अस्तित्ववाद : आधुनिक तत्त्वज्ञानातील एक प्रमुख व प्रभावी विचारसरणी किंवा दृष्टिकोन. ज्याला अस्तित्ववाद म्हणून ओळखण्यात येते, त्या तात्त्विक मताची किंवा दृष्टिकोनाची सुरुवात किर्केगॉर ह्या डॅनिश तत्त्ववेत्त्याच्या विचारापासून झाली, असे जरी सर्वसाधारणपणे मानण्यात येत असले, तरी ह्या दृष्टिकोनाला एक प्राचीन पूर्वपीठिका आहे. उदा., नीत्‌शे, पास्काल, सेंट ऑगस्टीन, सॉक्रेटीस ह्या पूर्वसूरींच्या तत्त्वज्ञानात हा दृष्टिकोन प्रतिबिंबित झाला आहे, असे अनेकदा म्हणण्यात येते आणि ते सार्थही आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात अस्तित्ववादाचा व्यापक आणि खोल असा परिणाम तर झाला आहेच पण नीतिशास्त्र, साहित्य आणि राजकारण यांच्यावरही अस्तित्ववादाचा फार मोठा प्रभाव पडला आहे. मानवी परिस्थिती आणि जीवन यांच्याकडे पाहण्याची एक विवक्षित दृष्टी आणि तिला अनुरूप अशी जगण्याची एक शैली अस्तित्ववादाशी निगडित आहे. त्यामुळे मानसशास्त्रातही अस्तित्ववादी मानसशास्त्र अशी एक विचारसरणी विकसित झाली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या कालखंडात अस्तित्ववादाचा जो विकास झाला आणि जनमानसावर त्याचा जो प्रभाव पडला, त्याला सार्त्र ह्या फ्रेंच तत्त्ववेत्त्याचे कर्तृत्व बरेचसे कारणीभूत आहे. पण केवळ तत्त्वज्ञानापुरते पाहिले, तर अस्तित्ववादाला परिणत स्वरूप देण्यात यास्पर्स आणि हायडेगर ह्या जर्मन तत्त्ववेत्त्यांची कामगिरी मूलभूत महत्त्वाची आहे. अस्तित्ववादी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या सर्व तत्त्ववेत्त्यांनी, काही समान तात्त्विक सिद्धांत स्वीकारले आहेत. हे सिद्धांत म्हणजे अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाचा गाभा होय आणि या गाभ्याला भिन्न अस्तित्ववादी तत्त्ववेत्त्यांनी भिन्न दिशांनी मुरड घातली आहे किंवा त्याचा भिन्न दिशांनी विकास केला आहे, अशी परिस्थिती नाही. काही समान बौद्धिक सिद्धांतांवर सर्व भिन्न भिन्न अस्तित्ववादी मतांची किंवा दर्शनांची उभारणी झाली आहे, असे नाही. माणसाच्या परिस्थितीविषयी, मानवी अस्तित्वाच्या स्वरूपाविषयी आणि माणसाने कसे जगावे ह्यांविषयी काही मूलभूत प्रश्न अस्तित्ववादी तत्त्ववेत्ते उपस्थित करतात अतिशय उत्कट जिव्हाळ्याने उपस्थित करतात. निसर्गविज्ञानात विश्वाविषयीचे आणि माणसाविषयीचे ज्ञान सामावले असते, ते गृहीत धरून त्याच्या संदर्भात विद्यापीठीय तत्त्वज्ञान जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करते आणि तटस्थपणे, तर्कशास्त्राच्या साहाय्याने त्यांची उत्तरे शोधते, त्या प्रश्नांहून अस्तित्ववादी उपस्थित करीत असलेले प्रश्न अगदी वेगळे असतात. ह्या प्रश्नांच्या वेगळेपणात आणि ज्या विलक्षण आस्थेने हे प्रश्न विचारण्यात येतात, तिच्यात अस्तित्ववादाचे वेगळेपण सामावलेले आहे ह्या प्रश्नांना दिलेल्या समान उत्तरात नव्हे. किर्केगॉर, यास्पर्स, हायडेगर आणि सार्त्र हे प्रमुख अस्तित्ववादी तत्त्ववेत्ते होते. इतर अस्तित्ववादी तत्त्ववेत्त्यांच्या विचारांचे आकलन ह्या तत्त्ववेत्त्यांच्या मतांच्या संदर्भात होऊ शकते. म्हणून ह्या चार तत्त्ववेत्त्यांच्या भूमिकांचा आढावा येथे प्रामुख्याने घेण्यात आला आहे.

