अष्टांगयोग: योग म्हणजे सर्व चित्तवृत्तींचा निरोध. यालाच ‘समाधी’ म्हणतात. याची आठ अंगे : यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. यम पाच होत : अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह. नियम : शुचिता, संतोष, स्वाध्याय, तप व ईश्वरप्रणिधान. स्थिर व सुखात्मक शरीरस्थिती म्हणजे आसन. कुंभक, रेचक व पूरक अशा तीन विभागांची श्वसननिरोधाची क्रिया म्हणजे प्राणायाम. ध्येयविषयाव्यतिरिक्त विषयांपासून मन आवरणे म्हणजे प्रत्याहार. ध्येयविषयावर मन स्थिर करणे म्हणजे धारणा. ध्येयविषयाचे निर्वेध व एकाग्र चिंतन म्हणजे ध्यान. ध्येयविषयाची विविध स्वरूपांतील स्थूल कल्पना व सूक्ष्म तत्त्वांची निश्चित कल्पना म्हणजे विचार. विचारापासून आनंद व या तिन्ही स्थितींतील एकरूप अहंची सतत जाणीव, अशा चार वृत्तींनी युक्त स्थिरध्यान म्हणजे संप्रज्ञात समाधी होय आणि या वितर्क, विचार, आनंद व अस्मिता वृत्तींचा लोप झालेली मन:स्थिती म्हणजे असंप्रज्ञात समाधी.
पहा : योगदर्शन.
जोशी, लक्ष्मणशास्त्री