आंध्र प्रदेश :  भारतीय संघराज्यातील एक घटक राज्य. क्षेत्रफळ २,७६,८१४ चौ. किमी. लोकसंख्या ४,३५,०२,७०८ (१९७१). विस्तार उ. अक्षांश १२ १४ ते १९ ५४ व पू. रेखांश ७६५० ८६ ५०. या राज्याच्या उत्तरेस महाराष्ट्र, मध्यप्रदेश व ओरिसा, दक्षिणेस तमिळनाडू व कर्नाटक, पश्चिमेस कर्नाटक व महाराष्ट्र ही राज्ये आणि पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. आंध्र राज्याला ९६० किमी. लांबीचा किनारा मिळालेला असून तेथे लहानमोठी दहावर बंदरे आहेत. भारताच्या ८·४% क्षेत्रफळ व सु. ७·९% लोकसंख्या असलेल्या ह्या राज्याची राजधानी हैदराबाद आहे.

भूवर्णन: आंध्र प्रदेशातील सर्वांत जुने व पायाभूत खडक आर्कीयनकालीन असून त्यांच्यात प्रामुख्याने गुलाबी व करड्या रंगाचे ग्रॅनाइट, नाइस व अल्प प्रमाणात धारवाड संघाचे हॉर्नब्लेंड, टाल्क, क्लोराइट, मायका, शिस्ट, लोही, क्वार्टसाइट, खोंडालाइट, नेफेलिन, सायेनाइट इ. खडक आढळतात.या आर्कीयनकालीन खडकांत लोह, मँगॅनीज, तांबे, क्रोमाइट इ. धातुके व अभ्रक, बेरिल, ग्राफाइट, कायेनाइट, सिलिम नाइट इ. अनेक औद्योगिक महत्त्वाची खनिजे मिळतात. आर्कियननंतर कॅम्ब्रियनपूर्व काळात बनलेल्या कडप्पा संघाचा सु. ३५,००० चौ. किमी. चा चंद्रकोरीच्या आकाराचा पट्टा आंध्रमध्ये असून त्यात प्रामुख्याने क्वार्टझाइट, शेल व पाटीचे खडक आहेत. पुलिवेंडली येथे क्रिसोटाइल जातीच्या उत्कृष्ट ॲस्बेस्टॉसचे तसेच बेम्पल्ली, पुलिवेंडली, कोटापल्ली येथे बॅराइट व संगजिरे या खनिजांचे मोठे साठे मिळतात. कडप्पानंतरच्या विंध्यकालीन खडकांपैकी कुर्नूल समूहाच्या बंगनपल्लीजवळच्या खडकात हिरे सापडतात. गोदावरी जिल्ह्यात उत्तर गोंडवनकालीन खडकांचे थर राजमहेंद्री ते विजयवाड्यापर्यंतच्या पट्ट्यात असून सिंगरेनी व कोठागुडम् भागांत कोळसा सापडतो. राजमहेंद्रीनजीक गोदावरीच्या त्रिभुजप्रदेशात गोंडवनकालीन खडकांवर चुनखडक, वालुकाश्म इ. गाळांचे खडक आढळतात. यांतील कित्येक क्रिटेशिअस काळातील असून त्यांवर डेक्कन ट्रॅप खडक आहे. येथील काही गाळांचे खडक कडलोर वालुकाश्माच्या समकालीन—इओसीन ते मायोसीन कालातील—असावेत असे अनुमान आहे. 

स्वाभाविक रचनेच्या दृष्टीने आंध्र प्रदेशाचे तीन प्रमुख विभाग पडतात : किनाऱ्याजवळचा सखल मैदानी प्रदेश पूर्व घाटाच्या तुटक डोंगरओळींचा व पश्चिमेकडील सह्याद्रीच्या डोंगरपठारांचा प्रदेश आणि बाकीचा विखुरलेल्या टेकड्या, अवशिष्टशैल, मोठमोठे सुटे खडक यांनी युक्त असलेला उत्थान पावलेला स्थलीप्राय प्रदेश.अगदी ईशान्येकडील किनारपट्टीचा भाग चिंचोळा असून त्यावर समुद्रात घुसलेल्या ‘डॉल्फिन्स नोज’ या टेकडीच्या आडोशाने विशाखापटनम् हे महत्त्वाचे नैसर्गिक बंदर तयार झालेले आहे. किनारपट्टीचा मध्य भाग गोदावरी व कृष्णा यांच्या विस्तीर्ण व सुपीक त्रिभुजप्रदेशांचा असून त्यांच्या दरम्यान कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. किनारपट्टीचा दक्षिण भाग हलक्या प्रतीच्या जमिनीचा असून त्यात दक्षिण टोकास पुलिकत हे खारकच्छ आहे. नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे जाणाऱ्या पूर्व घाटाच्या ९०० ते १,५०० मी. उंचीच्या डोंगरात वेलिकोंडा व नलुमलई या चंद्रकोरीसारख्या रांगा किनाऱ्याला समांतर येतात. त्यांच्या पश्चिमेस नंद्याळ खोरे आहे. राज्याच्या नैर्ऋत्य व दक्षिण भागात एरामलई, शेषाचलम् व पालकोंडा (९०० मी.) रांगा आहेत. आग्नेयेस नागरी डोंगर आहेत. स्थलीप्राय प्रदेशाची उत्तरेकडील उंची सु. ४५० ते ६०० मी. व दक्षिणेकडे ३०० ते ४५० मी. आहे. या प्रदेशाचा बहुतेक भाग नाइस व ग्रॅनाइट यांपासून झालेल्या तांबूस वाळूमिश्रित जमिनीचा आहे. उघड्या-बोडक्या टेकड्या, खुरट्या काटेरी झुडपांनी युक्त अशी तांबूस पिवळी जमीन, रोडावलेले जलप्रवाह यांनी हा प्रदेश वैराण भासतो. मधूनमधून लहान-मोठ्या दऱ्यांत बांधून काढलेले तलाव व त्यांभोवतीची वस्ती हेच या प्रदेशातील कष्टमय जीवनाचे आधार आहेत.

 या राज्यात विविध प्रकारची खनिजसंपत्ती आहे. सिंगरेनी, कोठागुडम् व इतर खाणींतून दरसाल सु. सात लाख मेट्रिक टन कोळसा मिळतो. अनंतपूर, चित्तूर, कडप्पा, खम्मम्, कृष्णा, कुर्नूल, नेल्लोर या जिल्ह्यांत दरसाल सु. सहासात लाख टन लोहधातुक मिळते. नेल्लोर जिल्ह्यात अभ्रक व कडप्पा जिल्ह्यात ॲस्बेस्टॉस मिळते. अनंतपूर, खम्मम्, कृष्णा, कडप्पा या जिल्ह्यांत बॅराइट्स मिळतात. याशिवाय चिनी माती, भट्टीच्या विटांसाठी लागणारी आगबंद माती, शहाबादी फरशी, स्लेट, संगमरवर, चुनखडी इ. खनिजे आहेत. गोवळ-कोंड्याजवळ हिरे सापडत असत. अणुशक्ति उपयोगी इल्मेनाइट व मोनाझाइट ही खनिजे वेल्लोर जिल्ह्यातील वाळूत अल्प प्रमाणात सापडतात. मँगॅनीज विशाखापटनम, श्रीकाकुलम् या जिल्ह्यांत सापडते. 