सरेन किर्केगॉर : किर्केगॉरची भूमिका समजून घ्यायला हेगेलच्या तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर तिच्याकडे पाहणे इष्ट ठरेल. हेगेलच्या म्हणण्याप्रमाणे विश्व म्हणजे बुद्धिप्रणीत तत्त्वांचा मूर्त आविष्कार आहे, विश्वामध्ये बौद्धिक तत्त्वे मूर्त झालेली असतात. बुद्धी हेच माणसाचेही स्वरूप आहे. म्हणून माणसाला विश्वात स्वत:ची ओळख पटते, विश्वाचे त्याला ज्ञान होऊ शकते, असे ज्ञान होण्यात माणसाचे सार असलेली बुद्धी आणि विश्वाचे सार असलेले बुद्धितत्त्व ह्यांची एकात्मता उघड होते. त्याचप्रमाणे माणसाला स्वत:च्या आणि विश्वाच्या प्रकृतीला अनुरूप अशा जीवनमार्गाची कल्पना करता येते आणि त्या मार्गाने जगून साफल्य प्राप्त करून घेता येते. पण हेगेलच्या म्हणण्याप्रमाणे हे तात्काळ, सहज घडून येत नसते ते द्वंद्वात्मक पद्धतीने घडून येते. सुरुवातीला अस्तित्वासंबंधीचे सत्य माणसाला परके, बाह्य, आगंतुक, केवळ बाहेरून स्वत:वर लादलेले आहे, असे भासते. ते समजून घेण्यात माणसाचे स्वत:चे परिवर्तन घडते, बुद्धी हे स्वत:चे स्वरूप आहे ही ओळख त्याला पटते आणि हे स्वरूपही त्याला यथार्थतेने प्राप्त होते. त्याचप्रमाणे विश्वाचे स्वरूपही बुद्धिप्रणीत आहे ही ओळख त्याला होते [ →  हेगेल, जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख]. ह्या साऱ्याच बुद्धिवादी आणि आशावादी भूमिकेविरुद्ध किर्केगॉरने बंड केले आहे. त्याचे म्हणणे असे, की माणूस हा काही विश्वाचे स्वरूप तटस्थतेने समजून घेणारा द्रष्टा नाही. मूलत: तो कर्ता आहे व आपण काय करावे, कसे जगावे, हे त्याला स्वत: निर्णय घेऊन ठरवावे लागते. अस्तित्वाचे स्वरूप बुद्धिप्रणीत नाही अस्तित्वात बुद्धिप्रणीत तत्त्वे मूर्त झाली आहेत असे नाही व म्हणून ते निरर्थक आहे. ह्यामुळे विश्वाला साजेसा जीवनमार्ग आहे आणि तसे जगणे म्हणजे चांगल्या रीतीने जगणे असे काही नाही. असा वस्तुनिष्ठ दृष्ट्या योग्य असा जीवनमार्ग नसतो. योग्य जीवनमार्ग स्वत:ला निवडावा लागतो. आणि ही निवड तिच्या पलीकडच्या कोणत्याही वस्तुनिष्ठ निकषांनी योग्य ठरत नाही किंवा पारखता येत नाही. कारण ज्या निकषांनी ती पारखायची, ते निकषही त्या जीवनमार्गाबरोबरच निवडलेले असतात त्या निवडीचे ते भाग असतात. निसर्गविज्ञानात आणि गणितात बुद्धिनिष्ठ तार्किक अनुमानाने आपण वस्तुनिष्ठ सत्य शोधून काढतो, हे किर्केगॉरला अमान्य नाही. पण मानवी अस्तित्वाच्या स्वरूपाविषयी असे काही वस्तुनिष्ठ सत्य, बुद्धिप्रणीत प्रमाण जीवनमार्ग नसतो. एखाद्या विवक्षित जीवनमार्गात जे काही अंतर्हित असेल, अनुस्यूत असेल, ते स्पष्ट करणे त्याचे तपशीलवार, सुसंगत चित्र आपल्यासमोर उभे करणे, एवढेच बुद्धीचे कार्य असते त्याचे समर्थन करणे हे तिचे कार्य नसते. अशा वेगवेगळ्या जीवनमार्गांमधून एकाची निवड आपल्याला करावी लागते व ही निवड निराधार, स्वेच्छेने केलेली असते बुद्धिनिष्ठ निकषांच्या आधारे ती केलेली नसते.

माणसापुढे असे तीन वेगळे जीवनपंथ असतात, असे किर्केगॉर मानतो. ते म्हणजे : सौंदर्यान्वेषी जीवनपंथ नैतिक जीवनपंथ आणि धार्मिक जीवनपंथ. (कधी कधी नैतिक जीवनपंथ आणि धार्मिक जीवनपंथ ह्या दोहोंचाही एकाच जीवनपंथात तो समावेश करतो). सौंदर्यान्वेषी माणूस केवळ अनुभवांचा रस चाखण्यासाठी जगत असतो वाटेल त्या मोहाला दूर सारून प्राप्त कर्तव्य पार पाडले पाहिजे, ह्या निष्ठेला त्याच्या जीवनात स्थान नसते. नैतिक जीवन हे शांत, अविकार्य पण असीम उत्कटतेने समोरचे साधेसुधे कर्तव्य पार पाडण्याच्या निश्चयावर आधारलेले असते. सौंदर्यान्वेषी जीवनात अंतर्भूत असलेल्या निकषांप्रमाणे नैतिक जीवन शुष्क, नीरस ठरेल तर नैतिक जीवनपंथात अंतर्भूत असलेल्या निकषांप्रमाणे सौंदर्यान्वेषी जीवन थिल्लर, बेजबाबदार ठरेल. पण ह्या दोन निकषांतून एकाची निवड करण्यासाठी आपल्याला उच्चतर निकष उपलब्ध नसतात ही निवड आपल्याला स्वेच्छेने करावी लागते. स्वत: किर्केगॉरचा कल नैतिक जीवनाच्या बाजूचा होता, असे त्याच्या लिखाणावरून दिसून येते. किर्केगॉरच्या दृष्टीने खरा मूलभूत विरोध, धार्मिक जीवनपंथ आणि धार्मिक सत्याला वगळणारा जीवनपंथ–ह्याला ऐहिक जीवनपंथ म्हणू या–ह्यांच्यात आहे. अस्तित्वाचे स्वरूप मानवी बुद्धीला अनाकलनीय असल्यामुळे ते मानवी बुद्धीला परके असते. ते बुद्धीला पटणारे नसते ते श्रद्धेने स्वीकारावे लागते, ते जसे असेल तसे स्वीकारण्याचा निर्णय घ्यावा लागतो. बुद्धीच्या निकषांना उतरणारे असे ते नसते व म्हणून निरर्थक असते. आपले नेहमीचे समंजस वर्तनाचे आणि नैतिकतेचे जे निकष असतात, त्यांचा हे निरर्थक सत्य भंग करते. ते स्वीकारले तर आपल्या सार्‍याच मूल्यांची उलटापालट होते व म्हणून त्याच्याशी प्रामाणिक राहण्यात आपल्याला सतत यातना भोगाव्या लागतात. हे सत्य व त्याला अनुरूप अशा वर्तनाचे स्वरूप बाह्य निकषांनी निश्चित होत नसल्यामुळे, धार्मिक जीवनाचे सार त्याच्या आंतरिकतेत असते. विशुद्ध श्रद्धेचा धार्मिक पुरुष बाह्यात्कारी एखाद्या मुनीमासारखा असेल. ही आंतरिकता म्हणजे ईश्वरासमोर माणूस स्वत:शीच जो संबंध जोडतो तो.

