पोलकी : (क. बिलितले, भुतले लॅ. गिव्होशिया रॉटलरिफॉर्मिस कुल-यूफोर्बिएसी). हा मध्यम आकारमानाचा व जाडजूड फांद्यांचा वृक्ष भारतात दक्षिणेच्या पठारावरील पानझडी जंगलात व श्रीलंकेत आढळतो. ह्या वनस्पतीच्या वंशातील (गिव्होशियातील) एकूण ३–४ जातींपैकी भारतातील ही एकच जाती आहे. ह्या वृक्षाच्या खोडाची साल साधारण जाड, तपकिरी रंगाची व गुळगुळीत असून तिचे साधारण गोलसर, जाड व फुगीर तुकडे पडून गेल्यावर तेथे खाचा पडतात. कोवळे भाग, फुलोरे व पानांची खालची बाजू यांवर तारकाकृती केसांची लव असते. पाने साधी, एकाआड एक, मोठी, सु. २५ सेंमी लांब, अंडाकृती, तळाशी हृदयाकृती, गोलसर दातेरी, काहीशी विभागलेली, चिवट व लांब देठाची असतात. पात्यांच्या तळातून अनेक प्रमुख शिरा निघून पात्यात पसरलेल्या असतात. फुले लहान, एकलिंगी व पानांच्या बगलेत, वल्लऱ्यांवर उन्हाळ्यात येतात. संदले व प्रदले प्रत्येकी पाच बिंब खंडित नर-फुलात १३–२५ केसरदले स्त्री-फुलात २–३ कप्प्यांचा किंजपुट तीन किंजदलांपासून बनलेला असतो [→ फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ सु. २·५ सेंमी. व्यासाचे व हिरवे असून त्यात एकच गोलसर. सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेले), फिकट जांभळट तपकिरी बी असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ यूफोर्बिएसी कुलात (एरंड कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड पांढरे किंवा पिवळट करडे, मऊ व हलके असून त्याच्यावर रंग चांगला बसतो. वल्ही, तराफे, कोरीव व कातीव काम, खेळणी, नाटकी मुखवटे इत्यादींसाठी ते विशेषकरून वापरतात. बियांचे तेल नाजूक यंत्रांना वंगण घालण्यास उपयुक्त असते.

महाजन, श्री. द.