ॲक्टिनियम : रासायनिक मूलद्रव्य. आवर्त सारणीच्या (रासायनिक मूलद्रव्यांच्या कोष्टकरूपाने केलेल्या विशिष्ट मांडणीच्या) तिसऱ्या गटातील किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर फेकण्याचा गुणधर्म असणारी) व संक्रमणी (दोन आवर्तनाच्या सांध्यावर आढळणारी) धातू. रासायनिक चिन्ह Ac. अणुभार २२७ अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ८९. समस्थानिक (तोच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) दहा, सर्व किरणोत्सर्गी निसर्गात आढळणारा समस्थानिक मुख्यतः २२७ हा असून त्याचा अर्धायुकाल (किरणोत्सर्गी पदार्थाची मूळ क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काल) २७·७ वर्षे आहे. एकूण समस्थानिकांपैकी तोच सर्वांत स्थिर आहे व त्यावरूनच ॲक्टिनाइड श्रेणी (आवर्तसारणीतील ८९ ते १०३ अणुक्रमांकांच्या मूलद्रव्यांची श्रेणी) हे नाव दिलेले आहे. ॲक्टिनियम हे ॲक्टिनाइड श्रेणीतील पहिले व प्रातिनिधिक मूलद्रव्य आहे.
ॲक्टिनियमाचा शोध ए. दब्यर्न यांनी १८९९ मध्ये लावला. हेच मूलद्रव्य गीझेल यांनी स्वतंत्रपणे १९०२ साली लँथॅनम व सिरियम यांच्या ऑक्साइडांपासून वेगळे काढले.
ॲक्टिनियम हे केवळ धन, त्रिसंयुजी [→ संयुजा] असून त्याचे रासायनिक गुणधर्म लँथॅनम श्रेणीतील धन, त्रिसंयुजी मूलद्रव्यांच्या सारखेच असतात. त्यांच्यातील भेद असा की, जटिल आयन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांच्या) निर्मितीत, ॲक्टिनियम हे लँथॅनमी मूलद्रव्यांइतके सहज भाग घेत नाही. ॲक्टिनियमाच्या ज्या धन संयुगांचे परीक्षण झालेले आहे, त्यांची संरचना अनुरूप लँथॅनमाच्या संयुगांशी समाकृतिक (समान स्फटिकाकार असलेली) असल्याचे आढळून आले आहे. ॲक्टिनियम (मुख्यतः २२७) हे युरेनियमाच्या खनिजात अत्यल्प प्रमाणात असते.
ॲक्टिनियमाचा आयन वर्णहीन असतो. ॲक्टिनियमाचे ऑक्साइड (Ac2O3), फ्ल्युओराइड (AcF3), ब्रोमाइड (AcBr3), क्लोराइड (AcCl3) तसेच फॉस्फेट, ऑक्झॅलेट इ. संयुगे व पोटॅशियम सल्फेटयुक्त द्विलवण (दोन लवणांच्या अणुसंयोगापासून तयार झालेले लवण) ही तयार करण्यात आली आहेत. सल्फाइडाखेरीज याची सर्व संयुगे पांढरी असतात.
पहा : युरोनियमोत्तर मूलद्रव्ये.
संदर्भ : Thorpe, T. F. Whiteley, M. A. Thorpe’s Dictionary of Applied Chemistry, Vol. I, London, 1966.
क्षीरसागर, अनुपमा, अ.