आंध्र प्रदेशात उन्हाळ्याचे तपमान ३७ से. ४४ से. यांच्या दरम्यान असते. काही ठिकाणी ते ५० से. पर्यंतही जाते. हिवाळ्याचे तपमान १६ ते १९ से. च्या दरम्यान असते. समुद्रकिनाऱ्याजवळच्या प्रदेशात उन्हाळा व हिवाळा सौम्य असतो. पावसाचे प्रमाण ५० पासून १४० सेंमी. पर्यंत आहे. पाऊस मुख्यत: जून ते सप्टेंबरमध्ये पडणारा नैर्ऋत्य मान्सूनचाच आहे. त्याचे प्रमाण तेलंगण, रायलसीमा (अनंतपूर, चित्तूर, कडप्पा व कुर्नूल हे जिल्हे) व किनारपट्टी या प्रदेशांत क्रमश: कमी होत जाते. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वादळांमुळे विशेषत: उत्तरभागात भरपूर पाऊस पडतो. राज्याचा नैर्ऋत्यभाग पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात असल्यामुळे तेथे पाऊस सर्वांत कमी पडतो. 

गोदावरी आणि कृष्णा या आंध्र प्रदेशातील मुख्य व महत्त्वाच्या नद्या होत. दक्षिण भागात पेन्नार ही मुख्य नदी आहे. गोदावरी महाराष्ट्रातून येऊन आदिलाबाद जिल्ह्यात या राज्यात शिरते आणि पुढे ७२० किमी. वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. राजमहेंद्री येथे तिचा त्रिभुजप्रदेश सुरू होतो. तिला या राज्यात मांजरा, मणेरू, प्राणहिता, इंद्रावती आणि शबरी या उपनद्या मिळतात. कृष्णा कर्नाटक  राज्यातून येऊन या राज्याच्या महबूबनगर जिल्ह्यात शिरते.तिचा या राज्यातील प्रवाह ७२० किमी. आहे. तिच्या त्रिभुजप्रदेशाच्या शिरोभागी विजयवाडा वसलेले आहे. कृष्णेला या राज्यात मिळणारी मोठी उपनदी म्हणजे तुंगभद्रा. पेन्नार ही कर्नाटकमधून येऊन अनंतपूर जिल्ह्यात या राज्यात शिरते, तिला अनेक उपनद्या या राज्यात मिळतात. याशिवाय वंशधारा आणि नागवली या नद्या ओरिसातून या राज्यात येतात व मग बंगालच्या उपसागरास मिळतात. 

या राज्यातील जंगलक्षेत्र एकूण क्षेत्राच्या २२·५% आहे. ते मुख्यत: तेलंगण, विशाखापटनम्, गोदावरी जिल्हे व नल्लमलई पर्वत येथे आहे. त्यात सागवान, रोजवुड, सॅटिनवुड, मड्डी, येपी इत्यादी पानझडी वृक्ष आढळतात. तसेच बांबू, कच्छवनश्री यांची वनेही आहेत. यांशिवाय अनेक प्रकारचे वृक्ष, गवत, काटेरी झुडपे वगैरे निरनिराळ्या भागांत आहेत. इमारती लाकूड, बांबू व सुरू ही मुख्य जंगल -उत्पन्ने आहेत.

अरण्यात वाघ, चित्ता, लांडगा, कोल्हा, अस्वल इ. प्राणी आहेत. हत्ती नामशेष झाले आहेत. चौशिंगी हरणे, सांबर व इतर प्रकारची हरणे आणि अन्य प्राणी पुष्कळ आहेत.


  इतिहास : ऐतरेय ब्राह्मणात आंध्र लोकांचा निर्देश प्रथम आढळतो. चंद्रगुप्त मौर्यापूर्वी आंध्र प्रदेश संपन्न असल्याचा मीगॅस्थीनीझने उल्लेख केला आहे व प्लिनीने यास दुजोराच दिलेला आहे. धनकटक – नंतरची अमरावती – ही त्या काळी राजधानी होती. इ. स. पू. सु. चौथ्या शतकात जैन आचार्य भद्रबाहू आपल्या अनुयायांसह या भागातून गेल्याचा उल्लेख मिळतो. अशोकाच्या शिलालेखात आंध्राचा निर्देश आहे. इ. स. पू. सु. २२५ मध्ये सिमुक राजाने पैठण येथे सातवाहन घराणे स्थापन केले असावे. सातवाहनांनी सु. साडेचारशे वर्षे राज्य केले. यज्ञश्री शातकर्णी, हाल, गौतमीपुत्र शातकर्णी, पुलुमायी हे या घराण्यातील अतिप्रसिद्ध राजे. यांच्या कारकिर्दीत कला, वाङ्‌मय आदी क्षेत्रांत अत्यंत भरभराट झाली. यांचे साम्राज्यही खूप वाढले. रोमन साम्राज्याशी त्यांची देवाण-घेवाण असल्याचे पुरावे मिळतात. यूरोपामध्ये दमास्कसचे पोलाद तलवारीसाठी उत्कृष्ट समजले जाई परंतु दमास्कसला ते आंध्रामधील निर्मळहून निर्यात होत असे. तिसऱ्या शतकात शक, पल्लव, यवन यांच्या हल्ल्यांमुळे सातवाहन साम्राज्य लयास जाऊन आंध्रामध्ये अनेक लहान लहान राज्ये उदयास आली. त्यांपैकी नाग, बृहत्पालायन, सालंकायन, इक्ष्वाकू आदी उल्लेखनीय घराणी होऊन गेली. इक्ष्वाकू हे मूळचे सातवाहनांचे मांडलिक. ते स्वतःस ‘आंध्रभृत्य’ म्हणत. नागार्जुनकोंडा खोऱ्यातील श्रीपर्वतासमीप विजयपुरी येथे त्यांनी आपली राजधानी स्थापिली. बौद्ध धर्म, शिक्षण, कला यांचे हे त्या काळी एक मोठे केंद्र समजले जात असे. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता नागार्जुन याचे शिष्य आर्यदेव व दिङ्नागाचार्य हे येथील प्रसिद्ध शिक्षक. दिङ्नागाचार्यांनी पुढे वेंगी विद्यापीठाची स्थापना केली. आंध्राच्या ईशान्येकडे गंग, पूर्वेकडे वेंगीचे चालुक्य, दक्षिणेकडे चोल, पल्लव इत्यादींची राज्ये असल्याचा ह्युएनत्संगाने उल्लेख केला आहे. ८५० च्या सुमारास वेंगीच्या चालुक्यांपैकी विजयादित्य तिसरा ह्याने सध्याच्या आंध्र प्रदेशाचा बराच भाग आपल्या आधिपत्याखाली आणला, त्याने आपली राजधानी वेंगीहून विजयवाड्यास हलविली. चालुक्यांनी सध्याच्या राजमहेंद्रीची स्थापना केली. अनेक विद्वानांना आश्रय दिला. तेलुगू महाभारताचा लेखक नन्नय चालुक्यांच्याच पदरी होता. राष्ट्रकूट, चोल व काकतीय यांची सत्ता याच सुमारास आंध्राच्या निरनिराळ्या भागांत होती. बाराव्या शतकात वरंगळचे काकतीय प्रभावशाली बनले. १३२६ पर्यंत ह्यांची कारकीर्द झाली. गणपतिदेव (१२०२–६२), त्याची मुलगी रुद्रम्मादेवी (१२६२—९२) व तिचा नातू दुसरा प्रतापरुद्र (१२९२–१३२३) हे त्यांमधील उल्लेखनीय राज्यकर्ते होत. यांच्या कारकिर्दीत बरीच मंदिरे, किल्ले, कालवे, तलाव बांधले गेले. रामप्पा व लक्‍नावरम् हे सध्याचे तलाव त्यांच्या कारकिर्दीतीलच. मार्कोपोलोने वैभवशाली काकतीयांचे वर्णन केले आहे. महंमद तुघलकाने काकतीयांचा शेवट केला. परंतु इस्लामी आक्रमणाची पाठ वळताच रेड्डी घराण्याने आंध्र प्रदेशावर ताबा मिळविला (१३२८–१४२४). नंतर विजयानगरच्या साम्राज्याचा उदय, उत्कर्ष व अस्त (१३३६–१५६५) झाला. कृष्णदेवराय (कारकीर्द १५०९–३०) हा मोठा सम्राट झाला. उत्तम शासक, विद्वान, लेखक व कलेचा चाहता अशी याची ख्याती होती. तेलुगू साहित्यात याने मोलाची भर घातली. आंध्रातील कंबम्-बुक्कराय, समुद्रम् व कनिगिरी ही मोठी तळी याने बांधली. बहामनी व इतर शेजारच्या सुलतानांशी विजयानगरच्या कटकटी चालू होत्या. त्याचे पर्यवसान तालिकोटा (राक्षसतागडी) च्या लढाईत झाले (१५६५) आणि विजयनगरच्या साम्राज्याचा अस्त झाला. बहमनी राज्यातील तेलुगुभाषिक तेलंगण सुभ्यावर कुली कुत्बशहाची नेमणूक झाली होती. बहमनी राज्याची शकले झाली तेव्हा कुली कुत्बशहाने गोवळकोंड्यास कुत्बशाही स्थापन केली. १५८० च्या सुमारास आंध्र प्रदेशाचा बहुतेक भाग कुत्बशाहीकडे आला. त्यांच्या अमदानीत दखनी उर्दूचा फैलाव झाला. आकण्णा, मादण्णा या हुषार प्रधानांनी राज्यकारभारात सुधारणा केली. तेलुगू साहित्यास व कलेस आश्रय दिला. कुत्बशाहीची छाप आंध्रमधील तेलंगण विभागात आजही दिसून येते. १६८७ मध्ये गोवळकोंडा औरंगजेबाने जिंकला व आंध्र दिल्लीच्या मोगल साम्राज्याचा भाग बनला. औरंगजेबाने नेमलेला दख्खनचा सुभेदार निजामुल्मुल्क आसफजाह याने औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांमध्ये झालेल्या बेबनावाचा फायदा घेऊन हैदराबाद येथे स्वतंत्र निजामशाही स्थापन केली. या वेळी मराठ्यांची सत्ता वाढीस लागल्याने त्यांचा निजामाशी विरोध अटळ होता. सु. शंभर वर्षे मराठे-निजाम-संबंध कधी सलोख्याचे तर कधी झगड्याचे चालले होते.

