अपघर्षक :(अब्रेझिव्ह). घर्षणाने पृष्ठाची झीज घडवून आणणारा पदार्थ. कोणत्याही वस्तूचा पृष्ठभाग घासून स्वच्छ करणे, गुळगुळीत करणे, त्याच्यावर चकाकी आणणे, पृष्ठ झिजवून त्या वस्तूला इष्ट व अचूक मापाची करणे इ. कामांसाठी अपघर्षक वापरले जातात. उदा., आपण वापरीत असलेल्या कित्येक वस्तू किंवा यंत्रा—उपकरणांचे भाग बनविताना प्रथम त्यांचे स्थूल आकारमान असणाऱ्‍या वस्तू सामान्य हत्यारे वापरून बनविल्या जातात. त्यांचे आकारमान पाहिजे त्यापेक्षा किंचित मोठे व पृष्ठ खडबडीत असते. त्यांच्यापेक्षा अधिक कठीण अशा—उदा., एमरी, वाळू, माती यांसारख्या—एखाद्या पदार्थाने त्यांचे पृष्ठ घासून ते गुळगुळीत करणे व त्या वस्तूंना अचूक मापात इ. कामे केली जातात.

अपघर्षकांच्या अंगी अत्यावश्यक असणारे गुण म्हणजे कठीणपणा व त्याच्या खालोखाल चिवटपणा आणि उच्चतापसहता हे होत. उच्चतापसहता म्हणजे तापमान वाढले असता लिबलिबीत न होता कठीणपणा कायम राहण्याचा गुण होय. अप- घर्षकांची अपघर्षक शक्ती वरील तीन गुणांवर अवलंबून असते. अपघर्षक हे सुट्या कणांच्या स्वरूपात किंवा त्यांचे कण कागदावर किंवा कापडावर चिकटवून किंवा त्यांची चाके करून वापरली जातात. अपघर्षकांच्या कणांचा आकार गोलसर असू नये. तो खडबडीत असावा व घाशीत असताना कण भंग पावले म्हणजे कणांच्या कडा अणुकचीदार होतील असे त्यांचे भंजन (फुटणे) असावे अशा कडांनी त्यांची कर्तनशक्ती (कापण्याची शक्ती) वाढते. अपघर्षक पदार्थांचे कण कोणत्या तरी बंधकाने (वस्तू एकमेकांस चिकटवून ठेवणाऱ्‍या पदार्थाने) एकत्र चिकटवून वापरावयाचे असतील, तर अपघर्षकाप्रमाणेच बंधकाची उच्चतापसहताही लक्षात घ्यावी लागते.

अपघर्षकांचे नैसर्गिक व कृत्रिम असे दोन गट पडतात. निरनिराळे रासायनिक संघटन असलेल्या विविध खनिजांचा व खडकांचा अपघर्षक म्हणून उपयोग केला जातो. हे नैसर्गिक अपघर्षक होत. आता कृत्रिम  अपघर्षकही तयार करण्यात येतात. नैसर्गिक अपघर्षकांत मूलद्रव्ये असण्याचा संभव असतो व त्यांना निर्मल करणे नेहमीच सोपे असते असे नाही उलट कृत्रिम अपघर्षक नियंत्रित परिस्थितीत तयार करता येतात. त्यांना निर्मल करणे, विवक्षित दर्जाचे अपघर्षक मिळवणे व त्यांची प्रतवारी करणे सोपे असते म्हणून त्यांचा उपयोग उत्तरोत्तर वाढत आहे.

नैसर्गिक अपघर्षक :नैसर्गिक अपघर्षकांचे पुढील तीन वर्ग सामान्यत: केले जातात : (१) उच्च प्रतीचे—यांच्यात कठीणपणाच्या उतरत्या क्रमाने हिरा, कुरूविंद, एमरी व गार्नेट यांचा समावेश होतो. (२) सिलिकामय-यांच्यात निरनिराळ्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्‍या कठीण किंवा नरम अशा, किंवा घासून चकाकी आणण्यासाठी व बर्फ करण्यासाठी (अपघर्षकयुक्त कापडाने घासण्यासाठी) वापरल्या जाणाऱ्या खनिज पदार्थांचा समावेश होतो.

