ॲक्टिनोमायसीटेलीझ : शीझोमायसीटीज या सूक्ष्मजंतूंच्या वर्गातील दहा गणांपैकी एक. या गणातील सूक्ष्मजीवांना ‘ऑक्टिनोमायसीज’ म्हणजे ‘किरणकवक’ अशी संज्ञा हार्झ या शास्त्रज्ञांनी प्रथम वापरली व तीच रूढ झालेली आहे.
या सूक्ष्मजीवांचे स्थान ⇨कवक व सूक्ष्मजंतू यांमधील आहे. हे कवकासारखे तंतुमय असले तरी तंतूंचा व्यास व व्याप्ती लहान आढळतात. यांच्यात कवकांप्रमाणे लिंगभेद नसून कोशिकांत (शरीरातील सूक्ष्म घटकांत, पेशींत) स्पष्ट केंद्रकही नसतो. जनन तंतुविभाजनाने किंवा विशिष्ट बीजाणुनिर्मितीने (लाक्षणिक प्रजोत्पादक अवयवांच्या निर्मितीने) होते. इतर सूक्ष्मजंतूंचा आकार विशिष्ट असला तरी त्यांचे जनन विभाजनानेच होते. अशा व इतरही गुणधर्मांत बहुतांशी ॲक्टिनोमायसिजांचे सूक्ष्मजंतूंशीच साम्य असल्याने त्यांचा समावेश सूक्ष्मजंतूंत केलेला आहे.
ॲक्टिनोमायसीज हे अचल असून त्यांची वाढ चिवट, लोकरीसारखी किंवा मखमलीसारखी, कमी व्याप्तीची असते. ते तांबूस, नारिंगी किंवा निळ्या रंगाचे असतात. ते प्रामुख्याने मृदेत, वाहत्या पाण्यात, पाण्यातील गाळात, धूलिकणांत, वनस्पतींच्या व प्राण्यांच्या अवशेषांत, तसेच कुजलेल्या खतात अगणित संख्येने आढळतात. वनस्पतींच्या व प्राण्यांच्या अवशेषांचे त्यांच्यामुळे अपघटन होऊन (घटक द्रव्ये सुटी होऊन) कार्बन, नायट्रोजन इ. घटक उपलब्ध होतात. काही जाती वनस्पती, मानव व प्राणी यांच्या बाबत रोगोत्पादक आहेत. तसेच काही जातींचा प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थांच्या उत्पादनात मौलिक उपयोग होतो.
वर्गीकरण : ॲक्टिनोमायसीटेलीझ या गणाचे बर्गीज मॅन्युअल ऑफ डिटरमिनेटिव्ह बॅक्टिरिऑलॉजीया मान्यवर ग्रंथात समाविष्ट केलेले वर्गीकरण असे :
(१) | तंतुमय नसतात, अथवा तंतू मूलरूपी बीजाणुनिर्मिती नसते. | ||
कुल— (१) मायक्रोबॅक्टिरिएसी. | |||
(२) | विकसित तंतुमय | ||
(अ) | बीजाणुनिर्मिती बीजाणुधानीत (बीजाणूंच्या पिशवीत) नसते. | ||
(अ१) | बीजाणुनिर्मिती तंतूपासून विभाजनाने होते. | ||
कुल—(२)·ॲक्टिनोमायसीटेसी | |||
(अ२) | तंतुमय वाढ विभाजन नसते. | ||
कुल—(३) स्ट्रेप्टोमायसीटेसी. | |||
(आ) | बीजाणुनिर्मिती बीजाणुधानीत आढळते. | ||
कुल— (४) ॲक्टिनोप्लॅनेसी. |
प्रत्येक कुलात एक वा अधिक वंश व जाती आढळतात. त्यांतील महत्त्वाच्या वंशांची व जातींची माहिती खाली दिलेली आहे.
(१) ॲक्टिनोमायटेसी : या कुलातील सूक्ष्मजीव तंतुमय, मृतोपजीवी (मृत कार्बनी म्हणजे जैव पदार्थांवर उपजीविका करणारे), मृदेत आढळणारे, मृदेतील संमिश्र कार्बनी पदार्थांवर विक्रिया करून त्यांचे साध्या पदार्थात रूपांतर करणारे आढळतात. या कुलात दोनच महत्त्वाचे वंश आहेत. (अ) ॲक्टिनोमायसीजव (आ) नोकॉरडिया.
