आचार्य: हिंदू, बौद्ध, आणि जैन ह्या धर्मातील ह्या धर्मांतील एक धार्मिक  पदनिदर्शक संज्ञा. या तिन्हीही धर्मांत आचार्यपदाच्या कल्पनेस मान्यता असली, तरी तीत थोडाफार फरकही आढळतो.

हिंदू : उपनयन करून मुलास ब्रह्मचर्याची  दीक्षा देणारा व साङ्गआणि सार्थ वेदांचे अध्यापन करणारा गुरू म्हणजे आचार्य होय. ब्रम्हचार्यश्रमाची दीक्षा ज्याला मिळते,  त्याला त्या दीक्षेने दुसरा जन्म प्राप्त होतो असे मानले जाते. हा जन्म आचार्यांच्या पोटी होतो, असे अथर्ववेदात (११·५·३) म्हटले आहे. वेदाध्ययनार्थ गुरुकुलवास सांगितला आहे. गुरुकुलालाच ‘आचार्यकुल’ असे छांदोग्य उपनिषदाच्या  अखेरच्या खंडात म्हटले आहे.

आचार्यावाचून  विद्येला अधिष्ठान प्राप्त होत नाही, असा उपनिषदातील अध्यात्मविद्येचा  सिद्धांत आहे. वेदोत्तरकाळी  झालेले व्याकरणापदी ग्रंथ, गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे, श्रौतसूत्रे, स्मृती, पुराणे, दर्शनसूत्रे, भाष्ये व महत्त्वाचे मौलिक किंवा विवरणात्मक शास्त्रग्रंथ  यांच्या प्रणेत्यांना ‘आचार्य’ अशी संज्ञा  लावण्याची  प्रथा आहे. बौधयान, ⇨ आपस्तंब, ⇨ वसिष्ठ, ⇨ गौतम, ⇨ पाणिनी, बादरायण, ⇨ वात्स्थायन, ⇨ शंकर,  ⇨ रामानुज,  ⇨ मध्व, ⇨ वल्लभ  इत्यादींकाना ‘आचार्य’ हे अभिधान आहे.

शंकर, रामानुज, वल्लभ, मध्व  इ. आचार्यांचे मठ आहेत. या मठातील पीठांवर ज्या व्यक्तीला अभिषेक होतो, त्या पीठाधिष्ठाताला ‘आचार्य’ ही संज्ञा विशेषेकरून लागते. उपाध्याय ही पदवी आचार्य पदवीपेक्षा मनुस्मृतीत दुय्यम मानली आहे. कारण उपाध्याय  हा कमी विद्वान व शिकविण्याकरिता वेतन घेणार गृहीत धरला आहे.  शास्त्र संपूर्ण शिकलेला व त्याप्रमाणे  आचरण करून शिकविणारा  म्हणजेच आचार्य, असेही एक प्रसिद्ध श्लोकात म्हटले आहे.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

बौद्ध : मूळ त्रिपिटकग्रंथांत  विविध प्रसंगांच्या अनुरोधाने  भगवान बुद्धाचे  व त्याच्या  पट्टशिष्यांचे  विविध विषयांवरील  विचार संकलित  केलेले आहेत. मूळ धर्मग्रंथात  आलेल्या सर्व  वचनांचा साकल्याने विचार करून, त्यांत अंतर्गत विरोध असल्यास त्याचा समन्वय व निर्णय करून, एक पद्धतशीर विचारप्रणाली बनविणे, हे बौद्ध आचार्यांचे महत्त्वपूर्ण कार्य असून  ते त्यांनी पूर्वपार पार पाडल्याचे आढळून येते. बौद्ध धर्मात निर्माण झालेल्या निरनिराळ्या पंथोपपंथाची तात्त्विक व नैतिक बैठक घडवून, त्या त्या पंथोपपंथांच्या विचारप्रणालीचे समर्थन करण्याचे कार्य, विविध कालखंडांत बौद्ध आचार्यांनी केलेले आहे.

