आंबुटी : (अंबुती हीं. चंगेरी, चंपामेथी, अमरूल गु. आंबोलो क. हुळितिन्निचेगिड सं. अम्लिका, शुक्लिका इं. इंडियन सॉरेल, क्रीपिंग सॉरेल लॅ. ऑक्सॅलिस कॉर्निक्युलेटा कुल-ऑक्सॅलिडेसी). ही लहान, तीव्र वासाची व चवीची भुईसरपट वाढणारी ⇨ ओषधी बागांमध्ये एक तण म्हणून वाढते. तिचा प्रसार भारताच्या उष्ण भागात सर्वत्र असून हिमालयात २,७०० मी. उंचीपर्यंत व श्रीलंकेतही आहे. पाने संयुक्त, हस्ताकृती, त्रिदली व बारीक पण लांब देठाची दले फार लहान देठाची, व्यस्त हृदयाकृती, फुले कक्षास्थ, अर्धवट चवरीसारख्या फुलोऱ्यात ऑक्टोबर-मेमध्ये येतात. पाकळ्या पाच, सुट्या, पिवळ्या व लांबट बोंड लांबट, पंचकोनी व टोकदार असून त्यात अनेक गोलसर, भुऱ्या व अध्यावरणयुक्त बिया असतात [→ बीज] अध्यावरण बियांच्या कठीण सालीपासून अलग होताना बी बाहेर फेकले जाते.
कच्ची पाने भाजीसारखी खातात. ती ज्वरनाशक, थंडावा देणारी, भूक वाढविणारी व क जीवनसत्वाच्या अभावामुळे होणाऱ्या स्कर्व्ही या रोगावर उपयुक्त असतात. या वनस्पतीत पोटॅशियम अम्ल ऑक्सॅलेट असते.
ऑक्सॅलिस बोवी ही जाती लहान, सुंदर शल्ककंदयुक्त (खवलेदार कंद असलेली) ओषधी असून तिची मुळे गाठाळ व पाने वरच्यापेक्षा थोडी मोठी असतात. फुले गर्द गुलाबी असून थंडीत स्तबक प्रकारच्या फुलोऱ्यात [→ पुष्पबंध] येतात. बागेत कुंड्यांत किंवा खडकाळ जागी शोभेकरिता नेहमी लावतात. सावली थंड व दमट हवा हिला मानवते. नवीन लागवड कंदापासून करतात. ऑ. ॲसिटोसेला (इं. वुड-सॉरेल) ही जाती ब्रिटनमध्ये सामान्यपणे आढळते हिच्यावर उघडी व बंद फुले आढळतात. ऑक्सॅलिस वंशातल्या कित्येक जातींत केसरदले व किंजदले [→ फुल] यांच्या लांबीत एका जातीतील भिन्न वनस्पतींत फरक असून त्यांचा परपरागणास उपयोग होतो.
पहा : जिरॅनिएलीझ परागण
जमदाडे, ज. वि.