आंत्रशोथ: संसर्गजनक जंतू, विषाणू (अतिसूक्ष्म जंतू, व्हायरस) किंवा कृमी यांच्यामुळे तसेच रासायनिक व इतर अपायकारक पदार्थांमुळे आंत्राच्या (आतड्याच्या) अंतःस्तराला (आतल्या बाजूच्या थराला) येणाऱ्या सुजेला आंत्रशोथ म्हणतात.

 मनुष्यांत आणि पाळीव जनावरांत आंत्रशोथ आढळतो. मानवात त्याचे विविध प्रकार कल्पिले आहेत. त्यांचे वर्णन बृहदांत्रशोथ, अतिसार आणि आमांश या शीर्षकांखाली केलेले आहे. 

आंत्रशोथ सर्व पाळीव जनावरांत आढळतो. विशेषतः रवंथ करणाऱ्या जनावरांच्या लघ्वांत्रात (लहान आतड्यात) ही सूज आढळते. रवंथ करणाऱ्या जनावरांची प्रतिकारशक्ती इतर जनावरांच्या मानाने अधिक असते तर मांजर, कुत्रा ही जनावरे खाद्यपदार्थांतील बदलामुळे होणाऱ्या आंत्रशोथाला अधिक संवेदनाक्षम (बळी पडणारी) असतात. 

लक्षणे: जनावराचे वय, प्रकृतिमान, जात इत्यादींवर रोगाची सुरुवात अवलंबून असते. मंद हालचाल कमी खाणे किंवा मुळीच न खाणे हिरव्या, काळ्या रंगाचा रक्तमिश्रित व दुर्गंधियुक्त मल शरीरास ताठरपणा वगैरे लक्षणे दिसून येतात. रोगाचे प्रमाण गंभीर असेल तेव्हा रोग्याला सुरुवातीला पुष्कळ वेदना होतात, तसेच शरीरास ताठरपणा येऊन रोगी अशक्त होतो. हा प्रकार विषबाधा व विशिष्ट संसर्गजन्य जंतूंमुळे होतो. जनावर कुशीवर पडलेले व अशक्त अवस्थेत आढळते. गाई, बैल, म्हशी यांच्या खाण्यापिण्यावर परिणाम झालेला आढळून येत नाही. वेदना-प्रमाण जास्तच असल्यास जनावरे किंवा इतर हालचाल करण्यास नाखूष दिसतात. घोड्यांमध्ये लाथा झाडणे, एकसारखे ऊठबस करणे वगैरेंमुळे पोटात वेदना होत असल्याचे समजते. रोग गंभीर प्रकारचा असला म्हणजे डोळे लाल व आत ओढलेले दिसतात व त्यांतून एक प्रकारचा चिकट पूही येतो. 

रोगामुळे काही थोड्या जनावरांना ताप येण्याचाही संभव असतो. रक्तपरिवहन अकार्यक्षम झाल्यामुळे नाडी जलद चालते पण ताप कमी होतो. घोडी, खेचरे वगैरे जनावरांत नाडीची गती बैल वगैरे जनावरांपेक्षा जास्त असते. गंभीर स्वरूपाच्या रोगात श्वासोच्छ्‌वास मंद होत जातो. एक-दोन दिवसांच्या आजाराने जनावराच्या पाठीवर कटिभागाकडे दोन्ही बाजूंस खळगे दिसतात व पोटाचे स्नायू ताठरलेले होतात. काही जनावरांच्या पोटात गुरगुरते. 

रोगनिदान: मलाची परीक्षा केल्याने रोगाची कारणमीमांसा व प्रकार कळतो. संसर्गजन्य जंतूंमुळे रोग झाला असेल तर मल रक्तमिश्रित व पातळ आढळतो. बुळकांडी झालेल्या रोगात मल विशिष्ट प्रकारचा असतो. कुत्र्यामध्ये कृमींची बाधा असेल, तेव्हा मल पातळ व करड्या रंगाचा असतो. वासरात पातळ, मध्यम करडा किंवा पिवळा, दुर्गंधियुक्त, चिकट व वायूचे बुडबुडे असलेला असा मल असतो. घोड्यात तपकिरी रंगाचा, पातळ व मध्यम, वारंवार तसेच आपोआप होत असलेला मल आढळतो. 

सर्वसाधारण लक्षणांबरोबरच विशिष्ट कारणांमुळे झालेल्या रोगाची विशेष लक्षणेही असतात. संसर्गजन्य जंतूंचा प्रादुर्भाव असला तर बहुधा तापाचे प्रमाण जास्तच असते व तो बराच काळपर्यंत टिकतो. रोगाची सुरुवात अचानक ताप चढूनच होते. नाडी अनियमित लागते व मल पातळ व काही वेळा रक्तमिश्रित असतो. विषबाधेमुळे रोग झालेला असल्यास पुष्कळ वेदना होतात व शरीर ताठरते. अशक्तपणा येण्याची शक्यता संभवते. 

रोगाची कालमर्यादा अनिश्चित असून ती त्याच्या स्वरूपावर व कारणावर अवलंबून असते. रोग्याचे भवितव्यही या दोन्हींवरच अवलंबून असते. खाद्यपदार्थात बदल झाल्यामुळे रोग झाल्यास खाण्याच्या पदार्थांत योग्य सुधारणा करून रोगी लौकर बरा होतो याउलट रासायनिक किंवा जंतूंच्या प्रादुर्भावामुळे रोग झाला असल्यास रोगी लौकर बरा न होता दगावण्याची शक्यता असते.

