पोलोन्नरुव : श्रीलंकेतील एक प्राचीन अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ व उत्तर-मध्य विभागाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ५,९०० (१९७१). ते अनुराधपुरपासून महावेली-गंगा नदीकाठी सु. ६४ किमी. वर नैर्ऋत्येस वसले आहे. प्राचीन वाङ्मयात कलिंगपूर, पुलस्तिपूर, तोपविवा, तोपावा, पुलत्थिपूर इ. त्याचे विविध नामोल्लेख आढळतात. इ. स. आठव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत ते सिंहली राजांच्या राजधानीचे स्थळ होते. इ. स. १२४० नंतर त्यास अवकळा प्राप्त झाली. तत्पूर्वी दक्षिण भारतातील चोल राजांनी त्यावर इ. स. १०४९ ते १०५९ पर्यंत वर्चस्व प्रस्थापिले व पुढे ११९८ मध्येही पुन्हा त्यावर स्वारी करून अधिसत्ता गाजविली. चोल आक्रमणे वगळता उर्वरित काळात येथे शांतता व सुव्यवस्था होती आणि पहिला पराक्रमबाहू (का. ११६४–९७) व निस्सांक मल्ल (का. ११९८–१२०७) यां कलाभिज्ञ राजांच्या कारकीर्दींत येथे बौद्ध व हिंदू मंदिरे बांधली गेली तसेच असंख्य शिल्पाकृती, ब्राँझच्या मूर्ती व भित्तिचित्रे निर्माण झाली. विसाव्या शतकात येथे उत्खनने झाली आणि नंतर अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याबरोबरच जुना तलाव दुरुस्त झाला. त्यामुळे शेतीला उत्तेजन मिळाले व तंबाखू आणि भात यांची पिके होऊ लागली. आधुनिक पोलोन्नरुव हे एक टुमदार पर्यटनाचे स्थळ बनले.
येथील बहुतेक अवशेष इ. स. बाराव्या शतकातील असून त्यांत बौद्ध अवशेषांचे प्रमाण जास्त आहे. गावाच्या दक्षिणेस जुन्या किल्ल्याचे अवशेष असून त्यांत एक मोठे स्नानगृह आहे. उत्तरेकडे थूपाराम विहार आहे. त्यात इमारतील शोभेची बुद्धाची भव्य मूर्ती आहे. या विहाराजवळच अष्टदल कमळाच्या आकाराचा, दगडी स्तंभांचा व दगडी कठड्यांचा सुरेख निस्सांक लतामंडप आहे. याच्याजवळ एक भव्य शिलालेख आहे. गल पोत (दगडी पोथी) या नावाने तो प्रसिद्ध आहे. पुढे हेट-डा-गे नावाची बुद्धावशेष ठेवण्याची एक वास्तू आहे. याच्या बाजूस सत महाल प्रासाद नावाची एक मोठी सात मजली वास्तू आहे. या सर्व वास्तूंत वट-डा-गे विहार प्रेक्षणीय असून, नावाप्रमाणे तो वर्तुळाकार आहे. त्याच्या चारी प्रवेशद्वारांना दगडी पायऱ्या आहेत. जमिनीला लागून असलेल्या एका पायरीत अर्धवर्तुळाकृती चंद्रशिला आहे. तीत वैशिष्ट्यपूर्ण अपोत्थित शिल्पकाम आढळते. कठड्याच्या बाजूंना द्वारपालांच्या सुबक आकृत्या आहेत. भिंतींवर सिंह व खुजी व्यक्तिचित्रे आहेत. प्रवेशद्वारासमोर बुद्धाच्या ध्यानस्थ बैठ्या मूर्ती आहेत. पूर्वी या इमारतीत एक स्तूप होता. या इमारतीपासून दीड मीटरवर कोटविहार हा मोठा स्तूप आहे. याच्या जवळच बुद्धसिंह प्रासाद व नंतर लंकातिलक किंवा जेतवनाराम डागोबा आहे. यात बुद्धाची भव्य मूर्ती आहे. यानंतर किरीविहार व त्याच्या पलीकडे गोल विहार खोदला आहे. त्यात बुद्धाची एक ध्यानस्थ बैठी मूर्ती आहे. याच्या शेजारी खडकात बुद्धाची महानिर्वाण अवस्थेतील सु. १३ मीटर लांबीची मूर्ती आहे. त्याच्या डाव्या बाजूस त्याचा शिष्य आनंद याची मूर्ती आहे. पोलोन्नरुवाच्या विश्रामधामजवळ हातात ग्रंथ धरलेली पराक्रमबाहूची समजलेली तिसरी मूर्ती आहे. या तीन मूर्ती भव्यता, गंभीरता व भावदर्शकता दर्शवितात. यांशिवाय पोलोन्नरुवाचे कमळदल स्नानगृह हेही प्राचीन अवशेषांचे लक्षणीय उदाहरण आहे. याच्या जवळच डमाळ महा-सेय हा आणखी एक डागोबा लागतो. थूपाराम, जेतवनाराम व डमाळ महा-सेय हे तिन्ही डागोबा एकाच वास्तुशैलीत बांधले आहेत. त्यांवर द्राविड शैलीची छाप स्पष्ट दिसते. शेवटच्या डागोबात सिगिरियाप्रमाणे सुंदर-वेधक रंगीत भित्तिचित्रे आहेत. विश्रामधामजवळच तोपविवा हे जुने सरोवर आहे. पूर्वी शेती व जलक्रीडा यांसाठी त्याचा उपयोग होत असावा. हिंदू मंदिरांत शिवाची अनेक छोटी मंदिरे आढळतात त्यांपैकी डळडा मालिगाव या नावाने प्रसिद्ध असलेले मंदिर अधिक कलात्मक आहे. शिवमंदिरांत नंदीची मूर्ती क्वचित दिसते. अनेक ठिकाणी गजलक्ष्मीची मूर्ती आढळते. येथील हिंदू मंदिरांवर चोल वास्तुशैलीची छाप दिसते. येथे सापडलेल्या ब्राँझ मूर्ती व लहान शिल्पे कोलंबो वस्तुसंग्रहालय व ब्रिटिश म्यूझीयम यांत ठेवली आहेत.
संदर्भ : 1. Coomaraswamy, A. K. History of Indian and Indonesian
2. Fergusson, James, A History of Indian and Eastern Architecture, Vol. II,
3. Smith, V. A. A History of Fine Art in
देशपांडे, सु. र.
“