हिरा : हिऱ्‍याइतके कठीण (कठिनता—१०) व प्रभावी असे दुसरे अपघर्षक नाही. हिरा अतिशय महाग असतो ही त्याच्या वापरातील मुख्य अडचण असते. दर वर्षी  खाणीतून काढल्या जाणाऱ्‍या हिऱ्‍यापैकी सु. वजनी २५ टक्के इतक्या हिऱ्‍यांचाच रत्ने म्हणून उपयोग होतो. इतरांत कोणता ना कोणता दोष असल्यामुळे रत्ने म्हणून ते निरूपयोगी असतात [→हिरा रत्ने]. त्यांचा उपयोग उद्योगधंद्यांत व मुख्यत: अपघर्षक म्हणून होतो. त्यांना ‘औद्योगिक हिरे’ म्हणतात. औद्योगिक हिऱ्‍यांचे पुढील दोन प्रकार आहेत :

(१)कार्बोनॅडो किंवा काळा हिरा : याचे गोटे व खडे ब्राझीलातील बाहिया प्रांतातल्या गाळांच्या खडकात सापडतात. खनिज तेलाचे व धातुपाषाणांचे साठे शोधून काढण्यासाठी जमिनीत खोल भोके पाडताना जी गिरमिटे वापरतात त्यांचे फाळ व धातूंची तार काढण्याचे साचे कार्बोनॅडोचे असतात. अपघर्षक चाकांना इष्ट आकार देऊन ती अचूक मापाची करण्यासाठी अपघर्षक म्हणून कार्बोनॅडोचा उपयोग केला जातो. विमानांच्या व मोटारींच्या एंजिनांचे व इतर कित्येक यंत्रा-उपकरणांचे काही भाग अचूक मापाचे करण्यासाठी घासणे, भोके पाडणे, कापणे इ. क्रिया अचूक प्रमाणात व्हाव्या लागतात. हिऱ्‍याचे पीठ किंवा कण धारेवर चिकटविलेली हत्यारे वापरून ती कामे अचूक व थोड्या वेळात होत असल्यामुळे हिरे महाग असले तरी ते वापरून वस्तू बनविणे स्वस्तच पडते. त्यामुळे हिऱ्‍याची मागणी अतिशय वाढलेली आहे व युद्धकालात तर ती प्रचंड असते.

(२)बोर्ट : रत्ने म्हणून निरुपयोगी असणाऱ्‍या हिऱ्‍यांचे तुकडे, कपच्या, खडे, कण इत्यादींचा समावेश ‘बोर्ट’ या संज्ञेत होतो. बोर्ट मुख्यत: काँगो, गोल्डकोस्ट, सिएरा लिओन व दक्षिण आफ्रिका येथे मिळते. बोर्टाच्या पिठाचा किंवा पुडीचा उपयोग रत्नांचा पैलू पाडण्यासाठी, खनिजांची व कार्बाइडांची पृष्ठे घासण्यासाठी, विमाने व मोटारी यांच्या एंजिनांच्या भागांची पृष्ठे घासून त्यांना अचूक मापात आणण्यासाठी केला जातो. भोके पाडण्याच्या हत्याराच्या फाळाच्या टोकांवर व करवतींच्या धारांवर चिकटविण्यासाठी बोर्ट वापरले जाते. कार्बोनॅडोपेक्षा बोर्ट स्वस्त असल्यामुळे शक्य तेथे कार्बोनॅडोऐवजी बोर्टाचाच वापर केला जातो.

कुरुविंद : (कठिनता—९). रा. सं. AI2O3 हा सुट्या कणांच्या स्वरूपात किंवा त्याचे कण कागदावर वा कापडावर चिकटवून किंवा त्यांची चाके बनवून वापरला जातो. याच्या ऐवजी कृत्रिम कार्बोरंडमाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. नील व माणिक (लाल) हे कुरुविंदाचे प्रकार रत्ने म्हणून वापरतात. औद्योगिक कुरुविंदाचे साठे दक्षिण आफ्रिकेत, कॅनडात, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत, भारतात, मॅलॅगॅसीत व रशियात आहेत [→कुरुविंद].

एमरी : हे कुरुविंद, मॅग्नेटाइट, थोडे हेमॅटाइट व स्पिनेल यांच्या मिश्रणाच्या खडकाचे नाव होय. या खडकातील उच्च कठीणपणा असणारा घटक म्हणजे कुरुविंद होय. त्याचे कण उच्चतापसह असतात व दाब पडल्यावर हळूहळू भंग पावतात. एखाद्या एमरीचा कठीणपणा व कर्तनशक्ती हे गुण तिच्यात किती कुरुविंद आहे यावर अवलंबून असतात. एमरीचे सुटे कण किंवा तिचे कण चिकटवून तयार केलेले कागद वा कापड किंवा तिच्यापासून केलेली चाके अपघर्षक म्हणून वापरली जातात. चांगली एमरी ग्रीसमधून व तिच्यापेक्षा किंचित कमी प्रतीची तुर्कस्तानातून येते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एमरी बरीच नरम असते. [→एमरी].


