अपरापोषिका : सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी आणि स्तनी या प्राण्यांच्या भ्रूणाच्या बाह्यकलांपैकी मधल्या कलेला अपरापोषिका हे नाव दिलेले आहे. हिच्या बाहेरच्या बाजूला जरायू (कला) आणि आतल्या बाजूला उल्ब (कला) आणि पीतक-कोश (ज्यामध्ये पोषक अजैव द्रव्य असेल असा कोश) असतो. अंडाणू व शुक्राणू यांचा संयोग झालेल्या अंड्यापासून वाढ होत असलेल्या जीवाच्या पूर्व अवस्थेला भ्रूण म्हणतात आणि भ्रूणाच्या भोवती उत्पन्न होणाऱ्या पातळ पापुद्र्यांना कला म्हणतात. सरीसृप, पक्षी आणि स्तनी या प्राण्यांच्या भ्रूणांचे अपरापोषिका हे एक महत्त्वाचे अंग आहे. अपरापोषिका पश्चांत्राच्या (आतड्याच्या मागच्या भागाच्या) खालच्या भागापासून बाहेर वाढणाऱ्या एका लहान पिशवीच्या स्वरूपात उत्पन्न होते ही पिशवी एखाद्या फुग्याप्रमाणे मोठी होऊन भ्रूणाबाहेर पडते आणि सगळ्या भ्रूणबाह्य गुहेत (पोकळीत) पसरते. अपरापोषिकेत एक द्रव पदार्थ भरलेला असतो. अपरापोषिकेला केशिकांच्या (अतिशय बारिक रक्तवाहिन्यांच्या) जाळ्या – मार्फत रक्ताचा भरपूर पुरवठा होतो. यामुळे सरीसृप, पक्षी आणि स्तनिवर्गातील अंडज स्तनींमध्ये (अंडी घालणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये) ही श्वसनाचे कार्य करते. अपरापोषिका दोन स्तरांची बनलेली असते. आतील स्तर अंत:स्तर-कोशिकांचा असून तो भ्रूणाच्या आंत्राच्या (आतड्याच्या) अंतस्त्वचेशी अखंड असतो. बाहेरचा स्तर मध्यस्तर-कोशिकांचा असून तो भ्रूणाच्या अंतरंग-मध्यस्तराशी संलग्न असतो. नाळेतून गेलेल्या एका बारीक वृतांने (देठाने) अपरापोषिका पश्चांत्राला जोडलेली असते [ → भ्रूणविज्ञान].

काही काळानंतर अपरापोषिकेचे तिच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या जरायूशी सायुज्यन (एकीकरण) होऊन एक संयुक्त जरायु- अपरापोषिका तयार होते. सरीसृप आणि पक्षी यांत जरायु-अपरापोषिका कवच-कलांच्या (कवचाच्या आत त्याला चिकटून असणाऱ्या कलांच्या) लगेच खाली असते. या जरायु- -अपरापोषिका कोशिकांच्या जाळ्यामधून भरपूर रक्त मिळते म्हणून ती एक महत्त्वाचे श्वसनांग आणि उत्सर्जनांग बनते. काही स्तनी, सरीसृप आणि पक्षी यांमध्ये अपरापोषिकेच्या गुहिकेचा उपयोग वृक्कांनी मूत्रपिंडांनी) अलग केलेले उत्सर्ग-पदार्थ (शरीराबाहेर काढून टाकण्यायोग्य निरुपयोगी पदार्थ) साठविण्या -कडे होतो. सरीसृप व पक्षी या दोन वर्गांत अल्ब्युमीन (पांढऱ्या बलकात असणारे प्रथिन) शोषून घेण्याच्या कार्यात अपरापोषिका मदत करते. मनुष्य आणि इतर काही सस्तन प्राण्यांच अपरापोषिका ही एक अवशेषांग (लहान व अपूर्ण वाढ झालेले इंद्रिय) म्हणून असते आणि तिचा ऱ्हास होणेही शक्य असते, तथापि, तिच्या – वरील रक्तवाहिकांशी समजात (उत्पत्ती आणि रचना या बाबतींत साम्य असणाऱ्या वाहिका नाभि-रोहिण्या आणि नाभि-शिरा म्हणून टिकून राहतात आणि भ्रूणाचा अपरेशी (वारेशी) संबंध जोडतात.

अपरास्तनी (वार असणारे स्तनी) प्राण्यांत अपरापोषिका व जरायू यांचे सायुज्यन होते. हीच भ्रूणाची अपरा (वार) होय. या अपरेमुळे भ्रूण व त्याची माता यांच्या रक्ताचा परस्परांशी संबंध येतो. भ्रूणाच्या रक्तद्रव्याची गर्भाशयातील रक्तद्रव्याशी देवघेव होऊ शकते. रक्ताच्या या अन्योन्य देवघेवीमुळे प्रसवपूर्व कालातील पाचन, श्वसन व काही अंशी उत्सर्जन या भ्रूणातील क्रिया सुलभतेने होतात. नाहीतर भ्रूणाची वाढ योग्य प्रकारे झाली नसती. अपरापोषिकेचा भ्रूणाच्या शरीरात असलेला तळचा भाग तसाच राहतो व सर्प, मगर आणि पक्षी हे प्राणी वगळून इतरांत त्याचा मूत्राशय बनतो.

कापडी, रा. सी.