 मच्छलीपटनम् येथे इंग्रजांची वखार १६११ पासून (कुत्बशाहीच्या संमतीने) सुरू झाली. नंतर फ्रेंचांना सलाबतजंगाने काही प्रदेश तोडून दिला व फ्रेंच सैन्याची मदत मिळवली. डचांनी लोखंडी सामानाचा कारखाना माधवपलायम् (जि. पश्चिम गोदावरी) येथे १६२८ पासून चालविला होता. यूरोपीयांचा चंचुप्रवेश आंध्र प्रदेशात असा झाला. इंग्रज वखारी पू. किनाऱ्यावर अनेक ठिकाणी निरनिराळ्या सत्ताधाऱ्यांच्या अखत्यारात होत्या. पण मद्रासमधील फोर्ट सेंट जॉर्ज (किल्ला)हे त्याचे केंद्र होते. मद्रास (चेन्नापट्टण) शहरावर चंद्रगिरीच्या आंध्र राजांचा अंमल होता. कुत्बशाहीकडून ब्रिटिशांना बऱ्याच सवलती मिळाल्या. फ्रेंच-ब्रिटिश स्पर्धेत हैदराबादच्या निजामाचे वर्तन धरसोडीचे होते. परंतु पुढे ब्रिटिशांची बाजू घेणे निजामाला भाग पडले. गंजाम, विशाखापटनम्, गोदावरी, कृष्णा आणि गुंतूर हे आंध्र जिल्हे निजामाने ब्रिटिशांना १७९५ च्या सुमारास बक्षीस दिले, तर टिपूच्या पाडावानंतर निजामाच्या वाटणीचे चार जिल्हे (बेल्लारी, कुर्नूल, अनंतपूर आणि कडप्पा) त्याने ब्रिटिशांना १८०० च्या सुमारास बहाल केले.

१८५७ च्या प्रक्षोभानंतर सर्व सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे गेली. तेव्हा मद्रास इलाख्यात बहुतेक आंध्र प्रदेश समाविष्ट होता. हैदराबाद हे संस्थान राहिले

हैदराबाद संस्थान ], त्यात तेलंगणाचा भाग होता. तेलुगुभाषिक लोक तीन-चार राजकीय विभागांत मिळून राहत होते. स्वातंत्र्यानंतर निजामाने भारतात विलीन व्हावयाचे नाकारले. पोलीस-कारवाईनंतर तो भाग लष्करी अंमलाखाली आला. १९५२ साली वी. रामकृष्ण राव हे हैदराबादमधील पहिलेलोकनियुक्त मुख्यमंत्री झाले. 

मद्रास इलाख्यातून आंध्र प्रांत वेगळा करण्याच्या मागणीची चळवळ १९१३ पासूनच सुरू झाली. आंध्र महासभा ठिकठिकाणी चळवळ करीत होती. जानेवारी १९५० पर्यंत आंध्र राज्य झाले नाही म्हणून पोट्टी श्रीरामलू यांनी त्यासाठी ५८ दिवसांचे उपोषण केले व स्वप्राणांची आहुती दिली (डिसें. १९५२). १ ऑक्टो. १९५३ पासून अकरा जिल्ह्यांचे नवे आंध्र राज्य (राजधानी कुर्नूल) अंमलात आले. आंध्र राज्याचे पहिले मंत्रिमंडळ टी. प्रकाशमचे परंतु अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यामुळे प्रकाशम् मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. फेरनिवडणुका पार पडल्या, पुष्कळ कम्युनिस्ट सभासद हरले, काँग्रेस युनायटेड फ्रंट पक्ष विजयी झाला आणि बी. गोपाळ रेड्डी यांनी मंत्रिमंडळ बनविले (सन १९५५). मध्यंतरी मिश्रा कमिशनने बेल्लारी जिल्ह्याचा कानडीभाषिक विभाग म्हैसूर राज्यास दिला (मे १९५३). तेलंगण वेगळे राज्य राहावे (राजधानी हैदराबाद) असा प्रयत्न चेन्ना रेड्डी प्रभृतींनी केला  पण तो सफल झाला नाही. राज्यपुनर्घटना-समितीच्या शिफारशींनुसार नोव्हेंबर १९५६ मध्ये आंध्र (११ जिल्हे) आणि तेलंगण (९ जिल्हे) मिळून आंध्र प्रदेश स्थापन झाला. नव्या आंध्र प्रदेशात संजीव रेड्डी मुख्यमंत्री बनले. आंध्रमधून तेलंगण विभक्त करण्याची चळवळ मात्र चालूच राहिली.    

राज्यव्यवस्था : शासनाच्या सोयीसाठी आंध्र प्रदेशाची श्रीकाकुलम्, विशाखापटनम्, पूर्व गोदावरी, प. गोदावरी, कृष्णा, गुंतूर, नेल्लोर, चित्तर, कडप्पा, अनंतपूर, कुर्नूल, महबूबनगर, हैदराबाद, निझामाबाद, मेडक, आदिलाबाद, खम्मम्, वरंगळ, करीमनगर, नलगोंडा व ओंगोल (प्रकाशम्) अशा २१ जिल्ह्यांत विभागणी केली आहे. विधिमंडळ द्विसदनी असून विधानसभेचे २८७ आणि विधानपरिषदेचे ९० सदस्य आहेत. राज्यातून लोकसभेवर ४१ व राज्यसभेवर १८ सदस्य निवडून जातात. राष्ट्राध्यक्षांनी नेमलेल्या राज्यपालाच्या संमतीनुसार राज्याचे मुख्यमंत्री काम पाहतात. १ मार्च १९७३ ला आंध्र प्रदेश विधानसभेत पक्षांचे बल काँग्रेस पक्ष २१६, कम्युनिस्ट ८, कम्युनिस्ट-मार्क्सिस्ट १, अपक्ष १८ व इतर पक्षांचे मिळून ३९ असे होते. १८ जानेवारी १९७३ लाच विधानसभा निलंबित करून राज्यात राष्ट्राध्यक्षांची राजवट जारी करण्यात आली होती. १० डिसेंबर १९७३ रोजी काँग्रेस पक्षाचे श्री वेंगलराव हे नवे मुख्यमंत्री झाले.


