पोर्ट ब्लेअर : भारताच्या अंदमान व निकोबार या केंद्रशासित द्वीपसमूहाची राजधानी. लोकसंख्या २६,२१२ (१९७१). हे इतिहासप्रसिद्ध शहर व नैसर्गिक बंदर बंगालच्या उपसागरातील दक्षिण अंदमान बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर असून कलकत्त्याच्या दक्षिणेस १,२५५ किमी. व मद्रासच्या पूर्वेस १,१९१ किमी.वर आहे.
गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या सल्ल्याने आर्चिबाल्ड ब्लेअरने १७८८ मध्ये पहिली वसाहत स्थापन केली व तिला ‘पोर्ट कॉर्नवॉलिस’ हे नाव दिले होते. तथापि १७९१ मध्ये वसाहतीचे स्थलांतर याच बेटाच्या ईशान्य भागात सध्याच्या पोर्ट कॉर्नवॉलिस येथे करण्यात आले, परंतु मलेरियाच्या सतत उद्भवणाऱ्या साथीमुळे १८५७ मध्ये ही वसाहत पुन्हा पहिल्या जागी हलवून तिला ‘पोर्ट ब्लेअर’ असे नाव देण्यात आले. पुढे ब्रिटिशांनी या शहराचा कैद्यांच्या वसाहतीसाठी उपयोग केला व तेव्हापासून येथील तुरुंग ‘काळे पाणी’ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५७ च्या स्वातंत्र्ययुद्धापासून अनेक राजकीय नेते व स्वातंत्र्यसैनिक यांना काळ्या पाण्याची शिक्षा होऊन या तुरुंगात रहावे लागले. १९०६ मध्ये येथे ‘सेल्युलर जेल’ हा ६ बराकी व आठशे अरुंद खोल्यांचा तीन मजली तुरुंग बांधण्यात आला. येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या लोकांत स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या थोर नेत्यांचा समावेश होतो. दुसऱ्या महायुद्धकाळात जपानच्या बाँबवर्षावाने या तुरुंगाचे दोन भाग उद्ध्वस्त झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुरुंगाच्या काही भागाचे इस्पितळात रूपांतर करण्यात आले असून उरलेला भाग स्थानिक तुरुंग म्हणून वापरला जातो.
शहरात अनेक शासकीय इमारती, बौद्ध मंदिर, राधाकृष्ण मंदिर इ. आधुनिक वास्तू असून सर्वात प्रथम वसविलेला ‘ॲबर्डीन’ हा भाग बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. येथे मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय व एक महाविद्यालय आहे. शहरात लाकूड कापण्याची मोठी गिरणी असून चटया, टोपल्या, कातडी वस्तू बनविणे, तसेच खोबरे वाळविणे, मासेमारी इ. उद्योग चालतात. पोर्ट ब्लेअर भारतातील व अन्य देशांतील शहरांशी हवाई मार्गांनी आणि जलमार्गांनी जोडले आहे. येथून लाकूड, नारळ, खोबरे यांची निर्यात होते. शहरात दोन अतिथीगृह, एक प्रवासीगृह आहे. येथील सृष्टिसौदर्य हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून याची गणना डोंगरी शहरांत केली जाते.
फडके, वि. शं. चौंडे, मा. ल.
“