सारांश, मानवी अस्तित्वाविषयीचे सत्य वस्तुनिष्ठ नसते ते व्यक्तिनिष्ठ असते. माणसाला स्वत:च्या स्वरूपाचा शोध घ्यायचा नसतो, तर ते घडवायचे असते आणि ते घडविण्याचे त्याला स्वातंत्र्य असते. हे स्वातंत्र्य मानवी जीवनाचे सार आहे. पण माणसाला स्वातंत्र्य आहे, ह्याचा अर्थ मानवी अस्तित्व परिनिष्ठित नाही, त्याच्या गाभ्यात रिक्तता आहे मानवी अस्तित्व म्हणजे एक वास्तव नाही, तर अनेक पर्यायी शक्यतांचा संभार आहे. त्यामुळे विभीषणा (ड्रेड, आँग्स्ट, अँक्झायटी) हा माणसाचा स्थायीभाव आहे. विभीषणा आणि भीती ह्यांच्यात फरक आहे. भीतीला निश्चित विषय असतो विवक्षित घटनेची ती भीती असते. विभीषणेला निश्चित विषय नसतो. मानवी स्वातंत्र्याच्या बुडाशी जी रिक्तता किंवा शून्यता असते, वास्तवाचा अभाव असतो, त्याच्यात ह्या विभीषणेचा उगम असतो आणि सर्व मानवी जीवनाला ती व्यापणारी असते. मानवी परिस्थितीचे हे स्वरूप स्वीकारणे म्हणजे किर्केगॉरच्या मते प्रामाणिकपणे जगणे [ → किर्केगॉर, सरेन]. 

कार्ल यास्पर्स : किर्केगॉरनंतरचा अस्तित्ववादी विचारवंत म्हणजे कार्ल यास्पर्स. याच्या तत्त्वज्ञानावर किर्केगॉरच्या विचारांचा खोल पगडा असला, तरी त्याने ह्या विचारांना स्वत:चे असे एक वेगळे वळणही दिले आहे. किर्केगॉरच्या भूमिकेचे एक वैशिष्ट्य म्हणजे अस्तित्वाचे स्वरूप बुद्धिगम्य, सुव्यवस्थित नसल्याने तत्त्वज्ञान स्वभावत:च खंडित, अपूर्ण असले पाहिजे. त्याला सुव्यवस्थित दर्शनाचे स्वरूप देणे शक्य नाही व इष्टही नाही, हे त्याचे मत होय. उलट, तत्त्वज्ञान अस्तित्वाचे ग्रहण करणारे व म्हणून समावेशक असले पाहिजे, अशी यास्पर्सची भूमिका होती. यास्पर्स मानसोपचारपद्धतीकडून तत्त्वज्ञानाकडे वळला. माणसाचे व्यक्तिमत्त्व कार्यकारणनियमांना अनुसरून घडलेले असते, हे प्रचलित मानसो-पचारपद्धतीमागील गृहीतकृत्य आहे. त्याचप्रमाणे जीवनातील प्रसंगांना देण्यात येणाऱ्या कित्येक प्रतिसादांना विकृत मानण्यात येते, तर कित्येक प्रतिसादांना स्वाभाविक, नॉर्मल मानण्यात येते. ह्या विभागणीमागे विश्र्वाच्या स्वरूपासंबंधीची एक कल्पना वस्तुनिष्ठ, बुद्धिग्राह्य आहे, तर इतर कल्पना म्हणजे विश्वाची विकृत दर्शने आहेत, असे गृहीतकृत्य आहे. पण यास्पर्सला मानसोपचाराच्या प्रत्यक्ष अनुभवास असे आढळून आले, की ह्या गृहीतकृत्यांमध्ये एक मोठी उणीव आहे. माणसाचे जे प्रत्यक्ष घडलेले व्यक्तिमत्त्व असते, ज्याचा उलगडा मानसशास्त्र करू पाहते, त्याच्यामागे एक मूलभूत निवड असते. तो दुसरेही काही बनू शकला असता, पण ती शक्यता सोडून तो प्रत्यक्षात जसा आहे तसे बनण्याची निवड त्याने केलेली असते. आणि ह्या निवडीबरोबरच विश्वाच्या स्वरूपाविषयीची एक कल्पनाही त्याने निवडलेली असते. ती बौद्धिक निकषांचे समाधान करते म्हणून स्वीकारलेली नसते, तर स्वतंत्रपणे निवडून स्वीकारलेली असते. विज्ञानाने आणि प्रचलित तत्त्वज्ञानाने दुर्लक्षित केलेल्या ह्या मूलभूत निवडीच्या महत्त्वावर किर्केगॉरने भर दिला आहे, हे यास्पर्सला आढळले. म्हणून किर्केगॉरचा त्याच्यावर एवढा प्रभाव पडला. माणसाच्या दृश्य, प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्वामागे ही मूलभूत निवड करणारा त्याचा जो खराखुरा स्व आहे त्याचा कित्येक सीमान्त प्रसंगांमध्ये आपल्याला प्रकर्षाने प्रत्यय येतो, असे यास्पर्सचे म्हणणे आहे. मृत्यूची किंवा अपराधीपणाची उत्कट जाणीव, किंवा विभीषणा ह्यांसारखे प्रसंग सीमान्त प्रसंग असतात. कारण आपल्याला खरीखरी निवड करावी लागते, ही जाणीव माणसाला त्यांच्या संदर्भात होते.