  हैदराबाद  येथे राज्याचे उच्च न्यायालय असून जिल्हा व तालुका पातळीवर न्यायालये आहेत. 

आर्थिक स्थिती: आंध्र प्रदेशात नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून घेण्यास चांगला वाव आहे आणितसा तो करून घेतला जातही आहे. राज्यातील ६७% लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. गोदावरी, कृष्णा, पेन्नार इ. नद्यांच्या मुखांजवळचा सुपीक प्रदेश शेतीला अनुकूल आहे. पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्वीपासूनच्या असून त्यांत नवीन योजनांची भर पडत आहे. काकतीय व विजयानगरच्या राज्यांनी काही तलाव व कालवे केले होते. निजामाने त्यांत निजामसागर, उस्मानसागर, हिमायतसागर इत्यादींची भर घातली. ब्रिटिश कालखंडात लहानमोठ्या अनेक योजना फलद्रूप झाल्या. स्वातंत्र्यानंतर यांत भरच पडत आहे व यामुळे आंध्र समृद्ध होत आहे. १९६५ – ६६ साली आंध्रमध्ये दरडोई उत्पन्न रु. ३४३·०० (भारत रु. ४३०) होते. एरंडी आणि तंबाखू यांच्या उत्पादनात आंध्राचा क्रमांक भारतात पहिला आहे तर भात, रागी, मिरच्या, भुईमूग, तीळ यांच्या पैदाशीत तो तिसरा आहे. आंध्र प्रदेश इतर राज्यांना धान्यपुरवठा करू शकतो. 

या राज्यातील नद्यांच्या त्रिभुजप्रदेशातील व किनारपट्टीतील गाळाची जमीन तांदूळ, ऊस, केळी, आंबा या पिकांस विशेष उपयोगी आहे. तेलंगण विभागातील उच्च व मध्यम प्रतीची आणि इतर ठिकाणची अवगीकृत काळी जमीन कापूस, तंबाखू, मिरच्या, हळद, ज्वारी, बाजरी, राळे इ. धान्यांस उपयुक्त आहे. पाणीपुरवठ्याची चांगली सोय असेल तेथे या जमिनीत तांदूळ व ऊसही होतो. बऱ्याच ठिकाणी, विशेषत: किनाऱ्यावरील गाळजमिनीला लागून, दख्खन पठाराच्या व रायलसीमा भागात तांबडी जमीन आहे. ती कुळीथ, तूर इ. द्विदल धान्ये, भुईमूग, फळे यांच्या उत्पादनास सोयीची आहे. या जमिनीत पाणीपुरवठा असल्यास कापूस, तंबाखू व ऊसही होतो. जांभा दगडाची जमीन थोडीच आहे. तिच्यात नारळ, सुपारी, द्विदल धान्ये व फळे होतात. काही भागांत तांदूळही होतो. 

या राज्यातील एकूण सु. पावणेतीन कोटी हेक्टर जमिनीपैकी १९६९ – ७० मध्ये ४१·६% जमीन लागवडी खाली असून २३·५% जमीन जंगलव्याप्त होती. शेतीस अयोग्य व उजाड जमीन ७·४%, बिगरशेती उपयोगाखाली ७·५%, शेतीयोग्य पडीक ४·४%, पड ठेवलेली  ६% चराऊ ४·१% व बाकीची इतर पड, तरु-उत्पन्ने इत्यादींखाली होती. काही जमिनीतील एकाहून अधिक पिके गणतीत धरली तर पिकांखालील एकूण जमीन ४७·५% होती. कालवे, पाटबंधारे, तलाव, विहिरी या सिंचनसाधनांचा उपयोग करून येथील कष्टाळू शेतकरी वर्षातून दोनदोन, तीनतीन पिके काढतात. प्रत्यक्ष लागवडीखाली असलेल्या जमिनीपैकी सु. ३१% जमिनीला सिंचनलाभ होतो. या सिंचनक्षेत्रापैकी ४०·६% जमिनीला (आंध्र विभागात ३६% व तेलंगण विभागात ४·६%) सरकारी कालव्यांचे पाणी मिळते. यातील एकट्या कृष्णा जिल्ह्यात २०·४% आहे. एकूण सिंचनक्षेत्राच्या ३९·९% जमीन तलावांच्या पाण्याने भिजते. यांपैकी १६% क्षेत्र नेल्लोर जिल्ह्यात आहे. विहिरींच्या पाण्याने भिजणारी जमीन एकूण सिंचनक्षेत्राच्या १५·३% आहे. त्यापैकी ४६·७% जमीन नेल्लोर,

 अनंतपूर, कडप्पा आणि चित्तूर या जिल्ह्यांत आहे. कुर्नूल जिल्ह्यात पेरलेल्या क्षेत्रापैकी ८७·१०% क्षेत्र (१९६५- ६६) सिंचनाखाली होते. त्याखालोखाल पू. गोदावरी (६१·२%), कृष्णा (६३·३%), श्रीकाकुलम् (५५·९%) व आदिलाबाद (५७%) या जिल्ह्यांत होते. तुंगभद्रा, पोचमपाड (गोदावरी), वंशधारा, इंचेंपल्ली (गोदावरी), पुलीचिंतला (कृष्णा), सोमशीला (पेन्नार) इ. लहान मोठे प्रकल्प शेतीला साह्यकारक आहेत. पिकांखालील एकूण जमिनीपैकी भात २६%, ज्वारी २०·३% व बाजरी, नाचणी, राळे, मका, वरई, सावा, गहू वगैरे इतर धान्ये १५·९% जमिनीत होतात. १०·३% जमिनीत मूग, कुळीथ, तुरी, उडीद, हरभरा व इतर कडधान्ये होतात. नगदी पिकांपैकी भुईमूग १०·२%, कापूस २·३%, केळी, आंबा, लिंबे, संत्री इ. फळे व भाजीपाला २%, एरंडी २·२%, तीळ १·९%, मिरची १·१%, तंबाखू १·३%, ऊस १·१%, चारा १·४% व इतर तेलबिया, नारळ, कांदे, अखाद्य पदार्थ वगैरे मिळून ३·६% जमिनीत होतात. १९६५ – ६६ मधील पिकांचे एकूण उत्पादन ७·७६ अब्ज रुपयांचे होते. १९७१ –७२ मध्ये अन्नधान्ये, ऊस व तेलबिया यांचे उत्पादन अनुक्रमे ६२·७, ११·६ व १२·८ लक्ष टन व कापसाचे १·४४ लक्ष गाठी झाले. अलीकडे द्राक्षांच्या लागवडीला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. द्राक्षवेलीवर खास संशोधन चालू आहे. आनब्-ए-शाही या विपुल उत्पन्न देणाऱ्या जातीच्या वेलीचा चांगला प्रसार होत आहे. संकरित धान्याची लागवडही अधिक होत आहे. विशाखापटनम्, कोठागुडम् येथील व इतर राज्यांतील कारखान्यांत तयार झालेली रासायनिक खते शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत. 