गार्नेट :(कठिनता—८). खनिजांच्या एका गटाचे नाव. या गटात सारखेच भौतिक गुणधर्म पण निरनिराळे रासायनिक संघटन असणाऱ्‍या अनेक जाती आहेत. त्यांपैकी आल्मंडाइट या सामान्य व क्वचित अँड्राडाइट व रोडोलाइट या इतर जातींचा अपघर्षक म्हणून उपयोग केला जातो. चुनडी व पुलकमणी ही रत्ने या गटातली आहेत. गार्नेटही कित्येक रूपांतरित व क्वचित इतर खडकांत कमीअधिक संख्येने विखुरलेले आढळतात. त्यांचे खडे एकूण खडकाच्या कमीत कमी दहा टक्के असले व ते पावट्यापेक्षा मोठे असले तरच त्यांचा उपयोग फायदेशीर होतो.

तावदानी काचांची व शोभेच्या दगडांची पृष्ठे सपाट व गुळगुळीत करण्यासाठी गार्नेटाचे सुटे कण वापरले जातात. गार्नेटाचे कण चिकटविलेले कागद किंवा कापड ही पृष्ठ घासण्यासाठी, विशेषत: कठीण लाकडाचे पृष्ठ घासण्यासाठी, वापरली जातात. त्यांची कर्तनशक्ती वाळू-कागदाच्या दुप्पट ते सहापट असते. रबर, सेल्युलॉइड, चामडे इत्यादींच्या वस्तूंच्या व रेशमी किंवा फेल्टहॅटांच्या पृष्ठावर अखेरचा हात फिरविण्यासाठी व तांब्या-पितळेच्या वस्तूंवर किंवा मोटारींच्या बॉडीवर जे रंग किंवा व्हार्निशे दिलेली असतात, ती घासून त्यांचा लेप सर्वत्र सारखा करण्यासाठी गार्नेट-कागद वापरले जातात. गार्नेटाच्या जागतिक उत्पादनापैकी जवळ-जवळ सर्व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत होते. स्पेन, भारत, कॅनडा व मॅलॅगॅसी यांच्यातही गार्नेटाच्या खाणी आहेत पण त्यांचे उत्पादन क्षुल्लक आहे. दक्षिण आंध्रात, कर्नाटकात व तमिळनाडूत गार्नेट असणारे खडक आहेत [→गार्नेट गट].

सिलिकामय अपघर्षक : यांच्यात वाळू, वालुकाश्म, गारेचे गोटे, फ्लिंट, डायाटमी माती (डायाटम नावाच्या शैवालांनी युक्त असलेली माती), ट्रिपोलीची माती इत्यादींचा समावेश होतो. त्यांपैकी शेवटचे तीन भारतात सापडत नाहीत. पमीस हे सिलिकेचे नसून सिलिकेटांचे बनलेले असते पण त्याचा समावेश याच गटात करतात. त्याचे साठेही भारतात नाहीत. वालुकाश्मांपासून धार लावण्याचे दगड, चाके व जाती तयार करतात. क्वॉर्ट्‍झ व फ्लिंट यांच्या गोट्यांचा उपयोग दळण्याच्या यंत्रांत व त्यांच्या वाळूचा उपयोग वाळू-कागद व कापड करण्यासाठी होतो. दंतमंजन व धातूंचे पॉलीश करण्यासाठी डायाटमी माती वापरतात. पृष्ठ घासून पूर्वीचा रंग किंवा व्हार्निश काढून टाकण्यासाठी पमीसाचा उपयोग करतात.

संकीर्ण नैसर्गिक अपघर्षक : नरम अपघर्षकांत कॅल्साइट, चिनी माती, ज्वालामुखी राख, चॉक, डोलोमाइट, फेल्स्पार, मॅग्नेसाइट, रूज (काव), संगजिरे इत्यादींचा समावेश होतो. धातूंचे किंवा इतर वस्तूंचे पृष्ठ घासून साफ करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

कृत्रिमअपघर्षक : यांच्यात सिलिकॉन कार्बाइड (SiC), वितळवून घन केलेली ॲल्युमिना म्हणजे  ∝-ॲल्युमिना (Al2O3)व बोरॉन कार्बाइड (B4C)यांचासमावेश होतो. यांच्यापैकी पहिल्या दोहोंचावापर पुष्कळ अधिक प्रमाणात होतो.

