पोर्तोनोव्हो : पश्चिम आफ्रिकेतील बेनिन प्रजासत्ताकाची राजधानी आणि देशातील एक मोठे शहर. लोकसंख्या १,०४,००० (१९७६). हे अटलांटिक महासागराच्या गिनीच्या आखातकिनाऱ्यावरील पोर्तोनोव्हो या खारकच्छ भागात वसले आहे. हे गिनीच्या आखातापासून ११ किमी. व लागोसच्या (नायजेरिया) पश्चिमेस ८९ किमी. आहे. हे देशाच्या आग्नेय कोपऱ्यात असून, पोर्तोनोव्हो राज्याचे मुख्य केंद्र म्हणून सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात याची स्थापना झाली असावी. सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी हे गुलामांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र केले व त्यांनीच या पोतोनोव्हो – नवीन शहर – हे नाव दिले. येथून आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून मुख्यतः अमेरिकेस व पोर्तुगालला पाठविले जाई. गुलामांच्या व्यापारामुळेच हे शहर भरभराटीस आले. एकोणिसाव्या शतकात पोर्तोनोव्हो राज्याने पोर्तुगीजांचे संरक्षण नाकारल्याने पोर्तुगीजांची जागा फ्रेंचांनी बळकावली. कोटोनू बंदराचा विकास केल्यामुळे व लोहमार्गाने महत्त्वाच्या ठिकाणांशी पोतोर्नोव्हो जोडल्याने त्याचे व्यापारी व औद्योगिक महत्त्व वाढले. ताड तेल हे येथील प्रमुख उत्पादन होय. या बंदरातून मुख्यतः ताड तेल, खोबरे, कापूस, कॅपॉक यांची निर्यात होते. शहरातील रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट मिशन, कृषिविद्यालय, वनस्पति-उद्यान इ. उल्लेखनीय आहेत.

चौधरी, वसंत