अहमदशाह दुर्रानी : (? १७२२ ?—१७ ऑक्टोबर १७७२). अफगाणिस्तानचा १७४७ ते ७२ या काळातील राज्यकर्ता. त्या प्रांतात राजा बनणारा हा पहिलाच अफगाण. इराणच्या नादिरशाहच्या मृत्यूमुळे त्याच्या अंमलाखाली असलेल्या अफगाणिस्तानात अंदाधुंदी निर्माण झाली. तिचा फायदा घेऊन तेथील अब्दाली टोळ्यांनी आपल्या हातात सत्ता घेतली व अहमदशाहला राजा म्हणून निवडले. अहमदशाहने दुर्र- -इ-ईरान हा आपला किताब जाहीर केल्यापासून अब्दाली टोळ्या ‘दुर्रानी’ नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. अब्दालीने कंदाहार, काबूल, पेशावर इ. जिंकून अफगाणिस्तानात सत्ता प्रास्थापित केली. हिंदुस्थानावर त्याने १७४८ पासून १७६७ पर्यंत एकूण आठ स्वाऱ्या केल्या. यांतील तिसऱ्या स्वारीत त्याने दिल्ली, मथुरा, वृंदावन इ. शहरे लुटून क्रूर कत्तली केल्या. तेव्हा मराठ्यांनी १७५८-५९ मध्ये पेशावरपर्यंत जाऊन तेथून अफगाणांना घालवून दिले. १७५९ मध्ये अब्दालीने पुन्हा पंजाब हस्तगत केला. त्यानंतर सदाशिवराव- भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे व अब्दाली यांच्यात १७६१ मध्ये झालेल्या ⇨पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. या स्वारीनंतर अब्दालीला परत जावे लागले, कारण अफगाण सैनिकांनी त्यांना झालेल्या पटकी रोगाच्या अनुभवावरून लढण्यास नकार दिला होता. अहमदशाहच्या स्वाऱ्यांमुळे मराठ्यांच्या वाढत्या सत्तेला खीळ बसली आणि मोगल सत्तेचा अधिक ऱ्हास झाला. याशिवाय इंग्रजांना राज्यविस्तार करण्याचा मार्ग सुलभ झाला आणि शिखांना स्वतंत्र राज्य स्थापन करण्यास संधी मिळाली. अहमदशाहने आपल्या राज्याचा विस्तार उत्तरेस अमुदर्या, पश्चिमेस इराण आणि पूर्वेस सिंधू नदीपर्यंत केला होता. कर्क रोगाने तो मरण पावला.
संदर्भ : Singh, Ganda, Ahmad Shah Durrani, Bombay, 1959.
गोखले, कमल