आकारविज्ञान : (मॉर्फॉलॉजी). सजीवांच्या तपशीलवार अभ्यासाच्या सोयीकरिता केलेल्या प्रमुख सैध्दांतिक शाखांपैकी जीवविज्ञानाची एक शाखा. पूर्वी यामध्ये सजीवांचा आकार, स्वरूप व संरचना यांचा अंतर्भाव केला जात असे, परंतु जीवविज्ञानाच्या सध्याच्या प्रगतावस्थेत अंतर्रचनेचा विचार शारीर (शरीररचनाशास्त्र) व कोशिकांचा (पेशींचा) संपूर्ण अभ्यास कोशिकाविज्ञान [→ कोशिका ] या शाखांत केला जात असल्याने आकारविज्ञानाची व्याप्ती फक्त सजीवांच्या अवयवादिकांसह बाह्यस्वरूपापुरतीच मर्यादित राहिली आहे. यामध्ये अवयवांच्या कार्याचा विचार केला जात नाही, कारण तो ⇨ शरीरक्रियाविज्ञानात अंतर्भूत आहे. सजीवांच्या व त्यांच्या अवयवांच्या विकासावस्थेतील स्वरूप व संरचना यांचा विचार ⇨आकारजनन व काही अंशी ⇨गर्भविज्ञानात येत असल्याने या शाखा परस्परांपासून काटेकोरपणे वेगळ्या करता येत नाहीत. व्यक्तींच्या व अवयवांच्या बाह्यस्वरूपाचा तौलनिक अभ्यास बराच होत असून त्यापासून जाती, वंश व कुले यांचे परस्परसंबंध अधिक अचूकपणे ठरविले जात आहेत व त्यानुसार नैसर्गिक वर्गीकरण [→ वनस्पतींचे वर्गीकरण प्राण्याचे वर्गीकरण] अधिकाधिक सुधारले जात आहे.
आकारविज्ञान म्हणजे मॉर्फॉलॉजी ही संज्ञा प्रथमत: जर्मन शास्त्रज्ञ गटे (१७४९-१८३२) यांनी उपयोगात आणली होती. त्यांच्या कल्पनेप्रमाणे कोणत्याही सजीवाच्या संरचनेचा अभ्यास त्यात अंतर्भूत असून ती सजीव व्यक्ती ज्या गटात समाविष्ट असेल, त्याच्या आराखड्यातील संरचनेच्या एकतेशी संबंध्द असावी. परंतु हे तत्त्व प्राण्यांपेक्षा वनस्पतींच्या बाबतीत जास्त उपयुक्त ठरले. आधुनिक आकारविज्ञान शरीरावयवांच्या तौलनिक अभ्यासामुळे काढलेल्या निष्कर्षावर आधारले आहे, त्या दृष्टीने ते उत्क्रांतिवादापूर्वीचे व त्यापासून स्वतंत्र आहे संबंधित जाती, वंश व कुले यांतील समरचित अवयवांचे अस्तित्व तौलनिक आकारविज्ञानाने सिध्द झाले आहे.
पहा : भ्रूणविज्ञान वनस्पतिविज्ञान शारीर
संदर्भ : Haupt. A. W. Plant Morphology, NewYork,1953.
परांडेकर, शं. आ.