अवंतिवर्मन्‌ : (?—? जून ८८३). काश्मीरचा उत्पल वंशातील प्रसिद्ध राजा. ह्याने ८५५ पासून ८८३ पर्यंत राज्य केले. प्रथम अवंतिवर्मन्‌ने राज्यांतर्गत कलह मिटविले. त्याने आक्रमक युद्ध केल्याचे किंवा शेजारचा प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडल्याचे दिसत नाही. अंतर्गत सुव्यवस्था आणि लोककल्याणकारी सुधारणा ह्यांवरच त्याने आपले सर्व लक्ष केंद्रित केलेले दिसते. त्या कालात काश्मीरची जनता वारंवार येणाऱ्या पुरांमुळे आणि दुष्काळाने त्रस्त झाली होती. अवंतिवर्मन्‌च्या सूर्य नावाच्या पंतप्रधानाने डोंगरमाथ्यांवरून गडगडत आलेल्या दगडमातीचे अडथळे काढून टाकून वितस्ता (झेलम) नदीचा प्रवाह नीट वाहता केला झेलम व सिंधू नद्यांच्या संगमाचे स्थळ बदलून त्या परिसरातील पाणथळ जमीन शेती करण्यास योग्य अशी केली नदीच्या कडेने दगडी तट घातले आणि बंधारे घालून कालवे काढले. ह्यामुळे नदीकाठी अनेक खेडी वसली आणि शेतीस प्रोत्साहन मिळाले धान्याचा बिकट प्रश्न सुटला व आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. अवंतिवर्मन्‌ने स्थापत्य, शिल्प इ. कलांस उत्तेजन दिले.⇨अवंतिपूर नावाचे नगर वसविले आणि तेथे अवंतिस्वामी व अवंतीश्वर ही दोन वैष्णव व शैव मंदिरे बांधली. शैवपंथास त्याने विशेष उत्तेजन देऊन त्याचा प्रसार केला. त्याच्या काही मंत्र्यांनीही शिवालये बांधली. इतर पंथीयांना त्याने सहिष्णुतेने वागविले. तो वाङ्मयाचा भोक्ता होता. आनंदवर्धन, मुक्ताकण, शिवस्वामिन् ‌आणि रत्‍नाकर हे कवी आणि भट्टकल्लट हा शैवसंप्रदायाचा तत्त्वज्ञ ह्यांना त्याने राजाश्रय दिला होता. गीतापाठ ऐकत असताना ह्याल मरण आले. मरणापूर्वी त्याने आपल्या सूरवर्मन्‌ ह्या सावत्र भावाची राजपदासाठी (युवराज) निश्चिती केली होती.

देशपांडे, सु. र.