केवल अस्तित्व ग्रहण करणे, हे तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट आहे. विज्ञान किंवा बुद्धिनिष्ठ तत्त्वमीमांसा–उदा., चिद्वाद–भ्रामक नसतात, तर अपूर्ण असतात. अस्तित्वाचे जे दर्शन होते, त्याच्या पलीकडचे असे अतिशायी अस्तित्व असते. ह्या अस्तित्वाच्या ज्या खाणाखुणा कुठेकुठे आढळून येतात त्यांचा शोध घेणे आणि त्याच्याविषयी लाभलेल्या सत्यांचे आपल्या अंतरंगात जतन करणे, हे खऱ्याखुऱ्या ‘स्व’चे कार्य आहे [ →  यास्पर्स, कार्ल].

मार्टिन हायडेगर : हायडेगरच्या तत्त्वज्ञानाचा उगम ज्याप्रमाणे किर्केगॉरच्या विचारात सापडतो, त्याचप्रमाणे ⇨बेन्टानो  आणि ⇨हुसर्ल  ह्यांच्या  ⇨ रूपविवेचनवादातही तो सापडतो. रूपविवेचनवादाचे मध्यवर्ती सूत्र हे, की जाणीव कोणत्यातरी विषयाची जाणीव असते जाणिवेचा कोणताही प्रकार सविषय असतो. मी पाहतो तेव्हा काहीतरी पाहत असतो मला भास होतो तो कशाचा तरी भास असतो मला भीती वाटली तर ती कशाची तरी भीती असते. मला ज्याची भीती वाटते, ते खरोखर अस्तित्वात नसेल पण माझी भीती ही त्याची भीती असते. तेव्हा जाणिवेची प्रत्येक कृती सविषय असते मग तिच्या विषयाला जगात अस्तित्व असो वा नसो. ह्या रूपविवेचनवादी भूमिकेतून निष्पन्न होणारा एक प्रश्न असा, की ह्या आंतरिकत: सविषय असलेल्या जाणिवेला तिच्या बाहेर अस्तित्वात असलेल्या जगाचे ज्ञान कसे होते? आता हायडेगर हा प्रश्नच नाकारतो. कारण हा प्रश्न विचारताना जाणीव आणि तिला बाह्य असे जग ह्यांच्यात द्वैत आहे, असे हुसर्लने आणि त्याच्या पूर्वी देकार्तने गृहीत धरलेले आहे आणि हे गृहीतकृत्यच तो नाकारतो. कारण  ‘माझ्या जाणिवेला बाह्य जगाचे ज्ञान होऊ शकेल का?’ हा प्रश्न विचारणारा जो कुणी आहे, त्याला बाह्य जगाचे ज्ञान असल्याशिवाय तो हा प्रश्न विचारूच शकणार नाही. तेव्हा आपल्या जाणिवेच्या अस्तित्वाचे जे प्राथमिक स्वरूप असते, ते म्हणजे जगातले अस्तित्व, तेथे असलेले अस्तित्व, स्थित अस्तित्व (डाझाइन). हे जगातले अस्तित्व कोणत्या प्रकारचे अस्तित्व असते? जगातल्या वस्तूंपर्यंत पोहचण्याची, त्यांचे ग्रहण करण्याची धडपड, हे या अस्तित्वाचे सार असते. ह्या व्यवहारातून आपण आपल्या संकल्पना निर्माण करतो. स्थित अस्तित्वानंतर आपल्याला ज्या वस्तू उपयुक्त असतात, अवजारे किंवा हत्यारे म्हणून आपण ज्यांना वापरू शकतो अशा वस्तूंच्या अस्तित्वाची कल्पना आपण करतो आणि अखेरीस आपल्याला प्रतिकार, अडथळा करणाऱ्या अस्तित्वाची आपण कल्पना करतो. अशा रीतीने वेगवेगळ्या पदार्थप्रकारांच्या कल्पना आपण करतो. आणि अशा रीतीने समग्र विश्वातील पदार्थप्रकारांची व्यवस्था आपण लावतो.

