अमुदर्या: मध्य आशियातील सर्वांत मोठी नदी. प्राचीन नाव ऑक्सस अरबीमध्ये जायहून आणि संस्कृत-पाली ग्रंथांत हिला ‘वंक्षु’ म्हटले आहे. अमुदर्याचे खोरे सु. ४,६६,२०० चौ.किमी. असून लांबी २,५४० किमी. (पैकी १,४५० किमी. जहाजवाहतुकीस उपयुक्त) आहे. रशिया–अफगाणिस्तानमधील १,०८८ किमी. सरहद्द या नदीने बनलेली आहे.
पामीरच्या पठारावर समुद्रसपाटीपासून सु. ४,१०० मी. उंच असलेल्या झोरकुल अथवा व्हिक्टोरिया सरोवरात पामीर नदी उगम पावते नैर्ऋत्येस हिंदुकुशमधून सु. १०४ किमी. वाहत गेल्यानंतर कालापांज येथे हिला ईशान्य अफगाणिस्तानातून वाहत येणारी वाखान नदी मिळते संगमानंतर हिला ‘पांज’ म्हणतात. अफगाणिस्तानच्या उत्तर सरहद्दीवरून पश्चिमेकडे सु. ६४० किमी. वाहत गेल्यावर पांजला ताजिकिस्तानातून वाहत येणारी वाख्ष नदी मिळते. येथून पुढे हिला‘अमुदर्या’ म्हणतात. हिंदुकुशमधून ही नंतर वायव्येकडे वळते. पूर्वेकडील किझिलकुम व पश्चिमकडील काराकुम या ओसाड प्रदेशांमधून वाहत ती कझाकस्तानमधील अरल समुद्रास मिळते. पुरातन काळी या नदीचे पाणी काराकुमच्या उत्तरेकडील सारि-कामिश या कोरड्या प्रदेशात मुरून कॅस्पयिन समुद्राला मिळत असे. हल्ली अमुदर्याच्या मुखाजवळ ३८५ किमी. लांबीचा जुना व १६० किमी. लांबीचा नवीन गाळाचा त्रिभुजप्रदेश बनला आहे. मुखाजवळ ही नदी २,४०० मी. रुंद आहे.
उत्तरेकडून अमुदर्यास गूंट, बरतांग, कायझिनसु, बख्म, काफिरनिगन, सुरखानदर्या व किझिन सू आणि दक्षिणेकडून कोकचा व कुंडुझ या महत्त्वाच्या उपनद्या मिळालेल्या आहेत. थंडीमध्ये दोनअडीच महिने नदीच्या मुखाजवळील भाग गोठलेला असतो. उन्हाळ्यात पामीर-हिंदुकुशवरील हिमनद्या वाहू लागतात व त्यामुळे अमुदर्यास मोठे पूर येतात. हिंदुकुश पर्वतावरून अवखळपणे वाहणारी ही नदी ओसाड प्रदेशात शिरल्याबरोबर मोठ्या पात्रातून खननाचे कार्य करीतच आहे. चोर्जोवू या ठिकाणी नदीला १·६ किमी. लांबीचा पूल बांधलेला आहे. प्रवाहाची अनिश्चित दिशा आणि अलोट पण वेगवान पाणी यांमुळे अमुदर्याचा संपूर्णपणे उपयोग करून घेता आलेला नाही. पहाडी प्रदेशातून वाहत असता तिचा उपयोग विद्युत्निर्मितीकडे होतो आणि नंतर सखल भागातील तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या राज्यांतील प्रदेशात तिच्या पाण्याचा उपयोग शेतीकडे करून घेण्यात आला आहे. त्रिभूज प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कालवे आहेत हिचा काराकुम कालवा ८८० किमी. लांब असून त्यामुळे सु. साडेचार लक्ष हेक्टर जमीन भिजते. अमुदर्या प्रकल्पात नदीच्या मुखाजवळील काही भाग कॅस्पियन समुद्रास मिळवून आणखी सु. बारा लक्ष हेक्टर जमिनीत पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. अमुदर्यात विपुल मासळी सापडते.
यार्दी, ह. व्यं.