अमरवेल : (आकाशवेल, निर्मुळी इं. डॉडर लॅ. कस्क्यूटा रिफ्‍लेक्स कुल-कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). या पर्णहीन व मूलहीन जीवोपजीवी वलयिनीचा म्हणजे पाने व मुळे नसलेल्या व दुसऱ्या वनस्पतीतून अन्नरस घेणाऱ्या वेलीचा प्रसार भारतात सर्वत्र (सखल मैदानी भागात व सु. २,४८० मी. उंचीपर्यंत दख्खन पठारावर) असून बागेतल्या अनेक झाडांवर ती वाढते व त्यांच्या नाशास कारणीभूत होते. हिचे बी जमिनीत रुजल्यावर त्यातून तंतूसारखे खोड येते. परंतु लवकरच त्याला पोषणार्थ दुसऱ्या 

वाळुंजाच्या फांदीभोवती गुंडाळणारी अमरवेल. (१) वाळुंज, (२) अमरवेल, (३) अमरवेलीचे फूल

वनस्पतीचे खोड मिळाले नाही तर ते मरून जाते मिळाल्यास ते त्याभोवती वेटोळे घालत वाढते व आपल्या खोडापासून निघालेली सूक्ष्म शोषके किंवा अतिलहान शोषक अवयव दुसऱ्या (आश्रयाच्या) खोडात घुसवून त्यापासून अन्नरस घेते. याच वेळी त्याचा व जमिनीचा संबंध संपतो. अमरवेलीसारख्या तिच्या वंशात सु. १०० जाती असून त्या सर्व उष्ण समशीतोष्ण कटिबंधात पसरल्या आहेत. हिचे खोड खूप लांब, गुळगुळीत, फिकट हिरवट पिवळे  असून त्याला फांद्या व त्यावर कधी बारीक लाल ठिपके असतात. फुले एकाकी किंवा २-४ फुलांचे चवरीसारखे झुबके किंवा आखूड मंजऱ्या जानेवारी-फेब्रुवारीत येतात. फुलांची संरचना व सामान्य शारीरिक लक्षणे ð कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. पुष्पमुकुट परिहित [→पुष्पदलसंबंध] पांढरा, नलिकाकृती पाकळ्या त्रिकोणी, बहिर्नत (बाहेर वाकलेल्या) असतात. बोंड गोलसर, बारीक व गुळगुळीत तळाजवळ वृत्तीय स्फुटनामुळे [→ फळ] २-४ काळ्या बिया बाहेर येतात. बियांत पुष्क [→ बीज] भरपूर असून दलिका अत्यंत ऱ्हसित गर्भ बारीक व सर्पिल. बी वायुनाशी, कृमिनाशक व आरोग्यपुनःस्थापक. खोड रेचक खाजेवर बाहेरून लावण्यास व सतत तापावर पोटात घेण्यास उपयुक्त. फांट व्रण  धुण्यास वापरतात. खोड पित्तविकारावर देतात. बियांमध्ये ‘अमरवेलीन’ व ‘कस्क्युटीन’ ही रंगद्रव्ये व मेण असते.

पहा: जीवोपजीवन

  जमदाडे, ज. वि.

अमरवेल : (आकाशवेल). हेच नाव, ðलॉरेसी कुलातील एका त्यासारख्याच पर्णहीन, जीवोपजीवी, नाजूक लतेस (कॅसिथा फिलीफॉर्मिस) लावलेले आढळते. ही ð ओषधी भारतात सर्वत्र, परंतु विशेषतः समुद्रकिनारी असलेल्या इतर काही झुडुपांवर किंवा वृक्षांवर आढळते. हिचे खोड पिवळट हिरवे व बारीक तंतूंचे शाखायुक्त असे जाळे असते ते आश्रय-वनस्पतीवर वाढताना आपली लहान शोषके त्यात घुसवून अन्नरस शोषून घेते. हिची  लहान, व्दिलिंगी पांढरी, बिनदेठाची फुले विरळ कणिशांवर [®पुष्पबंध] सप्टेंबरात येतातबारीक पांढरी अश्मगर्भी (कोय असलेली) फळे मांसल, परिदलाने वेढलेली असतात. पक्षी बीजप्रसार घडवून आणतात. ही वनस्पती पौष्टिक व आरोग्यपुनःस्थापक असून पित्तविकार, चर्मरोग, जुनाट आमांश, मूत्रविकार इत्यादींवर उपयुक्त आहे. तिळेलातून तिचे चूर्ण केसांना लावण्यात चांगले तसेच नेत्रदाहात हिचा रस थोडी साखर घालून डोळ्यात घालतात. जुनाट (दृढमूल) व्रणांना लोणी, आले व अमरवेलीचे चूर्ण मिसळून लावतात.   

 परांडेकर, शं. आ.

 “