हे अस्तित्व, स्थित अस्तित्व म्हणजे अस्तित्वाविषयीची आस्था (कन्सर्न, लॅटिन—युक्‍रा) असते. आता आपल्या अस्तित्वाला व्यापणारा, त्याला त्याचे स्वरूप देणारा एक विशेष म्हणजे ते सीमित, सान्त असते मृत्यूने ते संपुष्टात येते. दुसरा विशेष असा, की ते क्षणाक्षणांत विखुरलेले असते. पण त्याबरोबरच आपल्यापुढे भविष्यकाल ठाकलेला असतो आणि तो निर्धारित व म्हणून बंदिस्त नसतो तो उघडा, अनावृत असतो. आपल्या अस्तित्वाला आपणच रूप देण्याची शक्यता असते आणि ह्या शक्यतेची, स्वातंत्र्याची जाणीव आपण असे रूप दिले नाही, तर आपले अस्तित्व केवळ शून्य आहे ही जाणीव म्हणजेच विभीषणा. ह्या विभीषणेपासून पळ काढायचा म्हणजे आपले खरेखुरे मीपण सोडून द्यायचे आणि ‘मी’ चे व्यक्तिमत्त्वशून्य अशा ‘आपण’ मध्ये रूपांतर करायचे. ‘ह्या प्रसंगी मी काय करावे?’असा विचार न करता ‘अशा प्रसंगी आपण काय करतो, कसे वागतो’ हा प्रश्न उपस्थित करायचा. आणि अशा रीतीने आपली म्हणून ठरलेल्या कृत्यांची गर्दी स्वत:भोवती उभी करून क्षणाक्षणाला ती पार पाडत राहायचे. विभीषणेला खरेखुरे तोंड द्यायचा मार्ग असा, की आपल्या समग्र अस्तित्वाची जाणीव धरायची. आणि समग्र अस्तित्वाची जाणीव धरायची ह्याचा अर्थ ते मृत्यूने सीमित झाले आहे, आरपार भेदलेले आहे, ही जाणीव बाळगून जगायचे. ह्या जाणिवेत सदसद्‌बुद्धी आणि अपराधित्वाची भावना ह्यांना स्थान असतेच. सदसद्‌बुद्धी म्हणजे मी काय व्हावे ह्याची जाणीव आणि अपराधित्वाची भावना म्हणजे मी अन्य काय होऊ शकलो असतो ह्याची जाणीव. ‘आपण’ म्हणून व्याज रीतीने क्षणाक्षणाला जगत राहावे, की खराखुरा ‘मी’ म्हणून प्रामाणिक अव्याज जीवन जगावे, ह्यांतून मला मूलत: निवड करावी लागते. हायडेगरच्या भूमिकेतून निर्माण होणारा प्रश्न असा, की ह्या प्रामाणिक, अव्याज जीवनाचा आशय काय? ह्या प्रश्नाला हायडेगरकडून उत्तर मिळत नाही [ → हायडेगर, मार्टिन].

झां पॉल सार्त्र : सार्त्रने आपली तत्त्वमीमांसा हायडेगरपासून स्वीकारली आहे. अस्तित्वाचे दोन प्रकार आहेत. एक स्वत: असणे वा स्वरूपसत्ता (बीइंग-इन्-इटसेल्फ). वस्तूंचे अस्तित्व असे असते. वस्तू असतात त्यांना स्वत:चे निश्चित व पूर्ण असे स्वरूप असते. अस्तित्वाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वत:साठी असणे वा आत्मनेसत्ता (बीइंग-फॉर-इटसेल्फ). हे माणसाचे अस्तित्व असते. त्याच्यापुढे उघडा भविष्यकाळ उभा ठाकलेला असतो आणि त्याच्यात आपल्या निवडीने त्याला स्वत:ला अस्तित्व द्यावे लागते. वस्तू केवळ असतात त्या आगंतुक असतात व म्हणून निरर्थक असतात. उलट, माणसे आपल्या अस्तित्वाला अर्थ देऊ शकतात पण असा अर्थ देईपर्यंत अस्तित्व निरर्थक असते. माणूस ह्या निरर्थकतेला विटलेला असतो. ह्याच्यातून सुटका होण्याचा एक मार्ग म्हणजे जणू काय मानवी अस्तित्वाचे स्वत:चे असे सिद्ध स्वरूप आहे, असे समजून त्या स्वरूपाला अनुसरून जगणे. पण ही दांभिकता (बॅड फेथ) आहे. कारण मानवी अस्तित्वाला स्वत:चे असे पूर्वनिश्चित स्वरूप नसते. अस्तित्व प्रथम असते आणि त्याचे स्वरूप आपल्या निवडीप्रमाणे नंतर ठरते.

