अरण: (भुतकेस, टमरूज हिं. बाक्रा गु. अलन सं. भुतफल लॅ. एलिओडेंड्रॉन ग्लॉकम कुल-सेलॅस्ट्रेसी). हा मध्यम आकाराचा व ९-१५ मी. उंचीचा वृक्ष भारतात बहुधा सर्वत्र (हिमालयात १,८०० मी. उंचीपर्यंत), तसेच श्रीलंकेत व मलायात आढळतो. महाराष्ट्रात पानझडी जंगलात सापडतो. शिवाय शोभेकरिता बागेतही लावतात. साल जाड, करडी किंवा गडद रंगाची पाने सोपपर्ण [⟶ पान], साधी, समोरासमोर, दीर्घवृत्ताकृती, चिवट, कोवळेपणी निळसर हिरवी फुले लहान, असंख्य, पिवळसर किंवा हिरवट पांढरी असून पानांच्या बगलेत किंवा जवळपास द्विपाद वल्लरीवर [⟶ पुष्पबंध] फेब्रुवारी ते ऑगस्टमध्ये येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे सेलॅस्ट्रेसी कुलाप्रमाणे. फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त), कठीण व गोलसर, १-३ सेंमी. लांब असून मेमध्ये पिकते. पानांच्या भुकटीने शिंका येतात. स्त्रियांना उन्मादमूर्च्छेतून सावध होण्यास याची धुरी उपयुक्त डोकेदुखीवर भुकटी तपकिरीप्रमाणे वापरतात. ताज्या मुळांच्या सालीचा लेप सुजेवर लावतात. फांट (थंड पाण्यात काढलेला मुळांचा रस) वांतिकारक असतो.
पहा : कंगुणी.
जमदाडे, ज. वि.
“