ॲक्सीनाइट: खनिज. स्फटिक त्रिनताक्ष [→ स्फटिकविज्ञान], विविध आकाराचे पण चापट आणि धारदार कडा असणारे. एकेकटे स्फटिक, स्फटिकांचे पुंज, पत्रित (पापुद्र्यांप्रमाणे) व पुष्कळदा वाकलेल्या पत्रांचे पुंज किंवा कणमय पुंज व संपुंजित राशी आढळतात. पाटन : (010) स्पष्ट [→ पाटन]. भंजन शंखाभ. ठिसूळ. कठिनता ६·५-७. वि.गु. ३·२४-३·२९. दुधी काचेप्रमाणे पारभासी ते पारदर्शक. चमक काचेसारखी. रंग लवंगेसारखा उदी, जांभळा, करडा, हिरवा, पिवळा. कस रंगहीन [→ खनिजविज्ञान]. रा. सं. कमीअधिक कॅल्शियम, मँगॅनीज व फेरस लोह असलेले सजल ॲल्युमिनियम बोरोसिलिकेट, Ca2(Fe,Mn)Al2(BO3)(Si4O12)OH. उत्ताप विद्युत् (स्फटिकाचे तापमान योग्य रीत्या बदलले असता त्याच्या विविध भागांवर धन व ऋण विद्युत् भार) निर्माण करू शकणारे. सामान्य खनिजांपैकी त्रिनताक्ष गटात असणारे ॲक्सीनाइट हे एकच खनिज आहे. ग्रॅनाइटामधील पोकळ्यांत, विशेषतः त्यांच्या भोवतालच्या व त्यांचा संस्पर्शी (स्पर्शाने वा निकट असल्याने होणारा) परिणाम झालेल्या खडकांतील पोकळ्यांत ॲक्सीनाइट आढळते. स्फटिकांच्या कडा कुऱ्हाडीच्या धारेप्रमाणे असतात, म्हणून ‘कुऱ्हाड’या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून ‘ॲक्सीनाइट’ हे नाव दिले गेले.

ठाकूर, अ. ना.