आकडी : स्नायूंचे अनैच्छिक, आकस्मिक व जोराचे आकुंचन-प्रसरण होण्याच्या अवस्थेला आकडी किंवा ‘झटके’ असे म्हणतात. या अवस्थेत रोगी कधीकधी बेशुध्द होतो. आकडी हा एक स्वतंत्र रोग नसून अनेक रोगांमध्ये दिसणारे लक्षण आहे. मूत्रविषरक्तता (मूत्रातून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ बाहेर न पडता ते रक्तात साठून राहण्याची अवस्था), मस्तिष्क रक्तस्राव (मेंदूतील रक्तस्राव), अपस्मार, अलर्क रोग (पिसाळ रोग), धनुर्वात, मस्तिष्कार्बुद (मेंदूतील पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेली निरुपयोगी गाठ ) वगैरे कित्येक रोगांत व स्त्रियांमध्ये उन्माद (हिस्टेरिया) व गर्भिणीविषबाधा (गर्भाच्या अस्तीत्वामुळे गरोदर स्त्रीला होणारी विषबाधेची लक्षणे) या रोगांत झटके येतात. त्यासंबंधी त्या त्या नोंदीत वर्णन केले आहे.
आकडी ही संज्ञा विशेषत्वाने लहान मुलांना येणाऱ्या झटक्यांस लावतात. जन्माच्या वेळी मेंदूला इजा झाल्यास जन्मताच मुलाला आकडी येते. मोठ्या मुलांत दात येत असताना, जंत झाले असताना , मुडदूस, परावटू ग्रंथिविकार [→ परावटु ग्रंथि], रक्तातील कॅल्शियमाचे प्रमाण कमी पडणे, अपस्मार, मस्तिष्कार्बुद वगैरे कित्येक रोगांत आकडी येते. मोठ्या माणसांना एकदम ज्वर चढताना हीव भरून येते. पण लहान मुलांमध्ये आकडी किंवा झटके येतात. देवी, गोवर वगैरे अनेक रोगांच्या सुरूवातीस झटके येतात.
चिकित्सा : आकडीची तातडीची चिकित्सा म्हणजे रोग्याला स्वस्थ निजवून ठेवणे, झटक्यावर गार पाण्याची पट्टी किंवा बर्फ ठेवणे, झटक्याच्या जोराने पडून किंवा दाताने जीभ चावून इजा होऊ न देणे, ही होय. मूळ कारण शोधून त्यावर योग्य उपचार केल्यास आकडी पूर्णपणे बरी होते.
ढमढेरे, वा. रा.