सर्वसाधारण लक्षणे, मलाचा प्रकार व त्याची योग्य प्रकारे झालेली परीक्षा, तसेच जनावराची विशिष्ट जात म्हणजे गाय, म्हैस, घोडा, लहान वा मोठे जनावर या गोष्टींवरून रोगनिदान निश्चित होते.

चिकित्सा: लक्षणांचा काळजीपूर्वक अभ्यास करून मूळ कारण नष्ट करणे हेच चिकित्सा करताना मुख्य उद्दिष्ट असते. दाहक स्वरूपाच्या खाद्य पदार्थांमुळे झालेल्या रोगात आतड्यातील अपायकारक पदार्थ सौम्य रेचक देऊन बाहेर काढतात. त्याबरोबरच वायुहारक औषधे पोटात देऊन वायू होणार नाही अशी खबरदारी घेतात. बिस्मथ कार्बोनेट किंवा सबनायट्रेट, टॅनिक अम्ल वगैरे औषध देऊन आतड्याच्या अंतस्त्वचेचे अपायकारक पदार्थांपासून रक्षण करतात. विषबाधा होऊ नये म्हणून परस्परमारक ठरतील अशी प्रतिविषे (विषावरील उतारा ठरणारी औषधे) देतात.

वारंवार पातळ जुलाब झाल्यामुळे जनावर अशक्त होते तेव्हा जवसाचे पाणी, द्राक्षशर्करा (ग्लुकोज) वगैरे देतात. तसेच द्राक्षशर्करा व लवण यांचा द्राव (ग्लुकोज-सलाइन) नीलेत टोचतात. शक्तिवर्धक औषधे देऊन रोग्याची शक्ती टिकवून धरतात. इतर सर्व लक्षणांबरोबरच ताप असला, तर तो कमी होण्यासाठी औषधे देतात. संसर्गजन्य जंतूंचा प्रसार थांबविण्याकरिता विशिष्ट व योग्य औषधोपचार करतात. वारंवार होणारे पातळ जुलाब आटोक्यात आणण्याकरिता स्तंभक (जुलाब आळवणारी) औषधे देतात. मलपरीक्षेत कृमींचा प्रादुर्भाव आढळल्यास विशिष्ट कृमिनाशक औषधे देतात.

मांजराचा आंत्रशोथ: ह्याला कॅट प्लेग किंवा फेलाइन एंट्रायटिस म्हणतात. रोग विशिष्ट विषाणूमुळे होत असून मुख्य लक्षण म्हणजे रोगबाधा अतिसत्वर होऊन ताबडतोब मृत्यू ओढवणे हे होय. विशेषकरून ३ – ४ महिन्यांच्या पिल्लांत रोगप्रादुर्भाव जास्त आढळतो, तर मोठ्या मांजरांत रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आढळून येते. रोगनिदान करताना मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा असे सुरुवातीला वाटते कारण मांजर तडकाफडकी मेलेले आढळते. पण रोग अतिशय संसर्गजन्य असल्यामुळे आजूबाजूची इतर मांजरे पण आजारलेली किंवा मेलेली आढळतात. रोगी मांजराच्या रक्तरसाने (सर्व रक्ताची गुठळी झाल्यावर राहिलेल्या व न गोठणाऱ्या पिवळसर पेशीविरहित द्रवाने) निरोगी मांजरास टोचल्याने त्याला रोग होतो. निरोगी मांजरांना रोगबाधा झालेल्यांच्या सान्निध्यात मुद्दाम ठेवले, तर त्यांनाही रोग होतो व त्यावरून रोगनिदान करणे सोपे होते.

विशिष्ट विषाणूमुळे रोगप्रादुर्भाव होत असल्यामुळे प्रत्यक्ष उपचारांपेक्षा प्रतिबंधक उपाय अधिक फायदेशीर ठरतात.

डुकरांच्या पिल्लांचा आंत्रशोथ: आतड्याच्या अंतःस्तरावरील पेशी मृत होतात. रबराच्या नळीसारख्या जाड व कठीण बनलेल्या लघ्वांत्राच्या शोथामुळे २ ते ४ महिन्यांच्या डुकरांच्या पिल्लांमध्ये मृत्यू ओढवतो. रोगप्रकार आनुवंशिक असावा असे समजतात व प्रसंगी एका विणीची सर्व पिल्ले रोगामुळे मृत्यू पावतात.

लक्षणे : त्वचेचा निळसर रंग, तहान अतिशय लागणे, शेवटी शक्तिपात होऊन मरून पडणे अशी लक्षणे आढळतात. आतड्यातील छिद्रयुक्त व्रण व पर्यदरशोथ (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पडद्याची दाहयुक्त सूज) यांमुळे मृत्यू ओढवतो. संसर्गजन्य रक्तस्रावी आंत्रशोथात दूध पिणे बंद होत नाही. वयाने मोठी पिल्ले आजारी होतात तेव्हा हगवण हे मुख्य लक्षण असते.

कापडी, चं. रा.