आंध्र प्रदेशातील शेतीचे सामान्य चित्र जरी याप्रमाणे असले, तरी पूर व अवर्षण या संकटांशी त्या राज्याला अनेकदा सामना करावा लागतो. पाऊस व चक्रीवादळे यांमुळे आलेल्या पुरांमुळे या राज्यांतील पिकांचे १९५३ – ७० या काळात सरासरी १२·६७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. १९७०  ७१ मध्ये अवर्षणाने २०० कोटी रु. चे व १९७२ मध्ये ६०० कोटी रु. चे नुकसान झाले. कृष्णा-गोदावरींचे त्रिभुजप्रदेश व कोलेरू प्रदेश येथील पूरनियंत्रण योजना आणि लहानमोठ्यासिंचन योजना, भूमिगत जलाचा अधिक उपयोग, खते, बीबियाणे, दुर्जल कृषी आणि केंद्रशासनाची मदत यांच्या साहाय्याने या संकटांस तोंड देण्यात येत आहे. 

शेतीच्या व इतर जनावरांच्या भारतीय शिरगणतीत आंध्र प्रदेशाचा क्रम चौथा आहे. भारतातील एकूण जनावरांपैकी एकदशांश जनावरे, एकपंचमांश मेंढ्या व एकषष्ठांश कोंबड्या-बदके हे आंध्र प्रदेशाचे प्राणिधन आहे. कोंबड्या, बदके व मेंढ्या यांबाबत आंध्र प्रदेशाचा भारतात पहिला क्रमांक आहे. प्राणिधनाच्या विकासयोजना कार्यान्वित आहेत. डुकरे ६·५ लाखांहून अधिक असून मत्स्यधनही विपुल आहे. सु. ९६० किमी. किनारा व ३२ किमी. रुंदीची समुद्रबूड जमीन यांमुळे ३०,००० चौ. किमी. पेक्षा अधिक मोठे सागरी मत्स्यक्षेत्र या राज्याला उपलब्ध आहे. यांत्रिक बोटींचा उपयोग समुद्रात दूरवर मासेमारीसाठी जाण्यास होतो. अंतर्गत मासेमारीचे जलक्षेत्र सु. ३२,००० हेक्टर असून तिसऱ्या पंचवार्षिक योजनेअखेर एकूण वार्षिक मासेमारी २·६५ टन होती. विशाखापटनम्, काकिनाडा वगैरे मच्छीमार केंद्रे असून कोलेरू व पुलिकत सरोवरांतही हा उद्योग वाढविण्यात येत आहे. 

आंध्र प्रदेशात उद्योगधंद्यांची वाढ झपाट्याने होत आहे. १९६५ मध्ये ६,०७३ कारखान्यांची नोंद राज्यात झाली होती. यांपैकी १२ कापडाचे, १९ साखरेचे, २ कागदाचे व सीमेंट, कातडीकाम, तेलशुद्धी आदींचे होते. बंदर (मच्छलीपटनम्), वरंगळ, धर्मावरम्, येमिगनूर, गढवाल, ताडपत्री येथील हातमागाचे कापड, अधोणीच्या सतरंज्या, कोंडापल्ली व निर्मळ येथील खेळणी, हैदराबाद येथील बिदरीकाम, जरकाम, भरतकाम, शिंगे व हस्तिदंत यांच्या वस्तू, गुंतूरची तंबाखू, आदिलाबादचे फर्निचर, कालहस्तीचे धातुकाम इत्यादी कुटिरोद्योग चांगले चालत आहेत. हैदराबाद हे भारतात वाहतुकीचे सोयीस्कर केंद्र असल्यामुळे तेथे अनेक सरकारी व खाजगी कारखाने निघाले आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, सिंथेटिक ड्रग्ज, हिंदुस्थान मशीन टूल्स, प्रागा टूल्स, हिंदुस्थान शिपयार्ड, झिंक स्मेल्टर, ॲटमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंटचा इलेक्ट्रॉनिक्स विभाग, रीजनल रिसर्च लॅबॉरेटरी, डिफेन्स रिसर्च (मेटलर्जिकल, इलेक्ट्रॉनिक्स) लॅबॉरेटरी इ. भारत सरकारचे कारखाने व संशोधनशाळा आंध्र प्रदेशात आहेत. गुडूरचा चिनी मातीच्या वस्तूंचा व काचेचा कारखाना, निझामाबादची निझाम शुगर फॅक्टरी (पॉवर अल्कोहोल व मिठाई कारखान्यांसह), सिंगरेनी, कोठागुडम् येथील कोळशाच्या खाणी हे सरकारी कारखान्यांपैकी काही होत. सिगरेटी व चिरूट, कागद,खते, साखर यांचे कारखाने, भात सडणे, भातकोंड्यातील तेल काढणे, ॲस्बेस्टॉसचे पत्रे करणे, लोखंडी सामान तयार करणे, तेलशुद्धीकरण इ. अनेक प्रकारचे खाजगी कारखाने निघाले आहेत व अधिकाधिक निघत आहेत. याशिवाय लोखंड, अभ्रक, स्लेट, शहाबादी फरशी, संगमरवर, बॅराइट्स इ. खनिजांवर आधारलेले उद्योगही वाढत आहेत.


  शक्तिसाधनांपैकी कोळसा व वीज ही आंध्र प्रदेशात भरपूर आहेत. जलविद्युत् व औष्णिक विद्युत् दोन्हींचे उत्पादन होते. तिसऱ्या योजनेच्या सुरुवातीस वीज-उत्पादनक्षमता २१३ मेवॉ. होती. ती त्या योजनेच्या शेवटी ६४७ मेवॉ. झाली. चौथ्या योजनेत ती ९८२ मेवॉ. पर्यंत वाढवावी असा प्रयत्न आहे. जलविद्युत् उत्पादनाच्या मच्छकुंड, तुंगभद्रा, निझामसागर, अपर सिलेरू, लोअर सिलेरू, श्रीशैलम्, नागार्जुनसागर, रामपदसागर, इंचेंपल्ली, प्राणहिता इ. योजना आहेत. यांपैकी तुंगभद्रा-प्रकल्प कर्नाटक राज्याच्या सहकार्याने मूर्त झालेला आहे. नागार्जुनसागर-प्रकल्प हा कृष्णेवरील एक प्रचंड प्रकल्प आहे. नंदीकोंडा येथे सु. ४·८ किमी. लांब व १२३ मी. उंच धरण बांधून २८५ चौ.किमी. चे भारतातील सर्वांत मोठे व जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मानवनिर्मित सरोवर तयार व्हावयाचे आहे. त्यात कोयना धरणाच्या चौपटीहून अधिक पाणी साठेल. याचा उपयोग १४ लाख हेक्टर जमिनीला शेतीसाठी होऊन शिवाय चार लाख किवॉ. वीज उत्पन्न होईल. औष्णिक वीज-उत्पादनाच्या हुसेनसागर, रामगुंडम्, तेलंगण इ. योजना आहेत. मार्च १९७१ पर्यंत १००० पेक्षा अधिक लोकवस्तीच्या सर्व गावांत वीज पोचली होती. आंध्र प्रदेशात सरकारी, खाजगी व ग्रामीण तसेच केंद्रसरकारच्या व राज्यसरकारच्या अशा एकूण ४० औद्योगिक वसाहती आहेत. उद्योगधंद्यांचे, लघुउद्योगांचे व भांडवल पुरवणारे अशी स्वतंत्र महामंडळे (कॉर्पोरेशन) राज्यात आहेत. महामंडळे कित्येक कारखानेही चालवितात. हैदराबाद, विजयवाडा व विशाखापटनम् ही निर्मितीची महत्त्वाची केंद्रे आहेत. 