‘मानवी अस्तित्व प्रथम असते’ ह्याचा अर्थ असा, की माणसाचे शरीर, त्याचे सामाजिक स्थान इत्यादिकांमुळे त्याच्या अस्तित्वाचे स्वरूप निश्चित होत नाही आपल्या स्वतंत्र निवडीने तो आपल्या अस्तित्वाला आशय देऊ शकतो. उलट, आपले निश्चित असे स्वरूप आहे. ते आपल्याला ओळखावे लागते. उदा., आपण शिक्षक आहो, वेटर आहो, असे समजून त्या स्वरूपाला अनुसरून आपली भूमिका पार पाडण्यात दांभिकता आहे, स्वतःची व इतरांची फसवणूक आहे. पण प्रश्न असा आहे, की समाजाच्या संदर्भात आपण कोणतेही जीवन सुसंगतपणे जगत राहिलो, तर आपण आपले काहीएक स्वरूप स्वीकारून त्याला अनुसरून आपली भूमिका पार पाडीत आहो, असे रूप ह्या जीवनाला येणार. म्हणजे सामाजिक संदर्भात सुसंगतपणे जगण्यात दांभिकता अनुस्यूत आहे, अशी परिस्थिती दिसते. ह्या दांभिकतेपासून सुटका कशी करून घेता येईल ?


माणसाचे अस्तित्व स्वत:साठी असते म्हणजे माणूस स्वत:साठी व्यक्ती असतो. पण इतरही माणसाकडे पाहू शकतात व इतरांच्या दृष्टीने माणूस वस्तू असतो. मी इतरांना माझ्या आस्थेचे विषय बनविले, तर मी त्यांना वस्तू बनवितो, त्यांच्यावर मी स्वत:ला लादत असतो. उलट मी जर स्वत:ला इतरांच्या आस्थेचा विषय बनू दिले, तर मी वस्तूचे अस्तित्व स्वत:साठी पतकरत असतो. ह्या दोन दुष्ट पर्यायांतून मार्ग काढायचा, तर नैतिक जीवनाचा स्वीकार करावा लागतो. सार्त्रच्या म्हणण्याप्रमाणे नीतीचे निकष मी स्वत: स्वतंत्रपणे निवडतो हे निकष अस्तित्वात आहेत व केवळ ओळखावे लागतात असे समजणे म्हणजे दाभिकता आहे. पण हे निकष नैतिक निकष म्हणून निवडणे म्हणजे सर्वांना प्रमाण म्हणून घालून देणे, हे जर नैतिक जीवनाचे स्वरूप असेल, तर इतरांनाही असे सर्वांना प्रमाण असे नैतिक निकष स्वीकारण्याचा व घालून देण्याचा अधिकार व म्हणून स्वातंत्र्य आहे, हे मी मान्य केले पाहिजे. तेव्हा सर्वांच्या स्वातंत्र्यचा आदर करणे हे नैतिक जीवनाचे सार आहे. इतरांच्या स्वातंत्र्याची कदर न करता त्यांच्याकडे एका मालिकेतील केवळ एकक (युनिट) म्हणून पाहणे, ही अनीती आहे. समाजाच्या माळेतील एकक म्हणून जर केवळ आपण व्यक्तीकडे पाहिले, तर तिचे स्वरूप व कर्तव्ये निश्चित होतात पण तिच्या स्वातंत्र्याचा लोप होतो. अशा सामाजिक स्थितीतून बाहेर पडायचे, तर समूहातील सर्वांनी स्वतंत्रपणे काही नियम निष्ठेने स्वीकारले पाहिजेत. अशा शिस्तबद्ध एकीतून समूहाचे व त्यातील व्यक्तीचे स्वातंत्र्य मूर्त होते. असा समाज अर्थपूर्ण इतिहास घडवितो. आजच्या भांडवलशाही, बूर्ज्वा समाजात हे स्वातंत्र्य आढळत नाही, माणसांना एकक म्हणून वागविण्यात येते व म्हणून सार्त्र ह्या समाजपद्धतीचा अव्हेर करतो. ह्या बाबतीत मार्क्सवादाशी त्याचे एकमत आहे. पण मार्क्सवादात अंतर्भूत असलेला आर्थिक नियति वाद तो नाकारतो  [ →  सार्त्र, झां पॉल].

