अरेबियन नाइट्स : अरबी भाषेतील गोष्टींचा जगप्रसिद्ध संग्रह. याचे मूळ अरबी नाव अल्फ लय्लह व–लय्लह (अलीफलैलह) असून इंग्रजीत अरेबियन नाइट्स एंटरटेनमेंट आणि वन थाउजंड अँड वन नाइट्स अशी नावे रूढ आहेत. एका प्रास्ताविक कथासूत्रात विविध कथा गुंफण्याचे संस्कृत पंचतंत्र वा शुकसप्तति यांमधील भारतीय तंत्र प्रस्तुत कथासंग्रहात योजिलेले आहे. प्रस्तुत कथातंत्र पश्चिमी साहित्यसमीक्षेत ‘रामेन एर्त्सेलुंग’ या जर्मन संज्ञेने ओळखले जाते. इराणच्या शहरयार राजाला त्याच्या वजिराची मुलगी शाहजादी (शाहराजाद) हिने एक हजार रात्री सांगितलेल्या या कथा आहेत. आपल्या राणीच्या व्यभिचाराने चिडून शहरयार अखिल स्त्रीजातीचा सूड घेण्याचे ठरवितो. रोज रात्री एका स्त्रीशी विवाह करून सकाळी तिला ठार करतो. शाहजादी आपल्या कथनचातुर्याने रोज रात्री राजाचे मन पुढील कथेत गुंतवून ठेवते. शेवटी राजाचे हृदयपरिवर्तन होते. अरेबियन नाइट्समधील कथांच्या साखळीची अशी पार्श्वभूमी आहे.
अरेबियन नाइट्सचे प्रचलित स्वरूप अठराव्या शतकात सिद्ध झाले. अंतर्गत पुराव्यावरून या कथांचे लेखन एकाच लेखकाचे व एकाच कालखंडात झालेले दिसत नाही. अल्-मसूदी या अरबी लेखकाच्या मुरु–जुझ्–झ्हब (९४७) या ग्रंथात ‘हजार अफसाना’ असा निर्देश आढळतो, असे नबिआ ॲबट याने १९४९ मध्ये निदर्शनास आणले. यावरून फार्सी भाषेतून या कथा अरबी भाषेत आल्या असाव्यात असे ॲबटचे मत आहे. प्रास्ताविक कथेच्या चौकटीचे मूळ भारतीय असावे, असेही एक मत आहे. या कथांचे मूळ स्वरूप व लेखनकाल निश्चित करणे अनेक कारणांनी अवघड बनले आहे. एक तर आरंभीच्या चार गोष्टी सोडल्या, तर इतर कथांबाबत उपलब्ध हस्तलिखित प्रतींत व मुद्रित संस्करणांत एकवाक्यता नाही. याशिवाय भारत, इराण, इराक, तुर्कस्तान व ईजिप्त यांच्याशी संबंधित असे काही विशेष या कथांत आढळतात. त्यांतील बहुतेक विशेषनामे अरबी व मुस्लिम असली, तरी काही भारतीय व क्वचित यूरोपीय नामेही त्यांत आहेत. त्यांतील काही कथाप्रसंग चीन व भारत येथे घडलेले असले, तरी कथांचे अंतरंग अस्सल अरबी व प्रेरणा इस्लामी आहे. कालविपर्यासाचे दोषही अरेबियन नाइट्समध्ये आढळतात. इराणच्या शहरयार राजाचा कालखंड इस्लामपूर्व मानल्यास, बगदाद, बसरा व कैरो या इस्लामोत्तर काळात प्रसिद्धीस आलेल्या शहरांचा निर्देश विपर्यस्त वाटतो. कॉफी व तंबाखू अनुक्रमे चौदाव्या व सोळाव्या शतकापर्यंत ईजिप्तमध्ये अपरिचित होती पण त्यांचा उल्लेख या कथांत आहे. ईजिप्तमधील १४०० ते १५५० मधील चालीरीती व शिष्टाचार अरेबियन नाइट्समध्ये प्रतिबिंबित झालेले दिसतात. कदाचित याच काळात त्यांमधील मूळ कथांचे संपूर्ण परिष्करण करून व त्यांत नवीन कथा अंतर्भूत करून त्यांचा संग्रह करण्यात आला असावा.
मूळ अरबी भाषेतील कथा काव्यात्मक अशा तुकड्या-तुकड्यांनी रचलेल्या आहेत. त्या कथा मुख्यतः कथनासाठी व विशिष्ट सुरात गाण्यासाठी रचलेल्या असाव्यात. प्रस्तुत कथांची विभागणी पुढीलप्रमाणे करता येईल : (१) परीकथा व तत्समान काल्पनिक कथा. (२) बगदादशी व तेथील सुलतान हारुन-अल्-रशीद आणि त्याचा प्रधान यांच्याशी निगडित असलेल्या मुख्यतः प्रेमविषयक व अद्भुतरम्य कथा. यांत ऐतिहासिक सत्यता नाही. (३) मध्यमवर्गीय लोकांशी संबंधित अशा हास्यकारक व थोड्याफार शृंगारिक कथा. यांची रचना तेराव्या ते सोळाव्या शतकांत, मामलूक सुलतानांच्या कारकिर्दीत कैरो (अल्-काहिरह) येथे झाली असावी. (४) साहसकथा. (५) बोधपर कथा. (६) आख्यायिका व दंतकथा यांवर आधारित कथा. (७) धार्मिक कथा.
