अल्वारेझ, लुई वॉल्टर : (१३ जून १९११— ). अमेरिकन भौतिकी विज्ञ व १९६८च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म सॅन फ्रॉन्सिस्को येथे झाला. १९३६ मध्ये शिकागो विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळविल्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कली येथील शाखेत त्यांची नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धात सूक्ष्मतरंगीय रडारसंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले तसेच अणुबाँब संशोधनातही महत्त्वाचा भाग घेतला. ॲलॅमॉगोर्डो सँड्स येथील पहिल्या अणुबाँबच्या स्फोटाच्या वेळी ते तेथे वैज्ञानिक-निरीक्षक होते.
सुरुवातीस अल्वारेझ यांनी अणुकेंद्रीय भौतिकी व विश्व-किरण (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणारे जटिल व अतिशय भेदक किरण) यांसंबंधी संशोधन केले. विश्व-किरणांबाबतचा पूर्व-पश्चिम परिणाम, ट्रिटियमाचा किरणोत्सर्ग (अणुकेंद्र फुटून त्यातून कण वा किरण बाहेर पडण्याची क्रिया), हीलियम (३) च्या समस्थानिकाची (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्या मूलद्रव्याच्या प्रकाराची, → समस्थानिक) स्थिरता, अणुद्विभंजनातील दीर्घ पल्ल्याचे आल्फा कण इ. महत्त्वाचे शोध त्यांनी लावले. याशिवाय न्यूट्रॉनाच्या चुंबकीय परिबलाचे [→ अणुकेंद्रीय व आणवीय परिबले] त्यांनीच प्रथम मापन केले. त्यांच्या संशोधनामुळे व्हॅन डी ग्रॅफ जनित्रात (व्हॅन डी ग्रॅफ यांनी शोधून काढलेल्या व अतिशय प्रचंड विद्युत् दाब निर्माण करणाऱ्या स्थिर विद्युतीय यंत्रात) उपयुक्त सुधारणा झाल्या. पहिला रैखिक प्रोटॉन वेगवर्धक (प्रोटॉनाचा सरळ रेषेत वेग वाढविणारे उपकरण) बांधण्यात त्यांनी पुढाकार घेतला (१९४५—४७).
अल्वारेझ व त्यांच्या सहकाऱ्यांना १९५४ मध्ये द्रव हायड्रोजनामध्ये मूलकणांचे (प्रोट्रॉन, इलेक्ट्रॉन इ. निरनिराळ्या कणांचे) मार्ग आढळले व त्यानंतर त्यांनी अधिकाधिक मोठ्या आकारमानाच्या द्रव हायड्रोजन बुद्बुद्-कोठ्या (विद्युत् भारित कणांचे मार्ग बुडबुड्यांच्या स्वरूपात दृश्य करणारे एक उपकरण, → कण अभिज्ञातक) तयार केल्या. तसेच त्यांनी बुद्बुद्-कोठीसंबंधीच्या प्रयोगात मापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या नव्या प्रयुक्त्या शोधून काढल्या. या पद्धतीमुळे १०-२२ सेकंदांइतके अत्यल्प आयुष्य असलेल्या कणांचे निरीक्षण करणे शक्य झाले आहे. बहुतेक नवीन मूलकण शोधण्याकरिता या पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे १९६०च्या सुमारास ज्ञात असलेल्या मूलकणांची संख्या ६० वरून १०० वर गेली. या महत्त्वाच्या कार्याकरिता अल्वारेझ यांना नोबेल परितोषिकाचा बहुमान मिळाला. १९४७ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर त्यांची निवड झाली.
भदे, व. ग.