  

कृत्रिम हिरे बनविणेही आता साध्य झालेले आहे व लौकरच त्यांचे व्यापारी उत्पादन होऊ लागेल. कठीणपणा व वितळबिंदूचे मान यांचा परस्परसंबंध असतो व उच्चतापसह पदार्थ सामान्यत: बरेच कठीण असतात. पुष्कळ उच्चतापसह पदार्थांचा, उदा., कित्येक कार्बाइडे, नायट्राइडे व सेर्मेटे यांचा, अपघर्षक म्हणून उपयोग करता येण्यासारखा आहे, पण उच्चतापसह वस्तू बनविण्यासाठीच ती वापरली जातात.

सिलिकॉन  कार्बाइड :ग्रॅफाइटाची विद्युत् अग्रे असलेल्या विजेच्या भट्टीत वाळू, कोक व लाकडी भुस्सा यांचे मिश्रण २,५०० से. इतके तापवून हे तयार करतात. साधी काळसर व हिरवी अशा याच्या दोन जाती मिळतात. हिरवी जात अधिक निर्मल व दुधी काचेप्रमाणे पारभासी असते. काचेच्या, ग्रॅनाइटाच्या, तापवून एकाएकी थंड केलेल्या लोखंडाच्या व कार्बाइड चिकटविलेल्या वस्तू ॲल्युमिनियम, रबर व चामडे इत्यादींच्या म्हणजे कठिण, ठिसूळ, नरम, चिवट इ. अनेक वस्तू घासण्यासाठी सिलिकॉन कार्बाइडापासून तयार केलेल्या चाकांचा वापर केला जातो.

∝-ॲल्युमिना: (कठिनता—९). पाण्याने थंड ठेवलेल्या धातूच्या पात्राचे जिच्या भोवती आवरण आहे अशा विजेच्या चाप-भट्टीत, सु. २,२५०से. इतक्या तापमानात बॉक्साइट किंवा निर्मल केलेली  ॲल्युमिना वितळवून व गोठवून अपघर्षक ॲल्युमिना तयार करतात. ती सिलिकॉन कार्बाइडाइतकी कठीण नसली तरी अधिक चिवट व टिकाऊ असते. खडबडीत पृष्ठे घासण्यासाठी केवळ  ∝-ॲल्युमिनाचे कण किंवा काचीकृत बंधकांच्या (व्हिट्रियस बाँडेड) जोडीने, वापरण्यास अगदी योग्य असतात.

बोरॉन कार्बाइड :याचा कठीणपणा सिलिकॉन कार्बाइडापेक्षा अधिक व हिऱ्‍यापेक्षा कमी असतो. निर्मल बोरिक ऑक्साइड (B2O3), पेट्रोलियम कोक व थोडे रॉकेल यांचे मिश्रण हवाबंद अशा व ग्रॅफाइटाचा रोध असलेल्या विजेच्या भट्टीत सु. २,५००से. पर्यंत तापवून बोरॉन कार्बाइड तयार करतात. त्याच्या पुडींचा उपयोग सिमेंटेड टंगस्टनाच्या किंवा टँटॅलम कार्बाइडाच्या वस्तू कापण्याच्या व त्यांचे ‘लॅपिंग’ (कापलेला भाग सफाईदार करण्याची क्रिया) करण्याच्या हत्यारात केला जातो. रत्नांना पैलू पाडण्यासाठी व रत्ने किंवा दगड कपण्यासाठीही बोरॉन कार्बाइडाची पूड वापरतात. २,४५० से. ला बोरॉन कार्बाइड वितळवून व ते ग्रॅफाइटाच्या साच्यात ओतून आणि उच्च तापमान असताना दाब देऊन ठशाच्या वस्तू तयार करतात. त्या कठीण, लवकर न झिजणाऱ्‍या व टिकाऊ असतात. संपीडित (दाबाखालील) हवेने वाळूचा झोत उडविणाऱ्‍या नळांच्या तोंडांची टोके व गेजांमधील (प्रमाणभूत मापे मोजण्याच्या उपकरणांतील) एकमेकांशी स्पर्श होणारे भाग अशा ओतीव कार्बाइडाचे असतात.