अस्तित्ववादी विचारप्रवाहातील दोन उपप्रवाह ⇨आल्बेअर काम्यू आणि गाब्रीएल मार्सेल ह्या नावांशी निगडित आहेत. काम्यूच्या विचाराचे सार असे, की माणसासमोर उभे असलेले हे विश्व त्याला सर्वस्वी परके आहे. हे ईश्वरनिर्मित नाही किंवा त्याच्यात बुद्धिप्रणीत तत्त्वेही मूर्त झालेली नाहीत. ते आंगतुक व म्हणून निरर्थक आहे. आणि स्वत:ची मूल्ये स्वत: निर्माण करणारा, ह्या मूल्यांना विश्वात आधार आहे अशी खोटी आशा न बाळगणारा, पण आधार नाही म्हणून निराशेच्या आहारी न जाणारा माणूसही निरर्थक आहे. माणसाची ही खरीखुरी परिस्थिती ओळखून जगणे म्हणजे अव्याजपणे जगणे. उलट मार्सेल ईश्वरवादी आहे. त्याने सुव्यवस्थित दर्शन रचलेले नाही, कारण अशा दर्शनांच्या तो विरुद्ध आहे. समस्या आणि गूढे ह्यांच्यात त्याने जो भेद केला आहे, तो त्याच्या दृष्टिकोनाला पायाभूत आहे, असे म्हणता येईल. समस्या विज्ञानात किंवा गणितात निर्माण होतात आपण त्यांच्याकडे तटस्थतेने पाहू शकतो आणि वस्तुनिष्ठ रीतीने त्यांचा उलगडा करू शकतो. पण जेव्हा समस्या मानवी अस्तित्वाविषयी असते, तेव्हा ती एक गूढ असते कारण ह्या समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन त्या समस्येचा भाग असतो. तटस्थ दृष्टिकोनातून समस्येचा उलगडा करता येत नाही. पण प्रेम, निष्ठा, श्रद्धा ह्यांचे अधिष्ठान जर विचाराला लाभले, तर तिचा उलगडा करता येतो आणि हे ज्ञान केवळ वैचारिक नसते, आपल्या जीवनाला उजळून टाकणारा तो प्रकाश असतो. मार्सेल ईश्वरवादी असला, तरी तत्त्ववेत्ता आहे. उलट बार्त व बुल्टमान हे अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाचा आधार घेणारे ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ आहेत. बार्तच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वराचे अस्तित्व व स्वरूप ह्यांविषयीचे ज्ञान आपल्याला एका निर्णयानेच स्वीकारावे लागते पण हे जे ज्ञान आपण निर्णयाने स्वीकारतो त्याचा आशय म्हणजे पारंपरिक ख्रिस्ती श्रद्धेचाच आशय. म्हणून बार्त ख्रिश्चन आहे. बुल्टमानच्या म्हणण्याप्रमाणे मानवी जीवनाच्या ज्या मर्यादा आहेत, विशेषत: जीवनाला वेढून आणि आरपार भेदून टाकणारे मृत्यूचे जे वास्तव आहे, त्यांची यथार्थ जाणीव बाळगून अव्याजपणे कसे जगावे, हे ख्रिस्ताच्या उदाहरणात मूर्त झाले आहे. एकदा हे उदाहरण आपल्यासमोर असले की ख्रिस्ताप्रमाणे अव्याजपणे जगावे, की मानवी अस्तित्वाच्या स्वरूपाविषयी स्वत:ची वंचना करीत जगावे, हा निर्णय आपण स्वत: घेऊ शकतो पण ख्रिस्ताच्या उदाहरणावाचून आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा असतो, ह्याची कल्पना आपल्याला आली नसती.

ह्या सूत्रांत मानवी अस्तित्व व परिस्थिती ह्यांच्या काही विशेषांकडे लक्ष वेधले आहे. काही समान सिद्धांत ह्या सूत्रांत मांडले गेले आहेत असे नाही. ह्या विवेचनाच्या पार्श्वभूमीवर अस्तित्ववादाची मध्यवर्ती सूत्रे अशी मांडता येतील : विश्व ही बुद्धिप्रणीत अशी व्यवस्था आहे, तिच्यात सहभागी असल्यामुळे माणसाला स्वत:ची अशी निश्चित प्रकृती लाभते आणि ह्या प्रकृतीला अनुसरून माणसाचा योग्य असा जीवनमार्ग निश्चित होतो, ही विधाने अस्तित्वमार्ग नाकारतो. वस्तू आगंतुक असतात, म्हणून बुद्धीला त्यांचे पूर्ण व यथार्थ आकलन होऊ शकत नाही त्या निरर्थक असतात. प्रत्येक वस्तू विवक्षित असते, सामान्य अशा बौद्धिक संकल्पनांद्वारा जे आकलन होऊ शकते, त्याच्या पलीकडे ती असते ह्यावर अस्तित्ववाद भर देतो. अस्तित्ववादाचे दुसरे सूत्र असे, की मानवी अस्तित्व आणि वस्तूंचे अस्तित्व ही मूलत: वेगळ्या प्रकारची अस्तित्वे आहेत. जाणीव ही स्वभावत:च सविशेष आहे हा, रूपविवेचनावादाचा सिद्धांत स्वीकारून त्याच्या आधारे माणसाची स्वतःविषयीची जाणीव आणि त्याची इतरांविषयीची जाणीव ह्यांच्यातील फरक अस्तित्ववादी स्पष्ट करू पाहतो. माणसाला इतरांची जाणीव होते, तेव्हा ह्या जाणिवेचे विषय असलेल्या व्यक्ती केवळ वस्तू बनतात. ही जाणीव त्यांच्या अस्तित्वाला विकृत रूप देते. उलट स्वत:च्या अस्तित्वाला स्वतंत्रपणे आशय देण्यात व्यक्तीला स्वत:ची जाणीव होते. पण व्यक्ती स्वतंत्र आहे ह्याचा अर्थ असा, की व्यक्तित्वाच्या गाभ्यात शून्यता, रिक्तता आहे. ही माणसाची निरर्थकता. माणसाच्या ‘सत्त्वा’पूर्वी माणसाचे अस्तित्व असते, ह्या सूत्रवाक्याचा आशय हाच आहे. माणसाचे हे स्वातंत्र्य म्हणजे त्याचे असह्य, यातना देणारे असे ओझे आहे पण ती त्याची प्रतिष्ठाही आहे. माणूस स्वत:च्या अस्तित्वाला जो आशय देतो, तो स्वतंत्रपणे निवड करून देतो. मी निवड न करता सवयीने कृत्य केले, तरी निवड न करण्याचे न सवयीचे कृत्य करण्याचे मी निवडलेले असते. मी केवळ कृत्येत निवडतो असे नाही, तर कृत्यांचे मूल्यमापन करण्याचे निकषही मी निवडतो. तेव्हा मानवी अस्तित्वाच्या मुळाशी अशी स्वतंत्रपणे केलेली निवड आहे, हे अस्तित्ववादाचे चौथे सूत्र. ह्यामुळे कार्यकारणनियमांच्या साहाय्याने मानवी वर्तनाचा उलगडा करता येत नाही. पाचवे सूत्र असे, की मानवी अस्तित्वाच्या यथार्थ स्वरूपाची जाणीव, उदा., त्याच्या गाभ्यात असलेली शून्यता, स्वातंत्र्याची जबाबदारी इ., आपल्याला कित्येक आत्यंतिक स्वरूपाच्या, प्रसंगांत होते. एरवीच्या जीवनात दैनंदिन कामाच्या रगाड्याचा आधार घेऊन आपण जीवनाचे हे विदारक स्वरूप स्वत:पासून लपवू शकतो. मानवी अस्तित्वाविषयी जी सत्ये अस्तित्ववादाला गवसलेली आहेत, त्यांची मांडणी, समर्थन बौद्धिक अनुमानांच्या किंवा तार्किक युक्तिवादांच्या साहाय्याने अनेकदा करता येत नाही, तर कादंबरीत किंवा नाटकात करण्यात येते त्याप्रमाणे विवक्षित मनःस्थिती व प्रसंग वाचकांपुढे किंवा श्रोत्यांपुढे मूर्त करून त्याचे मर्म त्यांच्या मनात संक्रांत करावे लागते. त्यामुळे अस्तित्ववादाची सूत्रे तार्किक प्रबंधांतून ज्याप्रमाणे मांडण्यात आली आहेत, त्याप्रमाणे ललित साहित्याच्या कृतींतूनही ती व्यक्त करण्यात आली आहेत.