ॲक्टिनोमायसीज : या वंशातील सूक्ष्मजीव वातानपेक्षी (हवेच्या सान्निध्यात न वाढणारे), अम्ल-स्थायी (काही ठराविक पद्धतीने सूक्ष्मजंतूंवर केलेली रंजकक्रिया तीव्र अम्लानेही नाहीशी न होता टिकून राहते असे), ‘’ग्रॅम-रंजक-व्यक्त‘’ (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभटसर रंग टिकून राहतो असे), शाखायुक्त, तंतुमय असून संवर्धकावर तंतूंचे विभाजन होऊन लघुशलाका तयार होतात. या वंशातील ॲक्टिनोमायसीज बोव्हिसया जातीमुळे जनावरांना व नवास ⇨किरणकवक रोग होतो. रोगग्रस्त जबडा, जीभ, फुप्फुस इ. अवयव लाकडासारखे कठीण बनतात.
(आ) नोकॉरिडिया : या वंशातील सूक्ष्मजीव बहुतांशी मृतोपजीवी, वातापेक्षी (हवेच्या सान्निघ्यात वाढणारे), अपट (कोशिका विभागणार्या भित्ती नसलेले) तंतुमय, विभाजनाने शलाका वा गोलाणु-(गोलाकार सूक्ष्मजंतु-कोशिका) निर्मिती व सूक्ष्मजंतूंसारखीच वाढ करणारे आहेत. अस्तित्व मृदेत.नोकॉरडिया ऑस्टेरीऑइडिसामुळे मानव व पशू यांना ‘नोकॉरडिऑसिस’ नावाचा व्रणोत्पादक रोग होतो.
(२) स्ट्रेप्टोमायसीटेसी : या कुलातील सूक्ष्मजीव बहुतांशी मृतोपजीवी असून संमिश्र कार्बनी पदार्थांचे त्वरित अपघटन करतात. संवर्धकावरची वाढ सपाट, चिवट व किरणांसारखी असते. वाढीस २५०से. तपमान पोषक, पण काही जातींना याहून अधिक तपमान चालू शकते. तंतूंपासून बीजाणुदंड व त्यांवर बीजाणुनिर्मिती होते. काही जातीच वनस्पती व प्राण्यांच्या बाबतीत रोगोत्पादक आहेत. काही जातींपासून बहुमोल प्रतिजैव पदार्थ मिळतात. या कुलात सहा वंश आहेत : (अ) स्ट्रेप्टोमायसीज, (आ) मायक्रोमोनोस्पोरा, (इ)थर्मोॲक्टिनोमायसीज, (ई) थर्मोमोनोस्पोरा, (उ) वॅक्समॅनिया, (ऊ) थर्मोपॉलीस्पोरा. यांपैकीस्टेप्टोमायसीज हाच वंश महत्त्वाचा आहे. (अ) स्ट्रेप्टोमायसीज : या वंशातील सूक्ष्मजीवांचे तंतू अविभक्त असून त्यांच्या बीजाणुशाखांवर विभाजनाने बीजाणुमालिका तयार होतात. हे वातपेशी, मृदेत आढळणारे, बृहतांशी मृतोपजीवी असून फक्त काहीच वनस्पती व प्राणी यांच्या बाबतीत रोगोत्पादक आहेत. पुढील जातींपासून बहुमोल प्रतिजैव पदार्थ मिळतात : (१) स्ट्रे. ग्रिशीअस, (२) स्ट्रे. लॅव्हेन्ड्यूली, (३) स्ट्रे. व्हेनेझूएली, (४) स्ट्रे. अँटिबायोटिकस, (५)स्ट्रे. ऑरिओफेशीअन्स, (६) स्ट्रे. फ्रेडीई, (७) स्ट्रे. पिंप्रीना स्ट्रे. स्कॅबीज या जातीमुळे बटाट्याला खवड्या रोग होतो.
प्रतिजैव पदार्थनिर्मिती व स्ट्रेप्टोमायसीज : स्ट्रेप्टोमायसिजापासून स्ट्रेप्टोमायसीन, स्ट्रेप्टोथ्रिसीन, क्लोरोमायसेटीन, ऑरिओमायसीन, निओमायसीन, व्हिओमायसीन, ॲक्टिनोमायसीन, मॅक्रोलिडिस, पॉलीन्स, हेमायसीन यांसारख्या अनेक प्रतिजैव पदार्थांची निर्मिती होते. मानव व प्राणी यांच्या अनेक दुर्धर रोगांवर त्यांचा बहुमोल उपयोग होतो. या निर्मितीसाठी मृदेतून·स्ट्रेप्टोमायसिजाचे जंतू विलगीकरणाने अलग वाढवितात. नंतर प्रयोगशाळेत त्यांच्या अवरोधनक्रियेचे कवकांवर व सूक्ष्मजंतूंवर मूल्यमापन करतात. प्रतिजैव पदार्थउत्पादन-क्षमता त्यांच्या संवर्धनाभोवतीच्या वलयनिर्मितीमुळे स्पष्ट दिसते. प्रतिजैव पदार्थ त्यानंतर प्राण्यांना टोचून, रोगचिकित्सेत व कार्यक्षमतेत प्रभावी आढळल्यास त्यांची निर्मिती केली जाते.