उपयोग : अपघर्षक हे सुट्या कणांच्या किंवा त्यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंच्या स्वरूपात वापरले जातात व त्या वस्तूंचे शेकडो प्रकार आहेत. काम वेगाने व सफाईदार व्हावे म्हणून निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळे व विवक्षित कामांसाठी विवक्षित प्रकार वापरावे लागतात. नैसर्गिक किंवा कृत्रिम अपघर्षकांपैकी कोणते, म्हणजे किती कठीणपणा असणारे, अपघर्षक वापरावयाचे आणि ते सुट्या कणांच्या किंवा त्यांचा लेप असलेल्या कागदाच्या किंवा कापडाच्या किंवा चाकाच्या स्वरूपात वापरावयाचे व त्यांच्या कणांचे आकारमान किती भरड किंवा बारीक असावे, ह्या गोष्टी ठरवाव्या लागतात.

अपघर्षक कुटून मिळालेले चूर्ण निर्मल करून व योग्य त्या मापाच्या चाळणीने चाळून इष्ट आकारमानाचे कण असलेले चूर्ण घेतले जाते. ते नुसतेच किंवा साबणाबरोबर वापरून चकाकी आणण्यासाठी व लॅपिंग किंवा बफिंग (अपघर्षकयुक्त कापडाने घासणे)करण्यासाठी वापरतात.

लेप दिलेले कागद व कापड : हे एमरी, गार्नेट, सिलिकॉन कार्बाइड, वितळवून थिजविलेली ॲल्युमिना, फ्लिंट इत्यादींपैकी एखाद्याचे कण चामड्यापासून केलेल्या सरसाने कागदास किंवा कापडास चिकटवून केलेले असतात. कण चिकटविण्यासाठी काही रेझिनेही वापरली जातात. १२ ते ६०० पर्यंतच्या निरनिराळ्या मापांच्या कमीअधिक भरड कणांचे कागद किंवा कापड बाजारात विकले जाते.

बांधीव चाके : दगड तासून ज्याप्रमाणे जाती करतात , त्याप्रमाणे घडीव अपघर्षक चाके पूर्वी करीत असत. मळलेल्या मातीच्या वस्तू भट्टीत तापवून मडकी किंवा चिनी मातीच्या वस्तू बनवितात त्या पद्धतीने, प्रथम १८७४ साली एमरीची चाके तयार करण्यात आली. तेव्हापासून या पद्धतीने लहानमोठ्या वाटेल त्या आकारमानाची चाके थोड्या वेळात व खर्चात करता येते व त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य झाले. अपघर्षकाचे सुटे कण एकत्र चिकटविण्यासाठी चिकणमाती किंवा इतर पदार्थ वापरले जातात. त्यांना ‘बंधक’ म्हणतात. अपघर्षकाचे कण, बंधक व थोडे पाणी यांचे मिश्रण करून साच्यात घालतात व यंत्राने दाब देऊन त्याला चाकाचा आकार देतात. चाके वाळवून भट्टीत भाजतात. भट्टीतून काढलेल्या चाकांना थोडे घासून पुसून विशेष आयासाविना अखेरचे स्वरूप देता येते. बंधकांचे पुढील मुख्य प्रकार होत :

