पोर्टर, जॉर्ज : (६ डिसेंबर १९२० – ) ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. १९६७ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक पोर्टर व ⇨रॉनल्ड जॉर्ज ऱ्हेफोर्ड नॉरीश यांना मिळून अर्धे आणि ⇨ मानफ्रेट आयगेन यांना अर्धे असे विभागून देण्यात आले. अतिशीघ्र गतीच्या रासायनिक विक्रियांचा अभ्यास करण्यासाठी चमक प्रकाश- विश्लेषणाचे तंत्र [अतिशय अल्पावधीच्या आणि अतितीव्र प्रकाशाच्या चमकेच्या साहाय्याने रेणूचे रासायनिक विघटन घडवून आणून शोषण वर्णपटाच्या परीक्षणाने त्याचा अभ्यास करण्याचे तंत्र → वर्णपटविज्ञान] विकसित करण्यात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल पोर्टर यांना बहुमान मिळाला.
पोर्टर यांचा जन्म स्टॅनफोर्थ (यॉर्कशर) येथे झाला. १९४१ मध्ये लीड्स विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी मिळविल्यानंतर १९४१–४५ या काळात त्यांनी ब्रिटिश नौदलाच्या रडार विभागात काम केले. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात त्यांनी पुन्हा अध्ययनास सुरुवात केली व नॉरिश यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १९४९ मध्ये रसायनशास्त्रातील डॉक्टरेट पदवी मिळविली. १९५२–५४ मध्ये ते केंब्रिज विद्यापीठाच्या भौतिकीय रसायनशास्त्र विभागात संशोधन उपसंचालक होते. त्यानंतर ब्रिटिश रेयॉन रिसर्च ॲसोसिएशनचे उपसंचालक (१९५४–५५), शेफील्ड विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक (१९५५–६३) व नंतर रसायनशास्त्राचे फर्थ प्राध्यापक (१९६३–६६) या पदांवर त्यांनी काम केले. १९६३–६६ या काळात ते लंडन येथील रॉयल इस्टिट्यूशनमध्येही रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. १९६६ पासून ते रॉयल इन्स्टिट्यूशनचे संचालक व रसायनशास्त्राचे फुलेरियन प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. केंट विद्यापीठात मानसेवी प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.
केंब्रिज विद्यापीठात त्यांनी नॉरिश यांच्या मार्गदर्शानाखाली १९४९–५५ या काळात चमक प्रकाश-विश्लेषणासंबंधीचे संशोधन केले. त्यांनी विशेषत्वाने क्लोरिनाचे अणू व रेणू यांच्या समतोलासंबंधी अभ्यास केला. पुढे शेफील्ड विद्यापीठातही त्यांनी याच विषयावर स्वतंत्रपणे संशोधन केले. मूलतः हे तंत्र अस्थिर मुक्त मूलकांच्या (विशिष्ट परिस्थितीत, सामान्यतः अतिशय अल्पावधीकरिता–काही मायक्रोसेकंदांकरिता-मुक्तपणे अस्तित्त्वात राहू शकणाऱ्या विशिष्ट संयोगावस्थेतील अणुगटांच्या) अभ्यासासाठी योजिले गेले होते. १९५३ मश्ये अल्पकालीन क्षोभावस्थेच्या शोषण वर्णपटाचा अभ्यास करताना पोर्टर यांनी द्रव विद्रावकातील (विरघळविणाऱ्या पदार्थातील) ॲरोमॅटिक रेणूंच्या [→ ॲरोमॅटिक संयुगे] केवळ एक मायक्रोसेकंदाइतपत आयुर्मान असणाऱ्या उच्च त्रिक् अवस्थांचा वर्णपट प्रथमच मिळविला. हे तंत्र द्रव विद्रावांच्या दीर्घकालीन क्षोभावस्थांच्या अभ्यासाकरिताही मौलिक ठरले आहे. १९५२ मध्ये पोर्टर, नॉरिश व इतरांनी आयोडीन अणूंच्या पुनर्संयोगाच्या अभ्यासाकरिता चमक प्रकाश-विश्लेषणाचा उपयोग केला. जटिल (गुंतागुंतीची संरचना असलेल्या) कार्बनी रेणूंच्या व विक्रियांच्या अभ्यासात हे तंत्र महत्त्वाचे ठरले आहे. नैसार्गिक अवस्थेतील कोशिकेमधील (पेशीमधील) जैव क्रियांच्या संदर्भात जटिल रेणूंचा अभ्यास करण्याकरिता पोर्टर यांनी नंतर सूक्ष्मदर्शिकी चमक प्रकाश-विश्लेषण तंत्रे विकसित केली. या तंत्रात ⇨ लेसर व ठिणगी उद्गम वापरण्यास चालना देऊन आणि इतर सुधारणा करून त्यांनी या तंत्राचा उपयोग करण्याच्या क्षेत्राचा विस्तार केला.
रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९६० मध्ये त्यांची निवड झाली. १९७२ मध्ये त्यांना ‘नाइट’ हा किताब मिळाला. ते फॅराडे सोसायटीचे एक अधिकारी व रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीचे सदस्य होते. रॉयल सोसायटीने १९७१ मध्ये त्यांना डेव्ही पदकाचा बहुमान दिला. त्यांनी केमिस्ट्री फॉर द मॉडर्न वर्ल्ड हा ग्रंथ व अनेक शास्त्रीय निबंध लिहिले आहेत.
कानिटकर, बा. मो.
“