ॲटलांटा : अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याची राजधानी. लोकसंख्या ४,९६,९७३ (१९७१). १८४५ पूर्वी हे मार्थझव्हिल म्हणून ओळखले जाई. अमेरिकेच्या यादवी युद्धातील ॲटलांटा मोहिमेत जनरल शर्मनने हे शहर बेचिराख केले होते. सध्या हे आग्नेय अमेरिकेतील महत्त्वाचे व्यापारी, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि दळणवळणाचे केंद्र आहे. धान्यपदार्थ, कापड, मोटारी, फर्निचर, औषधे हे येथील महत्त्वाचे उद्योग होत. निग्रोंच्या उच्च शिक्षणाचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. पदवी परीक्षेपर्यंत शाळेतून शिक्षण देणारी ॲटलांटा विद्यापीठ-पद्धत येथेच १८७० मध्ये सुरू झाली. वैद्यक शिक्षणाकरिता येथील एमरी विद्यापीठ, तर अत्याधुनिक तांत्रिक शिक्षणाकरिता येथील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रसिद्ध आहे. येथील राज्य ग्रंथालय, ऐतिहासिक कागदपत्रांचे संग्रहालय इ. प्रेक्षणीय आहेत. केंद्र सरकारची काही कार्यालये येथे आहेत.
लिमये, दि. ह.