(१) सिलिकेटी बंधक— अपघर्षकाचे कण व चिकणमाती ही वॉटर ग्लासच्या (सोडियम किंवा पोटॅशियम सिलिकेटाच्या पाण्यातील संहत व दाट विद्रावाच्या) विद्रावात कालवून व ते मिश्रण साच्यात दाबून केलेली  चाके वाळविल्यावर २५० से. तापमानाच्या भट्टीत दोन-तीन दिवस तापवितात. चाकू-सुऱ्‍यांच्या व हत्यारांच्या पात्यांना धार लावण्यासाठी ही चाके वापरतात. (२) काचीकृत बंधक—हा काचेसारखा सर्वांत अधिक वापरला जाणारा प्रकार आहे. चिकणमाती, फेल्स्पार व फ्लिंट यांचे चूर्ण मिसळून केलेल्या मसाल्यात अपघर्षकाचे कण व पाणी मिसळून लगदा तयार करतात. तो साच्यात घालून चाके बनवितात व ती सु. १,३००से. तापमानाच्या भट्टीत भाजतात. भाजण्यामुळे अपघर्षकाचे कण व बंधक यांच्यात खराखुरा रासायनिक बंध तयार होतो असे दिसते. बंधकाच्या मसाल्याचे रासायनिक संघटन व भट्टीत तापविण्याचे कौशल्य यांवर चाकाची प्रत अवलंबून असते. या बंधकावर वातावरणाचा, दमट हवेचा, तेलांचा  व सौम्य अम्लांचा परिणाम होत नाही मात्र तो किंचित ठिसूळ असतो. (३) लाख—वितळलेल्या लाखेत अपघर्षकाचे कण मिसळून तो रस साच्यात ओतून तयार केलेली चाके चाकू-कात्र्यांना आकार देण्यासाठी, त्यांच्या पात्यांना व बिनधोक वस्तऱ्‍यांच्या पात्यांना धार लावण्यासाठी व वस्तूंचे पृष्ठभाग सफाईदार करण्यासाठी वापरतात. (४) रबरी बंधक— अपघर्षकाचे कण, रबर व व्हल्कनीकारक द्रव्ये (रबराला स्थितिस्थापकता, टिकाऊपणा इ. गुणधर्म आणणारी गंधक वा त्यांची संयुगे यांनी युक्त असलेली द्रव्ये) यांचे मिश्रण यांत्रिक लाटण्याने लाटून तक्ते तयार करतात व गोल काप्याने कापून मिळणारी चाके काही काळ तापवितात. कापण्याच्या किंवा करवतण्याच्या कामासाठी ती वापरतात. (५) रेझीन बंधक—संश्लेषणाने तयार केलेल्या काही थोड्या अल्किड गटातल्या रेझिनांचा बंधक म्हणून उपयोग होतो. ते बंधक वापरून चाके करण्याच्या अनेक पद्धती आहेत पण त्या क्लिष्ट आहेत. (६) धातुमय बंधक—सिमेंटेड कार्बाइडी हत्यारे घासण्यासाठी किंवा कापण्यासाठी पृष्ठावर हिरकणीचा लेप असलेली चाके अत्यावश्यक असतात. तांबे व कथिल यांच्या मिश्रणात किंवा पोलादातही चूर्णधातुकर्माच्या [→चूर्णधातुविज्ञान] पद्धतीने हिऱ्‍याचे कण रूतवून ती चाके केली जातात.

 

चिनी मातीची हत्यारे : मातीसारखे पदार्थ व अपघर्षक व धातू यांच्या चूर्णाचे मिश्रण (चिनी मातीच्या वस्तूप्रमाणे) भट्टीत भाजून कर्तक हत्यारेही तयार करण्यात आलेली आहेत व ती धातू घासण्या-कापण्यासाठी वापरली जातात. ती कठीण व उच्चतापसह असल्यामुळे कर्तनाचा वेग, कर्तनाची खोली व कामाची सफाई या बाबतींत ती सामान्य यांत्रिक हत्यारांपेक्षा सरस असतात.

सर्व उद्योगधंद्यांत अनेक कामांसाठी अनेक प्रकारच्या अपघर्षकांचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे अपघर्षकांचे उत्पादन हाच एक प्रचंड उद्योग झालेला आहे. अधिकाधिक कार्यक्षम अपघर्षक शोधून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. शिवाय कच्ची चाके अधिक लौकर परिपक्व करणे, चाके अधिक तापसह करणे, अधिक तापमानाच्या भट्ट्या‍ तयार करणे, पाण्याला अधिक प्रतिरोध करतील अशी चाके बनविणे इ. गोष्टी साध्य करण्याच्या दृष्टीनेही अन्वेषण करण्यात येत आहे.

अपघर्षक तयार करण्याला भारतात नुकतीच सुरूवात झाली आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कार्बोरंडम कंपनी व मुरुगप्पा कंपनी यांनी मिळून भारतात स्थापन केलेल्या क्युमी कंपनीने मद्रास येथे काढलेल्या कारखान्यात १९५५ सालापासून ६०० टन संबद्ध अपघर्षक व ७०,००० रिमे अपघर्षक चिकटविलेले कागद दर वर्षी तयार होऊ लागले. त्यानंतर त्या कंपनीने गुजरातेतील ओखा बंदराजवळ दर वर्षी २०,००० टन कच्चे बॉक्साइट भाजता येईल असा कारखाना व केरळातील कोचीन येथे दर वर्षी ५,४०० टन कणीदारॲल्युमिनियम ऑक्साइड तयार करता येईल असा कारखाना सुरू केला आहे.

संदर्भ : 1. Bateman, A. M. Economic Mineral Deposits, New Delhi, 1960.

           2. C.S.I.R. The Wealth of India, Industrial products, Vol. I, New Delhi, 1957.

           3. Kirk, R. E. Othmer, D. F. Encyclopaedia of Chemical Technology, vol. I, Tokyo, 1947.

 कानिटकर, बा. मो.