अँफिऑक्सस : कॉर्डेटा संघातील सेफॅलोकॉर्डेटा उपसंघात या प्राण्याचा समावेश होतो. याचे प्राणिशास्त्रीय नाव ब्रँक्रिओस्टोमा लॅन्सिओलेटम आहे. जगाच्या उपसमशीतोष्ण आणि उष्ण प्रदेशांत समुद्रतीरावरील उथळ पाण्यात अथवा रेताड पुळणात तो आढळतो. तो लहान माशासारखा दिसतो. त्याची लांबी ५ ते ८ सेंमी. असते दक्षिण भारतात आढळणारी जाती मात्र १५ सेंमी. लांब असते. हा नेहमी वाळूत बीळ करून राहतो, पण तोंडाकडचे टोक नेहमी वाळूच्या वर पाण्यात असते रात्री बीळ सोडून तो पाण्यात इकडेतिकडे पोहत असतो आणि पहाटे पुन्हा वाळूत शिरतो. गाळातले जैव पदार्थ आणि लहान प्राणी याचे भक्ष्य होय.
शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असते डोके नसते मुख अग्र टोकाजवळ, मुखछदामधून (मुखावरील झाकणामधून) अधर पृष्ठावर उघडते मुखाभोवती संस्पर्शकांसारखे रोम (आखूड, ताठ केस) असतात. शरीरावर एक पृष्ठीय मध्य, एक अधर मध्य आणि एक शेपटावर असे तीन पक्ष (पर) असतात. अधरपृष्ठावर पुढच्या बाजूस दोन अनुपार्श्वक (बाजूवरून गेलेल्या) वळ्या असतात. त्यांच्या मागे अलिंदछिद्र [घशाच्या (ग्रसनीच्या) भोवतालच्या पोकळीचे बाहेर उघडणारे द्वार] असते. पुच्छपक्षाच्या बुडाशी डाव्या बाजूला गुदद्वार असते. शरीराचे समखंडन झालेले (सारखे भाग पडलेले) असून स्नायूंचे खंडविभाग अथवा आदिस्नायुखंड देहभित्तीवर स्पष्ट दिसतात.
शरीराच्या वरच्या भागात पुढच्या टोकापासून मागच्यापर्यंत पृष्ठरज्जू (अगदी खालच्या दर्जाच्या पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीराच्या वरच्या भागात असणारा लवचीक आधार-अक्ष किंवा कणा) असते आणि तिच्या वर पोकळ तंत्रिकारज्जू (जाड मज्जातंतू) असते. या पोकळीचा अग्रभाग थोडासा विस्तृत झालेला असून तो मेंदूचे आद्यरूप दर्शवितो. संवेदी (मेंदूला संदेश पोहोचविणाऱ्या) आणि प्रेरक (मेंदूपासून संदेश नेणाऱ्या) तंत्रिका असतात.
मुखछदाच्या आतल्या पृष्ठावर असणाऱ्या पक्ष्माभिकामय (हालचाल करणाऱ्या केसांसारख्या बारीक तंतूंनी युक्त असलेल्या) पट्टांमुळे (चक्रांगांमुळे, वाटोळ्या अंगांमुळे) पाणी मुखात शिरते. मुखाला लागूनच पातळ गुंठिका (पडदा) असून तिच्यावर संवेदी (ज्यांच्या योगाने वस्तूंचे ज्ञान होते असे) संस्पर्शक असतात अन्न गाळण्याच्या कामी त्यांचा उपयोग होतो मुख ग्रसनीत (मुखगुहेच्या लगेच मागे असणार्या अन्ननलिकेच्या अग्रभागात) उघडते ग्रसनीच्या पार्श्विक (बाजूच्या) भित्तींवर क्लोम-दरणे (कल्ल्यांच्या फटी) असून ती अलिंदगुहेत (ग्रसनीच्या भोवतालच्या पोकळीत) उघडतात. ग्रसनीच्या तळावर एक पक्ष्माभिकामय खातिका (खाच)— एंडोस्टाइल—असून तिच्यातून श्लेष्मा (एक प्रकारचा गिळगिळीत चिकट पदार्थ) स्रवतो. अन्नाचे कण श्लेष्म्यात गुंततात आणि पक्ष्माभिकांच्या (हालचाल करणाऱ्या केसांसारख्या बारीक तंतूंच्या) हालचालींमुळे हा गुंताडा आंत्रात (आतड्यात) जातो व तेथे अन्नाचे पचन होते. आंत्रापासून यकृत-अंधनाल (बंद नळीसारखे यकृत) निघतो. श्वसन आणि रुधिर-परिवहन (शरीरात रक्त फिरण्याची क्रिया) माशांप्रमाणेच असते पण हृदय नसते.
अँफिऑक्सस पृथग्लिंगी (लिंगे वेगवेगळी असलेला) आहे. नराच्या अथवा मादीच्या जननग्रंथी (शुक्राणू किंवा अंडाणू उत्पन्न करणारे भाग) गाठाळ असतात. पक्व जननकोशिका जनन ग्रंथींमधून अलिंदगुहेत जातात आणि अलिंदछिद्रामधून शरीराबाहेर पडतात. निषेचन (शुक्राणू व अंडाणू यांचा संयोग) पाण्यात होते. या प्राण्यांचा विणीचा हंगाम उन्हाळ्याच्या सुरुवातीस असतो.
कर्वे, ज. नी.