आंध्र प्रदेशातून एकूण ६,२२४ किमी. लांबीचे लोहमार्ग गेले असून त्याचे प्रमाण दर १००० चौ. किमी. ला १७ पडते. वॉल्टेअरच्या उत्तरेस दक्षिणपूर्व रेल्वेचा व मद्रास व गुडूर यांमध्ये दक्षिण रेल्वेचा काही भाग येतो. परंतु राज्याला मुख्यतः दक्षिणमध्य रेल्वे-विभागातील मार्ग असून सिकंदराबाद येथे त्याचे विभाग-कार्यालय आहे. राज्यातील एकूण सडकांची लांबी ९८,८२५ किमी. (१९७०-७१) असून त्यांपैकी ३६% पक्क्या सडका आहेत. राज्यात १९७१ मध्ये एकूण १,२५,८७१ मोटार वाहने होती. अंतर्गत जलमार्ग गोदावरी कालवा, कृष्णा कालवा, बकिंगहॅम कालवा, कुर्नूल-कडप्पा कालवा, कोग्मापूर कालवा वगैरे मिळून १,८४५ किमी. आहेत. सागरी जलमार्गावर विशाखापटनम् व काकिनाडा ही प्रमुख बंदरे असून बंदर मच्छलीपटनम्, भीमुनीपटनम्, कृष्णापटनम्, कलिंगपटनम् इ. सु. दहावर लहान बंदरे आहेत. हैदराबाद येथे देशातील एक महत्त्वाचा विमानतळ आहे. हैदराबाद, विजयवाडा, कडप्पा व विशाखापटनम् येथे आकाशवाणी-केंद्रे आहेत. १९७२ अखेर राज्यात ९,४५,६२६ रेडिओ होते. १९७२ च्या अहवालानुसार राज्यात २५ दैनिके, ४ द्वि/त्रिसाप्ताहिके, २२३ साप्ताहिके व ४०३ इतर अशी एकूण ६५५ नियतकालिके आहेत. यांत तेलुगू, इंग्रजी, उर्दू व काही हिंदी भाषांतीलही आहेत.

लोक व समाजजीवन: आंध्रप्रदेश-निर्मितीमुळे तेलुगुभाषिक लोक एकत्र आले खरे पण त्यांचे तीन प्रवाह भिन्न भिन्न राहिले. ब्रिटिश राजवटीत मद्रास इलाख्यात राहिलेला प्रजाजन आणि हैदराबादचा संस्थानी प्रजाजन यांच्यातली तफावत स्पष्ट दिसे. संस्थानी प्रजाजनांतले मुसलमान आणि बिगर-मुसलमान हा फरकदेखील नजरेत भरण्यासारखा होता. हे भेद अपरिहार्य होते. परंतु स्वराज्योत्तर कालात हैदराबादचे विभाजन आणि शेजारच्या राज्यात सामिलीकरण झाल्यावर प्रजाजनांचे आपसातले संबंधही बदलले. विषमता राहिलीच, परंतु ती वेगळ्या अर्थाने—वेगळ्या मर्यादेत पण वेगवेगळ्या थरांत उरली. राजकीय परिस्थितीने लाभलेल्या ह्या विषमतेत भर पडली ती आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे. मोठमोठ्या जमिनदाऱ्या, हैदराबाद संस्थानचे छोटेमोठे जहागीरदार, मोठमोठी मंदिरे, श्रीमंत व्यापारी, कारखानदार आणि सधन शेतकरी यांखेरीज उरलेला बहुजनसमाज श्रीमंतांच्या आश्रयाने राहणारांचा होता. शेतीसाठी स्वत:ची जमीन नाही, पोटभर मजुरी मिळविण्याजोगे हक्काचे, कायमचे काम नाही, अशा बिकट परिस्थितीत हा श्रमिक वर्ग वाढत होता. मुंबई-पुण्याकडे बांधकाम, घरकाम, मजुरी करणारे पुष्कळ लोक तेलुगुभाषी आहेत. कोलार सोन्याच्या खाणीतदेखील त्यांचे आधिक्य आहे. वरंगळ जिल्ह्यात कम्युनिस्टांचे छोटेसे राज्य स्थापन झाले होते पुष्कळ सधन शेतमालकांना आणि धनिकांना त्यांची भीती वाटत होती, हा इतिहास ताजा आहे. किंबहुना ही विषम परिस्थिती नाहीशी करण्यासाठी भूदानयज्ञाची कल्पना आचार्य विनोबांना आंध्र प्रदेशातच पोचंपाड येथे स्फुरली. किनाऱ्याजवळील आंध्र आणि हैदराबादच्या तेलंगणातील आंध्र असा सूक्ष्म भेद केव्हा केव्हा करतात पण तेलुगू भाषेचा एकजिनसी प्रभाव सर्वत्र दिसून येतो. आंध्रांचा अभिमान, दीर्घोद्योग आणि राष्ट्रीयत्वाची जाणीव हे गुण उल्लेखनीय आहेत. खादी आणि राष्ट्रभाषा- प्रचार, ब्रिटिशविरोधी संघटना इ. राष्ट्रसेवेच्या कार्यक्रमांत आंध्रांनी बराच वरचा क्रम पटकावला होता. आंध्र खादीची ख्याती भारतभर अजूनही आहे.

या राज्यातील लोकसंख्येमध्ये १९६१ च्या जनगणनेनुसार ८८% हिंदू, ८% मुसलमान आणि ४% ख्रिस्ती अशी वाटणी होती परंतु कित्येक शहरांत व जिल्ह्यांत ही टक्केवारी निराळी दिसते. हैदराबाद-सिकंदराबाद व कुर्नूल यांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण जास्त, तर गुंतूर, कृष्णा जिल्ह्यांमध्ये ख्रिश्चनांचे प्रमाण जास्त आढळते. १९७१ च्या शिरगणतीनुसार लिहितावाचता येणारे राज्यात २४·५६ (१९७१) असून हैदराबाद जिल्ह्यात त्याचे प्रमाण सर्वांत जास्त (३९·९१%) आहे. राज्यातील नागरी वस्तीचे प्रमाण १९·३५% असून ती २२५ शहरांतून विभागलेली आहे. राज्यात लाखावर लोकवस्ती असलेली तेरा शहरे आहेत. कृष्णा-गोदावरी-त्रिभुज प्रदेशात लोकवस्ती दाट, तर रायलसीमा, तेलंगण व डोंगराळ प्रदेशात त्या मानाने लोकवस्ती विरळ आहे. राज्यातील लोकवस्तीची सरासरी घनता दर चौ. किमी. ला १५७·२ आहे.

आंध्र प्रदेशात तेलुगूचे महत्त्व साहजिकच श्रेष्ठ आहे. तेलुगू बोलणारे ८६%, उर्दू बोलणारे ७%, तमिळ, कानडी आणि लंबाडी मिळून ४% यांखेरीज ओरिया, गोंडी, मराठी इ. भाषिकांचा समावेश आंध्र प्रदेशात होतो.

वंजारी, लमाणी आणि लंबाडी ह्या नावांनी एकाच लोकांचा (त्यांच्या भाषांचा) निर्देश होतो. अंध्र, भिल्ल, गोंड, प्रधान, शबर, वाल्मिकी, कोया, चेंचू, यरूकुल वगैरे सु. ३१ प्रकारच्या भिन्न भिन्न वन्य आदिजमाती मिळून सु. १३ लाख प्रजाजन होतात. त्यांच्या भाषा व पोटभाषाही निराळ्या आहेत.


आंध्र प्रदेशात स्त्री-पुरुष प्रमाण १९७१ च्या जनगणनेनुसार दर हजारी ९७७ स्त्रिया असे आहे. १९६१ मध्ये हे प्रमाण हजारी ९८१ होते. सर्व राज्याचे हे प्रमाण असले, तरी श्रीकाकुलम् जिल्ह्यात ते हजारी १,०२५ व निझामाबाद आणि विशाखापटनम् जिल्ह्यांत अनुक्रमे ९९९ व ९९८ आहे.

