ॲटॅकॅमाइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, फलकांवर उभ्या रेखा असलेले कृश प्रचिन [→ स्फटिकविज्ञान]. स्फटिकांची गुंतागुंत झालेले पुंज किंवा तंतुमय पुंज व वाळूसारखे कणही आढळतात. पाटन : (010) उत्कृष्ट [→ पाटन]. कठिनता ३–३·५. वि. गु. ३·७७. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक हिऱ्यासारखी, काचेसारखी. रंग पाचूसारखा किंवा भडक किंवा काळसर हिरवा. कस सफरचंदी हिरवा. रा. सं. CuCl2·3Cu(OH)2. वाळवंटी हवामानात मॅलॅकाइट, क्युप्राइट यांसारख्या तांब्याच्या धातुपाषाणांच्या (कच्च्या तांब्याच्या) ⇨ऑक्सिडीभवनाने हे तयार झालेले असते. हे तांब्याचा गौण धातुपाषाण आहे. नाव चिलीतील ‘ॲटॅकॅमा’ वाळवंटात प्रथम आढळल्यावरून दिले गेले.
ठाकूर, अ. ना.