अमरनाथ : जम्मू व काश्मीर राज्यातील प्रसिद्ध शिवक्षेत्र. हे श्रीनगरच्या ईशान्येस १३० किमी. व पहलगामपासून ४५ किमी. आहे. समुद्रसपाटीपासून ५,४८६ मी. उंचीवरील हिमालयाच्या एका बर्फाच्छादित शिखरामध्ये ही निसर्गनिर्मित गुहा असून आतले शिवलिंगही बर्फाचेच बनलेले असते. गुहा सु. १५ मी. लांब व १६ मी. रुंद आहे. गुहेजवळील रामकुंडातले पाणी छिद्रातून ठिपकते आणि त्यापासून हे लिंग बनते, असे मानतात. पार्वती व गणपती यांचेही बर्फमय उंचवटे येथे दाखविले जातात. श्रावणी पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. भाविक लोक येथील अमरगंगा नदीत स्नान करून मग दर्शन घेतात. भारतातल्या शक्तिपीठांपैकी हे एक समजले जाते.
दातार, नीला
“