राज्यातील जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या ठिकाणी दवाखाने असून क्षयरोग व कुष्ठनिवारण यांसाठी राज्यात विशेष सोयी आहेत. १९७१ च्या शिरगणतीनुसार राज्यातील एकूण लोकसंख्येच्या २४·५७% लोक–पुरुष ३३·१८% वस्त्रिया १५·७५%–साक्षर असून १४ वर्षे वयापर्यंत शिक्षण मोफत आहे. १९७०-७१ च्या माहितीप्रमाणे राज्यात पूर्वप्राथमिक शाळा ६२, विद्यार्थी ३,५६० प्राथमिक शाळा ३७,३४९, विद्यार्थी  ३२,२३,२९२, शिक्षक ८०,८१५ माध्यमिक शाळा २,९९४, विद्यार्थी ९,९४,२६६, शिक्षक ४३,७६३ होते. उस्मानिया विद्यापीठ (हैदराबाद), आंध्र विद्यापीठ (वॉल्टेअर), श्री वेंकटेश्वर विद्यापीठ (तिरुपती) व आंध्रप्रदेश कृषिविद्यापीठ (हैदराबाद) ही विद्यापीठे राज्यात असून एकूण २५६ महाविद्यालयांतून विविध प्रकारचे उच्च शिक्षण देण्याची सोय आहे. हैदराबाद येथे विविध क्षेत्रांतील संशोधन-संस्था असून वैद्यकशास्त्रालाच वाहिलेली एक वेगळी अकादमी आहे.

तेलुगू भाषा ही द्राविडी भाषांपैकी एक होय. परंतु काहींच्या मते ही प्राकृतजन्य असून पैशाची भाषेशी संबंधित आहे. तेलुगू लिपीमध्ये ५१ अक्षरे आहेत. अद्दकी येथील ८४८ च्या शिलालेखात प्रथम तेलुगू काव्याचा नमुना दिसतो. तथापि अकराव्या शतकातील आंध्र महाभारताचा कर्ता कवी नन्नय हा आंध्रच्या प्रौढ तेलुगू भाषेचा पहिला लेखक समजला जातो. महाकवी तिक्कन्न (१३ वे शतक) व एर्राप्रेगडा (१४ वे शतक) ह्यांनी आंध्र महाभारत पुरे केले तेलुगू भाषेतच ह्यांना कवियत्रम् म्हणतात. शैव वाङ्मयाचा जनक पाल्कुरिकी सोमनाथ (१२ वे शतक) याचे बसवपुराण, नन्नेचोडचे कुमारसंभवरंगनाथ रामायण इ. अभिजात वाङ्मय याच काळातील. पंधराव्या शतकातील महाकवी श्रीनाथ व महाभागवताचा लेखक पोतना हे युगपुरुष मानले जातात. विजयानगरच्या कृष्णदेवरायाची कारकीर्द तेलुगू साहित्याचे सुवर्णयुग होय. कृष्णदेवरायकृत आमुक्तमाल्यदा, पेद्दनाकृत मनुचरित्र, रामराजभूषणरचित वसुचरित्र, नंदी तिम्मनाविरचितपारिजातापहरणम्, तेनाली रामकृष्णकृत पांडुरंग माहात्म्य, आणि पिंगली सूरनाकृत कलापूर्णोदयम् या तेलुगूमधील अजरामर कृती समजल्या जातात. तेलुगूची उर्जितावस्था पुन्हा १९ व्या शतकातच झाली. साहित्याच्या विविध क्षेत्रांत भर पडत आहे. नवनिर्मिती होत आहे. आंध्र साहित्य परिषद (काकिनाडा), आंध्र सारस्वत परिषद (हैदराबाद), साहिती समिती (तिरुपती), विशाखा लेखक संघ (विशाखापटनम्), सरसा (मद्रास) अशा विविध संस्था पूर्वीपासूनच कार्य करीत होत्या. आता आंध्र प्रदेश साहित्य अकादमी स्थापन झाली आहे [तेलुगुभाषा तेलुगु साहित्य].

टिकेकर, श्री. रा. 

कला व क्रीडा: आंध्र प्रदेशातील लोककलांमध्ये रस्त्यावर करण्यात येणाऱ्या तेलुगू नाटकांचा वीथिनाटक हा एक प्रकार असतो. यातील पात्रांचा परिचय स्वतः पात्रे व सूत्रधार करून देतात. विधिनाटकामध्ये विनोदनिर्मितीसाठी हास्यगडू किंवा विट नामक विदूषकाचे पात्र असते. विधिनाटकातील पात्रयोजनेची ओळख व पात्रांच्या संवादांचे स्पष्टीकरण ही हास्यगडूची प्रमुख कामे असतात. मुलाच्या बारशाच्या दिवशी सुवासिनींनी म्हणावयाच्या मंगलारत्या हे आंध्र प्रदेशातील लोकगीतांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 

शातकर्णी राजाच्या काळामध्ये आंध्र कारागिरी व हस्तव्यवसाय प्रगत होते. परंतु त्यांचा खराखुरा उत्कर्ष झाला तो काकतीय राजांच्या काळात. वरंगळ या त्यांच्या राजधानीत उत्कृष्ट कारागिरीला वाव मिळाला. येथील तलम सुती विणकामाबद्दल मार्को पोलोने ही बहुमोल वस्त्रे कोळ्याच्या जाळ्यासारखी दिसतात असे म्हटले आहे. येथील मलमल फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून येथील लोकरीची कांबळी एके काळी प्रख्यात होती. रेशीमकाम हा या प्रदेशाचा आणखी एक विशेष. रेशमी वस्त्रांचे अनेक प्रकार नागबंधनम्, पट्टेडुकावू, कादंबकावू, चंदनकावू, रुद्राक्षवन्ने, वसंतविलास, लक्ष्मीविलास, हंसावली इ. नावांनी प्रचलित होते. मच्छलीपटनम् येथील कलमकारी कापड प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. गडवाल येथील साड्याही विशेष प्रसिद्ध आहेत. तिरुपतीची चंदनाची व पितळेची खेळणी तसेच कोंडापल्ली येथील लाकडी खेळणी प्रसिद्ध असून त्यांवर देवादिकांची चित्रे कोरलेली असतात. विशाखापटनमचे हस्तिदंती कोरीव काम आणि शिंगावरील व कूर्मपृष्ठावरील कोरीव काम उल्लेखनीय आहे. येथील बिद्रीकामाचे नमुने पानदाणी, अत्तरदाणी इ. वस्तूंमध्ये आढळतात. काचेच्या व नकली खड्यांच्या बांगड्या व मणीही येथे तयार होतात. 

