पो : इटलीतील सर्वांत लांब नदी. लांबी ६५२किमी. जलवाहनक्षेत्र सु. ७२,५००चौ. किमी. हिचा उगम इटलीच्या वायव्य सीमेवरील कॉतिअन आल्प्समधील माँट व्हीझो या १,८०० मी. उंचीच्या पर्वतराजीमध्ये होतो. ही नदी पहिल्या ३५किमी.मध्ये सु. १,७००मी. खाली येते. सालूत्सॉच्या पश्चिमेस ती तीव्रतेने उत्तरेकडे वाहू लागते व तूरिनमधून वाहत जाऊन पुढे मॉन्‌फेरातॉ या उंचवट्याच्या भागाजवळून वाहते. नंतर कीव्हासॉजवळ ती पूर्वेकडे वाहत जाऊन एड्रिॲटिक समुद्रास मिळते. एकूण प्रवाहमार्गापैकी ६१७किमी. लांबीच्या भागात ती १००मी.हून कमी उंचीवरून वाहते. त्यामुळे या भागातील तिच्या मार्गाचा उतार फारच मंद आहे. पो नदीच्या मधल्या व खालच्या टप्प्यांत अनेक वळणे व नालाकृती सरोवरे तयार झाली आहेत. याच कारणास्तव या नदीच्या खोऱ्यात अनेक वेळा पूर येतात. पो व तिच्या उपनद्या यांनी मिळून बनलेल्या खोऱ्यामध्ये पीडमाँट, लाँबर्डी, लिम्यूरियाचा काही भाग, जवळजवळ  सर्व एमील्या-रॉमान्या हा भाग, व्हेनेतॉचा एक कोपरा आणि स्वित्झर्लंडचा दक्षिण भाग एवढे क्षेत्र येते.

लिग्यूरियन लोक या नदीला ‘बोदिंकस’ (तळहीन) असे संबोधीत. पो नदीचे खोरे हे पूर्वी एक सागरी आखात होते. नदीने आणलेल्या गाळामुळे आखात बुजत जाऊन जमीन तयार झाली. पुढे या नदीला ‘पेदस’ असेही नाव पडले.

पोच्या उत्तरेकडून येणाऱ्या दॉरा रीपारीआ, दॉरा बाल्तेआ, सेझ्या, तीचीनो, आद्दा, ओल्यो व मींचो आणि दक्षिणेकडून येणाऱ्या तानारो, स्क्रीव्ह्या, त्रेब्या, तारो व पानारो या मुख्य उपनद्या होत. या उपनद्यांनी आणलेले पाणी पुरांची तीव्रता वाढविण्यास मदत करते.

पो नदी आपल्याबरोबर फार मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आणते. त्यामुळे तिच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. गाळाच्या प्रचंड प्रमाणामुळे दरवर्शी त्यात सु. ८०हे. क्षेत्राची भर पडते. परिणामी पूर्वीची काही बंदरे आता सागर-किनाऱ्यापासून १०किमी. आत असलेली आढळतात. पो नदी समुद्राला सु. १४ मुखांनी मिळते. सर्वसाधारणतः या मुखांचे पाच गट पाडता येतात. ‘पो देला पिला’ हे मुख सर्वांत मोठे असून त्यातूनच जलवाहतूक होते. मुखापासून सु. ४५०किमी. आत असलेल्या पाव्हिया शहरापर्यंत जलवाहतूक होऊ शकते.

नदीला येणारे पूर व तिने आणलेला गाळ हे महत्त्वाचे प्रश्न अजून समाधानकारकपणे सोडविता आलेले नाहीत. पूरनियंत्रणासाठी नदीच्या काठांवर बांधलेल्या तटांमुळे नदीच्या पात्रातच गाळ साचून त्याची उंची वाढते व पुराचा धोका अधिकच गंभीर होतो.

देशाच्या कृषिव्यवस्थेत मात्र पो नदीचा फार महत्त्वाचा वाटा असून तिने खोऱ्यातील लोकजीवन समृद्ध केले आहे. साहजिकच या खोऱ्याची व्यापारात नेहमी भरभराट झाली. पो नदीच्या खोऱ्यात मिलाल, तूरिन, पॅड्युआ, व्हेरोना, ब्रेशा इ.महत्त्वाची औद्योगिक शहरे विकास पावली आहे.

 

फडके, वि.शं. गद्रे, वि. रा.