागते. ‘राउंड द क्‍लॉक’ या खेळात प्रत्येक संघ एक ते वीस आकडे क्रमाक्रमाने खेळून, तदनंतर त्याचे दुप्पट व तिप्पट गुण मिळवण्याचा व सरतेशेवटी बैलाच्या डोळ्याचे गुण मिळविण्याचा प्रयत्‍न करतो. ‘ऑक्सो’, ‘शांघाय’, ‘बेसबॉल डार्ट्‌स’ हे आणखी काही प्रकार होत. ‘लंडन डार्ट्‌स क्‍लब’ या संस्थेने तयार केलेले नियम सामान्यतः राष्ट्रीय पातळीवरील खेळांमध्ये अनुसरले जातात. ‘नॅशनल डार्ट्‌स असोसिएशन’ ही या खेळाची एक मध्यवर्ती संघटना होय.

इनामदार, श्री. दे.