ॲडिनॉइडे : (नासाग्रसनी-लसीका पुंज). नाकाचा पश्चभाग आणि ग्रसनी (घसा) या ठिकाणी असणाऱ्या लसीका पुंजास [→ लसीका तंत्र] ग्रसनी-गिलायू (नाकामागील टॉन्सिल) म्हणतात. त्याची अधिवृद्धी (प्रमाणाबाहेर वाढ) झाल्यामुळे तेथे ज्या गाठी होतात त्यांना ‘ॲडिनॉइडे’ म्हणतात. या गाठींबरोबरच गिलायू ग्रंथीही (टॉन्सिल) बहुधा वाढलेल्या असतात. हा विकार बहुधा ३ ते ८ वर्षांच्या मुलांमध्ये होतो.

ॲडिनॉइडे. (१) ॲडिनॉइडे, (२) गिलायू ग्रंथी, (३) नासा मार्ग, (४) ग्रसनी.

 

नाकातून श्वास घेण्याला अडथळा उत्पन्न झाल्याने मूल तोंड उघडे ठेवून श्वासोच्छ्‌वास करू लागते. त्यामुळे कठीण तालू व वरचे दात यांच्यावर जिभेचा दाब पडत नाही त्यामुळे कठीण तालूची कमान उंच व निरुंद बनते. कायमच्या दातांना वरच्या जबड्यात पुरेशी जागा न मिळाल्यामुळे दात पुढे येतात. नासाविवरे (नाकातील पोकळ्या) लहान होऊन वरचा ओठ वर ओढला जातो. त्यामुळे दात अधिकच पुढे येतात. मुलाचा चेहरा अनवधानी व बावळट दिसतो. ग्रसनीकर्ण-नलिकेचे (घसा व कान यांना जोडणारी नलिका) ग्रसनीकडील तोंड बंद पडल्यामुळे मध्यकर्णाचा शोथ (दाहयुक्त सूज) होऊन कान फुटतो. नाक वारंवार चोंदते क्वचित बहिरेपणाही येतो. वारंवार त्रास होत असल्यास गिलायू ग्रंथींप्रमाणेच या गाठीही शस्त्रक्रियेने काढून टाकतात.

आपटे, ना. रा.