अस्तित्ववादाचा ज्याप्रमाणे ललित साहित्यावर प्रभाव पडला आहे, त्याप्रमाणे राजकारणावरही पडला आहे. प्रमुख अस्तित्ववादी विचारवंतांनी वेगवेगळे राजकीय विचारपंथ स्वीकारले असले–उदा., यास्पर्स उदारमतवादी आहे, हायडेगर काही काळ नाझी होता, सार्त्रने जीवनाच्या उत्तरार्धात मार्क्सवाद स्वीकारला आहे–तरी वैज्ञानिक तंत्रविद्येवर आधारलेल्या प्रचंड उत्पादनपद्धतीमुळे मानवी जीवन यांत्रिक होते व माणसाच्या आंतरिक पृथगात्म व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होतो, हा सर्वांच्या समान चिंतेचा विषय आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे निवडलेल्या बुद्धिनिरपेक्ष निकषांना अनुसरून निवड करण्याच्या अस्तित्ववादाच्या आग्रहामुळे नाझीवादासारखे आततायी, बुद्धिनिष्ठतेला न जुमानणारे राजकीय तत्त्वज्ञान स्वीकारण्याकडे अस्तित्ववाद्यांचा कल असणे शक्य आहे. मानसशास्त्रातही अस्तित्ववादी मानसशास्त्र उदयाला आले आहे. यास्पर्स स्वत: मानसोपचाराकडून तत्त्वज्ञानाकडे आला मानसिक घटनांचा, विशेषत: मनोविकृतींचा, कार्यकारणनियमांना अनुसरून उगम न शोधता व्यक्तीने आपल्या परिस्थितीचा लावलेला जो अर्थ विकृतीमध्ये दडलेला असतो, तो उकलण्याचा अस्तित्ववादी मानसशास्त्राचा प्रयत्न असतो. हा अर्थ व्यक्तीच्या स्वत:शी आणि अस्तित्वाशी असलेल्या मूलभूत वृत्तींच्या संदर्भात समजून घ्यायचा असतो आणि ह्या मूलभूत वृत्तींचे स्वरूप अस्तित्ववादी संकल्पनांच्या साहाय्याने–उदा., जगातले अस्तित्व आणि त्याचे विविध प्रकार–स्पष्ट केलेले असते. अस्तित्ववादी मानसशास्त्रात लूडव्हिक बिन्सवांगर आणि आर्. डी. लेंग ह्यांची कामगिरी विशेष महत्त्वाची आहे.

संदर्भ : 1. Allen, E. L. Existentialism from Within, London, 1953.

           2. Barrett, William, Irrational Man, New York, 1958.

           3. Blackham, H. J. Six Existentialists Thinkers, London, 1961.

           4. Collins, James, The Existentialists : A Critical Study, Chicago, 1952.

           5. Grimsley, R. Existentialist Thought, Cardiff, 1960.

           6. Heinemann, F. H. Existentialism and the Modern Predicament, London, 1959.

           7. Molina, Fernand, Existentialism as Philosophy, Engle-wood Cliffs, 1962.

           8. Roberts, David E. Existentialism and Religious Belief, Oxford, 1957.

           9.Wahl, J. Trans. Williams, F. Maron S. A Short History of Existentialism, New York, 1949.

रेगे, मे. पुं.