ॲझो संयुगे : ज्यांच्या संरचनेत -N=N- हा गट असून त्या गटाच्या दोन्ही टोकांस एकेक हायड्रोकार्बनी मूलक (निरनिराळ्या विक्रियांत स्थिर राहणारा पण सामान्यत: स्वतंत्र अस्तित्व नसलेला अणुगट) जोडलेला असतो, अशा कार्बनी संयुगांचा एक वर्ग. त्यांचे सर्वसामान्य सूत्र R-N=N-R’ असे असते. या सूत्रातील R व R’ म्हणजे एखादा अल्किल किंवा ॲरिल गट असतो. -N=N- या गटाला ‘ॲझो-गट’ म्हणतात. ‘ॲझोट’ या नायट्रोजनाच्या फ्रेंच भाषेतील जुन्या नावाचा संक्षेप करून ‘ॲझो’ हे नाव आलेले आहे. ॲझो संयुगांची संरचना ⇨डायाझो संयुगांहून भिन्न असते.
ॲझोमिथेन (CH3-N=N-CH3) हे केवळ अल्किल गट असणाऱ्या संयुगांचे म्हणजे ॲसिफॅटिक ॲझो संयुगांचे व ॲझोबेंझीन (C6H5-N=N-C6H5) हे केवळ ॲरिल गट असलेल्या म्हणजे ॲरोमॅटिक ॲझो संयुगांचे उदाहरण होय. एक गट ॲरिल व दुसरा अल्किल अशी, बेंझीन ॲझोएथेना (C6H5-N=N-C2H5) सारखी मिश्र ॲलिफॅटिक ॲरोमॅटिक संयुगेही असतात. वरील प्रकारांपैकी महत्त्वाची म्हणजे ॲरोमॅटिक ॲझो संयुगे होत. ॲलिफॅटिक ॲझो संयुगे किंवा ॲलिफॅटिक-ॲरोमॅटिक मिश्र संयुगे रासायनिक किंवा औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची नाहीत.
ॲरोमॅटिक ॲझो संयुगांपैकी सर्वांत साधे पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ॲझोबेंझीन होय. सर्व ॲझो-रंजक द्रव्ये त्याच्यापासूनच तयार करतात. ते नारिंगी लालसर असून पातळ पत्रीसारखे असते. वितळबिंदू ६८० से., अपघटन (मूळ रेणूचे तुकडे) न होता ते २९५०से. तपमानास उकळते. पाण्यात जवळजवळ अविद्राव्य (न विरघळणारे), परंतु कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) सहज विरघळते. ॲझोबेंझिनाची विपक्ष (रेणूतील अणू वा अणुगट द्विबंधाच्या विरुद्ध दिशांना असलेले, ट्रान्स) व समपक्ष (द्विबंधाच्या एकाच बाजूला असलेले, सीस) अशी दोन त्रिमितीय स्वरूपे [→ त्रिमितीय रसायनशास्त्र] असून त्यांपैकी विपक्ष स्वरूप हे अधिक स्थिर आहे. विपक्ष-ॲझोबेंझिनाचा विद्राव जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील) प्रकाशात काही काळ राहू दिल्यास, त्याच्या काही अंशाचे समपक्ष स्वरूपात रूपांतर होते. रूपांतराने तयार झालेल्या समपक्षाचे मान विद्रावकानुसार १५ ते ४०% असते (हार्ट्ली-१९३८). विपक्ष व समपक्ष ॲझोबेंझिनांची विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) भिन्न असल्यामुळे पाणी व इतर विद्रावक वापरून किंवा ⇨वर्णलेखन पद्धती वापरून ती वेगळी करता येतात. ॲझोबेंझिनाचे व्यापारी उत्पादन हायड्रॅझोबेंझिनाच्या अल्कली व अल्कोहॉलयुक्त विद्रावातून हवा जाऊन देऊन व त्यायोगे ऑक्सिडीकरण [→ऑक्सिडीभवन] करून करतात.
C6H5–NH–NH–C6H5 |
+ |
O2 |
→ |
C6H5–N=N–C6H5 |
+ |
H2O2 |
हायड्रॅझोबेंझीन |
ऑक्सिजन |
ॲझोबेंझीन |
हायड्रोजन पेरॉक्साइड |
ही विक्रिया हायड्रोजन पेरॉक्साइड तयार करण्यासाठी वापरता येण्यासारखी आहे.
रंजकद्रव्यांच्या उत्पादनात ॲझो संयुगांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. रंजक म्हणून उपयोग होण्यासाठी त्यांचे अनुजात (एका संयुगापासून तयार केलेली दुसरी संयुगे) तयार करावे लागतात. ॲरोमॅटिक ॲझो संयुगांतील हायड्रोजन अणूंचे हायड्रॉक्सी व ॲमिनो गटांनी व कित्येकदा वरील गट व सल्फॉनिक व कार्बॉक्सी गट यांनी प्रतिष्ठापन (संयुगातील एक अणू काढून त्या ठिकाणी दुसरा ठेवणे) करून रंजकद्रव्ये बनविली जातात. हायड्रॉक्सी व ॲमिनो गटांची भर पडून होणाऱ्या संयुगांचा रंग ॲझोबेंझिनापेक्षा गडद होतो. अशी भर घालत राहून संयुगाचे रेणू अधिकाधिक जटिल करीत गेल्यास फिकट पिवळ्या रंगापासून गडद काळ्या रंगापर्यंतची रंजकद्रव्ये तयार करता येतात.
पहा : रंजक व रंजकद्रव्ये.
संदर्भ : Fieser, L. F. Fieser, M. Organic Chemistry, Bombay, 1962.
मिठारी, भू. चिं.
“