पोर्ट सुदान : (बुर सूदान–अरबी). सूदानमधील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या १,३२,६३२ (१९७३). हे सूदानच्या कॅसाला प्रांतात, तांबड्या समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. पूर्वीचे स्वॅकिन हे अरबी बंदर प्रवाळांच्या वाढीमुळे निरुपयोगी झाल्याने १९०५–०९ यांदरम्यान या बंदराचा विकास करण्यात आला. सूदानचा सु. ७०% विदेश व्यापार या बंदरातूनच चालतो. कापूस, चामडे, मीठ, तेलबिया, सोनामुखी यांची निर्यात, तर बांधकामसाम्रगी, यंत्रे, इंधनतेल व वाहने यांची आयात होते. रस्ते, लोहमार्ग व हवाई वाहतुकीचे हे केंद्र आहे. याच्या आसमंतातील अनेक मिठागरांमुळे सबंध देशाची मिठाची गरज भागविली जाते.
डिसूझा, आ.रे.