अर्जुनदेव

अर्जुनदेव : (१५६३–१६०६). शीखांचे पाचवे धर्मगुरु, पंजाबातील गोइंदवल येथे जन्म. चौथे शीख गुरू रामदास यांचे अर्जुनदेव पुत्र. ते कवी, तत्त्वचिंतक, मुत्सद्दी व संघटक होते. शीखांचा धर्मग्रंथ ⇨ग्रंथसाहिब हा यांच्यापूर्वी केवळ गुरू नानकांचे चरित्र आणि त्यांचे काव्य एवढ्यापुरताच मर्यादित होता. अर्जुनदेवांनी मोठ्या परिश्रमाने आधीच्या साधुसंतांची व शीखगुरुंची वचने आणि स्वतःची काही काव्यरचना यांची त्यात भर घालून तो विस्तृत केला. अर्जुनदेवांनी तयार केलेल्या स्वरूपातील ग्रंथसाहिबच आज शीखधर्मीय पूज्य धर्मग्रंथ मानतात व त्याचे नित्य पठण करतात.

अमृतसर येथील हरमंदिराचे, म्हणजेच ⇨सुवर्णमंदिराचे, बांधकाम अर्जुनदेवांनी पुढाकार घेऊन पुरे केले व त्यात ग्रंथसाहिब ठेवला. त्याचप्रमाणे त्यांनी अमृतसर शहरही वसविले. याशिवाय त्यांनी तरण-तारण (जिल्हा अमृतसर) व कर्तारपूर (जिल्हा जलंदर) ही नवी शहरे वसविली. शीख धर्माची संघटना बळकट केली. त्यासाठी त्यांनी ‘मसंद’ नावाचे शीख धर्मप्रचारक नेमले आणि आपल्या अनुयायांकडून ‘दस्वंध’ (उत्पन्नाचा दहावा भाग) नावाचा नवा कर वसूल केला. शीख लोकांना त्यांनी व्यापारासाठी उत्तेजनही दिले. अर्जुनदेवांमुळेच शीख समाज संघटित होऊन आत्मरक्षणासाठी समर्थ झाला व पुढे इस्लामी आक्रमणास त्याने तोंड दिले. स्वधर्मरक्षणासाठी अर्जुनदेवांनी लाहोर येथे प्राणार्पण केले.

आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) मिसार, म. व्यं. (म.)