या प्रकारे वर्गीकरण करता आले, तरी अरेबियन नाइट्समधील कथांत एकात्मता आढळत नाही. सिंदबादच्या सफरींची कथा तर स्वतंत्रपणे रचलेली व नंतर त्यात घुसडलेली वाटते. वाङ्मयीन गुणवत्तेच्या बाबतीतही त्यात विषमता दिसून येते. काही कथा बंदिस्त व कलात्मक आहेत, तर काहींची रचना शिथिल वाटते. या कथा घटनाप्रधान असून व्यक्तिचित्रण स्थूल स्वरूपाचे आहे. मात्र कथनकौशल्य, चित्तवेधकता, अभिनव कल्पनाविलास व मानवी स्वभावाचे मर्मज्ञान या गुणांमुळे या अद्भुतरम्य कथा जगभर लोकप्रिय झाल्या.
अरेबियन नाइट्सचे सर्वांत पहिले भाषांतर आंत्वान गालां याने पॅरिस येथे १७०४ ते १७१७ या काळात फ्रेंच भाषेत केले व यूरोपीय लोकांना या उत्कृष्ट कथांची पहिली ओळख करून दिली. हे भाषांतर मूळ अरबीवरून केलेले होते. गालांच्या भाषांतराची अन्य यूरोपीय भाषांतही भाषांतरे झाली. जर्मन लेखक हबिस्ट याने मूळ अरबी कथासंहिता जर्मनीतील ब्रेस्लौ येथे छापली (१८२५–४३) व १८४० मध्ये तिच्यावरून जर्मन अनुवाद प्रसिद्ध केला. कैरो येथे १८३५ मध्ये छापलेल्या अरबी प्रतीवरून ई. डब्ल्यू. लेन या इंग्रज अभ्यासकाने दर्जेदार पण अपूर्ण इंग्रजी कथानुवाद (१८३९–४१) प्रसिद्ध केला. अरेबियन नाइट्स एंटरटेनमेंट हे नाव त्यानेच दिले. कलकत्त्याच्या अरबी प्रतीवर (१८३९–४१) आधारलेले इंग्रजी भाषांतर जॉन पेन याने प्रकाशित केले (१८८२–८४). अफाट लोकप्रियता आर्. एफ्. बर्टन याच्या सोळा खंडांतील भाषांतरास (१८८५–८९) लाभली. जे. सी. मर्द्रुसचे फ्रेंच भाषांतरही (१८९९) उल्लेखनीय आहे. यूरोपीय भाषांतील सर्वांत उच्च दर्जाचा मान ई. लिटमानच्या सहा खंडांतील जर्मन अनुवादाला (१९२१–२८) देण्यात येतो. लिटमानची विद्वत्तापूर्ण प्रस्तावनाही अभ्यसनीय आहे.
अरेबियन नाइट्सच्या संहिताविषयक व अन्य प्रश्नांची चिकित्सा डी. बी. मॅक्डोनल्ड या अमेरिकन अभ्यासकाच्या ग्रंथात आढळते. त्या कथांतील बगदादी व ईजिप्शियन अशा दोन ठळक स्तरांचा अभ्यास आउगुस्ट म्यूलरच्या विवेचनात आढळतो.
ह्या कथांचे मराठी भाषांतर ⇨कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजीवरून करावयास सुरुवात केली (१८६१). विष्णुशास्त्री चिपळूणकर व हरि कृष्ण दामले यांनी त्यास हातभार लावल्यावर, १८९० मध्ये अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या. त्या अनेक भागांत आहेत. त्यांची नवी सहा भागांतील आवृत्ती १९५७ मध्ये निघाली. शिवाय दोन प्रकारच्या संक्षिप्त आवृत्त्या १९१३ व १९५० मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. कृष्णशास्त्र्यांचा अनुवाद उत्कृष्ट आहे. त्याच्या प्रभावातून स्वतंत्र व अनुवादित स्वरूपाच्या सुरस व चमत्कारिक गोष्टी मराठीत लिहिण्यात आल्या. त्यांपैकी दामले-सिनकरकृत मराठी भाषेतील सुरस गोष्टी (१८७०), नारो अप्पाजी गोडबोल्यांच्या चमत्कारिक गोष्टी (सात भाग, १८६५–८९) व केशव रघुनाथ चौंचेलिखित महाराष्ट्र–भाषेत मनोरंजक गोष्टी (पाच भाग, १८७०–८७) हे कथाग्रंथ उल्लेखनीय आहेत. अरेबियन नाइट्सची अन्य लहानमोठी भाषांतरे त्र्यं. पु. थोरात, वा. गो. आपटे प्रभृतींनी केली आहेत.
जाधव, रा. ग. सुर्वे, भा. ग.
“