ॲझटेक : एक अमेरिकन इंडियन जमात. मेक्सिकोच्या खोर्यात १२०० ते १५२१ ह्या काळात ॲझटेक जमातीचे प्राबल्य होते. ॲझटेक हे सर्वसमावेशी नाव आहे. त्यात बऱ्याच जमातींचा अंतर्भाव होतो. त्यांतील तेनोचा ही प्रमुख जमात मेक्सिकोच्या वायव्येकडून ॲझत्लन किंवा सात गुंफांच्या प्रदेशातून आली अशी दंतकथा आहे. या जमातीने ताल्तेकोचा पराभव करून मोठे साम्राज्य स्थापिले. हल्लीचे मध्य व दक्षिण मेक्सिको ही त्यांच्या राज्याची परिसीमा होती. ताल्तेकोची संस्कृती प्रगत होती. तीतील बरेच सांस्कृतिक गुण ॲझटेकांनी आत्मसात केले. ॲझटेक संस्कृती सुप्रसिद्ध आहे व तिची तुलना पेरूतील इंका संस्कृतीशी करण्यात येते.
साधारणतः १३२५ च्या सुमारास ॲझटेकांनी आपली तेनॉच्तित्लान ही राजधानी तेस्कोको सरोवरातील एका बेटावर वसविली. ॲझटेकचे प्राचीन नाव मेक्सिका होते. त्यांची भाषा नहुआत्ल असून ती नहुआत्लन भाषिक समूहातील आहे. आजही मेक्सिकोत अंदाजे दहा लक्ष लोक ही भाषा बोलतात. इंग्रजीत टोमॅटो, चॉकलेट व चिली (मिरची) हे शब्द त्यांच्या भाषेतूनच आले आहेत.
ॲझटेकांनी १३७५ पासून अवघ्या एका शतकात आपले साम्राज्य वाढवून भरभराटीस आणले. या दिग्विजयाचे गमक त्यांच्या धर्मात सापडते. ॲझटेकांची वीत्सेलोपोच्ले ही मुख्य देवता होय. ह्या युद्धदेवतेला ॲझटेक सूर्याचे प्रतीक मानीत. रोज संध्याकाळी हा देव मरून, सकाळी पुन्हा जन्म घेतो व पहाटे सूर्याच्या किरणांचा हत्यारासारखा उपयोग करून, तो तारे व चंद्र यांच्याशी युद्ध करतो. रोज युद्ध करण्याची ताकद कमविण्यासाठी त्यास मानवी रक्ताची गरज भासत असे. त्यामुळे मानव बळीची गरज पडे व ती भागविण्याकरिता ॲझटेकांना युद्ध करून कैदी पकडणे आवश्यक होते. ॲझटेकांच्या क्रौर्यास कंटाळून पराभूत लोकांनी १५२१ च्या युद्धात स्पॅनिश सैन्याला ॲझटेकांच्या विरुद्ध मदत केली. कोर्तेझ या स्पॅनिश सेनानीने ॲझटेकांचा पराभव केला. आजचे मेक्सिको शहर त्यांच्या जुन्या राजधानीच्या अवशेषांवरच बांधलेले आहे. कमी सैन्य असूनही स्पॅनिश लोक घोडदळामुळे व तोफाबंदुकांमुळे ॲझटेकांचा पराभव करू शकले. ॲझटेक युद्धात धनुष्यबाण, भाले, गदा, तलवारी इत्यादींचा वापर करीत.
ॲझटेकांचा मुख्य व्यवसाय शेती. प्रमुख पीक मका. शिवाय घेवडा, काळी मिरी, तंबाखूचीही ते लागवड करीत. एका दांड्याच्या साहाय्याने ते शेत नांगरीत. लोखंडी नांगर किंवा त्यांना ओढणारे प्राणी नव्हते. तरीसुद्धा ते उत्तम पीक काढीत असत. कुत्री व कोंबड्या हे दोनच पाळीव प्राणी होते. त्यांच्याकडे चाक असलेली वाहने नव्हती किंवा कुंभाराचे चाकही नव्हते. ओझे पाठीवर वाहून नेत. पाण्यावरील दळणवळणासाठी लहान होड्यांचा उपयोग ते करीत. व्यापारात हे लोक अग्रणी होते. युद्धाबरोबर साम्राज्य वाढविण्यास त्यांना व्यापाराचा उपयोग झाला. आठवड्याचा बाजार राजधानीत भरत असे. ॲझटेक समाजात चलन नव्हते. धान्य, कापड, प्राण्यांची कातडी, मातीची भांडी, सोने, चांदी इ. रूपाने कर देण्यात येत असे.