आंध्र प्रदेशाने ­­­­­­­­­⇨त्यागराज, ­­­­­­­­­⇨श्यामशास्त्री, ­­­­­­­­­⇨मुथ्थुस्वामी दीक्षितर यांसारखे थोर संगीतकार भारतीय संगीताला दिले. नवव्या शतकाच्या प्रारंभी दुसऱ्या विजयादित्याच्या कारकीर्दीमध्ये राजाश्रयामुळे धार्मिक आंध्र संगीताला चांगले दिवस लाभले. विजयवाड्याच्या एका शिलेवर आंध्रातील नवव्या शतकातील वादक व नर्तक यांची चित्रे कोरलेली असून त्यांवरील मंजरी, मृदंग, झांज, मुरली इ. वाद्यांच्या चित्रांवरून तत्कालीन वाद्यांची कल्पना येते. या संगीताचा वारसा राज्य संगीत नाट्य अकादमी, ललित कला संगम या संस्था आजही चालवीत आहेत. एकपात्री हरिकथा या लोककलाप्रकारात लोकसंगीताची योजना असते. लोकनृत्याची अखंड परंपरा लंबाडी या आदिवासी जमातीमध्ये वंशपरंपरेने चालत आलेली आहे. या जमातीतील स्त्रिया भडक कपडे परिधान करून वमोठमोठे अलंकार घालून नृत्य करतात. या प्रदेशातील आजच्या काळातील सर्वांत प्रसिद्ध नृत्यप्रकार ­­­­­­­­­⇨कूचिपूडि नृत्य हा होय. अमरावती येथील स्तूप ही वास्तुकलेतील भव्य कलाकृती मानली जाते. हा स्तूप आज अवशिष्ट स्वरूपात आहे. अमरावतीव्यतिरिक्त आज नागार्जुनसागरात बुडालेल्या नागार्जुन कोंडा येथे विशाल बौद्धस्तूप, अश्वमेध कुंड, घाट, खुले रंगमंदिर व इतर वास्तू होत्या. त्यांतील काही मूळ वास्तू व शिल्पे, तसेच बुडालेल्या इतर वास्तूंच्या प्रतिकृती नव्या जागी बांधलेल्या संग्रहालयात ठेवल्या आहेत. अमरावती येथील शिल्पांप्रमाणेच नागार्जुनकोंडा येथील मिथुन, नटराजयुद्ध, ठेंगू यक्ष तसेच घंटासाक्ष येथील संगमरवरी शिल्पेही कलात्मक आहेत. वरंगळच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील कीर्तिस्तंभ वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. संगमरवरी दगडामध्ये लाकडाचा आभास निर्माण करणाऱ्या या चार प्रवेशद्वारांच्या कमानींच्या टोकांवर एक एक हंसाची मूर्ती होती. त्यांपैकी आज एकच हंसाची मूर्ती काळाच्या ओघात टिकून राहिली आहे. हैदराबाद येथील चार मिनार ही वास्तू १५९१ मध्ये कुली कुतुबशहाने बांधली. चार मिनारचे मनोरे ५५ मी. उंच आहेत. एका वेळी दहा हजार लोक बसून नमाज पढू शकतील एवढी मोठी संपूर्ण दगडी मक्का मशीद कुतुबशहाच्याच अमदानीत बांधण्यास सुरुवात झाली व औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या विजयानंतर ती पूर्ण केली. गोवळकोंडा हा कुतुबशाहीकालीन किल्ला वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बागेआम हे उद्यान, चौमहल, राजाची कोठी, फलकनुमा महल, सालारजंग म्यूझीयम, उस्मानिया विद्यापीठाच्या नव्या इमारती इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत. 

आंध्र प्रदेशातील चित्रकला काकतीयांच्या कारकीर्दी मध्ये विशेष प्रसिद्धीला आली. याच काळात घरातील भिंती चित्रित करण्याची पद्धती रूढ झाली. आंध्रातील सुरुवातीच्या चित्रकलेवर चालुक्य पद्धतीचा प्रभाव  पडलेला असून तेराव्या शतकानंतर येथील चित्रकलेला स्वत:चे असे वेगळे स्थान प्राप्त झाले. ताडपत्री आणि लेपाक्षी येथील तेराव्या ते सोळाव्या शतकांतील आंध्र चित्रकलेचे नमुने प्रसिद्ध आहेत. चौदाव्या शतकातील पालनाड येथील शिल्पचित्रे व वरंगळचे भग्नावशेष यांवरून येथील चित्रकलेने गाठलेली मजल ध्यानात येते. आजच्या काळातील ए. पैदिराजु, मोक्कापट्टी कृष्णमूर्ती, पी. टी. रेड्डी, एस्. व्ही. रामराव इ. चित्रकार प्रसिद्ध आहेत.

आंध्र प्रदेशातील अनेक राजे देवभक्त असल्यामुळे आंध्र प्रदेशात देवालये व मूर्तिकला यांचा विकास झाला. काकतीयांनी अनेक शिवालये बांधली. वरंगळ येथीलसहस्रस्तंभी शिवमंदिरातील मूर्ती ह्या जुन्या मूर्तिकलेचा एक उल्लेखनीय नमुना आहे. नूकाब, एकवीरा-घट्टांबिक, मणिकादेवी ह्या शिवशक्तीच्या देवीच्या मूर्ती याच काळात घडविल्या गेल्या. गुडाली, गंडवरम् आणि दिपिले येथील अनुक्रमे संगमेश्वर, शिवपार्वती आणि नग्नेश्वर ह्या मूर्ती प्रसिद्ध आहेत. काकतीयांनी बांधलेल्या अनेक देवालयांतील स्तंभांवर व छतांवर पौराणिक प्रसंग वर्णन करणाऱ्या मूर्ती कोरल्या आहेत. 

चैत्र महिन्यात वन्य जमातीतील लोक जंगलामध्ये जाऊन तेथे नृत्यगानात रममाण होतात. जन्माष्टमीच्या रात्री निघणाऱ्या श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या मिरवणुकीमध्ये लोक पलिते घेऊन नाचतात. दुसऱ्या दिवशी एका खांबाला तेल चोपडून त्याच्या टोकावर पैशांनी भरलेला हंडा टांगला जातो व कृष्णाच्या वेशभूषेतील गोपमंडळी खांबावर चढून तो हंडा खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात. पांडुगाएरूवाक्का या दोन कृषिसणांच्या दिवशी शेतकरी नृत्यगान करतात. अजूनही झाडांच्या ढोलीत व गुहांमधून राहणाऱ्या वन्य जमाती रात्री पुष्कळ वेळ जागून नृत्य करतात. संक्रांतीला आबालवृद्ध सर्वजण पतंग उडवितात. सणासुदीला उत्तमोत्तम मुग्गु रांगोळ्या काढतात. पुरुषांचा आधुनिक पोषाख लुंगी, उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा साधारणतः साडी व चोळी असा असतो. मलमलीच्या व रेशमी पोषाखाकडे स्त्रियांचा अधिक कल दिसतो. 

महाम्बरे, गंगाधर 

महत्त्वाची स्थळे: रामायण-महाभारतातील घटनांशी निगडित अशी अनेक ठिकाणे आंध्र प्रदेशात दाखवितात. बौद्ध व जैन धर्मांची एके काळी येथे भरभराट होती. छोटी-मोठी अनेक राज्ये या प्रदेशात होऊन गेली. स्वातंत्र्यानंतर अनेक योजना कार्यवाहीत आल्या, त्यामुळे ती ठिकाणेही आधुनिक तीर्थस्थळे बनली आहेत. हैदराबाद सांस्कृतिक दृष्ट्याही राजधानी शोभते. नागार्जुनकोंडा, नागार्जुनसागर व अमरावती ही जुन्यानव्यांची मिश्रणे होत. हैदराबादजवळील गोवळकोंडा किल्ला, गुंतूर जिल्ह्यातील एट्टिपोतला धबधबा, गुंतूर-विजयवाडा मार्गावरील मंगलगिरी येथील गोपुर, चेझर्ली (गुंतूर जिल्हा) येथील कपोतेश्वराचे मंदिर, श्रीकाकुलम् येथील आंध्र विष्णूचे मंदिर, पापिकोंडलूजवळ गोदावरीने निर्मिलेली अजस्र घळ व तेथील रम्य वनश्री, भद्राचलमचे रामाचे मंदिर, तिरुपती येथील प्रसिद्ध वेंकटेश्वराचे देवस्थान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्रीशैलम् येथील मल्लिकार्जुनाचे स्थान, हनमकोंडा येथील सहस्रखांबी मंदिर व शिल्पकाम, कोंडापूर येथील बौद्ध लेणी, चिंतापल्लीजवळील वन्य प्राण्यांचे जंगल ही आंध्र प्रदेशातील काही प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. यांशिवाय नागार्जुन, मच्छकुंड, तुंगभद्रा आदी प्रकल्प, राज्यातील अनेक तलाव, तशीच हैदराबाद, विशाखापटनम्, विजयवाडा, गुंतूर, वरंगळ, राजमहेंद्री, एलुरू, नेल्लोर, कुर्नूल, बंदर इ. शहरे आंध्र प्रदेशाचे वैभव दाखवितात.

टिकेकर, श्री. रा. 

संदर्भ : Subbarayan, B. Ed. Andhra Pradesh Almanac1968, Madras, 1967.