अस्वल : हा प्राणी अर्सिडी कुलातील असून या कुलात सात वंश आणि सु. नऊ जाती आहेत. आशिया, यूरोप आणि अमेरिकेत अस्वले आढळतात पण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात ती आढळत नाहीत. अस्वल भारतात सर्वत्र आढळते. ते दाट जंगलात राहणारे असल्यामुळे वाळवंटात आढळत नाही.
भारतीय अस्वलाचे शास्त्रीय नाव मेलर्सस अर्सिनस आहे. डोक्यासकट शरीराची लांबी १·४–१·८ मी., शेपूट १०–१२ सेंमी., खांद्यापाशी उंची ६०–९० सेंमी., वजन सामान्यतः ९०–११५ किग्रॅ., नर मादीपेक्षा मोठा असतो. मुस्कट लांब व पांढरे, खालचा ओठ लांब, पुढे आलेला, नाकपुड्या वाटेल तेव्हा बंद करता येतात वरच्या कृंतक दातांपैकी (पुढच्या दातांपैकी) आतली जोडी नसते, मागचे पाय आखूड, बोटांवर पांढऱ्या रंगाचे नखर (नख्या) असून पुढच्या पावलांवर ते लांब असतात. अंगावर लांब दाट काळे केस असतात. या काळ्या रंगात पुष्कळदा तपकिरी छटा असते. छातीवर U किंवा Y च्या आकृतीचा पांढरा, पिवळसर किंवा तांबूस तपकिरी पट्टा असतो. अस्वल ओबडधोबड दिसते.
जंगलातील कोणतीही निवार्याची जागा अस्वलाला राहायला चालते. ते निशाचर आहे. भक्ष्य मिळविण्याकरिता ते संध्याकाळी बाहेर पडते व पहाटे निवासस्थानी परतते. फळे, फुले, कीटक, मध आणि कधीकधी कुजके मांस हे भारतीय अस्वलाचे खाद्य होय. झाडावर चढून मधाने भरलेले पोळे ते खाली पाडते व मध खाते. वाळवीची वारुळे फोडून त्यातली वाळवी ते खाते. त्याचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. अस्वल झोपेत मोठ्याने घोरते.
समागमाचा काळा उन्हाळा असतो. सात-आठ महिन्यांच्या गर्भावधीनंतर डिसेंबर-जानेवारीत मादीला १-२ पिल्ले होतात. दोनतीन महिन्यांची झाल्यावर आईच्या पाठीवर बसून ती बाहेर जाऊ लागतात. तीन वर्षांपर्यत आईबरोबरच असतात. या अस्वलांत नर-मादी एकनिष्ठ आढळतात. नर व मादी दोघेही पिल्लांना जपतात. प्राणिसंग्रहालयातील व पाळलेले अस्वल ४० वर्षे जगते.
उत्तर ध्रुवीय अस्वल देखणे असते. याचे शास्त्रीय नाव थॅलॅर्क्टास मॅरिटायमस असे आहे. सर्व जातींच्या अस्वलांपेक्षा हे फार मोठे असून रंग पांढरा स्वच्छ असतो. याच्या अंगावर लांब दाट केस असतात. पावलांच्या तळव्यावरदेखील दाट केस असल्यामुळे बर्फावर चालताना याला त्रास होत नाही. मादीपेक्षा नर मोठा असतो. उत्तर ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशात वनस्पतिजन्य पदार्थ खायला मिळत नसल्यामुळे हे मांसाहारी बनलेले आहे. सील आणि वॉलरस यांची पिल्ले याचे मुख्य भक्ष्य होय पण कॅरिबू, खोकड, पक्षी आणि मिळतील ते इतर प्राणीही ते खाते. हे सहसा माणसाच्या वाटेस जात नाही. हे पोहू शकते. एस्किमो यांची शिकार करतात. याच्या शरीराच्या प्रत्येक भागाचा ते काही ना काही उपयोग करतात.
दक्षिण अमेरिकेतील चष्मेवाले अस्वल (याच्या डोळ्याभोवती पांढरे वलय असते), हिमालयी काळे अस्वल, अलास्कातील तपकिरी अस्वल, उत्तर अमेरिकेतील काळे अस्वल, उत्तर ध्रुवीय पांढरे अस्वल आणि मलायातील छोटे अस्वल या अस्वलांच्या काही प्रसिद्ध जाती आहेत.
कुलकर्णी, स. वि.