अभिसार : उत्तर भारतातील एक देश. प्राचीन साहित्यात ‘अभिसारजन’, ‘अभीसार’, ‘अबिसेरस’ व‘अव्रिसर’ अशी नामांतरे आढळतात. भौगोलिक स्थानाविषयीही भिन्न मतांतरे आहेत. स्टाइनच्या मते काश्मीरातील झेलम व चिनाब नद्यांच्या दरम्यानचा आधुनिक राजौरी व भिंबर हा डोंगराळ प्रदेश म्हणजे अभिसार देश, तर जयचंद्राच्या मते तो प्राचीन गंधार देशाच्या पूर्वेस असलेल्या कैकय देशाच्या उत्तरेस असलेला प्रदेश. अरियनच्या मते सिंधू नदीची पूर्वेकडील उपनदी सोनोस् (आधु. सोहान) अबिस्सरीअन (अभिसार) लोकांच्या देशात उगम पावत असे. सिंकदरच्या स्वारीच्या वर्णनात ‘अविसरेस’ नावाने यांचा निर्देश केला आहे. त्यात काश्मीरचा स्वतंत्र उल्लेख नसल्याने अभिसार हा त्या काळी एक स्वतंत्र व महत्त्वपूर्ण देश असून काश्मीर हा त्याचा उपविभाग असावा, असे वाटते. या देशाची राजधानी अभिसार येथे होती. राजतरंगिणीमध्ये या प्रदेशाचा दार्व नामक लोकसमूहासमवेत ‘दार्वाभिसार’ असा संयुक्त उल्लेख सापडतो. शिवसेन क्षत्रपाच्या पंजाब ताम्रमुद्रिकालेखात या देशाला ‘अव्रिसर’ म्हटले आहे.

शाह, र. रू.जोशी, चंद्रहास