ॲक्टिनोफाज किंवा ॲक्टिनोभक्षक : हे भक्षक प्रतिजैव पदार्थनिर्मितीस विघातक आहेत. हे टाळण्यासाठी भक्षक प्रतिरोधी जातींची निवड केली जाते. यांचा शोध विबोल्स व विरींगा या शास्त्रज्ञांनी १९३७ मध्ये लावला.
(आ) मायक्रोमोनोस्पोरा : या वंशातील जाती मृदेत, पाण्यात, खतात, धुलिकणात असून मृतोपजीवी, मध्यम तापरागी (२५०—४५० से. या मध्यम तपमानात वाढणारे), अपट तंतुमय, शाखायुक्त आणि बीजाणु-दंडांवर किंवा शाखांवर दर वेळेस एकच अंडाकार बीजाणुनिर्मिती करणारे आढळतात.
(इ) थर्मोॲक्टिनोमायसीज :यांची तंतुनिर्मिती माध्यमाबाहेर असून तंतूवर दर वेळी एकच बीजाणू वाढतो.
(उ) वॅक्समॅनिया : या वंशातील जातींवर बीजाणू जोडीने निर्माण होतात.
(३) मायक्रोबॅक्टिरिएसी :या कुलात सरळ, अल्पवक्र वा अनियमित आकाराचे, क्वचित शाखायुक्त किंवा तंतुशलाकायुक्त सूक्ष्मजीव असून ते वातापेक्षी, अचल, ग्रॅम-रंजक-व्यक्त, अम्ल-स्थायी असतात. यातील महत्त्वाचा वंश मायक्रोबॅक्टिरियमअसून त्यात मा. ट्युबरक्युलॉसिसक्षयरोगोत्पादक व मा. लेप्रीकुष्ठरोगकारक या जाती आहेत.
क्षयरोगोत्पादक जंतूंचे विलगीकरण, संवर्धन व विशेष अभ्यास रॉबर्ट कॉख यांनी १८८२ मध्ये केला. मा.बोव्हिसामुळे पशूंना व मा. एव्हियमामुळे पक्ष्यांना क्षय होतो. अम्ल-स्थायी रंजक क्रिया देऊन सूक्ष्मदर्शकाखालील निरीक्षणाने रोगग्रस्त भागांतील रोगोत्पादक जंतू ओळखता येतात. तसेच रोगोत्पादक जंतू प्राण्यांना टोचून क्षयरोगाचे अचूक निदान करता येते. याशिवाय ‘ट्युबरक्युलीन’ चाचणीत क्षयरोगोत्पादक जंतूंच्या प्रथिनांपासून संवर्धकात तयार झालेला ट्युबरक्युलीन हा द्रव अल्प प्रमाणात संशयित रोग्याच्या अंतस्त्वचेत टोचतात. अठ्ठेचाळीस तासांत सूज आल्यास क्षयरोगोत्पादक जंतू रोग्याच्या शरीरात आहेत असे मानले जाते. त्यानंतर पूर्ण चिकित्सा करून रोगाचे निदान करतात.
मा. लेप्री या जातीमुळे मानवास कुष्ठरोग होतो. हे जंतू संपूर्णत: परोपजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणारे), शलाकाकार, अम्ल-स्थायी व ग्रॅम-रंजक-व्यक्त असून प्रामुख्याने त्वचेत आढळतात.
वर नमूद केलेल्या सूक्ष्मजीवांव्यतिरिक्त या गणात समावेश केलेले कुल, वंश व जाती महत्त्वाच्या नाहीत.
पहा : प्रतिजैव पदार्थ सूक्ष्मजीवशास्त्र क्षयरोग.
संदर्भ : 1. Pelczar, M. T. Reid, R. D. Microbiology, New York, 1958.
2. Waksman, S. A. The Actinomycetes, Vol. I, Baltomore, 1959.
शिंदे, पां. आ.