अँपिअर (आंपेअर), आंद्रे मारी : (२२ जानेवारी १७७५ – १० जून १८३६). फ्रेंच भौतिकी विज्ञ व गणिती. विद्युत् शास्त्रात महत्त्वाचे संशोधन. त्यांचा जन्म लीआँजवळील पॉलिमिया येथे झाला. १८०१ मध्ये ते बोर्ग येथे भौतिकी व रसायनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक व नंतर १८०९ मध्ये पॅरिसच्या एकोल पॉलिटेक्‍निकमध्ये गणिताचे प्राध्यापक होते.

तारेमधून वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहामुळे चुंबकसूचीचे विचलन होते, या ओर्स्टेड यांच्या निरीक्षणासंबंधी अँपिअर यांना १८२० मध्ये माहिती मिळाली. त्यानंतर एका आठवड्याच्या आतच त्यांनी फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसला या व अशाच प्रकारच्या आविष्कारासंबंधीच्या विषयावर परिपूर्ण माहिती सादर केली. अँपिअर यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे विद्युत् प्रवाह संवाहकांतील अनुभवास येणाऱ्या यांत्रिक प्रेरणांसंबंधीचे त्यांनी मांडलेले दोन नियम होत. या संशोधनामुळेच विद्युत् प्रवाह-दर्शक व -मापक असे ‘एस्टॅटिक गॅल्व्हानोमीटर’ हे महत्त्वाचे उपकरण तयार होऊ शकले. गणितातील आंशिक ⇨अवकल समीकरणांसंबंधीही त्यांनी संशोधन केले होते. अँपिअर यांच्या सन्मानार्थ विद्युत् प्रवाहाच्या व्यावहारिक (मीटर-किलोग्रॅम-सेकंद पद्धतीतील) एककाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे. मार्से येथे ते मृत्यू पावले.

भदे, व. ग.