बौद्ध धर्मातील हीनयान व महायान ह्या दोन प्रमुख  संप्रदायांची  आणि त्यांतील विविध ‘निकायां’ची  म्हणजे पंथोपपंथांची, आचारविचारात्मक बाजू पद्धतशीरपणे  मांडून, तिचा पुरस्कार बौद्ध  आचार्यांनी  आपल्या प्रमाणभूत ग्रंथांतून केला आहे. अशा ग्रंथामध्ये विसुद्धिमग्ग, अभिधम्मत्थ-संग्रह, अभिधर्म –कोशकारिका, अभिधर्म-कोश-भाष्य, मूलमध्यमकारिका, अकुतोभया, प्रसन्नपदा, योगाचारभूमिशास्त्र, श्रावकभूमि, बोधिसत्त्वभूमि, विंशतिका तत्त्वसंग्रह इ. ग्रंथांचा अंतर्भाव होतो. असे प्रसिद्ध बौध्द आचार्य म्हणजे ⇨ बुद्धघोष, अनुरूद्धाचार्य, ⇨ वसूबंधू, यशोमित्र, नागार्जुन, चंद्रकीर्ती, आर्यदेव बुद्धपालित, भावविवेक, शांतिदेव, शांतरक्षित, कमलशील, ⇨ असंग, स्थिरमती, गुणमती ⇨ दिङ्नाग, ⇨ धम्मपाल (धर्मपाल) ⇨ धर्मकीर्ती प्रभृती होत [→ बौद्ध साहित्य ].

बापट, पु. वि.

जैन : जैन धर्माचे अनुयायी  श्रावक, श्राविका, साधू व साध्वी अशा चार संघांत विभागलेले आहेत. पहिले दोन संघ गृहस्थधर्म, तर दुसरे दोन मुनिधर्म आचरतात. साधू-सांध्वी-संघांना स्वतंत्रपणे  विहार करण्यास धर्माची अनुमती नाही त्यांना संघसंस्थेतच राहावे लागते. साधूंचा संघ एका आचार्याच्या देखरेखीखाली शिष्यसंघ म्हणून राहतो. साध्वी-संघ-प्रमुखास ‘गणिणी’  किंवा  ‘प्रवर्तिनी’ म्हणतात. वयाने, विद्वत्तेने व आचरणाने श्रेष्ठ असणाऱ्यासच  आचार्यपद मिळते. तथापि प्रखर बुद्धिमत्ता, प्रवचनपटुता, वादकौशल्य, चारित्र्यसंपन्नता  यांमुळे कमी वयातही  त्याची आचार्य म्हणून  निवड होऊ शकते.

जैन धर्मातील ⇨ दिगंबर व ⇨ श्वेतांबर पंथांत अनेक विद्वान व प्रसिद्ध आचार्य होऊन गेले. सुरुवातीच्या काही आचार्यांना  या दोन्हीही  पंथांत मान्यता होती . जैन  आचार्यांनी  धर्मशास्त्र , न्यायशास्त्र  इत्यादीबाबतची आपली मते विविध ग्रंथांतून मांडलेली आहेत. बारा अंग-ग्रंथ, प्रवचनसारपंचास्तिकाय, तत्त्वार्थ अथवा तत्वार्थसूत्र, आप्तमीमांसा,  युक्त्यशासनरत्‍नकरंडक श्रावकाचारस्वयंभूस्तोत्रसन्मतितर्क, अष्टशती, प्रमाणसंग्रह, तत्त्वार्थराजवार्तिक, अष्टसहस्रीप्रमाणपरीक्षा, पार्श्वाभ्युदयआदिपुराण हे  त्यांपैकी  काही प्रसिद्ध ग्रंथ होत. अशा आचार्यांमध्ये इंद्रभूती गौतम, भद्रबाहू, ⇨ कुंदकुंदाचार्य, ⇨ उमास्वाती (उमास्वामी), ⇨ समंतभद्र, सिद्वसेन दिवाकर, ⇨ अकलंकदेव, विद्यानंदी, ⇨ जिनसेनाचार्य, निर्युक्तिकार भद्रबाहू, स्थूलभद्र, शीलांक ⇨ अभयदेवसूरी, ⇨ हेमचंद्र प्रभृतींचा समावेश होतो. [→ जैन साहित्य].

पाटील, भ. दे.