शिक्षणसंस्था धर्मशिक्षकांच्या स्वाधीन होती. उच्च कुलीनांना व हुषार विद्यार्थ्यांना उच्च धर्मशिक्षण दिले जाई. इतरांना इतिहास, ॲझटेक परंपरा, कला व धर्म यांचे शिक्षण मिळे. त्यांच्यात वर्णमाला व लिपी नव्हती. चित्र व चिन्हांकित आकृतीद्वारा ते आपले अभिलेख जतन करून ठेवीत.
ॲझटेक वास्तुशिल्पाबद्दल प्रसिद्ध आहेत. ॲझटेक लोकांच्या वास्तूंत सर्पाकृती खांब आढळतात. खांबाच्या पायथ्याशी सर्पमुख असून शेपटीचा भाग तुळईवर असे. त्याचप्रमाणे पृष्ठभागावरील शिल्पांत व्याघ्रसमुदाय असे. इमारतीच्या भोवती खांबांचे व्हरांडे योजिले होते. मृत्स्नाशिल्पावर चकाकणाऱ्या रंगाचे काम असे. शिल्पांत गरुडाचे शिर प्रामुख्याने आढळून येते. त्यांच्या राजधानीची तुलना व्हेनिस शहराशी करण्यात येते. जलाशयावर बांधलेले हे शहर पूल बांधून जमिनीशी जोडलेले होते. स्पॅनिशांनी हे शहर जिंकले तेव्हा तेथील लोकसंख्या एक लक्ष होती. शहराच्या मध्यभागी सभास्थान होते. तेथे मोठे पिरॅमिड व त्यांवर देऊळ बांधलेले होते. सरकारी इमारती, सम्राटाचे महाल व बाजारपेठा सभास्थानाच्या भोवताली असत. ॲझटेकांचे सर्वांत प्रसिद्ध शिल्प म्हणजे त्यांचे कोरलेले दगडी पंचांग. हे ३.५ मी. व्यास असलेले व २६ टन वजन असलेले शिल्प, मेक्सिकोच्या वस्तुसंग्रहालयात बघावयास मिळते. या शिल्पाच्या मध्यभागी सूर्यदेवतेची प्रतिमा आहे. ॲझटेकांचे ३६५ दिवसांचे सौर वर्ष असे व २६० दिवसांचे धार्मिक वर्ष असे. ॲझटेक निष्णात कसबगार होते. मातीची भांडी ते हातांनी घडवीत. सोन्याचांदीचे दागिने, विशेषतः रत्नाचे दागिने ते घडवीत असत.
ॲझटेक समाजात उच्च-नीच असे भेद होते. उच्च वर्गात सामंत व व्यापारी लोकांचा समावेश होता. त्यांना खाजगी मालमत्ता बाळगण्याचा अधिकार होता. खालच्या वर्गातील लोकांना सार्वजनिक जमिनीचा हिस्सा मिळत असे. तात्त्विक दृष्ट्या राजपद निवडणुकीने मिळे, पण प्रत्यक्षात ते एकाच कुटुंबात असे. तेनॉच्तित्लान शहरात २० कुळी होत्या. त्यांची वसतिस्थाने, शेतजमिनी व मंदिरे स्वतंत्र असत. राज्यमंडळावर या कुळींचे सभापती, कुळींचे प्रमुख, सेनाधिकारी व धर्मशिक्षक असत. राजाची निवड राज्यमंडळ करीत असे. मंडळ उच्च न्यायालयाचेही कार्य करीत असे. ॲझटेक समाजातील सर्वांना सैन्यात भरती व्हावे लागे. योद्ध्यास समाजात जास्त प्रतिष्ठा होती.
संदर्भ : 1. Duran, Diego, The Aztecs The History of the Indies of New Spain, London, 1964.
2. Vaillant, G. C. Aztecs of Mexico, London, 1962.
मुटाटकर, रामचंद्र