पोंगळ : दक्षिण भारतात, विशेषत: तमिळनाडूत, साजरा केला जाणारा एक हिंदू महोत्सव. तमिळ पंचांगानुसार पौष महिन्यापासून नववर्ष सुरू होते आणि ह्या नववर्षदिनानिमित्त हा उत्सव साजरा केला जातो. तमिळनाडूत त्याला पोंगळ (पोंगल), तर कर्नाटकात संक्रांती म्हणतात. सूर्यदेवतेप्रीत्यर्थ हा उत्सव प्रत्यक्षात तीन दिवस साजरा होत असला, तरी त्याची तयारी आधी एक महिना सुरू असते. तमिळ पंचांगानुसार मार्गळी
वा मार्गशीर्ष हा वर्षाचा शेवटचा महिना रोगकारक व अशुभ मानला जात असल्यामुळे, ह्या सबंध महिन्यात अशुभाच्या व रोगाच्या निवारणार्थ काही विधी व व्रते केली जातात. गतवर्षाच्या शेवटच्या दिवसास ‘भोगि’ म्हणतात. तमिळमध्ये भोगी म्हणजे इंद्र म्हणून या दिवशी इंद्रपूजा होते. दोन हजार वर्षांपूर्वी तमिळनाडूत राजाश्रयाने लोक इंद्रोत्सव साजरा करीत होते. त्याची वर्णन शिलप्पधिकारम् व मणिमेखलै या काव्यांत आढळतात. भोगीच्या दिवशी घरातील जीर्ण-शीर्ण जाळी-जळमटी, केरकचरा काढून जाळून टाकतात घरांना रंगसफेती करतात सुगंधी द्रव्ये आणतात. मकर संक्रमणाच्या दिवशी उत्तरायणाच्या प्रारंभी नववर्ष पोंगळ सणाने सुरू होते. या दिवशी सुवासिनी सकाळी स्नान करून अंगणात रांगोळ्या घालतात व ओलेत्याने अंगणात दूध, गूळ व तांदूळ यांची खीर (पोंगल) शिजवितात. खिरीस उकळी येताच ‘पोंगळ ओ पोंगळ’ असा मोठ्याने गजर करतात. सूर्यनारायण व गणपतीस ह्या खिरीचा नैवेद्य दाखवितात व नंतर गायीस काही भाग देऊन उर्वरित भाग सर्वजण प्रसाद म्हणून ग्रहण करतात. या दिवशी लोक नवी वस्त्रे परिधान करून एकमेकांच्या घरी जाऊन परस्परांना भेटी देतात व ‘पोंगळ,पोंगळ’ असा उच्चार करून एकमेकांचे अभीष्टचिंतन करतात. ग्रामदेवतेसही पोंगळाचा नैवेद्य ग्रामप्रमुख दाखवितो. तिसऱ्या दिवसास ‘माट्टुपोंगळ’ म्हणतात. ‘माडु’ म्हणजे गोधन यावरून हा शब्द आला. महाराष्ट्रातील बैलपोळ्याप्रमाणे हा दिवस गायी-बैलांना शृंगारून व त्यांची पूजा करून साजरा करतात. संध्याकाळी गायी-बैलांची व ग्रामदैवतांची मिरवणूक काढतात आणि गाई-बैलांना गोडधोड खाऊ घालून मोकळे सोडतात. तांदूळ व ऊस ही नवी पिक्रे निघण्यास यावेळी सुरुवात होत असल्याने हा एक सुगीचाही उत्सव मानला जातो.
मद्रासमध्ये पोंगळ-उत्सवानिमित्त कंदस्वामीमंदिरातून मोठी रथयात्रा निघते. मदुराई, तिरुचिरापल्ली व तंजावर भागांत पोंगळानिमित्त ‘जल्लिक्कट्टु’ म्हणजे बैलांच्या शर्यती होतात त्यांत मस्तावलेल्या बैलांच्या शिंगांना काही पैसे बांधतात. हातात काठी किंवा दुसरे कसलेही बचावाचे साधन न घेता हे पैसे कोणीही बैलांच्या शिंगावरून हस्तगत करावयाचा खेळ खेळला जातो. सुगीनिमित्त तेथे सामूहिक भोजन केले जाते आणि त्यात गरीब, श्रीमंत, वाटसरू इ. सर्वच सहभागी होतात.
सूर्यदेवता, नवे वर्ष, पशुधन व सुगी यांनिमित्त हा उत्सव साजरा होत असल्याने त्याचे स्वरूप काहीसे संमिश्र असले, तरी सूर्योपासनेस त्यात विशेष महत्त्व आहे.
भिडे, वि. वि.
“